भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 10

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 10

Previous Article 

English   हिंदी  ગુજરાતી  বাংলা  తెలుగు   മലയാളം   ಕನ್ನಡ  தமிழ்

“ब्रिटिशांचे गुप्तहेर खाते सावध झाले आणि राणी लक्ष्मीबाईच्या झाशी राज्यामध्ये एका आठवड्यामध्ये 50 प्रशिक्षित, भारतीय वंशाचे गुप्तहेर पाठविले गेले. त्यांच्याबरोबर भरपूर धनसंपदा देण्यात आलेली होती. 

झाशीचे संस्थान 30-40 वर्षे आधीपासूनच ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली आलेले होते. झाशीच्या राजांना ब्रिटिशांनी नेमलेल्या स्पेशल ब्रिटीश अधिकाऱ्याच्या संमतीने प्रत्येक कार्य करावे लागत होते. झाशीचे राजे ‌‘गंगाधरराव‌’ हे वयाने पन्नासच्या आसपास होते आणि त्यांची प्रकृतीही ठीक नसायची. अशा परिस्थितीत त्यांचा विवाह तांबे घराण्यातील ‌‘मनकर्णिका‌’ नावाच्या मुलीशी झाला. तेव्हा ती फक्त 8-9 वर्षांची होती. 14 वर्षांची झाल्यानंतर तिला झाशीला आणण्यात आले. एक-दोन वर्षांनंतर तिला सर्व परिस्थितीचा अंदाज नीट येऊ लागला. 

मनकर्णिकेचे विवाहानंतरचे नाव ‌‘लक्ष्मीबाई‌’ असे ठेवले गेले होते. राणी लक्ष्मीबाई लहानपणीच नानासाहेब पेशवे व तात्या टोपे अशा सवंगड्यांबरोबर युद्धाचे खेळ खेळत असे. तिचे खेळतानाचे प्राविण्य पाहून तिच्या वडिलांनी तिला पेशव्यांच्या परवानगीने नानासाहेबांबरोबर युद्धकलेचे शिक्षण मिळू शकेल अशी तजवीज केली होती. 7 ते 14 अशी एकूण सात वर्षे लक्ष्मीबाई युद्धकारणातील व राजकारणातील धडे गिरवत होती. तात्या टोपे व नानासाहेब पेशवे दोघेही लक्ष्मीबाईपेक्षा मोठे असले, तरीदेखील तसे लहानच होते. लक्ष्मीबाई त्या दोघांना राखी बांधत असत.

झाशीमध्ये रुळण्यात दोन वर्षे लागली. त्यानंतर मात्र राणी लक्ष्मीबाई मंदिर दर्शन, शहरातील प्रमुख स्त्रियांच्या भेटीगाठी घेणे, जनतेची गाऱ्हाणी ऐकणे अशी कामे करता करता समाजातील विविध गटांमध्ये मिसळू लागली. राणीच असल्यामुळे तिच्या हुकुमानुसार अगदी सरकारी अधिकाऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला तिला भेटण्यासाठी यावेच लागे.

हळूहळू राणी लक्ष्मीबाईच्या लक्षात येऊ लागले की आपला पती निरनिराळ्या व्याधींनी पीडलेला आहे व तरीदेखील नेटाने राज्यशकट चालवीत आहे. परंतु त्याच्याकडील अधिकार सीमित (लिमिटेड) आहेत. त्यांचे राज्य नावापुरते स्वतंत्र संस्थान आहे. तिच्या पतीला ब्रिटीश कंपनी सरकारने सर्व बाजूंनी जखडून ठेवलेले आहे.

त्यामुळे राज्यात सर्वत्र फिरताना ती लोकमानसाचा नीट वेध घेऊ लागली. तिच्या लक्षात आले की ब्रिटिशांचे मिंधे असणारे, राजा गंगाधररावाच्या फौजेचे अधिकारी ब्रिटिशांच्या बाजूनेच उभे राहणार आहेत व गंगाधररावांची किंवा तिची आज्ञा ऐकणे शक्यच नाही. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या निरनिराळ्या व्यापारांमध्ये सहभागी झालेले व्यापारीसुद्धा कायम ब्रिटिशांचीच साथ देणार आहेत. 

