भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – 3

हे धारपुरेश्वर महादेवाचे मंदिर, ठिकठिकाणाहून जुन्या, पडीक अशा धर्मशाळा, घरे, वाडे ह्यांमधून आणलेल्या पाषाणांपासून बनविले गेले होते व ह्यामुळेच कोणालासुद्धा, ‘ते फक्त तीन वर्षांपूर्वी बांधून तयार झाले आहे’ असा संशयही आला नसता. मल्हारराव फितुरीचा धोका नीट ओळखून होते आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत गुप्तपणे शंकराची पिंडी व हरिहराची मूर्ती त्या रानातील जागेवर आणून, त्या मूर्तीच्या एका बाजूला पडकी भिंतही आधी बांधून ठेवली. अशीच जागा निवडली होती की जेथे झाडाझुडपांची भरपूर गर्दी होती. पुढे एके दिवशी त्यांच्याच एका खास सहकार्याला त्याचे हरवलेले वासरू शोधताना हे मंदिर ‘अचानकपणे’ सापडले व मग नेहमीच दानशूर असणार्या मल्हाररावांनी ते पुढे होऊन बांधून घेतले एवढेच. गावातल्या नव्वदी पार झालेल्या वृद्धांनीदेखील ग्वाही दिली की त्यांच्या लहानपणी त्यांनी असे ऐकले होते की येथील शिवाचे मंदिर दोनएकशे वर्षांपूर्वी परधर्मियांच्या आक्रमणामध्ये पाडले गेले.
हे मंदिर ‘शिवमंदिर’ म्हणूनच प्रख्यात केले गेले होते. स्वयंभगवानाच्या हरिहर मूर्तीचा उल्लेख जास्त होणार नाही, ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती कारण त्या मूर्तीच्या खालीच तर भलेमोठे तळघर होते व तिथून तीन दिशांना बाहेर पडणार्या तीन भुयारी वाटाही होत्या. मुख्य म्हणजे शिवमंदिराची रचनादेखील अगदी जाणूनबुजून अशा विचित्र रित्या केली गेली होती की त्यामध्ये अनेक खोल्या होत्या - मंदिराचे सामान ठेवण्यासाठी, उत्सवाच्या वेळेस लागणार्या पालखी, मोठा लाकडी रथ अशा गोष्टी ठेवण्यासाठी, गंध उगाळण्यासाठी, फुलांच्या माळा बनवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे निरनिराळ्या प्रांतांतून येणार्या-जाणार्या साधूंना व यात्रेकरूंना राहण्यासाठी. त्यातही विशेष गोष्ट म्हणजे ह्या मंदिराच्या अशा निवासी खोल्यांमध्ये कुणालाही दोन रात्रींपेक्षा जास्त राहता येत नसे. मग त्यांना दुसर्या मंदिरांच्या धर्मशाळांमध्ये हलविले जाई.
हे गुप्त तळघर, त्यातील भुयारी वाटा आणि मंदिरातील निवासी खोल्या हीच मल्हाररावांच्या स्वातंत्र्यसैनिकांची वर्दळीची स्थाने होती आणि ह्या मंदिरात ठेवले जाणारे सगळे साधू व यात्रेकरू नीट पारखून घेतले जात आणि तरीदेखील कुणालाही दोन दिवसांपेक्षा जास्त राहता येत नसे. येथे बराच काळ निवास असायचा, तो निरनिराळ्या वेशांत फिरणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या दोन गटांचा - एक म्हणजे भूमिगत झालेले स्वातंत्र्यसैनिक आणि दुसरे म्हणजे क्रांतिकारक. तळघरामधील अनेक गुप्त कपाटांमध्ये व फडताळांमध्ये वेशांतर करण्यासाठीची सर्व साधनसामग्री ठेवलेली असे. भारतातील प्रत्येक प्रांतातील पेहराव, वेगवेगळ्या साईझमध्ये येथे नेहमी उपलब्ध असे.
ह्या मंदिराचे तीन वृद्ध पुजारी होते व हे तिघेही मल्हाररावांचे खास मित्रच होते. त्यांतील एकाने बंगाली भाषा शिकून घेतलेली होती, दुसर्याने पंजाबी आणि तिसऱ्याने हिंदुस्थानी अर्थात हिंदी. ह्यामुळे देशभरातील क्रांतिकारकांची सोय येथे होऊ शकत असे.
आज आल्या-आल्या मल्हारराव मंदिरात नेटकेपणाने दर्शन घेऊन, लगबगीने तळघरात गेले. असे जेव्हा जेव्हा दिवसा करावयाचे असे, तेव्हा तेव्हा पुजारी, तेल सांडले, भस्म उडाले, गवाक्षातून पक्षी आत शिरला, सरडा मिळाला अशी कारणे देऊन गर्भगृहाचा दरवाजा बंद करून घेत असत. रात्रीच्या वेळेस तर काहीच प्रॉब्लेम नसे.
मल्हारराव तळघरात उतरले आणि थेट तळघरात असणार्या एकूण 19 दालनांमधील 13 नंबरच्या दालनात गेले. प्रत्येक दालनाच्या दरवाजावर क्रमांक कोरलेला होता. ‘दालने 19 होती’ असेच कुणाही बघणाऱ्याला वाटलेच असते; परंतु एकाच नंबराची तीन-चार दालनेही होती व एका दालनाच्या भिंतीतून उघडणारे आणखी गुप्त दालन पण असायचे.
ह्या अशा सगळ्या गुंतागुंतीच्या वास्तुरचनेचा बांधकामतज्ञ ‘शिवरामराजन्’ आज तीन वर्षांनंतर प्रथमच आलेला होता आणि तेदेखील आगाऊ कळवून, उत्तर हिंदुस्थानी वेश घेऊन व गावाबाहेरील हनुमान मंदिरातून येणार्या गुप्त मार्गानेच.
