भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – १

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू

 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा जो इतिहास आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असतो, तो एका फारच व्यापक आणि गहन अशा महागाथेचा केवळ एक छोटासा अंश आहे. सर्वांना परिचित असलेल्या काही नावांपलीकडे आणि ज्ञात गौरवशाली टप्प्यांपलीकडेही एक असा खूप मोठा अनकथित इतिहास दडलेला आहे—जो अशा स्त्री-पुरुषांनी घडवला, ज्यांचे त्याग कुठल्याही प्रकारे कमी नव्हते, किंबहुना ते दैवीच होते; परंतु त्यांची नोंद इतिहासाच्या पुस्तकांमध्येही नाही आणि कोणाला ते माहीतही नाहीत.

 

‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या अभ्यासपूर्ण अग्रलेखांमधून डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, हा अज्ञात, अनकथित इतिहास प्रकाशात आणतात. आपल्या मातृभूमीप्रति अढळ निष्ठा व शौर्य दाखवून ज्यांनी समर्पित भावाने देशकार्यात आपले योगदान दिले, अशा स्वातंत्र्यसैनिकांचे, विचारवंतांचे आणि अगदी गुप्तपणे पडद्याआडून स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍यांचे सुद्धा, जीवन ते ह्या अग्रलेखमालिकेमधून उलगडून दाखवतात. अनेकदा सामान्यांतूनच असामान्य बनलेली ही व्यक्तिमत्वे सर्वसामान्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक वाटावीत अशीच आहेत. जसजसा हा इतिहास पुढे-पुढे सरकतो, तसतशी असंख्य अपरिचित नावे समोर येतात; अशा व्यक्तींची, ज्यांचे जीवन - पराक्रम, त्याग आणि स्वातंत्र्यप्राप्तीचा दृढ संकल्प ह्यांनी घडलेले होते. 

 

ह्या अग्रलेखांमधून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांबरोबरच तिच्या, तितक्याच पराक्रमी सहकार्‍यांची माहिती समोर येते — असे सहकारी ज्यांचे शौर्य तिच्याइतकेच होते, पण ज्यांच्या नावांची इतिहासात नोंद नाही. त्यानंतर हा इतिहास हळूहळू लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या कालखंडात प्रवेश करतो, आणि त्यांच्या सर्वपरिचित सार्वजनिक प्रतिमेपेक्षा कितीतरी गहन व व्यापक असे त्यांचे अज्ञात पैलू उलगडून आपल्या समोर येतात. पुढे या लेखांमधून, टिळकांकडून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतलेले असंख्य अल्पपरिचित क्रांतिकारक, संघटक आणि निष्ठावान कार्यकर्ते समोर येतात. त्यांचे मूक त्याग, मानसिक व बौद्धिक निग्रह आणि नीडर कृती ह्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा कणा मजबूत केला; परंतु तरीही तथाकथित इतिहासकारांनी दुर्लक्ष केल्यामुळे ह्या खर्‍या ‘अनामिक नायकांची’ इतिहासात कुठेही नोंद नाही. 

 

हा केवळ इतिहासाचा लेखाजोखा नाही; तर ज्या अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागांवर हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा डोलारा उभारला गेला, त्या महान आत्म्यांना वाहिलेली ही आदरांजली आहे. शौर्य, समर्पण आणि नैतिक बळ प्रदर्शित करणार्‍या कथांनी भरभरून वाहणारा असा हा इतिहास, आपल्याला भारतीय स्वातंत्र्यलढ्याची खरी गहनता नव्याने जाणवून देतो आणि ज्यांनी मातृभूमीकरिता आपले सर्वस्व अर्पण केले, तेदेखील संपूर्ण निरपेक्ष भावाने, अशा त्यागमूर्तींसमोर नतमस्तक होण्यास प्रेरित करतो.

