भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग – 4

जानकीबाई आगाऊ ठरल्याप्रमाणेच मुंबईहून खास फकीरबाबांना अर्थात शिवरामराजन्ना भेटण्यासाठीच आली होती. शिवरामराजन् गेल्या तीन वर्षांपासून जानकीबाईला नीट ओळखत होते. ह्या तशा लहान वयाच्या तरुणीमध्ये बुद्धिमत्ता, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, निर्भयता आणि संयम ह्या गोष्टींचा किती सुरेख संगम झालेला आहे, हे फकीरबाबांना पुरेपूर ठाऊक होते. त्यांना वाकून नमस्कार करणार्या जानकीबाईला आशीर्वाद देत फकीरबाबा म्हणाले, “मुली! उत्तर हिंदुस्थानामध्ये बहुतेक प्रदेशातील स्त्रिया अजूनही डोक्यावरील पदर, चेहरा झाकला जाईपर्यंत खाली ओढून अर्थात चेहरा झाकूनच वावरत असतात. अगदी शहरांमध्येसुद्धा हे जाणवते. परंतु प्रमुख शहरांमधील उच्चभ्रू स्त्रियांमध्ये थोडे-थोडे आधुनिक जगाचे अस्तित्व जाणवायला लागले आहे. त्या स्त्रिया स्वतंत्रपणे वावरतही आहेत आणि शिकतही आहेत. मुंबई-पुणे इलाख्यातील स्त्रियांएवढी शिक्षणातील प्रगती उत्तर हिंदुस्थानामधील स्त्रियांमध्ये झालेली नसली, तरीदेखील अनेक वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, व्यापारी व गव्हर्न्मेंट ऑफिसर्सच्या घरातील स्त्रिया चेहरा पूर्ण झाकण्याऐवजी फक्त डोक्यावरून पदर घेऊन वावरतात आणि त्यांमधील काही स्त्रिया तर अगदी पुणे-मुंबईमधील त्यांच्या दर्जाच्या स्त्रियांप्रमाणेच आधुनिक वेषभूषा, शिक्षण व समाजसुधारणा ह्यांमध्ये हळूहळू प्रगती करू लागल्या आहेत.

तसेच मध्य भारत व दक्षिण भारतातील स्त्रियादेखील सुशिक्षित होऊ लागल्या आहेत. शहरांमधील अनेक शाळांमध्ये मुली जाऊ लागल्या आहेत. काही काही ठिकाणी तर स्त्रियांसाठी वेगळ्या शाळांचीही सुरुवात झालेली आहे. मात्र मुंबई व पुणे नगरीमधील स्त्रिया अधिक वेगाने पुढे जात आहेत व स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेऊ लागल्या आहेत.
फितुरांना धडा शिकवण्याचे कार्य करताना आपल्याला गुप्तता पाळणे व संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ‘आपले हे कार्य पुढे इतिहासात नोंदही होऊ शकणार नाही’ हे जाणूनच कार्यात उतरायला हवे. आपल्या ह्या कार्यातील पुरुषांनासुद्धा बाहेरून ‘ब्रिटीशधार्जिणे’ म्हणून मिरवावे लागेल. कदाचित, जेव्हा केव्हा स्वातंत्र्य मिळेल, तेव्हा आपली नावे देशभक्तांच्या यादीत नसतील, ह्याची जाणीव आपल्या गटातील प्रत्येकाला असणे अत्यंत आवश्यक आहे. मी जागोजागी असेच अनेक विविध वयोगटांचे पुरुष कार्यकर्ते तयार केले आहेत व माझ्या पत्नीने अशा स्त्रिया आमच्या मद्रास इलाख्यात तयार केल्या आहेत.
जानकीबाई! तुझे व रामचंद्ररावाचे कार्य तर जोरदारपणे चालू आहे. तुझ्या काही खास महिला कार्यकर्त्यांची तू भेट आयोजित केली आहेस, हा तुझा निरोप मला मिळाला. सभा कुठे आहे व नेमकी कुठल्या विषयावर आहे, हेही मला ठाऊक नाही. तूच प्रत्यक्ष इथे आली आहेस, ह्याचा अर्थ, सभा इथेच आहे काय?”
उत्तर मल्हाररावाने दिले, “होय! मुंबई, पुणे शहरांमध्ये सध्या प्रत्येक शिक्षित व्यक्तीवर बारीक नजर ठेवली जात आहे. त्यामुळे ह्या शहरांमधील स्त्रियांचे सार्वजनिक हळदी-कुंकू, महिला शिक्षण परिषदा, विधवा व परित्यक्ता (पतीने टाकलेल्या स्त्रिया) स्त्रियांसाठी भरवली जाणारी नर्सिंगची शिक्षण-सत्रे किंवा अशा स्त्रियांसाठी चालविल्या जाणार्या शिलाईकामाच्या कार्यशाळा ह्यांवरही पाळत ठेवली जात आहे. ब्रिटिशांना जेवढे मुंबई, पुणे व कलकत्त्याचे भय वाटते, तेवढे इतर कुठल्याही प्रांताचे वाटत नाही कारण जास्तीत जास्त क्रांतिकारक व सशस्त्र उठाव ह्याच दोन प्रांतांत होऊन गेले आहेत. पंजाबही धगधगताच आहे. अनेक सीख तरुण तर देशासाठी कधीही मरण्यास तयार आहेत परंतु अशा तरुणांचेच घात होत आहेत व हेही घात थांबवणे हेच तर आपले काम आहे.
फकीरबाबा! ह्यामुळेच नीट विचार करून सभा ह्या शिवमंदिरातच आयोजित केली आहे. भारताच्या सगळ्या प्रांतांतील समविचारी मंडळी येथे जमण्यास आधीच सुरुवात झालेली आहे. ते सर्व जण ‘वारकरी’ अर्थात विठ्ठलभक्तांच्या मराठमोळ्या रूपातच येथे येत आहेत व येणार आहेत.
आपल्या ह्या शिवमंदिरापासून एक भुयारी वाट जाते, ती गावाच्या पश्चिम सीमेबाहेर असणार्या विठ्ठल मंदिरामध्येच. तेथेदेखील अशीच गुप्त रचना करून ठेवलेली आहे. आमचे इस्टेट मॅनेजर गोविंददाजी हेच त्या विठ्ठलमंदिरातील भक्तांचे प्रमुख भजनीबुवा आहेत. तुमची प्रत्येक प्रतिनिधीशी ओळख करून देण्याचे कार्य गोविंददाजी व जानकी करतील. मग तुम्ही मोकळेपणाने सर्व सांगा, देशभर फिरून जे पाहिले आहे, गुप्त माहित्या काढल्या आहेत, ते सर्व सांगा.”

