भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 7

हिंदी English ગુજરાતી বাংলা తెలుగు മലയാളം ಕನ್ನಡ தமிழ்
मल्हारराव ह्या सर्व मंडळींना घेऊन विठ्ठल मंदिरातील ज्या गुप्त खोलीत गेले होते, ती खोली खूपच मोठी होती. तिच्यामध्ये जवळपास दोनशे व्यक्ती बसलेल्या होत्या आणि त्यासुद्धा जराही दाटीवाटी न होता. मुख्य म्हणजे शिव मंदिरातील व विठ्ठल मंदिरातील अशा कामासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्या ध्वनि-बंद (Soundproof) पद्धतीने बनविलेल्या होत्या. त्यामुळे तेथील एक शब्दही अगदी भिंतीला कान लावून बसलेल्यालासुद्धा कधीच कळू शकला नसता. मुख्य म्हणजे ह्या खोल्यांपर्यंत पोहोचणेच मुळी अगदी नेहमीच्या माणसालासुद्धा कठीण होते.
मल्हाररावांनी त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे वचन त्या सर्वांना दिले. त्या दोनशे जणांमध्ये वय वर्ष १८ ते ४० मधील जवळजवळ शंभर-सव्वाशे मंडळी होती. बाकीच्यांमध्ये ४० ते ७५ मधील वयोगटातील त्या त्या जातीतील विचारी, समजूतदार व देशभक्तीने भारलेली मंडळी होती.

गुप्त जिन्याने फडके मास्तर व फकीरबाबा तेथे येऊन पोहोचताच मल्हाररावांनी बोलण्यास सुरुवात केली, “सर्व काही सांगतो. हा आपल्या मातृभूमीचा गौरवशाली इतिहास आहे. परंतु मी उगीच खूप खोलात शिरणार नाही. आपल्या कार्यासाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढे नक्की सांगणार आहे.
मुख्य म्हणजे ह्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांचा इतिहास तर आपण बघणारच आहोत. परंतु फकीरबाबा व फडके मास्तर तुम्हाला ‘साध्यासुध्या माणसांनी गेल्या ६५ वर्षांत कशा विविध प्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील आपापल्या जबाबदाऱ्या निभावल्या’ हेदेखील सांगतील कारण आपल्यासारख्या सामान्य सैनिकांना अधिक बळ प्राप्त होण्यासाठी ह्या सामान्य नागरिकांच्या कार्याविषयी समजावून घेणे अधिक आवश्यक आहे.
आपल्या भारतीय नागरिकांमध्ये अर्थात सर्वसाधारण जनसमूहामध्ये ब्रिटिशांनी असा गैरसमज पसरवून दिला आहे की १) ब्रिटिशांची सत्ता इथून हलणे शक्यच नाही. २) ब्रिटिशांना विरोध केल्यास मृत्यूलाच कवटाळावे लागेल किंवा काळ्या पाण्यासारख्या भयंकर शिक्षांना सामोरे जावे लागेल व ह्या शिक्षा मरणापेक्षाही भयंकर असतात. ३) शिक्षा झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बायकामुलांकडे ह्या लढ्यातील भारतीय नेतेमंडळी जराही लक्ष देत नाहीत व त्यांचे पुढे खूप हाल होतात. ४) ब्रिटिशांच्यामुळेच भारतात सुधारणा झाल्या आहेत, नाहीतर भारत जंगलीच राहिला असता.
ही गोष्ट मात्र थोडीशी खरी आहे. ब्रिटिशांनीच भारतात राणीचे राज्य येथे येण्याच्या आधीच रेल्वे अर्थात आगगाडी आणली. 1853 सालीच मुंबईमध्ये बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली आगगाडी धावली व मग सर्वत्र पसरली.