शिवरामराजन् मूलत: मद्रास इलाख्यातील (सध्याचे तामिळनाडू). तेही प्रखर देशभक्त होते. वयाने रामचंद्रपेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते व मल्हाररावांपेक्षा दहा वर्षांनी लहान होते. ते रामचंद्ररावाबरोबरच गव्हर्न्मेंट सर्विसमध्ये होते आणि गुप्तपणे ह्या बाप-लेकांना सामील झालेले होते. ते उत्कृष्ट मराठी बोलू शकत असत व हिंदीदेखील. त्यामुळे शिवरामराजन् कधी ‘शिवराम’ नावाचा मराठी माणूस असायचा, तर कधी ‘शिवराजन्’ नावाचा तमिळ माणूस असायचा, तर कधी ‘शिवराज’ नावाचा उत्तर हिंदुस्थानी मनुष्य असायचा. परंतु हे बाप-लेक मात्र त्याचा उल्लेख, अगदी खासगीत बोलतानासुद्धा ‘फकीरबाबा’ म्हणून करायचे कारण कबीरपंथी साधूच्या वेशातच ते रेल्वेतून किंवा बोटीमधून प्रवास करीत असत. आजदेखील ते कबीरपंथी साधूच्या वेशातच आलेले होते.
मल्हाररावांनी दालनात प्रवेश करताच दालनाचे दार व्यवस्थितरित्या लावून घेतले. फकीरबाबांची आणि मल्हाररावांची गळाभेट झाली. मल्हाररावांनी आधी क्षेमकुशल विचारले आणि मग सरळ प्रश्न केला, “काय सुगावा लागलाय?”
फकीरबाबा अर्थात शिवरामराजनांचा चेहरा एका क्षणात उग्र झाला. त्यांच्या डोळ्यांतील संताप अगदी पेटत्या निखार्याप्रमाणे होता. त्यांनी कसेबसे स्वत:ला सांभाळत बोलण्यास सुरुवात केली, “मल्हारराव! सगळ्या क्रांतिकारकांचे घात, त्यांच्या आसपासची भारतीय मंडळीच करताहेत. आजपर्यंत पकडल्या गेलेल्या क्रांतिकारकांपैकी 99% च्या बाबतीत हेच घडले आहे. कधी शेजारीपाजारी, कधी ब्रिटिशांचे भारतीय खबरे, कधी सरकारने जाहीर केलेल्या इनामाला भुललेले लोक आणि काही ठिकाणी तर आधी चळवळीत असलेले व नंतर लांब गेलेले भेकड तरुणच.
किती भारतीय रक्त वहात आहे आणि किती दिवस वहात राहणार आहे? ह्या अशा फितुरांना धडा शिकवणे मला अधिक तातडीचे वाटते.”
मल्हारराव क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, “होय. कुणीही फितूर झाला की त्याला ब्रिटीश सरकारकडून सगळ्या सवलती दिल्या जातात. अशांना शिक्षा मग कोण देणार? आजपर्यंत आम्ही क्रांतिकारकांना व भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना सहाय्य करण्याचे काम करत होतो. परंतु कुठल्याही क्रांतिकारी कार्यात अर्थात सशस्त्र लढ्यामध्ये व गनिमी काव्यामध्ये (Guerilla Warfare) प्रत्यक्षपणे सहभागी झालो नव्हतो.
रामचंद्रशी माझे परवाच बोलणे झाले. ह्यापुढे फक्त पाठिंबा देऊन किंवा सहाय्य करून किंवा क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे पुरवून भागणार नाही. आपल्या संपूर्ण गटाला क्रांतिकार्यात उडी घेणे आवश्यक आहे आणि रामचंद्रची पूर्ण तयारी झालेली आहे.
दोन महिन्यांपूर्वी भगतसिंगाचे बलिदान झाल्यापासून तर सर्व देशभरच संताप खदखदतो आहे (23 मार्च 1931). अधिक उशीर लावून चालणार नाही. ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’चे बंगालमधून आलेले नेते ‘सुभाषचंद्र बोस’ ह्यांच्याशी नुकताच संपर्क झाला आहे. ते क्रांतिकारक विचारांचे आहेत, तरुण आणि तडफदार आहेत. आतून पूर्णपणे क्रांतिकारक असूनही त्यांनी गांधीजींचा मार्ग स्वीकारला आहे, तो विशाल आणि व्यापक स्वातंत्र्यलढ्यासाठीच.
त्यांच्याप्रमाणेच मीसुद्धा उघडपणे अहिंसक देशभक्त बनलो आहे आणि तुम्ही आणलेल्या बातमीवर उपाय करण्यासाठी काम सुरू करणार आहे. सुभाषचंद्रांचे म्हणणे आहे की देशभर अशी साखळी विणली जाणे आवश्यक आहे.

जाळे विणण्याचे काम आपण करूया आणि फितुरांना धडा शिकवायचे कामही करूया. त्या फितुरांचे बोकड कापायलाच हवेत.”
“कमीतकमी ह्या फितुरांना समाजात जगणे, राहणे जिकिरीचे, अपमानाचे व कष्टप्रद झाले पाहिजे आणि हे कार्य आम्ही स्त्रिया आधी हातात घेऊ.” हे उद्गार होते जानकीबाईचे. ती गुप्तद्वारातून आत येता-येता अगदी सहजपणे बोलून गेली होती, परंतु चेहर्यावरचा निश्चय अत्यंत कठोर होता.
(कथा चालू)