भुयारी मार्गाने ते तिघेही जण विठ्ठल मंदिरात जाऊन पोहोचले. तेथे नामसप्ताहाची तयारी जोरात चालू होती. एरवी शर्ट-पँटसारख्या आधुनिक पोषाखामध्ये वावरणारे गोविंददाजी आज तेथे धोतर, सदरा, गळ्यात वीणा आणि तुळशीमाळा, कपाळावर गोरोचनाचा व बुक्क्याचा टिळा आणि हातात चिपळ्या अशा रूपात सर्वत्र वावरत होते.
क्षणभर फकीरबाबांनीसुद्धा गोविंददाजींना ओळखले नाही. खरं तर गोविंददाजींची व शिवरामराजन् ह्यांचीच खरी मैत्री होती. फकीरबाबांच्या मुखात कबीरपंथाप्रमाणे सतत रामनाम होते, तर गोविंददाजींच्या मुखात वारकरीपंथाप्रमाणे सतत विठ्ठलनाम होते.
संध्याकाळची भोजने आटोपल्यानंतर गावाकडील पद्धतीप्रमाणे भक्त स्त्री-पुरुष गोविंददाजींच्या कीर्तनासाठी जमा होऊ लागले. अर्थातच त्यांमधील 30% मंडळी हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी तळमळणारे जीव होते.
मुख्य म्हणजे गोविंददाजींची ह्या अनेकांशी ओळखही जानकीबाईंनी करून दिलेली होती. अशा भेटींसाठीची सोय ह्या विठ्ठल मंदिरात, अगदी भक्तांची गर्दी असतानाही होत असे. तेथे विठ्ठल मंदिराच्या गाभार्याला लागूनच संस्कृतच्या, वेदपाठाच्या पाठशाळांचे वर्ग होते आणि मुख्य म्हणजे मौनाच्या व ध्यानाच्या खोल्याही होत्या. ह्या खोल्यांमध्येच सर्व गुप्त भेटी झाल्या होत्या.

गोविंददाजींनी ‘जय जय रामकृष्णहरि’ ह्या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दिव्य मंत्रगजराने आख्यानास सुरुवात केली. प्रजेवर अत्याचार करणार्या रावणाच्या गोष्टींनी आरंभ झाला होता. रावणाने कुबेराचे राज्य कपटाने जिंकून, तेथील मूळ वैदिक धर्माची कशी गळचेपी केली होती व साधुसंतांच्या हत्या केल्या होत्या, ह्याचे वर्णन चालू होते. कीर्तनातील ‘श्रीरंग’ अर्थात कथा संपून ‘उत्तररंगाला’ सुरुवात झाली. प्रभु श्रीरामचंद्रांच्या अवताराचे हेतू समजावून सांगितले जात होते.
शेवटी ‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की’ हा गजर जोरजोरात सुरू झाला. कीर्तनात रंगून गेलेल्या भक्तांना, गजर व टाळांचा आवाज, मृदुंगांचा आवाज ह्याशिवाय काहीच ऐकू येत नव्हते.
भजनासाठी अगदी प्रवेशद्वाराच्या जवळ बसलेली एक पाठीत वाकलेली वृद्ध व्यक्ती खोकत-खोकत काठीच्या आधाराने हळूच बाहेर पडली आणि त्या अंधारात त्या वृद्धास एक स्त्री येऊन मिळाली.
नेहमीप्रमाणे कीर्तनाच्या शेवटी मिरवण्यासाठी येणार्या जवळच्या मोठ्या गावातील एक पेढीमालक व त्याचा भारतीय पोलीस अधिकारी भाऊ असे स्वत:च्या घोडागाडीतून मंदिराच्या आवारात उतरत होते.
खाली उतरले, ह्या दोघांचे कोथळा काढलेले मृतदेहच. तो वृद्ध आणि ती स्त्री परत एकदा शांतपणे भजन करत होते आणि त्या घोडागाडीचा गाडीवान आरडाओरड करीत होता, “दरोडा पडला! माझ्या मालकांना वाचवा!” आणि हे ओरडता-ओरडता त्याने, ‘ते दोघे नक्की मेले आहेत’ ह्याची खात्री करून घेतली.
मंदिरातून जयघोष झाला - ‘पंढरीनाथ महाराज की जय’. ही खूण होती - परस्परांना.
(कथा चालू)
