भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – 5

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – 5

Previous Article 

हिंदी  English  ગુજરાતી  বাংলা  తెలుగు   മലയാളം ಕನ್ನಡ   தமிழ்

मंदिरातील गजर संपता-संपता अर्थात ‌‘पंढरीनाथ महाराज की जय‌’ हे शब्द विरता-विरता त्या गाडीवानाची बोंबाबोंब देवळातील अगदी प्रत्येकाला व्यवस्थित ऐकू आली. मंदिराच्या समोर असणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच रामचंद्र धारपूरकरांची पोल्ट्री व डेअरी फार्म (कुक्कुटपालन व गायी, म्हशी, बकऱ्यांचे पालन आणि दुग्धव्यवसाय) होती. तेथील चोवीस तास राहणारे मजूरसुद्धा अर्थातच धावत येऊन सगळ्यांच्या आधी तेथे पोहोचले होते.

मंदिरातील पुरुषमंडळी स्त्रियांना आतच राहण्यास बजावून लगबगीने बाहेर आली. एकच गोंधळ उडाला. त्या मृत झालेल्या दोघांच्याही पत्नींनी व इतर आप्त स्त्रियांनी हंबरडेच फोडले होते. त्यांना इतर स्त्रिया आधार देत होत्या.

थोड्याच वेळात धारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस ऑफिसर्स व शिपाई येऊन दाखल झाले. रीतसर जुन्या पोलिसी खाक्याने चौकशी सुरू झाली व त्याबरोबर बघ्यांची गर्दी आपोआपच कमी होऊ लागली.

गाडीवान ‌‘कसे आणि काय घडले‌’ हे सविस्तर सांगत होता. त्याने सांगितले की चार-पाच तगड्या व उंच पुरुषांची टोळी, गाडी थांबताच झपकन पुढे झाली व त्यांनी दोन्ही मालकांना, त्यांच्याकडील सर्व सोने व पैसे देण्यास सांगितले. परंतु दोन्ही मालक झटापट करू लागले व आरडाओरडीही करू लागले. बहुतेक त्यामुळे त्या लुटारूंनी त्या दोघांनाही भोसकले व त्यांच्या अंगावरील सर्व सोने व त्यांच्याजवळील सर्व पैसे घेऊन ते पळून गेले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्या गाडीवानाच्या गळ्याला पकडत विचारले, “xxx! मग तू काय करत होतास? तुलाच कसे काही नाही लागले? खरं सांग, तू पण त्यांचाच साथीदार आहेस ना?”

तो गाडीवान गयावया करत बोलू लागला, “साहेब! मला मारू नका. मी माझ्या जागेवरून उतरून खाली येईपर्यंत माझे दोन्ही मालक रक्तबंबाळ होऊन खाली पडलेले होते व ते लुटारू सोने व पैसे काढून घेत होते. मी ते पाहून घाबरलो. माझी बोबडीच वळली. त्यातच त्या लुटारूंपैकी एकाने मला जोरात लाथ घातली व मी दूर फेकला गेलो. ते येथून निघून गेल्यावरच मी कसाबसा उठलो व घाबरतच गाडीजवळ आलो व मला रडूच कोसळले. बघा! अजूनही मी थरथरतच आहे.”

त्याच गावात राहणारे अर्थात धारपूरनिवासी असणारे दोन पोलीस शिपाई म्हणाले, “साहेब! ह्याची अंगकाठी बघा. एकदम मरतुकडा (अतिशय बारीक व अशक्त) आहे. ह्याला अख्खं गाव ‌‘भितरा सख्या‌’ म्हणूनच ओळखतं. हा एक नंबरचा भेकड माणूस आहे. हा कशाला म्हणून घाबरत नाही? हा उंदराला घाबरतो, हा कुत्र्यांना घाबरतो, हा शिंग असणाऱ्या गायी-म्हशींनाच काय, पण मोठ्या बोकडांनाही घाबरतो. दुरून साप दिसला, तरी हा बोंबा मारत सुटतो. हा लुटारूंना काय सहाय्य करणार!

