भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – २

English हिंदी ગુજરાતી বাংলা తెలుగు മലയാളം ಕನ್ನಡ தமிழ்
भाग – २
लेखक – डॉ. अनिरुद्ध धै. जोशी
रामचंद्र इतर दोन ब्रिटीश अधिकाऱ्यांसह त्या इलाख्यातील जंगलांची पाहणी करण्याच्या नावाखाली क्रांतिकारकांचा शोध गेले दोन दिवस घेत होता. अर्थात रामचंद्र आपल्या वडिलांशी आधी संपर्क साधून मगच छापे घालत असे आणि त्यामुळे लपलेले क्रांतिकारक आधीच सुरक्षित ठिकाणी हलविले गेलेले असत. आज बाजूच्या गावात जोरदार छापा घातला गेला होता कारण तशी टीप मिळाल्याचे खुद्द त्या दोन ब्रिटीश सहकाऱ्यांनीच सांगितले होते. अर्थात त्यांच्या कानावर बातमी घालण्याची योजनाही रामचंद्रच्या अर्थातच मल्हाररावांच्या माणसांनीच करून ठेवलेली होती

आणि इथे मल्हाररावांच्या गावात अर्थात धारपूरमध्ये मल्हाररावांचे काम जोरदारपणे, अगदी दिवसाढवळ्या चालू होते आणि संध्याकाळपर्यंत नीट पारही पडले. सर्व माल अर्थात पिस्तुले, छोट्या बंदुका, काडतुसे व इतर काही आवश्यक सामग्री बैलगाड्यांमधून पुण्याच्या दिशेने केव्हाच निघाली होती. प्रत्येक बैलगाडीचा चालक एक-एक स्वातंत्र्यसैनिकच होता.
त्या सर्व बैलगाड्यांमध्ये आंब्याच्या पेट्या व पाट्या, तसेच लोणच्याचे आंबेही लहान-लहान गोणींमधून भरलेले होते आणि त्यांच्या आडूनच खरे सामान पाठविले गेले होते. प्रत्येक चेकनाक्याला व चेकपॉईंटला, प्रत्येक अधिकाऱ्याला आंबे, कैऱ्या किंवा पैसा ह्यांपैकी काही ना काही मिळतच होते. ह्या इलाख्यातील ब्रिटीश अधिकारी जाणून असत की मल्हारराव केवळ धनाने श्रीमंत नाहीत, तर मनानेही श्रीमंत आहेत आणि ब्रिटीश सरकारशी अत्यंत प्रामाणिक आहेत व नेहमी ब्रिटीश अधिकाऱ्यांचा योग्य तो मान राखीत असतात. त्यामुळे प्रत्येक पॉईंटला त्या-त्या अधिकाऱ्याला ‘काही ना काही भेट मिळणार’ अशी जाणीव असायची.
ही काही आजकालची गोष्ट नव्हती. 1928 सालापासून मल्हाररावांनी योजनाबद्धपणे काम करून आपली अशी प्रतिमा तयार करून ठेवलेली होती. दुसऱ्या बाजूला दररोज मल्हाररावांच्या विविध जागांवरून कमीतकमी शंभरएक बैलगाड्या तरी कुठला ना कुठला माल घेऊन अगदी लांबवरपर्यंत जात असत. त्या बैलगाड्या तपासून-तपासून ब्रिटीश अधिकारी, ब्रिटीश सार्जंट, भारतीय शिपाईही कंटाळून गेलेले होते आणि मल्हाररावांच्या शिक्क्याचे कागद दिसले की त्या बैलगाड्यांकडे कुणी ढुंकूनही पहात नसे.
