भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 11

“मधल्या काळामध्ये गंगाधररावांची प्रकृती हळूहळू जास्तच खालावू लागली आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या चुलतभावाचा लहान पुत्र दत्तक घेतला, ज्याचे नाव ‘दामोदरराव’ असे होते. ह्या दत्तकविधानानंतर काही काळातच गंगाधररावांचे निधन झाले. स्वतःचे दुःख बाजूला सारून, अवघ्या पंधरा दिवसांत राणी लक्ष्मीबाई दत्तकपुत्रास मांडीवर घेऊन राज्यकारभार चालवू लागली.
राणी लक्ष्मीबाईला, तिचे आधीच शिक्षण झालेले असल्यामुळे व गेल्या पाच वर्षांतील अधिक प्रशिक्षणामुळे व व्यावहारिक अनुभवांमुळे राज्यकारभार चालविणे अगदी सहजतेने जमत होते; किंबहुना तिच्या राज्यकारभारात झाशीतील प्रजा प्रथमच चार दिवस सुखाचे बघू लागली.

झाशीच्या राणीला मिळणारा प्रजेचा दुवा, प्रशंसा, स्तुती आणि आशीर्वाद झाशीतील ब्रिटीश अधिकाऱ्याच्या ताबडतोब लक्षात येऊ लागले व त्याने तशी तक्रारही वरिष्ठ अधिकार्यांना पाठवून दिली. परंतु त्या वरिष्ठ ब्रिटीश अधिकार्यांना त्यांच्या स्वतःच्या खास गुप्तहेरांकडून अशी माहिती मिळाली की राणी लक्ष्मीबाई सकाळ-संध्याकाळ देवपूजा करणे, जप करणे व मंदिरात जाणे ह्या गोष्टींमध्येच जास्त मग्न होती. सामान्य नागरिक स्त्रियांची ती वारंवार भेट घेते व त्यातून फक्त गरजू, गरीब, अनाथ व अपंग अशांनाच ती मदत करते व त्यामुळे ही परिस्थिती होत आहे. मात्र राणी लक्ष्मीबाई कंपनी सरकारशी अगदी एकनिष्ठ आहे. अशी माहिती पुरविणारा वरिष्ठ अधिकार्यांबचा गुप्तहेर म्हणजे दिवाण रघुनाथसिंग स्वतःच.
अशा माहित्या मिळाल्यामुळे निर्धास्त झालेले ब्रिटीश अधिकारी जागे झाले, ते धनसिंह गुर्जरच्या ठिकाणांवरून मिळालेल्या पुराव्यांमुळे. त्यांना कळून चुकले होते की धनसिंह गुर्जरला झाशीची राणी लक्ष्मीबाई अर्थसहाय्य करीत असे व झाशीतील पन्नास नागरिकही धनसिंह गुर्जरबरोबर होते
आणि ह्याबरोबर ब्रिटीश गव्हर्नर खडबडून जागा झाला व ब्रिटीश व्हाईसरॉयला ही बातमी कळविली गेली. (त्या काळात ‘व्हाईसरॉय’ हे पद नव्हते. कंपनी सरकारचा चीफच अर्थात् गव्हर्नर जनरलच व्हाईसरॉय समजला जात असे.)
ही माहिती मिळताच ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च अधिकारी कामास लागले. धनसिंह गुर्जरने दिलेल्या प्रचंड ताकदीच्या व समर्थ लढ्यामुळे, त्याच्या हौतात्म्यानंतर कंपनी सरकारने एकूण 34000 नवीन कायदे केले होते व ते अगदी काटेकोररित्या बनविलेही गेले होते आणि अगदी कठोरपणे अंमलात आणले जात होते.
ब्रिटीश सर्वोच्च अधिकार्यांकडून झाशीच्या संस्थानाला पत्र आले की राजाने केलेले हे दत्तकविधान कंपनी सरकारला मान्य नाही. ब्रिटीश अधिकाऱ्यांशी योग्य ते सहकार्य करावे, संपूर्ण माहिती अधिकृतरित्या द्यावी व संस्थान कंपनी सरकारच्या हातात देण्यासाठी तयारी करावी.
राणी लक्ष्मीबाई व तिच्या प्रमुख सहकार्यांना ह्या गोष्टीचा अंदाज होताच. मात्र ब्रिटीश ‘कारण कुठले पुढे करतील’ ह्याविषयी संभ्रम होता. दत्तकविधानाचे कारण पुढे करून ब्रिटिशांनी हिंदू वैदिक धर्मातील धार्मिक मान्यतांना झिडकारून दिले होते. झाशीच्या राणीचा संताप अनावर झाला होता. तिने जाणले की हे उघड-उघड वैदिक धर्मावरील, भारतीय संस्थानिकांच्या सत्तेवरील व भारतीय जनतेच्या जीवनशैलीवरील कपटी आक्रमण आहे.
दिवाण रघुनाथसिंगांच्या मदतीने तिने ब्रिटीश वरिष्ठ अधिकार्यांतबरोबर पत्रव्यवहार सुरू केला. लालाभाऊ बक्षी ह्यांना दूत म्हणून पाठविले गेले व अधिकाधिक वेळ व्हावा अशी तजवीज होऊ लागली. हे सर्व चालू असताना राणी लक्ष्मीबाई जास्तीतजास्त वेळ मंदिरांमध्ये घालवू लागली. निरनिराळ्या गावांमध्ये निरनिराळ्या महापूजा आयोजित करू लागली. वैदिक पठणाची व पुराणकथनाची सत्रे भरविली जाऊ लागली.
अशा प्रकारच्या मंदिरभेटींमध्ये, महापूजनांमध्ये व सत्रांमध्ये सर्व प्रजाजनांना ‘ब्रिटीश काय करत आहेत’ हे पद्धतशीररित्या समजावून सांगण्याचे कार्य राणी लक्ष्मीबाईचे विविध सहकारी करू लागले व त्याच वेळेस धर्मनिष्ठ व भारतीय अस्मिता जागृत असणार्यां मंडळींकडून निधी जमा करण्यात येऊ लागला व गुप्त रितीने पुरणसिंग कोरी व खुदाबक्ष हे विविध शस्त्रास्त्रे विकत घेऊ लागले.