ब्रिटिशांनीच पोस्ट खाते सुरू केले व त्यामुळे प्रवासाच्या खूप मोठ्या सोयी झाल्या व दूरवर राहणाऱ्या आप्तांशी सहजतेने संपर्क साधता येऊ लागला.
ब्रिटिशांनीच पक्के रस्ते बांधले, मोटारगाड्या व बसगाड्या आणल्या आणि मुंबई-पुणेसारख्या शहरांमध्ये तर विजेवर चालणारे दिवे आले.
पाणी आणण्यासाठी काही नदीवर किंवा विहिरीवर जावे लागत नाही. घरबसल्या पाईपाने पाणी येते. ह्या कारणामुळे शहरातील स्त्री-पुरुष ब्रिटीश सरकारवर खूष आहेत.
आपल्याकडे ग्रंथ व पुस्तके हाताने लिहिली जायची. ब्रिटिशांनी छापखाने आणून अगदी प्रत्येक माणसाला आयते पुस्तक देऊ केले.
मुख्य म्हणजे ठिकठिकाणी हजारो सरकारी नोकऱ्या तयार केल्या गेल्या व त्यामुळे अक्षरश: लाखो मध्यमवर्गीयांचे संसार सुखाने होऊ लागले.”
पुढच्याच रांगेत बसलेला ‘संपतराव’ नावाचा पंचविशीतला तडफदार तरुण उभे राहून म्हणाला, “एवढ्या सगळ्या सोयी ब्रिटीश सरकारने आपल्याला दिलेल्या असताना आपण त्यांच्याशी कृतघ्न का व्हायचे? त्यांनी आपल्याशी प्रतारणा केली आहे का?”
मल्हारराव म्हणाले, “बरोब्बर बोललास. एकदम योग्य प्रश्न विचारलास. ह्या सर्व सोयी ब्रिटीश सरकार करत आहे, हे मूलत: त्यांच्या सैन्याची हालचाल व्यवस्थित व्हावी म्हणून, त्यांच्या सैन्याला दारुगोळा व अन्नधान्य नीट मिळावे म्हणून, त्यांच्या ब्रिटीश ऑफिसर्सना व त्यांच्या कुटुंबियांना आयते चाकर मिळावेत म्हणून.
ह्या सगळ्या सोयी ब्रिटीश गव्हर्न्मेंट भारतीयांच्याच पैशाने करत आहेत. ब्रिटिशांचा एक पौंडही कधी भारतात आलेला नाही. उलट भारतामधून खूप मोठी धनाची व नैसर्गिक संपत्तीची आणि सोने-चांदीची लूट ब्रिटिशांनी एवढी वर्षे चालू ठेवलेली आहे आणि त्यासाठीही मनुष्यबळ भारतीयच वापरले जात आहे.
वरून कितीही सभ्यतेचा आव आणला, तरीदेखील हे ब्रिटीश पूर्णपणे असंस्कृत आहेत. आपणां भारतीयांना अत्यंत निकृष्ट दर्जाची वागणूक मिळत आहे. ह्या कारणांसाठीच ब्रिटिशांना विरोध करणे आवश्यक आहे व होते. काय संपतराव, पटले ना?”
संपतराव ‘भारतमाता की जय’, ‘भगवान रामभद्रांचा जयजयकार असो’ असे म्हणून बोलू लागला, “ही माहिती देशभर पसरवणे आवश्यक आहे. काय होते की माझ्यासारख्या, शहरात नोकरी करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या मनुष्याला ह्या गोष्टी कळूच शकत नाहीत आणि त्यांच्या शाळा, त्यांची हॉस्पिटल्स आणि त्यांनी आपल्या धर्माविषयी उपस्थित केलेले प्रश्न ह्या सर्वांमुळे आम्ही ब्रिटिशांचे चाहते बनून जातो व त्यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाला कडक शिस्त मानून, ब्रिटिशांना भिऊन व त्यांचा आदर राखून वागू लागतो. मी मुंबईतली नोकरी सोडूनसुद्धा पूर्ण वेळ ह्या कार्यासाठी देण्यासाठी तयार आहे.”