ह्या वास्तवाची जाणीव होताच राणी लक्ष्मीबाईने झाशी राज्यातील शेतकरी, बारा बलुतेदार (गावातील सुतार, कुंभार, लोहार इत्यादि 12 प्रकारचे व्यावसायिक), शेतीकामगार, बांधणी मजूर अशा सामान्य नागरिकांशी साध्या विषयांवर बोलणी करण्यास सुरुवात केली.

तिच्या ओळखी पद्धतशीरपणे वाढविण्यामध्ये तिला तिच्या एका सेविकेचा खूप मोठा उपयोग झाला. तिचे नाव ‌‘झलकारीबाई‌’ असे होते. ती त्या काळात कोळी समजल्या जाणाऱ्या समाजातील स्त्री, राणी लक्ष्मीबाईने बरोबर हेरली. झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईपेक्षा वयाने मोठी होती. परंतु तिला लिहिता-वाचता येत होते आणि राणी लक्ष्मीबाईबरोबर युद्धसराव करण्याची संधी मिळाल्यामुळे तिला युद्धकलाही नीट येऊ लागली होती. झाशीच्या सैन्यातील एका ब्रिटीश सोल्जरला लाच देऊन राणी लक्ष्मीबाईने झलकारीबाईला झाशीच्या तोफखान्यात साफसफाईचे काम मिळवून दिले व त्या नावाखाली त्या ब्रिटीश सार्जंटने झलकारीबाईला तोफ चालविण्याचे व तोफेसाठी लागणाऱ्या दारुगोळ्याचे व इतर साहित्याचे दीड वर्षं प्रशिक्षण दिले. कधीकधी स्वत: राणी लक्ष्मीबाईसुद्धा वेशांतर करून, झलकारीबाईची बहीण बनून त्या विभागात जात असे व तिनेही तोफेमध्ये प्राविण्य मिळविले आणि बंदूक चालविण्यामध्येही.

असे सर्व चालू असताना राणी लक्ष्मीबाई गर्भवती झाली व तिला आरामाचा सल्ला दिला गेला.

ह्या गर्भावस्थेच्या काळाचा फायदा घेऊन लक्ष्मीबाई निरनिराळ्या प्रजाजनांना त्यांच्या घरातील स्त्रियांबरोबर, भेटण्यासाठी म्हणून बोलवू लागली आणि जनमानसाचा तिला नीट अंदाज येऊ लागला.

एके दिवशीच्या संभाषणामध्ये राणी लक्ष्मीबाई झलकारीबाईला एकांतामध्ये म्हणाली, “आपल्या राज्यातील एकही नागरिक सुखी नाही. सर्व जातींचे सामान्य नागरिक व विशेषत: शेतकरी आणि शेतमजूर ब्रिटिशांच्या हस्तक्षेपामुळे अक्षरश: भरडले जात आहेत. काहीतरी करायला हवे. आपण दोघी मिळून राज्यातील बुद्धिमान धाडसी स्त्रियांची एक संघटना स्थापन करूया. ‌‘स्त्रिया अशी काही कामे करतील‌’ असा संशयही ब्रिटीश ऑफिसर्सना येणार नाही.” ह्याबरोबर लगेचच झलकारीबाई कामास लागली आणि ‌‘दुर्गादलाची‌’ स्थापना झाली. ‌‘मोतीबाई‌’ नावाची एक स्त्री युद्धकलेत व गुप्तहेर शास्त्रामध्ये प्रवीण झाली आणि ‌‘मुंदरबेगम‌’ नावाची स्त्री कुस्ती शिकली व राणी लक्ष्मीबाईची अंगरक्षक बनली.

