भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 13

राणी लक्ष्मीबाईच्या, कंबर कसून व पोलादी छाती करून लढण्यासाठी तयार असलेल्या दुर्गादलाने व महादेवशिवदलाने ब्रिटिशांच्या हल्ल्याला जोराने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. युद्धात जशी झाशीच्या किल्ल्यावरून राणी लढत होती, तसे आधीच योजनाबद्धपणे झाशी शहरातील व झाशी राज्यातील विविध भागांत लपवून तयार ठेवलेले राणी लक्ष्मीबाईचे शेकडो सैनिक, मेजर एरस्किनच्या सैन्यावर अनेक बाजूंनी व अनेक ठिकाणी हल्ले चढवू लागले.
‘ब्रिटीश सैन्यातील दीड हजार सैनिक पहिल्या चार दिवसांतच मारले गेले व झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील जास्तीत जास्त दोन-चार सैनिक आपण मारू शकलो असू’ असा स्पष्ट संदेश मेजर जनरल ह्यूज रोजच्या गुप्तचरांनी एरस्किनच्याही नकळत ह्यूज रोजला व लॉर्ड डलहौसीला कळविला व त्याबरोबर ठिकठिकाणांहून ब्रिटिशांचे सैनिक झाशीबाहेर गोळा होऊ लागले.
राणी लक्ष्मीबाई तिच्या जवळच्या सहकार्यांबरोबर चर्चा करून महालातील देवगृहात जाण्यास निघाली. चहूबाजूंनी हल्ले वाढत चालले होते. पहिल्या चार दिवसांनंतरच्या प्रत्येक दिवशी झाशीच्या सैन्याचे व झाशी राज्याचे अतोनात नुकसान होत चालले होते.

किल्ल्याबाहेर राहून आणि गनिमी हल्ले करून ब्रिटीश सैन्याला छळणार्या लक्ष्मीबाईच्या सैन्यामध्ये जवळजवळ 50% सैनिक मारले गेले होते. राणी लक्ष्मीबाई ह्याच विचारात देवगृहाकडे निघाली होती की किल्ल्याबाहेरून लढणार्या आपल्या गनिमी काव्याच्या सैन्याला थांबवायचे की लढू द्यायचे आणि त्यांना निरोप कसा पाठवायचा? कारण त्यांच्यापर्यंत तो निरोप पोहोचवणारे, झाशीच्या किल्ल्यातून आजूबाजूच्या प्रदेशांत जाणारे सातही भुयारी मार्ग ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केले होते.
राणी लक्ष्मीबाईने देवगृहात प्रवेश करून देवाचे दर्शन घेतले, देवगृहात स्वतःच्या हाताने ज्योत प्रज्वलित केली आणि ‘ही एखाद्या वेळेस माझी-तुमची शेवटची भेट असेल’ असे स्पष्ट देवांना सांगून राणी लक्ष्मीबाई एकदाही मागे वळून न पाहता देवगृहातून निग्रहाने बाहेर पडली. कारण देवगृहात देव तर होतेच, पण तेथेच एका भिंतीवर तिच्या पतीचे, पुत्राचे व राणी लक्ष्मीबाईच्या दिवंगत मातेचे, पुरनसिंग कोरीने काढलेली अगदी हुबेहूब अशी मोठाली चित्रे होती. तिला एकही अश्रू गाळायचा नव्हता. त्या पतिव्रता भारतीय नारीने देवगृहाचा दरवाजा ओलांडून बाहेर येताना तिच्या पतीचे स्मरण करून त्याला एवढेच सांगितले - ‘बहुतेक लवकरच तुमच्याशी भेट होईल. तुम्हां दोघांना भेटण्यात आनंदच असेल. परंतु झाशी ही तुमची माता होती. तिच्या संरक्षणासाठी देवाला सांगा.’
राणी लक्ष्मीबाई देवगृहातून बाहेर पडून बालेकिल्ल्याच्या दुसर्या मजल्याकडे निघाली, जेथे पुरणसिंग कोरी व दिवाण रघुनाथसिंग काही विशेष बातम्या घेऊन तिची वाट पहात बसले होते.
राणी लक्ष्मीबाई एकटीच त्या भल्यामोठ्या व्हरांड्यातून चालत होती. त्या पूर्ण किल्ल्यात एकही सेवक नव्हता. सर्व सेवक, अगदी आचारी, पाणकेसुद्धा लढाईमध्ये सहाय्य करण्यात गुंतलेले होते. काही वेळा तर लढणार्या सैनिकांना खाण्यापिण्यासाठीही उसंत मिळत नव्हती, तेव्हा हा आचारीवर्ग व पाणी वाहणारा वर्ग सैनिकांना स्वतःच्या हातांनी भरवत होता व जलही पाजत असे आणि सैनिक लढतच रहात. कुठलाही सैनिक दोन ते तीन तासांपेक्षा कणभरही जास्त झोपलेला नव्हता.
