भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – 6

हिंदी English ગુજરાતી বাংলা తెలుగు മലയാളം ಕನ್ನಡ தமிழ்
सकाळी उजाडता उजाडता जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात येऊन पोहोचले. तशी आगाऊ सूचना स्थानीय पोलीस अधिकाऱ्यांनी मल्हाररावांना व गावच्या पाटलाला दिलेलीच होती. गावचे पाटील म्हणजेच धनाजी पाटील अर्थात वंशपरंपरेने चालणारी पाटीलकी थोरला बंधू असल्यामुळे त्यांच्याकडे आली होती, म्हणून पाटील म्हणायचे एवढेच. धनाजी पाटील कुठलेही काम बघत नसत. सर्व सरकारी व बिनसरकारी कामे मल्हाररावच सांभाळत. कारण धनाजी पाटील केवळ निकम्मे नव्हते तर एक नंबरचे स्त्रीलंपट व नानाविध छंद असणारे होते. मल्हाररावांवर सार्याव गावाचाच विश्वास होता. त्यांनीच शब्द दिल्यामुळे गेली चार-पाच वर्षे धनाजी पाटील प्रत्येक दिवस मजेत घालवत होता. मल्हारराव गावच्या करातील (Tax) पाटलाचा हिस्सा त्याला व्यवस्थित आणून देत असत आणि मुख्य म्हणजे धनाजीची गावात व गावाबाहेर असणारी हजारो एकर जमीन मल्हाररावच सांभाळत असत. फक्त जेव्हा ब्रिटिश ऑफिसर्स येत असत, तेव्हा धनाजी पाटील चावडीवर येऊन बसत असत. बोलण्याचे काम मल्हाररावच करत.

आजही ब्रिटिश पोलीस ऑफिसर्स येणार असल्यामुळे धनाजी पाटील येऊन बसलेले होते. त्यांच्या कानावर कालची हकीगत मल्हाररावांनी थोडक्यात घातलेलीच होती. मल्हाररावांना पूर्ण खात्री होती की पोलीस अधिकार्यााचा व त्याच्या खबर्याा भावाचा खून झालेला असल्यामुळे अगदी थेट वरपर्यंत बातमी रात्रीच्या पोटातच जाणार आणि शहरातून एखादा तरी गोरा अधिकारी येणारच. आणि तसेच घडले होते. ब्रिटिश ऑफिसर हेल्डेन सकाळी सात वाजता तेथे येऊन पोहोचला होता. हा हेल्डेन जिल्ह्याचा सर्वोच्च पोलीस अधिकारी होता. त्याला उत्कृष्ट मराठी बोलता येत होते.
देशभक्तांचा कर्दनकाळ अशीच हेल्डेनची ख्याती होती. मुंबई-पुण्याच्या बरोबरीनेच ह्याच्या अंमलाखालील तुरुंगात स्वातंत्र्यसैनिकांना व क्रांतिकारकांना ठेवले जाई. ‘ह्याचा तुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नरक आहे’ असेच वर्णन त्याच्या तुरुंगाची हवा खाऊन आलेले लोक करत असत. त्याने आल्या-आल्याच चौकशीला सुरुवात केली. त्याचे कान अतिशय तीक्ष्ण होते आणि मल्हाररावांनीही फकीरबाबा व फडके मास्तरांच्या मदतीने विठ्ठल मंदिरातील गजराचा व टाळांचा आवाज दुप्पट जोरदार करून घेतलेला होता. त्या आवाजाला त्रासून हेल्डेन ‘काय चालले आहे’ हे पाहण्यासाठी म्हणून थेट त्याच दिशेने निघाला. त्याच्या पाठोपाठ मल्हारराव, धनाजी पाटील असे दोघेच जण व हेल्डेनचे चार खास विश्वासू भारतीय पोलीस अधिकारी निघाले.
रस्त्यातून जाता-जाता मल्हाररावांनी त्या हत्येविषयी व त्या ठिकाणाविषयी व्यवस्थितपणे हेल्डेन साहेबाला सांगून टाकले. त्यामुळे हेल्डेन साहेबाच्या मनातील संशय अधिक बळावत जाणार ह्याची मल्हाररावांना पूर्ण खात्री होती.
ह्याचबरोबर मल्हाररावांना हीही पूर्ण खात्री होती की हा ब्रिटिश अधिकारी जबरदस्ती करून मंदिरामध्ये शिरणार नाही; परंतु त्याचे ते चार भारतीय कुत्रे असणारे भारतीय वंशाचे पोलीस ऑफिसर्स ती सर्व जागा अगदी पिंजून काढणार होते.

