भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 14

हिंदी ગુજરાતી বাংলা తెలుగు മലയാളം ಕನ್ನಡ தமிழ்
झलकारीबाईने शेवटचा श्वास घेतानासुद्धा ब्रिटीश सैन्यासमोर ओरडून ओरडून सांगितले होते की राणी लक्ष्मीबाई, अर्थात खरा सूर्य झाशीच्या किल्ल्यात जोरदार तयारी करत आहे कारण मुंदरबेगमने स्वतः माहिती काढून आणून झलकारीला दिलेली होती की जनरल ह्यूज रोजचा पुढील पाच तत्त्वांवर (Principles) जबरदस्त विश्वास आहे. १) राजाऐवजी किंवा राज्यप्रमुखाऐवजी संपूर्ण सैन्याला ठार केले, तरीदेखील विशेष उपयोग होत नाही कारण वाचलेला राजा किंवा नेता परत सैनिक गोळा करतोच. २) भारतीय राजे व राण्या चैनीच्या मार्गावर असल्यामुळे त्यांना जनतेची सहानुभूती नाही व सहाय्यही नाही. ३) भारतीय ब्रिटिशांपुढे सर्वच बाबतींत अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. ४) ‘अहिंसा’ हे तत्त्व भारतीयांच्या मनामध्ये खूप मोठे स्थान मिळवून असल्यामुळे व हिंदू, सर्वांमध्येच देवाचा अंश असल्याचे मानत असल्यामुळे, सधन व ताकदवर ब्रिटिशांना तर देवच मानणार. ५) जगातील कुठल्याही धर्मातील मनुष्य व विशेषतः भारतीय मरताना कधीच खोटे बोलत नाही.
राणी लक्ष्मीबाईने ह्याच माहितीचा उपयोग करून गुप्तपणे सर्व कारवाया केलेल्या होत्या व झलकारीबाईनेही आज मरताना, ‘राणी लक्ष्मीबाई किल्ल्यातच असल्याचे’ धादांत असत्य सांगून जनरल ह्यूजला राणीच्या मागे जाण्यापासून रोखले होते.
व त्याच्या आधी जवळजवळ बारा तास, ‘स्वतःच राणी लक्ष्मीबाई असल्याचे’ ब्रिटिशांना पटवून दिल्यामुळे, ब्रिटीश सैन्याचे सर्व लक्ष फक्त तिच्यावर केंद्रित झाले होते व राणी लक्ष्मीबाई तिच्या खास साथीदारांसह, तात्या टोपे रहात असलेल्या कालपी गावापर्यंत जाऊन पोहोचू शकली होती व मुंदरबेगमनेही ‘राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरला जाऊन पोहोचल्याचा’ निरोप एका फितुर सैनिकासमोर झलकारीला सांगून (संदर्भ कथामंजिरी ४-३-१३) ब्रिटिशांची तशीही दिशाभूल केली होती.
ब्रिटिशांचे अर्धे सैन्य ग्वाल्हेरमार्गे रवाना झाले होते व अर्धे सैन्य फक्त झलकारीवर लक्ष ठेवून बारा तास राहिले होते.
ह्यामुळे राणी लक्ष्मीबाईही कालपीला निर्विघ्नपणे पोहोचू शकली व किल्ल्यात दिवाण रघुनाथसिंग, सरदार मंजुनाथ पहाडी, राजकुंवरबाई व कमलकुमारी हे चौघे जण मिळालेल्या अवधीचा वापर करून पुढील लढाईसाठी अधिक सक्षमपणे तयार झाले कारण काही झाले तरी ब्रिटिशांचे ह्यूजच्या नेतृत्वाखालील सैन्य तीन ठिकाणी विभागले जावे, हीच व्यूहरचना होती.
एक भाग किल्ल्याशी लढत राहिला पाहिजे व किल्ला कमीतकमी तीन दिवस लढवत ठेवता आला पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटीश सैन्याचा दुसरा भाग ग्वाल्हेरमार्गे गेला पाहिजे आणि तिसरा भाग झाशीच्या आजबाजूच्या गावांच्या नाकेबंदीच्या कामात गुंतून पडला पाहिजे.