त्याचबरोबर दिवाण रघुनाथसिंग, लालाभाऊ बक्षी हा झाशीच्या लष्करातील उपसेनापतीही राणीच्या कार्यात सहकार्य करू लागला. ‌‘खुदाबक्ष बशरत अली‌’ नावाचा दुसरा फौजी अधिकारी त्याच्या पत्नीसह ह्यांच्या कार्यामध्ये सहभागी होऊ लागला. तसेच कमलकुमारी चौहान, राजकुंवर यादव अशा मध्यमवर्गीय स्त्रिया राणी लक्ष्मीबाईला वारंवार भेटू लागल्या.

योग्य वेळेस झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने एका पुत्रास जन्म दिला. परंतु तो अगदीच अल्पायुषी ठरला. त्या दु:खातून बाहेर पडताना राणी लक्ष्मीबाईला मोतीबाईचे, झलकारीबाईचे व मुंदरबेगमचे खूपच सहाय्य झाले.

राणी लक्ष्मीबाई एक दिवस एकटीच रडत आपल्या महालात बसली असताना, तिला दूरवरच्या एका भागात ब्रिटीश सार्जंट ऑफिसर झाशीच्या दहा-बारा प्रजाजनांना क्रूरतेने मारहाण करताना दिसला. तिने माहिती काढण्यासाठी मोतीबाईला पाठवले. मोतीबाई त्या भागातील एका झोपडीआड लपून राणी लक्ष्मीबाईला माहिती पुरवू लागली व ह्या दूताच्या कामासाठी मुंदरबेगम व राजकुंवरबाई नेमल्या गेल्या आणि राणी लक्ष्मीबाई दु:खामुळे अगदी साध्या वस्त्रांमध्ये होती. तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता. नाकात नथही नव्हती. राजकुंवरबाई घाईघाईने राणीच्या महालात शिरली. तिला झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या महालात झलकारीबाई बसली आहे असेच वाटले. ती पटकन बोलून गेली, “बहन झलकारी, राणी लक्ष्मीबाई आपल्याला सन्मानाने वागवते, ह्याचा अर्थ असा नाही की तू राणीच्या आसनावर बसावेस.” तिच्या पाठोपाठ आलेल्या मुंदरबेगमलाही असेच वाटले 

आणि पहिल्यांदाच त्या तिघींच्याही लक्षात आले की साध्या वेशातील लक्ष्मीबाई व झलकारीबाईमध्ये कमालीचे साम्य आहे.

तो ब्रिटीश अधिकारी लहानशा चुकीसाठी व सारावसुलीसाठी त्या दहा-बारा जणांना भरपूर मारहाण करीत होता, अगदी अमानुषरित्या.

त्या मारहाणीत, बापाच्या कडेवर बसलेल्या लहान मुलाचा मृत्यू झाला होता.

हे वृत्त कळताच राणी लक्ष्मीबाई स्वत:चा पुत्रशोक ताबडतोब विसरली आणि तिने त्वरेने दुर्गादलाच्या कार्यास पुनश्च आरंभ केला. झलकारीबाईचा पती ‌‘पुरनसिंग कोरी (कोळी)‌’ हा झाशीच्या सैन्यातील एक लहानसा ऑफिसर होता. ह्यानेच झलकारीबाईला व इतर स्त्रियांना राणीच्या गावाबाहेरील प्रासादामध्ये युद्धकला शिकविण्यास सुरुवात केली. आजारी असलेल्या राजा गंगाधररावांना सांगून पुरनसिंग कोरीची नियुक्ती तिने त्यांच्या सैन्यातील ‌‘नाईक‌’ ह्या पदावर केली व तीदेखील तोफखान्याच्या.

हळूहळू दुर्गादलाच्या स्त्रियांची संख्या वाढतच गेली आणि दिवाण रघुनाथसिंगच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी व मजूर वर्ग तयार होऊ लागला.

इ.स. 1856च्या विजयादशमीपर्यंत झाशीच्या राणी लक्ष्मीबाईकडे दुर्गादलाच्या दोन हजार स्त्रीसैनिक व रघुनाथसिंग दिवाणांच्या बरोबर काम करणारे ‌‘महादेवशिव‌’ गटाचे सैनिक तयार झाले.” 

(कथा चालू)