-----------------------------------------------------------------

भाग – १

लेखक – डॉ. अनिरुद्ध धै. जोशी

 

मल्हारराव कपाळाचा घाम पुसीत शेताच्या कडेला जाऊन उभे राहिले. आज दिवसभर खूपच काम पडले होते. त्यांच्या शेतांवरील जवळजवळ शंभरएक मजूर आज आलेले नव्हते आणि पिके तयार होऊन कापणीची, झोडणीची, मळणीची कामे जोरात सुरू होती. गहू, बाजरी, मका ह्यांच्याबरोबरच मल्हाररावांच्या शेतांमध्ये तूर, उडीद, मूग, मटकी, हरभरा अशी पिकेही होत असत. खरीपाची म्हणजे जून महिन्यामध्ये ज्यांची पेरणी होई अशी आणि रब्बीची म्हणजे नोव्हेंबरनंतर ज्यांची पेरणी होई अशी. 

 

त्याशिवाय मल्हाररावांची बागायती जमीनही खूप मोठी होती. दीडशे एकरची तर आमराईच होती. त्याशिवाय केळीच्या बागा, डाळिंबांच्या बागा, पपईच्या बागा, पेरूच्या बागा ह्यांमध्ये जवळजवळ आठशे एकर जमीन होती. वरकड म्हणजे ठिकठिकाणी माळरानावरच्याही जमिनी होत्या, जिथे गवत उगवले जाई व त्याचा पेंढा बनवून गुरांसाठी विकला जाई. सात जंगलांची मालकीही त्यांच्याकडे होती. त्या जंगलांमधील मोठमोठे वृक्ष तोडून, त्यांपासून लाकडी ओंडके व फळ्या बनवण्याचे कारखानेही मल्हाररावांनी तयार केले होते. सरपणाच्या लाकडाचा (जळणाची, स्वयंपाकाची लाकडे) मल्हाररावांचा व्यवसायही अगदी जोरात चालू होता. 

 

त्याशिवाय दोनशे एकर जमिनीवर गाई, म्हशी, बकऱ्या पाळलेल्या होत्या. दुधाचा व्यवसायही मजबूत फायदेशीर होता आणि गेल्या वर्षापासून रामचंद्रने, मल्हाररावांच्या एकुलत्या एका लाडक्या लेकाने कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्म) करण्यासाठी खास जागा घेतली होती. तेथे तशी सर्व व्यवस्थाही केली होती आणि गोविंददाजी नावाच्या, ह्या क्षेत्रातील एका व्यावसायिकाच्या नोकरीतून अपमानित होऊन बाहेर पडलेल्या अनुभवी कामगारास त्याने तेथील कारभारी नेमले होते. 

 

आज थोडासा गोंधळ उडला होता कारण त्यांच्या शेतावरील बरेचसे शेतमजूर बाजूच्याच एका गावातून येत असत व त्या गावात ब्रिटीश अधिकारी तपासणीसाठी आल्यामुळे गावातून बाहेर पडण्याची सर्वांना बंदी केलेली होती.

 

तो क्रांतिकारकांचाच जमाना होता आणि काही मराठी भाषिक तरुण क्रांतिकारक त्या गावात येत-जात असत असल्याची बातमी कुणातरी फितुराने (Traitor) ब्रिटीश राज्यकर्त्यांना दिली होती. भगतसिंगाला दोन महिन्यांपूर्वीच ब्रिटीश गव्हर्न्मेंटने फासावर लटकवले होते आणि भारताच्या कानाकोपऱ्यांतून गरम रक्त पेटून उठत होते. 

