भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 9
English हिंदी ગુજરાતી বাংলা తెలుగు മലയാളം ಕನ್ನಡ தமிழ்
मल्हारराव बोलता-बोलता क्षणभर थांबले. त्यांचा गळा भरून आला होता आणि डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. तेथील सर्व उपस्थितांची जवळपास तशीच परिस्थिती झालेली होती. त्याच खोलीतील मल्हाररावांच्या डाव्या हाताला असलेल्या कोपऱ्यात बसलेल्या तीनही स्त्रियांची स्थिती मात्र फारच वेगळी होती.
पहिली स्त्री म्हणजे एकवीस वर्ष संपवून बाविसावे चालू असलेली जानकीबाई - ‘आद्य हुतात्मा मंगल पांडेसुद्धा बावीस वर्षांचाच होता. मीही बावीस वर्षांचीच आहे. काय सुंदर वाटत असेल नाही, गोळी छातीत घुसताना! भगवंता! माझेही असेच होऊ देत.’
दुसरी स्त्री होती, फडके मास्तरांची पत्नी कमलाबाई. ही पोक्त व अनुभवी स्त्री ‘तिला काय काय करता येईल’ हा विचारच करत होती, परंतु डोके शांत ठेवूनच.
तिसरी स्त्री, गोविंददाजींची कन्या सौ. मंजुळाबाई. तिचे सासरही गावातच होते. हिला एक वर्षाचे एक बाळ होते व ते तिच्या मांडीवरच झोपलेले होते. तिचे वयही बावीसच होते. ही आधीपासूनच गोविंददाजींच्या हाताखाली त्यांच्या सर्व कारस्थानांमध्ये गेली तीन वर्षे सहाय्य करत होती. ती जानकीबाईंची जिवाभावाची मैत्रीण होती. तिचा पती ‘वासुदेव गोविंद` हा रामचंद्र धारपूरकरचा तेवढाच खास मित्र होता व मुंबई ते धारपूरमधील मानवी ब्रिज (पूल) होता. मंजुळाबाईच्या मुलाचे नाव ‘मंगलप्रसाद’ असेच होते - अगदी मुद्दाम ठेवलेले. तिला असेच वाटत होते की मंगल पांडेच तिच्या पोटी जन्माला आला आहे.
एक पाच मिनिटांनंतर वातावरण थोडेसे हलके झाले. संपतरावाने थोडेसे बाचकतच प्रश्न केला, “मल्हारराव! मंगल दिवाकर पांडेने बलिदान केले, ही श्रेष्ठच गोष्ट आहे. परंतु तुम्ही त्याला ‘पहिले बलिदान` का म्हणता? तो नंदकुमारही फासावरच चढविला गेला होता ना?”
मल्हारराव म्हणाले, “नंदकुमारला ब्रिटीश ऑफिसरने कपटवृत्तीचा वापर करून फासावर चढविले होते, हे नक्की; परंतु तो काही स्वातंत्र्यसैनिक नव्हता. तो ब्रिटिशांसाठी भारतीय जनतेकडून टॅक्स गोळा करण्याचे काम करीत असे व त्यातील काही हिस्सा तो भ्रष्ट ब्रिटीश अधिकाऱ्यांना त्यांच्या चैनीसाठी देत असे. एकदा प्रसंगवशात अर्थात पैशाची चणचण असल्यामुळे नंदकुमारने, जमा झालेल्या टॅक्समधील काही हिस्सा स्वतःकडेच ठेवण्यास सुरुवात केली व त्यासाठी त्याला फासावर चढविले गेले.
हे स्वातंत्र्ययुद्धातले बलिदान नव्हते, परंतु ब्रिटिशांच्या हिंसक व क्रूर जुलूमशाहीचे उदाहरण होते. केवळ थोड्याशा पैशांच्या चोरीसाठी फासावर लटकवणे आणि तेसुद्धा ७० वर्षांच्या माणसाला, ही नक्कीच अन्यायाची गोष्ट होती, परंतु बलिदानाची नाही.”
संपतरावनेच परत एक प्रश्न केला, “मंगल पांडेचे बलिदान झाले, त्या जागेवर साधी शिळा तरी ठेवली गेली आहे काय?”