सर्वांचे समाधान नीट झालेले पाहून मल्हारराव पुढे बोलू लागले, “पहिल्यांदा ब्रिटीश सरकार भारतावर राज्य करतच नव्हते. भारतावर राज्य करत होती, ती ब्रिटिशांची एक व्यापारी कंपनी - ईस्ट इंडिया कंपनी. ह्या ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम कलकत्ता, सूरत व अडगळीत पडलेली मुंबईची सात बेटे येथे आपल्या वखारी, गोदामे व वसाहती निर्माण केल्या आणि मग हळूहळू पद्धतशीररित्या भारतातील एक-एक राज्य घेण्यास सुरुवात केली.
इ.स. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या राज्याभिषेकाच्या वेळी ह्या ब्रिटीश कंपनीचे सर्वोच्च अधिकारी अत्यंत लाचारीने वागत होते. परंतु शिवाजी महाराज व संभाजी महाराज ह्यांच्या कालखंडानंतर ब्रिटिशांच्या ह्या कंपनीला भारतात सत्ता गाजवण्याची इच्छा जोरदारपणे होऊ लागली व तशा संधी ते मिळवू लागले.
ईस्ट इंडिया कंपनीने अनेक राजांना, समाजातील काही विशिष्ट गटांना व मतलबी व्यापाऱ्यांना द्रव्यलोभाने आपल्या पक्षात घेतले, तसेच नेपाळच्या त्यावेळच्या राजाला भरपूर द्रव्य देऊन त्याच्याकडून भलीमोठी सेना बनवून घेतली आणि भारतातील एक-एक राज्य गिळण्यास सुरुवात केली व इ.स. १८१८ साली ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील सर्वांत मोठे, प्रबळ व मजबूत असे पेशव्यांचे राज्य जिंकून घेतले व मग त्यांना सर्वकाही सोपे वाटू लागले.
ब्रिटिशांचे अत्याचार वाढतच चालले होते. एखादा सामान्य ब्रिटीश वंशाचा सोल्जरही श्रेष्ठ भारतीयाला लाथेने तुडवू शकत असे. असंतोष हळूहळू धुमसू लागला होता. काही संस्थानिकही जागे होऊ लागले होते.
त्यातच १८५७ साली कलकत्त्याजवळ ब्रिटिशांची छावणी पडली होती. तेथे ‘बंगाल नेटिव्ह इन्फन्ट्री’ची ३४वी बटालियन कार्यरत होती. तिच्यामध्ये एक ‘मंगल दिवाकर पांडे’ नावाचा अत्यंत धार्मिक ब्राह्मण सामील होता. ह्या बंगाल नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियन 34 मध्ये फक्त ब्राह्मणांनाच सामील करून घेतले जात असे.
हा मंगल दिवाकर पांडे उत्तर प्रदेशातील ‘बलिया’ जिल्ह्यातील ‘नगवा’ नामक गावातील पुजारी दिवाकर पांडे ह्यांचा पुत्र होता व कट्टर सनातनधर्मीय होता.
ह्या बटालियनला ‘पॅटन १८५३ एनफिल्ड’ बंदुकी दिल्या गेल्या, ज्या अत्यंत शक्तिशाली व अचूक नेमबाजीच्या होत्या. परंतु ह्या बंदुकींमध्ये काडतूस भरताना दातांनी उघडावे लागत असे आणि त्या काडतूसाच्या बाहेरील आवरणामध्ये गायीच्या व डुकराच्या मांसाची चरबी वापरलेली होती.

इंग्लिश बऱ्यापैकी समजणाऱ्या मंगल पांडेला ही बातमी अगदी वेळेवर कळली आणि त्याचे धार्मिक मन बंड करून उठले. त्याने ब्रिटीश सैन्यातील ठिकठिकाणी विखुरलेल्या सर्व प्रांतीय भारतीय वंशाच्या सैनिकांशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणा उभी केली. मंगल पांडे मूळचाच अभ्यासू होता व वीरश्रीने भरलेला होता. त्याने नीट कट आखला आणि २९ मार्च १८५७ रोजी कलकत्त्याजवळील त्यांच्या छावणीतून बंडास सुरुवात केली. त्याला ठिकठिकाणाहून जोरदार प्रतिसाद मिळाला.”
(कथा चालू)