रघुनाथसिंग दिवाणांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले शिवमहादेवदल, झाशीच्या आसपासच्या गावांमध्ये ठिकठिकाणी वेळोवेळी हालचाली करून ब्रिटीश सैन्याला ठिकठिकाणी विखरून ठेवत होते. हाच तो ब्रिटीश सैन्याचा तिसरा भाग आणि त्यांच्यावरही हल्ले जोरदारच होत होते.
राणी लक्ष्मीबाई कालपीत सुखरूपपणे जाऊन पोहोचली. तात्या टोपेंबरोबर तिची भेटही अगदी प्रदीर्घ चर्चेसह व्यवस्थित पार पडली. रावसाहेब पेशव्यांनी व तात्या टोपेंनीही तिला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
राणी लक्ष्मीबाईचे दुर्गादलातील व शिवमहादेवदलातील स्त्री-पुरुष विविध वेशांनी व विविध मार्गांनी झाशीच्या राणीला येऊन मिळतच होते.
ह्या तिघांचे मिळून सैन्य जवळजवळ बावीस ते पंचवीस हजार झाले होते.
सर्व योजना काटेकोरपणे आखून जनरल ह्यूजच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढविण्याची जोरदार तयारी झाली. फक्त आधुनिक शस्त्रास्त्रांची मात्र कमी चांगलीच जाणवत होती.
राणी लक्ष्मीबाईचे गुप्तहेर खाते अगदी जोरदारपणे काम करीत होते. त्यांनी मिळवलेल्या बातम्यांनुसार राणी लक्ष्मीबाईने एक धाडसी निर्णय घेतला. तिचे जन्मग्राम ‘वाराणसी’ होते. (तिच्या माहेरच्या ‘तांबे’ घराण्याचे वास्तव्य गेली शंभर वर्षे वाराणसीतच होते व पुण्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. तांब्यांचे अनेक हितचिंतक वाराणसी व आजूबाजूच्या प्रदेशात होते. आजही वाराणसीमध्ये अनेक मराठी परिवार कित्येक शतकांपासून रहात आलेले आहेत.)
राणी लक्ष्मीबाई काही काळ वाराणसीमध्येच राहिली, मात्र गुप्तपणे आणि तिने ‘किती भारतीय संस्थानिक ह्या युद्धात उतरतील’ ह्याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली, परंतु हाती फारसे काही लागले नाही.
लक्ष्मीबाई जवळजवळ अडतीस संस्थानिकांना प्रत्यक्षपणे भेटली. जवळजवळ महिनाभर तिने ह्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु दोन-तीन संस्थानिकांच्या आश्वासनाशिवाय विशेष काही होऊ शकले नाही.
शेवटी राणी लक्ष्मीबाईने तात्या टोपेंच्या दहा हजार सैन्याच्या मदतीने झाशी किल्ल्यावर आक्रमण करून झाशी परत ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.
कारण कालपीला येऊन पोहोचल्यानंतर अवघ्या सात दिवसांतच राणी लक्ष्मीबाईला माहिती मिळाली होती की ‘झाशीचा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला आहे’ व तो कुठल्याही परिस्थितीत परत मिळवायचाच, असा चंग राणीने बांधलेला होता.
परंतु कशाबशा ब्रिटिशांच्या आक्रमणातून वाचलेल्या कमलकुमारी चौहान, राजकुंवर यादव व तिचा भाऊ बिहारीलाल यादव ह्या तिघांनी राणी लक्ष्मीबाईची ११ मे १८५८ रोजी कालपीत येऊन भेट घेतली. दिवाण रघुनाथसिंग कशा रितीने लढले व कसे वीरगतीस प्राप्त झाले, हे वृत्त राणी लक्ष्मीबाईने हृदय घट्ट करून ऐकले. ती रघुनाथसिंग दिवाणांना पितासमानच मानत होती.