मल्हारराव भगवंताला हात जोडत म्हणाले, “मंगल दिवाकर पांडेच्या बलिदानानंतर अवघ्या एक महिन्याने, त्याच्या एका खास मित्राने ‘धनसिंह गुर्जर’ने त्या जागेवर एक विशिष्ट आकाराचा दगड पुरून, त्याच्या बाजूला एक तुळशीचे रोप लावले. (पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ह्याच ठिकाणी मंगल पांडेचे स्मारक बनविले गेले आहे.)

धनसिंह गुर्जर मेरठमधील ब्रिटीश छावणीतील कोतवालाच्या हुद्यावर होता. त्याच्या हाताखाली ५० सैनिक होते. मंगल पांडेने धनसिंहबरोबर मृत्यूआधी सतत तीन दिवस चर्चा केली होती, परंतु धनसिंह गुर्जरला लेफ्टनंट बॉघने ताबडतोब परत फिरण्याची आज्ञा दिली होती, त्यामुळे त्याला परतणे भाग पडले होते.
धनसिंह गुर्जरकडे त्यावेळेस त्याच्याबरोबर फक्त एकच सैनिक होता व म्हणून तो शांत राहिला होता, परंतु मेरठ छावणीत पोहोचल्यानंतर काही तासातच त्याला ‘बरॅक पोरमध्ये मंगल पांडेने काय केले` हे वृत्त कळले व आतून पेटून उठलेला कोतवाल धनसिंह गुर्जर जोरदारपणे कामास लागला. त्याने एक-एक मनुष्य गोळा करण्यास सुरुवात केली व स्वत:चे पन्नास सैनिक आणि इतर गटांतील पन्नास सैनिक असे शंभर जणांचे छोटे सैन्य तयार केले. ९ एप्रिल १८५७ रोजी मेरठच्या छावणीमध्ये मंगल पांडेच्या फाशीची वार्ता येऊन पोहोचली. छावणीतील जवळपास प्रत्येक सैनिक चिडला होता, परंतु उपयोग काय? त्या दोन हजार सैनिकांपैकी फक्त चाळीस जणांनी धनसिंहच्या गटात सामील होण्याचे धैर्य दाखविले. बाकीचे गप्पच राहिले.
धनसिंह गुर्जरचे एकशेचाळीस सैनिक ह्यांना आपल्याकडील काडतुसे देण्याचे धैर्यही उरलेल्या सैनिकांमधील फक्त तीस-चाळीस जणांकडेच होते, परंतु धनसिंह गुर्जरची तेज:पुंज वाणी हळूहळू इतरांवर परिणाम करू लागली आणि मग बऱ्यापैकी काडतुसे जमा होऊ लागली आणि त्याच्या सैनिकांची संख्याही 250 पर्यंत जाऊन पोहोचली. 21 एप्रिल रोजी ईश्वरीप्रसादलाही फाशी दिले गेले, ही बातमी आल्यावर तर अधिकाधिक सैनिक पुढे येऊ लागले व स्वातंत्र्ययुद्धाची आग जवळपासच्या इतर सात छावण्यांमध्येही पसरली.
आपापसांत बातम्यांची व संदेशांची देवाणघेवाण होऊ लागली. प्रत्येक छावणीला व ठाण्याला त्यांचे-त्यांचे लक्ष्य नेमून दिले गेले
आणि १० मे १८५७ रोजी कोतवाल धनसिंह गुर्जरच्या नेतृत्वाखाली मेरठ छावणीतील ब्रिटीश ऑफिसर्स असलेल्या ठाण्यावर जोरदार हल्ला केला गेला.
धनसिंहच्या ओजस्वी वाणीने व प्रचंड तळमळीमुळे जवळजवळ ६०० सैनिक निरनिराळ्या ठाण्यांहून तातडीने मेरठला पोहोचलेले होते आणि तेही सशस्त्र.
संपूर्ण पश्चिमी उत्तर प्रदेश, दिल्ली, आग्रा, डेहराडून, बिजनौर, पंजाब, राजस्थान, झाशी व महाराष्ट्रापासून क्रांतिकारी विचारांनी भारलेले सामान्य नागरिक कोयता, विळा, करवत, हातोडा, कुऱ्हाड, काठी अशी शस्त्रे घेऊन मेरठला येऊन पोहोचले होते आणि स्वातंत्र्यसंग्रामात सामील झाले होते.