 

मल्हाररावांवर म्हणून आज खूपच भार पडला होता. त्यांना स्वत:ला कामात उतरावे लागले होते. त्यांचा पुत्र रामचंद्र पहिल्यांदा मुंबईत एका सूतगिरणीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नोकरीवर होता. परंतु त्याची हुशारी व शिक्षण पाहून ब्रिटीश गव्हर्नरने रामचंद्रला गव्हर्न्मेंट सर्व्हिससाठी निवडले होते. तो मोठा गव्हर्न्मेंट ऑफिसर झालेला होता. अधिकृतरित्या त्याच्याकडे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशचा दक्षिण भाग व कर्नाटकाचा उत्तर भाग एवढ्या प्रदेशाचे जंगलखाते होते. तो त्या विभागाचा तेथील सर्वेसर्वा होता. तो डायरेक्ट गव्हर्नरलाच रिपोर्टिंग करत असे. त्याच्या व गव्हर्नरच्या मध्ये दुसरा कुणीही ब्रिटीश ऑफिसर नव्हता आणि भारतीय अधिकारी असूच शकत नव्हता. 

 

रामचंद्र कायम फिरतीवर असे. मुंबईतील ‌‘कोट‌’ (फोर्ट) इलाख्यात (परिसरात) त्याला गव्हर्न्मेंटने दिलेला भलामोठा, खरा तर अवाढव्य बंगला होता. गव्हर्नरची डायरेक्ट भेट घेऊ शकणारे फक्त दोन-तीनच प्रांतिक अधिकारी होते. त्यांच्यामध्ये रामचंद्रचे नाव सर्वांत वरचे होते. 

 

एवढेच काय, परंतु गेल्या चार वर्षांत त्याने दाखविलेल्या कामगिरीमुळे त्याची इंडियाच्या व्हाईसरॉयशी (भारतातील ब्रिटिशांचा सर्वोच्च अधिकारी) तीन वेळा भेट झाली होती आणि तीसुद्धा दुसरे कुणी उपस्थित नसताना, व्हाईसरॉयच्या स्पेशल दालनात, व्हाईसरॉय, ह्या इलाख्याचा गव्हर्नर व रामचंद्र. ह्यामुळे रामचंद्रचा चांगलाच दबदबा त्याच्या इलाख्यात तर होताच, परंतु बऱ्याच प्रमाणात भारतात इतरत्रही होता. 

 

फक्त मल्हाररावांनाच ठाऊक होते की रामचंद्रकडे वरकरणी फक्त जंगल व शेती खाते असले, तरीदेखील खरं तर त्याच्याकडे त्या इलाख्यातील स्वातंत्र्य चळवळ कमजोर करत जाण्याचे काम होते. 

 

 

जेव्हा ही कामगिरी रामचंद्रवर सोपविली गेली, रामचंद्रने आपल्या वडिलांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले होते कारण मल्हारराव लोकमान्य टिळकांचे परमभक्त होते. स्वातंत्र्यचळवळीत ते मिरवत नसले, तरीदेखील त्या कार्यासाठी पैसा पुरवणे, गुप्त पत्रके प्रिंट करून घेणे, स्वातंत्र्यवीरांना गुप्तपणे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व गुप्ततेची काळजी घेणे आणि मुख्य म्हणजे लोकमान्यांच्या वृत्तपत्रातील अग्रलेख रोज संध्याकाळी गावकऱ्यांना वाचून दाखविणे, अशी कामे चालूच होती. 

 

लोकमान्य 1920 साली अनंतात विलीन झाल्यानंतर न. चिं. केळकरांनी त्यांची वृत्तपत्रे चालू ठेवली होती. गांधीजींच्या अहिंसावादी विचारांचा पगडा वाढत चालला होता. 1928 च्या दांडीयात्रेत अर्थात मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत मल्हाररावांनी भागही घेतला होता. परंतु ही जुलमी परदेशी सत्ता अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य देईल ह्यावरील मल्हाररावांचा विश्वास 28 सालीच उडाला होता कारण त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक नि:शस्त्र, निरपराध, निर्दोष मनुष्यांची, अगदी वृद्ध व स्त्रियांचीसुद्धा डोकी फुटताना त्यांनी पाहिली होती आणि योद्ध्यांची परंपरा असलेल्या मल्हाररावांना ते सहन झाले नव्हते.