सगळ्यात बेकार काम म्हणजे मल्हाररावांच्या बैलगाड्यांतून अनेक वेळा जळणाचा कोळसा, वाळू, रेती, मुरुमाची माती, जांभे दगड, खडी (छोटे-छोटे तुकडे केलेले दगड), शेणाच्या गोवऱ्या अशा वस्तूही भरभरून पाठविल्या जात असत आणि मुख्य म्हणजे त्या अशा सामानाबरोबर अधूनमधून जंगलात सापडणारे विविध प्रकारचे डिंक असावयाचे व ह्या सर्वांचा वास आणि धूळ, ब्रिटिशांनाच काय, पण भारतीय अधिकाऱ्यांना व शिपायांनाही असह्य होत असे. त्यातच काही वेळा जनावरांची कमावलेली कातडीही असायची आणि खारवलेली विविध प्रकारची मासळीही असायची. खाऱ्या मासळीच्या, कमावलेल्या चामड्यांच्या व डिंकाच्या वासांचा सुगावा लागताच ब्रिटीश अधिकारी व सार्जंट्स, त्या गाड्यांपासून अक्षरश: दूर पळत असत.

फक्त दोन-चार भारतीय वंशाचे शिपाई नाईलाजाने, अक्षरश: नाक मुठीत धरून स्टँप मारण्यापुरते एक क्षणभर उभे असायचे. त्या भारतीय वंशाच्या शिपायांना ब्रिटीश ‘सिपॉय’ असे संबोधत असत. त्यांना ब्रिटिशांकडून अगदी हीन दर्जाची वागणूक मिळत असे; परंतु पगार व इतर अनेक सोयी (फॅसिलिटीज) त्यांना मिळत असल्यामुळे सिपॉय बनण्यासाठी खूप मोठा वर्ग उत्सुक असे.
त्यांच्यातील अर्ध्याहून जास्त सिपॉयांना, ‘स्वातंत्र्यलढा कशासाठी आणि काय’ एवढे जाणण्याचीही अक्कल नसायची. असे बहुतेक जण अशिक्षित किंवा अगदी अल्पशिक्षित असायचे. ब्रिटिशांवर नाराज असायचे, परंतु पोटासाठी व मजेसाठी ही नोकरी टिकवून ठेवण्याकरिता त्यांना ब्रिटीश ऑफिसर्सना खुश ठेवावेच लागे व त्यासाठी हे भारतीय वंशाचे सिपॉय संशयित स्वातंत्र्यसैनिकांना मारहाण करण्यामागे अगदी जोरात असायचे.
मल्हाररावांनी रामचंद्राशी नीट बोलून अशा अनेक भारतीय सिपॉयांना आपल्याशी घट्ट बांधून घेतले होते.
त्या पिता-पुत्रांकडे संपत्ती अगणित होती आणि भारतमातेची सेवा करण्याची भलीमोठी जिद्द होती. मल्हाररावांनी रामचंद्रच्या वयाचे व आपल्या वयाचे काही खास मित्र त्यांच्या गुप्त कार्यात सामील करून घेतलेले होते. त्यांतील काही तर एवढे वृद्ध होते की त्यांच्याकडे पाहून कुणालाही संशय आला नसता की ते स्वातंत्र्ययुद्धाच्या चळवळीतील सहकारी आहेत.

मुख्य म्हणजे वृद्ध व मध्यमवयीन स्त्रियादेखील मल्हाररावांनी ह्या कार्यात सामील करून घेतलेल्या होत्या आणि त्यादेखील वारकऱ्यांचा आदर्श समोर ठेवूनच - अगदी नावाजलेल्या प्रतिष्ठित घरांतील स्त्रियांपासून अशिक्षित स्त्रियांपर्यंत विविध जाती व जमातींच्या स्त्रिया रामचंद्रच्या पत्नीने अर्थात जानकीबाईने तयार केलेल्या होत्या.
असे वृद्ध पुरुष, साधेसुधे दिसणारे मजूर व ह्या विविध जमातींच्या स्त्रिया पाहून, ब्रिटीश अधिकारी अशा बैलगाड्यांच्या नादी लागतच नसत कारण उगीच एखादा म्हातारा गचकला आणि एखाद्या उच्च घराण्यातील स्त्रीची अवहेलना झाली, तर सर्व समाज ब्रिटिशांच्या विरोधात जाऊ शकत होता व अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सर्व ब्रिटीश अधिकाऱ्यांना वारंवार वरून ताकीद मिळत असे. ह्यामुळे मल्हाररावांचे व रामचंद्राचे कार्य अगदी सुरळीतपणे चालत असे.
