भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 8
संपतरावने बोट उंचावत प्रश्न विचारला, “मंगल दिवाकर पांडे ह्या एका सामान्य सैनिकाने काय असे घडवून आणले? त्याने काही पूर्वतयारी केली होती की उतावळेपणाने किंवा खोट्या उत्साहाच्या भरात तो काहीतरी करून बसला? आम्ही असेच काहीसे ऐकलेले आहे!”

मल्हारराव निक्षून व स्पष्ट शब्दांत म्हणाले, “मंगल पांडेविषयी ब्रिटिशांनी ब्रिटीशधार्जिण्या वृत्तपत्रांचा व सरकारी नोकरांचा व व्यापाऱ्यांचा आणि खबऱ्यांचा उपयोग करून अशीच बातमी पुढे पसरवून दिली की ‘मंगल पांडे ह्याने भांग प्राशन केली होती व तो नेहमी अफू (ओपियम) घेत असे व त्या नशेतच तो अत्यंत बेजबाबदारपणे वागला. त्याच्यामागे कुठलेही भारताविषयीचे मूल्य नव्हते.’
परंतु हे सर्व निखालस व धडधडीत असत्य आहे. फडके मास्तरांचे वडील अनंतराव फडके हेसुद्धा मंगल पांडेच्याच बटालियनमध्ये होते व आपल्या फकीरबाबांचे मामादेखील. त्यामुळे आपल्याकडे अचूक माहिती आहे व तीदेखील तेथे उपस्थित असलेल्या लोकांकडूनच मिळालेली.
सर्वांनी कान देऊन ऐका. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेने लढाईस आरंभ केला व हल्लाही चढविला, ही गोष्ट खरी. परंतु ते त्याने कुठल्या नशेमध्ये केलेले कृत्य नव्हते. तो अफू, गांजा, भांग आणि दारूच काय, पण साधी विडीसुद्धा फुंकत नसे. त्याला साध्या सुपारीचेदेखील व्यसन नव्हते. साधारणपणे फेब्रुवारी ५७च्या शेवटच्या आठवड्यातच ‘त्या’ बंदुका व ‘ती’ काडतुसे त्याच्या छावणीत पुरविली गेली. परंतु सैनिकांपासून सत्य लपवून ठेवले गेले होते.
मंगल दिवाकर पांडे हा रोज पहाटे उठून १०८ वेळा गायत्री मंत्र जप करणारा व त्यानंतर महादेवाची आराधना करणारा धार्मिक व सत्शील तरुण होता. त्याला इंग्रजी भाषा बऱ्यापैकी अवगत झालेली होती. ‘ईश्वरीप्रसाद’ नावाचा त्या सैन्यातील जमादार इंग्लिश भाषेत प्रवीण होता. त्याच्याबरोबर राहून-राहून मंगल पांडे इंग्रजी शिकला होता. तसेच ज्या ‘नंदकुमार’ नावाच्या, बुरद्वान, नादिया आणि हुगळी विभागाच्या भारतीय बंगाली वंशाच्या दिवाणाला (टॅक्स कलेक्टर) ब्रिटिशांनी १७७५ मध्ये फाशी दिले होते, त्याचा सूडाने पेटलेला नातू नाव व गाव बदलून ‘नवीनचंद्र मुखोपाध्याय’ नावाने ब्रिटीश गव्हर्न्मेंटच्या लष्कराशी निगडित नोकरीमध्ये सामील झाला होता व तो इंग्लिशमध्ये अत्यंत प्रवीण होता. परंतु त्याने त्याचे कुठलेही रहस्य कधीच उघड होऊ दिले नव्हते. त्याचा पुत्र, मंगल दिवाकर पांडेचा खास मित्र झाला होता. मंगल पांडे आपल्या ह्या मित्राशी नेहमी गप्पा मारत बसत असे व त्यामध्ये ब्रिटिशांनी चालवलेल्या अत्याचारांविषयी संताप व्यक्त करीत असे व ‘काहीतरी करावे’ अशी जिद्द बाळगूनच. त्यामुळे नवीनचंद्र मुखोपाध्यायने मंगल पांडेला एका महिन्यात इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी तयार केले होते व ह्याविषयी कोणालादेखील काहीही कल्पना नव्हती - अर्थातच मंगल पांडेच्या विश्वासातील मित्रांना सोडून.