 

परंतु लोकमान्य तर गेलेले होते. गांधीजी अहिंसा मार्गावर ठाम होते. बंगालमध्ये व पंजाबमध्ये क्रांतिकारकांचे उठाव होत होते. परंतु स्थानिक भारतीयांच्या फितुरीमुळे सर्व क्रांतिकारक पकडले जात होते व फाशी दिले जात होते किंवा सरळसरळ ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडत होते. 

 

हे पाहून मल्हारराव गेली तीन वर्षे सक्रिय संग्रामापासून दूर झाले होते. त्यांना मार्ग सापडत नव्हता. खरं तर त्यांना नेता मिळत नव्हता. रामचंद्राकडे ही गुप्त कामगिरी ब्रिटिशांनी सर्व माहिती काढून मगच दिलेली होती. त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलेले होते - ‌‘रामचंद्र राजकारणापासून पूर्ण अलिप्त आहे. त्याचे वडील मल्हारराव अतिश्रीमंत जमीनदार, शेतकरी व व्यावसायिक असून टिळकांचे चाहते होते. परंतु सध्या ते राजकारणापासून दूरच होते.‌’ ह्या रिपोर्टमुळेच रामचंद्रला ही जबाबदारी मिळू शकली होती. 

 

रामचंद्रने थोडेसे भीतभीतच ह्या नव्या जबाबदारीविषयी, मल्हारराव मुंबईला आल्या-आल्या त्यांच्या कानावर घातले होते. मल्हारराव संतापतील ह्याविषयी रामचंद्रची पूर्ण खात्री होती. त्यालाही असा भारतमातेशी द्रोह करावयाचा नव्हता. परंतु ह्या जबाबदारीला ‌‘नाही‌’ म्हटले असते, तर ब्रिटिशांचे सिक्रेट बाहेर फुटू नये म्हणून त्याला तुरुंगाची हवा खावी लागली असती किंवा कदाचित उडविलेही गेले असते. 

 

मल्हाररावांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले आणि ते डोळे बंद करून व मान खाली घालून त्यांच्या नेहमीच्या लाडक्या आरामखुर्चीत शांतपणे बसून राहिले. ती पाच मिनिटांची पूर्ण शांतता रामचंद्रला असह्य करून सोडत होती. पाच मिनिटांनंतर मल्हाररावांची आरामखुर्ची एका संथ लयीत डोलू लागली. त्या काळात डोलणाऱ्या आरामखुर्च्या असत. 

 

जवळजवळ दहा मिनिटांनंतर मल्हाररावांनी डोळे उघडले आणि उभे राहून त्यांनी रामचंद्रला घट्ट मिठी मारली, “जंगल व शेतकी खातेही नीट सांभाळ. ती भूमातेची जोपासनाच आहे आणि ब्रिटिशांकडून ही गुप्त जबाबदारीही जरूर घे. मात्र ह्या गुप्त जबाबदारीचा फायदा आपल्या भारतमातेसाठीच झाला पाहिजे, देशभक्तांना सहाय्य करण्यासाठीच झाला पाहिजे. इतिहासात जरी तुझे नाव नोंदले गेले नाही, तरी स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हृदयात तुला नक्की स्थान मिळेल. एक लक्षात ठेव. ‌‘तो‌’ एकच खरा आहे.” 

 

 

आज मल्हारराव शेताच्या बांधावर बसून रामचंद्रच्या निरोपाची वाट पहात होते. त्या शंभरएक शेतमजुरांना गावातच अडकवून ठेवण्याची योजनासुद्धा मल्हाररावांनीच रामचंद्रला सुचवलेली होती. सर्व पोलीस दळाचे लक्ष व बळ त्या शेजारच्या गावात एकवटणार होते आणि मल्हाररावांच्या आमराईतून पिस्तुले व काडतुसे (Cartridge) पुण्याला पाठविण्यात येणार होती.

(कथा चालू)