14 मे 1857 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने (Lord Dalhousie) दत्तकविधान बेकायदेशीर ठरवून झाशीचे संस्थान खालसा केल्याचे अधिकृत आज्ञापत्र झाशीच्या राणीकडे सोपविले आणि त्याबरोबर त्याच रात्री झाशीमध्ये असलेल्या छावणीतील भारतीय सैनिकांनी झाशी शहरात ठिकठिकाणी हल्ले चढवून तेथील ब्रिटीश अधिकार्यांरशी लढून त्यांना यमसदनी पाठविले. अगदी एकही ब्रिटीशर वाचू शकला नाही.
मेजर जनरल ह्यूज रोज (Hugh Rose) ह्याला राणी लक्ष्मीबाईने ‘हे शिपायांचे बंड असल्याचे’ पटवून दिले आणि वाटाघाटी चालूच ठेवल्या. मेजर ह्यूज रोज नोव्हेंबर व डिसेंबर 1857 मध्ये झाशीतच तळ ठोकून होता. परंतु त्याला, त्याच्या अधिकार्यांजना व गुप्तहेरांनासुद्धा राणी लक्ष्मीबाईच्या गुप्त कारवायांची माहिती अजिबात मिळू शकली नाही. ह्याचे सर्व श्रेय स्वतः राणी लक्ष्मीबाईची मुत्सद्देगिरी व तिच्या खास सहकार्यांच्या अपूर्व नियोजनामध्ये होते. दिवाण रघुनाथसिंग, लालाभाऊ बक्षी, खुदाबक्ष, पुरणसिंग कोरी, झलकारीबाई, मोतीबाई, मुंदरबेगम, कमलकुमारी चौहान व राजकुंवर यादव अशा नऊ जणांचा गट झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आदेशानुसार अत्यंत शांतपणे आणि तरीही नेटाने प्रत्येक कार्य करीत होता. दुर्गादल व महादेवशिवदल अगदी व्यवस्थितरित्या वाढत होते. मेजर जनरल ह्यूज रोज वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्थात लॉर्ड डलहौसीला भेटण्यासाठी म्हणून झाशीबाहेर पडला व त्याच्या प्रवासाच्या दुसर्याष टप्प्यावरच त्याला झाशीच्या आजूबाजूच्या राज्यांतील दगाबाज लोक येऊन भेटले, जे झाशीच्या राणीच्या शौर्यामुळे व उत्कृष्ट राज्यकारभारामुळे तिचा मत्सर करत होते. त्यांनी अगदी सविस्तररित्या ह्यूजला झाशीतील राणीच्या हालचालींविषयी सांगितले व काही पुरावेही दिले.
ह्याबरोबर सर्वच चित्र पलटले. मेजर जनरल ह्यूज रोज लॉर्ड डलहौसीकडे जे झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या बाजूने बोलणार होता, त्याऐवजी टोकाच्या विरोधात जाऊन बोलला कारण त्याला दोन महिने झाशीत तळ ठोकूनसुद्धा काहीच न कळल्यामुळे त्याचा अहंकार अपमानित झालेला होता. त्याने झाशीच्या राणीला धडा शिकविण्याचा व झाशीचे राज्य जमीनदोस्त करण्याचा ठाम निश्चय केला.
ह्यावेळपर्यंत झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांविरुद्ध तयारी करीत असलेल्या नानासाहेब पेशव्यांशी संपर्क साधलेलाच होता व पेशव्यांचा प्रमुख प्रतिनिधी तात्या टोपे दोन वेळा झाशीत येऊन राहूनही गेला होता. झाशीवर हल्ला झाल्यास तात्या टोपे सहाय्यास धावून येणार होता, तेसुद्धा त्याच्या तीन हजार सैनिकांसह.

लॉर्ड डलहौसीच्या आदेशानुसार मेजर जनरल ह्यूज रोजने दहा हजार सैनिकांसह 15 मार्च 1858 रोजी झाशीवर आक्रमण केले. घनघोर युद्ध सुरू झाले.
मेजर एरस्किन (Erskine) हा प्रमुख सेनापती होता. त्याच्याशी लढत असतानाच लालाभाऊ बक्षी व दिवाण रघुनाथसिंग ह्यांनी मेजर एरस्किनबरोबर संवाद चालूच ठेवला होता. परंतु राणी लक्ष्मीबाई जराही बेसावध नव्हती.
राणी लक्ष्मीबाईच्या दुर्गादलाच्या 3500 वीरांगनांनी थेट मेजर एरस्किनच्या छावणीवरच हल्ला चढविला. राणी लक्ष्मीबाई व झलकारीबाई दोन दिशांनी धावून गेल्या होत्या आणि ब्रिटिशांचे 4000 सैनिक मारूनच दुर्गादल परतले होते.”
(कथा चालू)