राणी लक्ष्मीबाई विचारांत मग्न होऊन एक-एक पाऊल पुढे जात होती. तिच्याबरोबर सदैव असणार्या अंगरक्षिका मुंदरबेगमचे संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ राणी लक्ष्मीबाईवरच होते. तीदेखील राणी लक्ष्मीबाईच्या पाठोपाठ चालत होती.
अर्ध्या रस्त्यात एक सैनिकी पेहरावातील व्यक्ती अचानकपणे राणी लक्ष्मीबाईच्या समोर येऊन उभी राहिली. त्या व्यक्तीच्या अंगावरील ब्रिटीश सैनिकाचा पेहराव मुंदरबेगमने त्या मिट्ट अंधारातही बरोबर ओळखला आणि क्षणार्धात त्या वाघिणीने त्या ब्रिटीश सैनिकाच्या अंगावर झेप घेतली. त्यासरशी ती व्यक्ती खाली पडणार, इतक्यात त्या सैनिकाच्या डोक्यावरील ब्रिटीश टोपी (सिपॉय हॅट) खाली पडली आणि मुंदरबेगम सावध झाली, ती दचकूनच, “अरे! झलकारी तू!”
“होय, मी झलकारीबाई.” तिघीही जणी तातडीने बाजूच्याच कक्षात गेल्या. राणी लक्ष्मीबाईने झलकारीचा हात हातात घेऊन तिला प्रेमाने व सन्मानाने आपल्या बाजूला बसवले, “बहन झलकारी! तू काय हा वेश करून मिळवत आहेस? तुझ्या अंगावर किती ठिकाणी खरचटले आहे! आपल्यासाठी एकही भुयारी मार्ग उरलेला नाही. मग तू काय करून व कुठे जाऊन आलीस?”
झलकारीबाई शांतपणे लक्ष्मीबाईला मुजरा करून म्हणाली, “झाशीच्या किल्ल्याच्या उत्तरेकडील तटाच्या कड्यावरून उतरणे अत्यंत कठीण आहे असे जाणून तेथे एकही भुयारी मार्ग केलेला नव्हता आणि सरळसरळ उतरण्यासाठी तर वाटच नव्हती.
परंतु मी एक मांजर काल त्या कड्यावरून सोडले व ते ज्या प्रकारे उतरत गेले, ते पहात राहिले. त्याच मार्गाने आज रात्री मी गडाच्या खालपर्यंत जाऊ शकले. तेथे ब्रिटीश सैन्याची गस्तसुद्धा नाही कारण तेथे अक्राळविक्राळ खडकांचे जंजाळ पसरलेले आहे. त्यातून तुम्हाला नक्कीच वाट काढता येईल.

माझी विनंती आहे की तुम्ही मोजके निष्ठावंत सैनिक बरोबर घेऊन ह्या छुप्या वाटेने किल्ला उतरावात व कालपीच्या दिशेने प्रयाण करावेत कारण ‘आपला किल्ला आपण तीन दिवसांपेक्षा जास्त लढवू शकू’ असे मला जरादेखील वाटत नाही. तुम्ही वाचलात तरच ही लढाई चालू राहू शकेल, नाहीतर तात्या टोपेंनासुद्धा असेच वेगळे पाडून मारले जाईल. बघा ना! तात्या टोपेंकडून येणारी सैनिकी मदत ब्रिटिशांनी ‘कॉनपूर’ (Kawnpoor)(अर्थात सध्याचे कानपूर)च्या सीमेवरच रोखून धरली आहे. परंतु तुम्ही बाहेरून हल्ला चढवलात तर कॉनपूर शहराच्या आतून तात्या टोपे लढू शकतील. तुम्ही निघावे हेच योग्य.”
राणी लक्ष्मीबाई ठामपणे म्हणाली, “मी पळून जाणे शक्य नाही!” समोरून घाईघाईने येणारे दिवाण रघुनाथसिंग तेवढ्याच ठामपणे म्हणाले, “मी आपल्या पित्याच्या वयाचा आहे. तुमचे हे ‘पलायन’ ठरणार नाही, तर ही खरीखुरी ‘रणनीति’ आहे. जिंकण्याची ही एकच आशा उरली आहे.”