एके दिवशी पहाटे उठून जप करण्याआधी स्नानासाठी विहिरीवर गेलेल्या मंगल पांडेला, दोन ब्रिटीश ऑफिसर्सच्या संभाषणाचा एक भाग ऐकू आला. गायीची चरबी (Cow Fat व बीफ) आणि डुकराची चरबी (पिग फॅट, पोर्क) हे शब्द ऐकू आल्यामुळे मंगल पांडेने चोरून संपूर्ण संभाषण ऐकले व त्याला ब्रिटिशांच्या बेताची कल्पना आली की ह्यांना हिंदू व मुसलमान अशा दोघांचाही धर्म बुडवायचा आहे कारण हिंदू कधी गोमांस खाणार नाहीत व खरा मुसलमान कधी डुकराची चरबी खाणार नाही.
तेथूनच मंगल पांडेच्या विचारांची चक्रे वेगाने सुरू झाली. त्याने पहाटे-पहाटेच हे वृत्त जमादार ईश्वरीप्रसाद व आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. त्यांच्यामध्ये व्यवस्थित योजना आखली जाऊ लागली. ठिकठिकाणच्या हिंदू सैनिकमित्रांना ह्या कटात सामील करून घेतले जाऊ लागले. मेरठच्या छावणीतील तर प्रत्येक भारतीय सैनिक वाट्टेल ते करायला तयार झालेला होता.
१ एप्रिल १८५७ पासून नवीन काडतुसे वापरणे सक्तीचे होणार होते व त्यामुळे २८ मार्चची रात्र निश्चित केली गेली. सर्व जण एक क्षणही न झोपता रात्रभर जागे होते. परंतु रात्रभर ब्रिटीश अधिकारी ‘लेफ्टनंट बॉघ’ (Baugh) त्याच्या काही ब्रिटीश सहकाऱ्यांबरोबर ह्या संपूर्ण बरॅक पोर (Barrack Pore) छावणीमध्ये गस्त घालत फिरत होता व त्याच्याबरोबर बाहेरून आलेले काही भारतीय जमीनदार होते, ठाकूर होते व काशीला निघालेले यात्रेकरूही होते. त्यामुळे मंगल पांडेने सबूर राखण्याचे ठरविले, परंतु ही सर्व मंडळी हळूहळू तेथून निघून गेल्यानंतर आपल्याबरोबर भरलेली बंदूक (जुनी) व बराचसा दारुगोळा घेऊन लेफ्टनंट बॉघच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी स्वत:च्या तंबूतून बाहेर पडला.
त्याच्या कटात सामील झालेल्या सहकाऱ्यांसाठी निशाणी म्हणून ठरल्याप्रमाणे तात्पुरता लावलेला लाल फडका एका भित्र्या, भेकड सहकाऱ्याने ताबडतोब लपवून ठेवला व एकटा मंगल पांडेच लेफ्टनंट बॉघच्या निवासस्थानी जाऊन उभा राहिला व तेथून बाहेर पडलेल्या लेफ्टनंटवर त्याने पहिल्यांदा गोळ्या झाडल्या. स्वातंत्र्ययुद्धाची पहिली गोळी उडाली ती येथे. परंतु फितुरांनी आपले काम केले होते. त्यामुळे लेफ्टनंट बॉघ तयारीतच होता. तो लगेचच घोड्यावर स्वार झाला व पळू लागला. परंतु मंगल पांडेच्या दोन गोळ्या लेफ्टनंटच्या घोड्याच्या शरीरात घुसल्या व घोडा लेफ्टनंट बॉघला घेऊनच खाली कोसळला. त्याबरोबर मंगल पांडे तलवार घेऊन बॉघवर धावून गेला व त्याच्यावर तलवारीने सात घाव केले. परंतु ‘शेख पलटू’ नावाच्या लेफ्टनंटच्या खास शिपायाने मंगल पांडेला मागे खेचून पाडले.