परंतु त्याहीपेक्षा मोठा धक्का पुढच्या संभाषणात समोर आला. त्या तिघांनी झाशीच्या किल्ल्याची ब्रिटिशांनी केलेली दुर्दशा सविस्तरपणे सांगितली. झाशीच्या किल्ल्यातील प्रत्येक वास्तु भग्न केली गेली होती. अनेक घरे जाळली होती व शेकडो स्त्री-पुरुषांच्या निर्घृणपणे हत्या केल्या गेल्या होत्या. ह्या तिघांच्या मते, राणी लक्ष्मीबाईने झाशीला परत येण्याचा विचार सोडून द्यावा, असे होते. रावसाहेब पेशव्यांनीही हाच सल्ला दिला.
परंतु झाशीची राणी मात्र मागे हटण्यास तयार नव्हती. तिने सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या वेगवेगळ्या मार्गांनी पुढे पाठविण्यास सुरुवात केली. २४ मे रोजी राणी लक्ष्मीबाई तिच्या, मागे उरलेल्या एक हजार सैनिकांसह, मध्यरात्रीस कालपीहून निघणार होती.

परंतु फितुरांनी त्यांचे काम केले होते आणि राणी लक्ष्मीबाई कालपीहून बाहेर पडण्याच्या आतच, भल्यामोठ्या सैन्यासह मेजर जनरल ह्यूज रोजने कालपीवर भीषण हल्ला चढविला.
तुंबळ युद्ध झाले. राणी लक्ष्मीबाईचे ९०% सैन्य आधीच कालपीबाहेर गेलेले होते. तात्या टोपेंचीही तीच गत होती. परंतु दोघेही शर्थीने लढले.
शेवटी तीन दिवसांच्या तुंबळ युद्धानंतर राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपेंनी, कालपी गुप्त रितीने सोडण्याचा निर्णय घेतला - अर्थात वेगवेगळ्या मार्गांनी.
कारण राणी लक्ष्मीबाईचे अकरा हजार सैन्य, कालपी ते झाशी ह्या प्रदेशात तिची वाट पहात होते. त्यांना अनाथ करून असहाय्य करण्याची कल्पनासुद्धा राणी लक्ष्मीबाईला मान्य झाली नसती.
राणी लक्ष्मीबाई तिच्या ह्या तीन सहकाऱ्यांसोबत गंगेतून प्रवास करीत पुढच्या प्रवासाला निघाली, तेव्हा तिच्या सर्वांगावर ५९ जखमा होत्या.
राणीची युद्धनीतीतील व राजनीतीतील महत्त्वाची सल्लागार मोतीबाई, ही मात्र राणी लक्ष्मीबाईच्या वेशात ५०० सैनिकांसह जंगलांमधील बिकट मार्गाने झाशीच्या दिशेने निघाली - अर्थातच ब्रिटीश सैनिकांना झुलवत व राणी लक्ष्मीबाईचा प्रवास निर्विघ्न होण्यासाठीच. तिनेच लिहिलेल्या एका पत्रात, राणी लक्ष्मीबाईच्या अंगावरील ५९ खोल जखमांचा उल्लेख केला.
झाशीची राणी लक्ष्मीबाईने अर्ध्या रस्त्यात मोतीबाईची भेट घेतली व ग्वाल्हेरवर हल्ला करून ग्वाल्हेर जिंकून घेण्याचा निर्णय झाला. ग्वाल्हेर हे संस्थानसुद्धा ब्रिटिशांच्या अंमलाखालीच होते व संस्थानिक नावालाच होते.
ग्वाल्हेरच्या दिशेने निघालेल्या राणी लक्ष्मीबाईचे जखमी शरीर, जखमी मन व हत्यारांशिवायचे सैन्य असले, तरीदेखील तिने जिद्द सोडली नाही. राणी लक्ष्मीबाईने नवीनच योजना आखली.
(कथा चालू)