मेरठच्या आसपासच्या गावांतील अक्षरश: हजारो गुर्जर जातीचे गावकरी मिळेल त्या शस्त्रानिशी तेथे जमा झाले होते.
१० मेच्या रात्री ९ वाजता धनसिंह व त्याच्या एका तुकडीने मेरठ छावणीतील ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या इमारतीवर हल्ला चढविला व त्या सर्वांना बंदीवान बनविले. रात्री दोन वाजता मेरठमधील प्रमुख तुरुंग तोडून ८७६ कैद्यांना सोडविले गेले व आपल्यात सामील करून घेतले. त्यानंतर तुरुंगाला आग लावून दिली गेली.
सकाळपर्यंत बावीस ब्रिटीश ऑफिसर्स मारले गेले होते, ८० ब्रिटीश सोल्जर्स मारले गेले होते आणि जवळपास तेवढेच धनसिंहच्या कैदेत होते.
‘शहीद मंगल पांडे अमर रहें’ ही घोषणा देत, साधारण शस्त्र धारण करणाऱ्या, देशभरातून आलेल्या हजारो भारतीय नागरिकांनी मेरठमधील, ब्रिटिशांशी संबंधित अशी प्रत्येक इमारत, कागदपत्र, पोलीस ठाणी व अशाच अनेक गोष्टी अक्षरश: जाळून खाक केल्या होत्या.
त्यानंतर त्यांतील अर्धे सैनिक व अर्धे नागरिक १२ मे रोजी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले व विद्रोह मेरठच्या आजूबाजूच्या गावांमध्येसुद्धा पसरला.
ब्रिटीश कंपनी सरकारने जोरदार प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांकडे सैन्यबळही मोठे होते व शस्त्रास्त्रे तर विपुलही होती आणि अधिक परिणामकारकही होती.
ही विद्रोहाची आग दिल्लीतसुद्धा पसरत चालल्याचे पाहून उत्तरप्रदेश, पंजाब, बंगाल, महाराष्ट्र व पाटणामध्येही अशाच गोष्टी घडत आहेत हे पाहून ब्रिटीश कंपनी सरकार इरेला पेटले. त्यांना त्यांची सत्ता जाण्याचा धोका दिसू लागला.

काही ठिकाणीच ब्रिटीश जिंकत होते, परंतु बहुतेक ठिकाणी स्वातंत्र्यसैनिक जिंकत होते. प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडात तीनच घोषणा होत्या. ‘१) फिरंगी को मार डालो। २) शहीद मंगल पांडे अमर रहें। आणि ३) क्रांतिसूर्य धनसिंह गुर्जर की जय हो।’ तीन महिने ह्या चकमकी चालूच होत्या आणि ब्रिटिशांना चांगलाच मार खावा लागत होता.
शेवटी ब्रिटिशांनी कपटनीतिचा अवलंब करून, धनसिंह त्यावेळेस असलेल्या मेरठजवळील गावावर (पानस्ली अथवा गगोल) दहा मोठ्या तोफांनी अत्यंत क्रूर हल्ला केला आणि ५०० घोडेस्वार शिपाई गावात घुसून कत्तल करू लागले. अक्षरश: हजारो पुरुष व स्त्रिया कापले गेले आणि उरलेल्यांना फाशी दिले गेले आणि तेसुद्धा प्रत्येक चौकाचौकात.
धनसिंह गुर्जर कोतवाल येथेच शहीद झाला व तेसुद्धा जवळजवळ शंभर ब्रिटीश सैनिकांना ठार मारूनच.
ह्या गावामध्येच धनसिंह गुर्जरला झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा जबरदस्त पाठिंबा असल्याचे पुरावे ब्रिटिशांच्या हाती लागले व एका रात्रीत ब्रिटिशांना गरीब स्वभावाची, असहाय्य, एकाकी विधवा राणी लक्ष्मीबाई प्रचंड धोकादायक वाटू लागली.”

(कथा चालू)