त्यातच ह्याला आई-बाप कुणी नाही. हा अनाथ मुलगा, आपल्या ह्या देवाघरी गेलेल्या पोलीस अधिकारी साहेबांनी कामावर ठेवला व त्यांच्याच घराच्या ओट्यावर रहात असतो. ह्याचा बाप पण घोडेवालाच होता. त्यामुळे हा फक्त घोड्याला घाबरत नाही.”

ह्या माहितीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी थोडासा मवाळ झाला, “काय रे सख्या! कधीपासून साहेबांकडे कामाला आहेस? आणि त्या लुटारूंपैकी कोणाला ओळखलेस का?”

सख्या दोन्ही हात जोडून व गुडघे टेकून बसत म्हणाला, “साहेब! मी साहेबांच्या सासुरवाडीच्या गावाला रहात होतो. ह्यांच्या सासऱ्यांनीच मला शिफारस देऊन ह्यांच्याकडे पाठवले. गेली तीन वर्षे मी ह्यांची घोडागाडी सांभाळतो व घोड्यांची निगा राखतो.

साहेब! एक तर काळोख आणि त्यामध्ये त्या लुटारूंनी चेहरा घोंगडीने अर्धवट झाकून घेतलेला होता. त्यामुळे नीट पाहू शकलो नाही. परंतु कुणी ओळखीचे वाटले नाही. मात्र ज्याने मला लाथ घातली, त्या लुटारूच्या पायात भलेमोठे कडे होते. असे पायातले जाड कडे मी ह्याआधी कधीच पाहिलेले नाही.”

बाकीही बऱ्याच चौकशा झाल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांची खात्री पटली की कुणी दुसऱ्या प्रदेशातून आलेली लुटारूंची टोळी असावी. त्यांनी मृतदेहाचे सर्व परीक्षण लिहून घेतले आणि उपस्थित प्रौढ व्यक्तींच्या साक्षीही घेतल्या. कुणालाही काहीच माहीत नव्हते. एकजात सगळ्यांनी फक्त गाडीवानाचा आरडाओरडा ऐकला होता व मंदिरातून बाहेर आल्यावर ते मृतदेह पाहिले होते.

त्या मृत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनेसुद्धा रडत-रडत सांगितले, “हा सख्या माझ्या माहेरी घोड्यांचेच काम बघत असे. तो एकदम प्रेमळ व विश्वासू आहे. तो साहेबांचा घात करणार नाही.”

हळूहळू करून सर्व गर्दी पांगली. पोलीस अधिकारी व शिपाई निघून गेले. दोन्ही शवे रीतसर कारवाईनंतर नातेवाईकांकडे सुपूर्द केली गेली. मंदिराच्या आवारात फक्त गावातील काही मोजकी प्रतिष्ठित मंडळी व मंदिरात नेहमी येणारी भजनी मंडळी थांबलेली होती.

मल्हाररावांनी गावातील उपाध्यायांना प्रश्न केला, “आपल्या ह्या पवित्र मंदिराच्या अंगणातच असा रक्तपात झाला आहे. आम्ही वारकरी तर मांसाहारही करत नाही. मग ह्या जागेचे आता शुद्धीकरण करावे लागेल ना?” हा प्रश्न खरं तर तेथील प्रत्येकालाच पडलेला होता.

उपाध्याय मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात पंचांग चाळीत म्हणाले, “मल्हारराव! मुहूर्तही चांगला नव्हता आणि नक्षत्र तर फारच खराब होते. त्यामुळे शुद्धीकरण व शांतिपाठ तर करावाच लागणार. ह्या अंगणातच सर्व व्यवस्था करावी लागेल. तेथे चारी बाजूंनी मंडप बांधून घ्यावा लागेल. ‌‘कुणाचीही अशुभ छाया पडू नये‌’ म्हणून मंडपाच्या चारी बाजू जाडसर तंबूच्या कापडांनी बांधून घ्याव्यात व ह्या मंडपात फक्त मोजक्या लोकांनाच येण्याजाण्याची मुभा असावी.” उपाध्यायबुवांनी लागणाऱ्या साहित्याची भलीमोठी यादी करून दिली.