हे चारही पोलीस ऑफिसर्स इलाख्यात खूप प्रसिद्ध होते. त्यातच गावात हत्या झालेला पोलीस ऑफीसर हा हेल्डेनचा पाचवा कुत्राच होता व ह्यामुळे ते चौघेही चवताळून उठलेले होते. मंदिराच्या आवारात पोहोचताच हेल्डेन प्रांगणाच्या बाहेरच बसला आणि त्याच्या आदेशानुसार हे चौघे जण मंदिर व सभामंडप निरखून-निरखून तपासू लागले; पण त्यांनासुद्धा काही नियम अर्थात मंदिराचे पावित्र्य भंग न करण्याचे नियम पाळावेच लागत होते. परंतु ‘सर्व नियम पाळून हातास काहीच लागत नाही’ हे लक्षात येताच ते चौघेही जण धार्मिक नियमांना बाजूला ठेवून, काही ठिकाणी घुसून अगदी प्रत्येक कोपरा आणि कपाट तपासू लागले.
गुप्त द्वारे, गुप्त खोल्या व तळघर त्यांना सापडणे शक्यच नव्हते. ह्याची दोन कारणे होती. एक तर फकीरबाबांनी अर्थात शिवरामराजन् यांनी रचनाच तशा केल्या होत्या व दोन्ही मंदिरांच्या बांधकामात सहभागी झालेले तमिळ कामगार केव्हाच त्यांच्या त्यांच्या गावांना गेलेले होते. दुसरे म्हणजे अशा जागांच्या व गुप्त द्वारांच्या ठिकाणी भजनासाठी स्त्रियांनाच बसविले गेले होते. त्यांतील अनेक स्त्रिया ह्या चौघांच्या नात्यातल्या होत्या, गावातल्या होत्या किंवा जातीतल्या होत्या व अशा स्त्रियांच्या मधे घुसून कारवाई केल्यास ते चौघेही जण त्यांच्या त्यांच्या जातीकडून व गावाकडून बहिष्कृत होऊ शकले असते.