त्यातच मल्हारराव पडले मोठे धार्मिक. त्यांना ब्रिटीश ऑफिसर ओळखायचे, ते ‘सतत देव-देव करणारा अतिश्रीमंत जमीनदार` म्हणूनच. हे ब्रिटीश अधिकारी आपापसांत बोलताना मल्हाररावांचा उल्लेख, ‘बनेल म्हातारा’ सर्व पापे करून स्वर्गात जाण्यासाठी देव-देव करतो, असा करत असत. कारणे दोन होती.
1 मल्हारराव वेगवेगळ्या ठिकाणच्या, अगदी लहानसहान गावातीलसुद्धा मंदिरांचे जीर्णोद्धार करायचे आणि सतत कुठल्या ना कुठल्या मंदिराला भेट द्यायचे व भरपूर दानधर्म करायचे.
त्याचबरोबर अनेक मंदिरांजवळ त्यांनी विहिरी व छोट्या-छोट्या धर्मशाळाही बांधल्या होत्या.
2 तर दुसऱ्या बाजूला ते न चुकता, प्रत्येक जत्रेमधील तमाशाच्या फडावर हजेरी लावतच असत व त्यांच्या वाड्यावरही लावणीचे कार्यक्रम होत असत व तेसुद्धा उघडपणे आणि बऱ्याच वेळा.
खरं तर मल्हाररावांना अशा कार्यक्रमांमध्ये यत्किंचितही रस नव्हता, परंतु रंगेलपणाचे नाटक वठवणे आवश्यक होते. वखवखलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना आपल्याशी मैत्री करायला लावण्यासाठीच अशा गोष्टी जरूरीच्या होत्या.
रामचंद्र, सर्व ब्रिटिशांमध्ये ‘रामचंद्रराव’ किंवा ‘धारपूरकर साहेब’ ह्या नावांनी ओळखला जात असे. त्याची पत्नी जानकीबाई हिची राहणीदेखील, मोठ्या हुद्यावरील अधिकाऱ्याच्या पत्नीला साजेशी अशीच होती. तिला ‘सर्वांत फॅशनेबल स्त्री’ म्हणून अख्खी मुंबई व पुणे ओळखायचे. तिची ऊठबसही ब्रिटीश अधिकारी व त्यांचे कुटुंबीय, श्रीमंत पारशांच्या स्त्रिया व सरकारधार्जिण्या भारतीय अधिकाऱ्यांच्या पत्नी ह्यांमध्येच असायची.
जानकीबाई अवघ्या एकवीस वर्षांची होती, परंतु त्या काळातील लोकांना तिचे अप्रूप वाटत असे कारण ती फाड-फाड (Fluent) इंग्लिश बोलत असे. गव्हर्नरची पत्नी ही जानकीबाईची खास मैत्रीण होती. ही गव्हर्नरची मेमसाहेब कुठल्याही समारंभाला जानकीबाईशिवाय जातच नसे.
मल्हारराव, गाड्या योग्य ठिकाणी पोहोचल्याचा निरोप मिळताच त्यांच्या गावाच्या वस्तीबाहेर असणाऱ्या लाकडाच्या वखारीकडे व कोळसे बनवण्याच्या भट्टीकडे निघाले. इथे सतत धूर व धूळ असल्यामुळे गावकऱ्यांचे जाणे-येणेही नसायचे.
परंतु सर्व गावाला नीट माहीत होते की ह्या वखारीसमोरच मल्हाररावांनी जीर्णोद्धार केलेले (खरं तर बांधलेले, तयार केलेले) ‘धारपुरेश्वर महादेवा’चे मंदिर होते आणि ज्यामध्ये शिवलिंगाबरोबरच त्रिविक्रमाच्या ‘हरिहर’ स्वरूपाची मूर्तीही होती.