उपाध्यायबुवांनी आणि मल्हाररावांनी मिळून गावातील चौकस वृत्तीच्या लोकांनाच ह्या कामगिरीवर नेमले. अर्थातच त्यांना मंदिराच्या आवाराबाहेर जाण्यास परवानगी नव्हती.

सर्व मंडळी निघून गेली. रात्रीचे दोन वाजले होते. मंदिराच्या सभामंडपात फक्त मल्हारराव, गोविंददाजी, उपाध्याय, जानकीबाई आणि गावाच्या शाळेतील मुख्याध्यापक फडके मास्तर एवढेच उरले होते. मंदिराचा दरवाजा आतून लावून घेऊन ही सर्व मंडळी मंदिरातील तळघरातून शिवमंदिराच्या तळघरात येऊन पोहोचली. तेथे फकीरबाबा अर्थात शिवरामराजन्‌‍ वाट पहातच बसलेले होते. मुख्याध्यापक फडके मास्तरांना घट्ट मिठी मारत फकीरबाबा म्हणाले, “कोणीही तुम्हाला ओळखले नाही. तुम्ही भजनासाठी जेथे बसला होतात, त्याच्या समोरच मी बसलो होतो. मधेच भजनातून उठणारी व दोन भजनांच्या मधल्या काळात किंवा एक गजर संपून दुसरा गजर सुरू होण्याच्या काळात अनेक लोकं तुमच्या आजूबाजूला वावरत होती. ह्या शाळेत गेली दहा वर्षे असूनही तुम्हाला कुणीसुद्धा ओळखू शकले नाही. खरोखरच हाडाचे अभिनेते आहात तुम्ही! आणि काय वेगाने त्या पेढीवाल्याच्या पोटात भोसकले तुम्ही! तोड नाही!”

फडके मास्तर दोन्ही हात जोडून भगवंताचे स्मरण करीत म्हणाले, “हे स्वयंभगवानाच्या कृपेनेच घडू शकते. माझे सोडून द्या. ‌‘दोन्ही भाऊ आले आहेत` हे वृत्त कळताच जानकीबाई ज्या चपळाईने धनगरी घोंगडी पांघरून मला सामील झाली, ते नवलच होते आणि तिने तर त्या नीच पोलीस ऑफिसरवरच कुऱ्हाडीचा घाव घातला.”

मल्हारराव कौतुकाने आपल्या लाडक्या सुनेकडे पाहात म्हणाले, “पोरी! तू खरंच रणरागिणी आहेस. ह्या दोन नीच भावांनीच आपल्या जिल्ह्यातील अनेक देशभक्तांना भरपूर छळलेले होते. तो व्यापारी भाऊ पोलीसांना गुप्त बातम्या पुरवायचा व स्वातंत्र्यसैनिकांना पकडून द्यायचा आणि तो पोलीस ऑफिसर भाऊ त्या सर्वांचे अतोनात हाल करायचा व तेदेखील लोकांच्या देखत. ह्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली होती.”

फकीरबाबा ‌‘प्रभु रामचंद्र की जय‌’ असे म्हणून अत्यंत आदराने म्हणाले, “येथील दहशत दूर झाली आहे. कार्याचा आरंभ जानकीने केला आहे. त्यात तिला सहाय्य महादेवराव फडक्यांनी केले आहे आणि संपूर्ण बेत आखला होता रामचंद्राने. राम, जानकी व शिव एकत्र आल्यावर अशुभाचा नाश होणारच.” 

(कथा चालू)