राणी लक्ष्मीबाईने प्रश्न केला, “का?” दिवाण रघुनाथसिंग व नाईक पुरनसिंग कोरींनी एकत्रच उत्तर दिले, “आपले एक सेनापती दुल्हेराव त्यांच्या तुकडीसह नुकतेच ब्रिटिशांना जाऊन मिळालेले आहेत व त्यांना किल्ल्याची इत्थंभूत माहिती आहे आणि आपल्या सैन्याचीही. हा दगाबाज फितूर सर्व माहिती ब्रिटिशांना देणारच आहे. ह्याला ब्रिटीश मेजर जनरल ह्यूज रोजने मोठी जहागिरी देऊ केली आहे. आपण निघावे हेच उचित. विचार करण्यास अवधी उरलेला नाही.”
राणी लक्ष्मीबाईने रात्रीच्या पोटातच उतरावे, असे ठरले. स्वतः लालाभाऊ बक्षी, मोतीबाई, खुदाबक्ष व मुंदरबेगम राणीबरोबर निघाले. राणी लक्ष्मीबाई त्या अत्यंत बिकट वाटेने गड उतरू लागली.
आणि बरोबर त्याच क्षणाला झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईचा वेश परिधान करून दोनशे सैनिकांसह लढत-लढत किल्ला उतरू लागली. तिचे एकच उद्दिष्ट होते, ‘ब्रिटीश सैन्याचे लक्ष फक्त तिच्यावरच केंद्रित व्हावे. राणी लक्ष्मीबाईस कुठल्याही अडथळ्याशिवाय कालपीपर्यंत पोहोचता यावे.

किल्ला अर्धा उतरून लढणारी झलकारीबाई दिसताच ब्रिटीश सेनेमधील ह्यूज रोज अत्यंत खूष झाला. त्याने सैनिकांना हल्ला सौम्य करण्यास सांगितले. त्याला राणी लक्ष्मीबाईला जिवंत पकडायचे होते. 3 एप्रिल 1858 ची रणचंडीची रात्र होती. झलकारीबाईच्या नजरेसमोर तिचा पती पुरनसिंग कोरी ब्रिटिशांच्या गोळीने शहीद झाला. त्याला नमस्कार करून व त्याच्या रक्ताने स्वतःचे कपाळ माखून घेऊन झलकारीबाई ब्रिटिशांच्या शिबिराजवळ जाऊन पोहोचली. ती संपूर्ण चोवीस तास छावणीभोवती लढत फिरत राहिली. शेवटी फक्त ती आणि तिच्या दोन साथीदार राजकुंवर व कमलकुमारी राहिल्या.
4 एप्रिलची रात्र सुरू झाली. ब्रिटिशांच्या गोळ्यांनी डावा हात पूर्णपणे जायबंदी झालेली झलकारीबाई घोड्यासकट छावणीमध्येच शिरली. कमलकुमारीने तिला निरोप दिला होता की राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरला पोहोचली आहे.
डावा हात लटकत असलेली झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईच्या आवेशातच मेजर जनरल ह्यूजच्या तंबूवरच हल्ला करती झाली.
झलकारीबाईने ह्या दोघींना गुपचूप मागच्यामागे परत फिरवले व ती एकटीच पुढे गेली.
4 एप्रिल रात्री बारा वाजता झलकारीबाईने तिचा घोडा जनरल ह्यूजच्या समोर नेला व मेजर जनरल ह्यूजच्या खांद्यावरच वार केला. परंतु एका क्षणात अनेक ब्रिटीश सैनिक तिच्यावर तुटून पडले आणि झलकारीबाईने शेवटचे शब्द उच्चारले, “मैं सिर्फ़ झलकारी हूँ। प्रत्यक्ष सूरज लक्ष्मीबाई तो क़िले में तैयारी कर रही हैं।”
झलकारीबाईच्या बंद होणार्या डोळ्यांसमोर फक्त लक्ष्मीबाईचाच चेहरा दिसत होता. ती झलकारीबाई मरता-मरताही मेजर जनरल ह्यूज रोजची तलवार मोडूनच शेवटचा श्वास घेती झाली.
तिच्या आजच्या समाधीवरील पुढील ओळी किती सार्थ आहेत!
आकर रण में ललकारी थी
वह झांसी की झलकारी थी
गोरो को लड़ना सीखा गई
रानी बन जोहर दिखा गई
है इतिहास मे झलक रही,
वह भारत की सन्नारी थी।
“मैथिली शरण गुप्त”