आणि मंगल पांडेच्या बेताचा सुगावा लागलेला ब्रिटीश सार्जंट-मेजर (Sergeant-Major) ह्यूसन (Hewson) तेथे येऊन पोहोचला. ह्यूसन पराभव पाहून संतापला व त्याने जमादार ईश्वरीप्रसादला मंगल पांडेवर हल्ला चढविण्याची आज्ञा दिली. परंतु ईश्वरीप्रसादने त्याची आज्ञा धुडकावून देऊन, मंगल पांडेला सहाय्य करण्यास सुरुवात केली. ह्यूसनच्या मदतीला शेख पलटू धावून आला. तो इतर शिपायांना मदत करण्यास सांगू लागला, परंतु मंगल पांडेच्या एकनिष्ठ सहकाऱ्यांनी उलट दगडांचा व चपलांचा मारा केला.
मंगल पांडे व त्याच्या सहकाऱ्यांनी ती लढाई जवळजवळ जिंकलीच होती. मंगल पांडे मोठमोठ्याने घोषणा देत होता,
१) मारो फिरंगी को. (परकीयांना ठार मारा.)
२) तुम्ही आमच्या काळ्या रंगाचा प्रामाणिकपणा पाहिला आहे, ह्यापुढे आमचा क्रोध पहा. (You have tested a black man’s loyalty - now test his fury.)
३) ही काडतुसे चावून आपण सर्व धर्मभ्रष्ट होऊ. आधीच सावध व्हा. (By biting these cartridges, we shall become infidels, awake!)
४) मी हिंदुस्थानी आहे आणि मीच हिंदुस्थान आहे. (I am true Indian and I am Hindustan myself.)
तेवढ्यात मेजर जनरल जॉन बेनेट हरसे (Hearsey) तेथे येऊन पोहोचला. त्याने बरोबर मोठा फौजफाटा आणला होता. जनरलने आज्ञा न ऐकणाऱ्या प्रत्येक भारतीय सैनिकाला गोळी घालण्याची धमकी दिली. त्यामुळे काहीच माहिती नसलेले, त्याच्याबरोबर आलेले सैनिक पुढे सरसावले. मिळेल त्या हत्यारांनी हाणामारी सुरू झाली. सर्वत्र रक्तपात दिसू लागला.
परंतु ती सर्वसाधारण हाणामारी नव्हती. ती होती स्वातंत्र्याची पहिली लढाई. ६०० ब्रिटिशांशी वफादार राहिलेले सैनिक व मंगल पांडेबरोबरील चोवीस जण हा सामना संध्याकाळ होता-होता संपला. ईश्वरीप्रसादने मंगल पांडेच्या सूचनेनुसार इतर चोवीस सहकाऱ्यांना जंगलात पळवून दिले.
शेवटी सायंकाळी पाच वाजता मंगल पांडे व ईश्वरीप्रसादला जेरबंद केले गेले आणि रक्ताने माखलेला पांडे तरीदेखील ताठ चालत जोरजोरात घोषणा देतच राहिला. त्याला नावापुरते लष्करी हॉस्पिटलमध्ये ठेवले गेले व सात दिवसांच्या कोर्टमार्शलचे नाटक करून मंगल पांडेला ८ एप्रिल १८५७ रोजी हजारो लोकांच्या देखत सुळावर चढविले गेले व ईश्वरीप्रसादला २१ एप्रिल रोजी.
मित्रहो! आपल्या भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील ही दोन पहिली बलिदाने. ह्यांच्या नामोच्चाराशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा सुरूच होऊ शकत नाही.”
हुतात्मा मंगल पांडे यांचे स्मारक
(कथा चालू)