त्या चौघांनी बाहेर येऊन हेल्डेनला हलक्या आवाजात इंग्लिशमध्ये सांगितले की “बाकी सर्व व्यवस्थित वाटते, पण तीन गोष्टी खटकतात. १) स्त्रिया एका बाजूला, पुरुष एका बाजूला अशा रितीने बसण्याची परंपरा असूनही येथील मंदिरात मात्र स्त्रियांचे समूह पुरुषांपासून अलग असले तरीदेखील सभामंडपात ठिकठिकाणी विखुरलेले होते.
२) मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेरील प्रांगणात एक नव्याने उभारलेला मंडप आहे. जेथे हत्या झाली त्याच जागेवर शुद्धीकरणाचा मोठा होम चालू आहे. होमकुंड खूपच मोठ्या आकाराचे बनविले गेले आहे आणि येथेही बया् पैकी गर्दी आहे. मुख्य म्हणजे अठरा पगड जातींपैकी (त्या काळातील रिवाजानुसार अठरा प्रमुख जाती, त्यांची प्रत्येक जातीची पगडी किंवा पागोटे किंवा फेटा हा फक्त त्यांची जातच वापरत असे.) प्रत्येक जातीचे प्रमुख नागरिक आजूबाजूच्या गावातूनसुद्धा येत आहेत व त्या सगळ्यांना दुखावले गेले तर खूप मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. खटकण्यासारखी गोष्ट म्हणजे एकाही जातीला मंडपाबाहेर ठेवले गेलेले नाही. अगदी गावाबाहेर वस्ती असणार्याग जातीच्या लोकांनाही या मंडपात स्थान आहे. या लोकांना एवढा मान मिळण्याचे कारण काय?
गावातील उच्चवर्णीय मंडळी अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय व व्यापारी वर्ग ह्याला विरोध कसा करत नाहीत? ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी कारस्थान शिजते आहे.
३) अनेक चेहरे अनोळखी वाटत आहेत. या परिसरातले वाटतच नाहीत.
अशा सर्व संशयितांना व सर्व जातिप्रमुखांना पकडून पोलीस ठाण्यावर चौकशीसाठी नेऊया काय? हंटरचे चार-पाच फटके बसले की कुणी ना कुणीतरी बोलूच लागेल.”

हेल्डेन आपली अस्वस्थता लपवत इंग्लिशमध्येच म्हणाला, “असे काही करण्यास वरून सक्त मनाई आहे कारण सर्व भारतीयांना, किंबहुना सर्व जातिप्रमुखांना व गावप्रमुखांना तरी ‘राणीचा जाहिरनामा’ (क्वीन्स् प्रोक्लमेशन) विषयी सखोल माहिती देशभरातील सरकारविरोधी सुशिक्षितांनी दिलेली आहे. त्यामुळे मला वरून परवानगी मिळवावी लागेल कारण ‘जालियनवाला बाग’ प्रकरणानंतर ब्रिटिश पार्लमेंट काही बाबतीत संयम बाळगत आहे व तसाच संयम बाळगण्याचा आदेश आम्हां सर्वांना आलेला आहे. त्यातच ‘२८ सालच्या दांडी यात्रेमध्ये अनेक भारतीयांची डोकी फुटली’ त्याचेही वर्णन व छायाचित्रे जगभरातील वर्तमानपत्रांनी छापलेली आहेत. त्यामुळे थोडी सबुरी राखूया.”
हेल्डेन त्याचा फौजफाटा घेऊन जिल्ह्याच्या प्रमुख स्थानी निघून गेला. त्यांतील कुणालाही कल्पना नव्हती की मल्हाररावांना, फकीरबाबाला व फडके मास्तरांना इंग्रजी उत्कृष्ट रित्या समजत होते व बोलताही येत होते. त्यांनी फक्त जानकीबाईला त्यांच्यापासून दूर उभे करून ठेवले होते आणि तेसुद्धा तिचा मान राखूनच कारण तिच्या पतीची अर्थात रामचंद्र धारपूरकरांची ब्रिटिश सरकारमधील वट हेल्डेनला नीट ठाऊक होती.
ते सर्वजण निघून जाताच मल्हारराव प्रत्येक जातीतील व गावातील त्यांच्या प्रमुख हस्तकांना घेऊन अगदी शांतपणे विठ्ठल मंदिरातील एका गुप्त खोलीत गेले. हेल्डेन व त्याच्या ऑफिसर्समधील सर्व संभाषण मल्हाररावांनी सर्वांना नीट समजावून सांगितले.
काही जणांनी नम्रतेने प्रश्न केला, “राणीचा जाहीरनामा म्हणजे नक्की काय? जालियनवाला बाग कुठे आहे व तेथे काय घडले? दांडी यात्रेत सर्व शांततेने चाललेले असताना डोकी फुटलीच कशी?”
मल्हाररावांनी शांतपणे डोळे मिटून स्वयंभगवानाचा मंत्रगजर केला आणि एक-एक गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.
(कथा चालू)
