भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 15

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 15

       तात्या टोपे, बाणपुरचा राजा, ब्रिटिश आर्मीतून बाहेर पडलेल्या स्वतंत्र गट करून लढणार्या  दोन हजार भारतीय सैनिकांचा गट व राणी लक्ष्मीबाई अशा चौघांनी एकत्र येऊन ग्वाल्हेर किल्ल्यावर आणि ग्वाल्हेर प्रांतावर पहाटे पहाटे जोरदार हल्ला चढविला. 

    ग्वाल्हेरचे संस्थानिक ब्रिटिशांशी मैत्री बाळगून होते व त्यामुळे त्यांनी राणी लक्ष्मीबाईला व तात्या टोपेंना सहाय्य करण्यास नकार तर दिलाच, पण त्याचबरोबर ब्रिटिशांना सर्व माहितीही कळवली; परंतु तीदेखील जाणून-बुजून अर्धीमुर्धीच व बर्यानच प्रमाणात ब्रिटिशांची दिशाभूल करणारी. 

    ग्वाल्हेर संस्थानिकांनी किल्ला राणी लक्ष्मीबाईच्या ताब्यात देऊन स्वत:चे ह्या लढ्यापासून असणारे अंतर ब्रिटिशांना जरूर दाखवून दिले होते व त्यानुसार ते ग्वाल्हेरपासून दूरवरही जाऊन राहिले होते; परंतु त्यांचे दोन सरदार राणी लक्ष्मीबाईच्या सहाय्यासाठी मागे ठेवले गेले व त्याचबरोबर बरेचसे युद्धसाहित्यही. एकूण सोळा तोफा व बराचसा दारूगोळा ग्वाल्हेर संस्थानकडून राणी लक्ष्मीबाईला भेट म्हणून दिला गेला. 

    14 जूनच्या पहाटेपर्यंत राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, बाणपुर महाराजा हे सैन्याची व्यवस्थित व्यूहरचना करण्यात गुंतले होते. राणी लक्ष्मीबाईच्या सैन्याचा अंदाज जनरल ह्यूज रोजला अजिबात येत नव्हता कारण गेल्या दीड महिन्यात अक्षरश: शेकडो शूर पुरुष व स्त्रिया अक्षरश: शेकडो मार्गांनी झाशीच्या राणीच्या सैन्यात सामील होत होते.

    जनरल ह्यूज रोजला येणार्यार गुप्त बातम्यांनुसार राणी लक्ष्मीबाईकडे तिचे स्वत:चे चौदा हजार सैन्य असावे, तसेच तात्या टोपेंचे तीन हजार सैन्य, बाणपुरचे दोन हजार सैन्य व स्वतंत्र स्वातंत्र्यसैनिक गटाचे चार हजार सैनिक असावेत; परंतु ‌‘राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील किती सैनिक प्रशिक्षित आहेत व किती अननुभवी आहेत, परंतु उत्साहाने भरलेले शूर भारतीय आहेत’ याचा त्याला नीट अंदाज येत नव्हता व त्यासाठी त्याने विविध प्रयत्न चालू ठेवले होते.

    मेजर जनरल ह्यूज रोजला पूर्ण कल्पना होती की राणी लक्ष्मीबाई व तिचे सैन्य हेच त्याचे प्रमुख शत्रू आहेत व त्यांचाच प्रथम पाडाव करणे आवश्यक आहे. 

    लॉर्ड डलहौसीच्या नंतर गव्हर्नर जनरल पदावर आलेला लॉर्ड चार्ल्स कॅनिंग (Charles Canning) हा अत्यंत धूर्त राजकारणी होता आणि मुख्य म्हणजे हा ब्रिटिश राणी व्हिक्टोरियाचा खास माणूस होता; किंबहुना राणी व्हिक्टोरियानेच त्याला ह्या पदावर भारतामध्ये पाठविले होते. 

    त्याने भारतात आल्या आल्या बॉम्बे युनिव्हर्सिटी, कलकत्ता युनिव्हर्सिटी व मद्रास युनिव्हर्सिटी अशा तीन आधुनिक विद्यापीठांची स्थापना करून भारतीय तरुणांना ब्रिटिश सेवेत येऊन अधिकारपदे मिळवण्याचा मार्ग खुला करून दिला व भरपूर स्कॉलरशिप्सही वाटल्या गेल्या. ह्यामुळे मोठ्या शहरांतील भारतीय तरुण लढ्यापासून दूर गेले. 

    फर्स्ट अर्ल कॅनिंगने (First Earl Canning) गेल्या दोन वर्षांपासून भिजत पडलेला व लॉर्ड डलहौसीने ह्या युद्धाआधीच तयार केलेला ‌‘हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा‌’ पास करून घेतला व तशा सूचनाही भारतात जारी केल्या गेल्या. 

    मोठ्या युनिव्हर्सिटीज व विधवा पुनर्विवाह कायदा ह्या दोन गोष्टींमुळे सर्वसामान्य भारतीयांना, विशेषतः मध्यम वर्गातील सुधारकांना ‌‘ब्रिटिश जणू देवच आहेत, भारताचा उद्धार करण्यासाठीच आलेले आहेत‌’ असे वाटू लागले व ह्या तथाकथित सुधारक मंडळींनी तरुणांना व स्त्रियांना स्वातंत्र्ययुद्धात भाग घेण्यास रोखण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले होते व त्याचे दुष्परिणाम 1858 च्या जानेवारीपासूनच दिसू लागले होते. 

    या चार्ल्स कॅनिंगने झाशी, ग्वाल्हेर व कानपूर (कालपी) अशा मोक्याच्या स्थानांच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये ‌‘राणी लक्ष्मीबाईला जिवंत किंवा मृत पकडून देणार्या) व्यक्तीला 20000 रुपयांचे बक्षीस व त्याचबरोबर पाचशे एकर जमीन‌’ घोषित केली - जागोजागी, मोक्याच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्ये, अगदी तमाशा व नौटंकीच्या फडांच्या बाहेरसुद्धा बोर्ड लावले, जाहिराती वाटल्या व दवंड्याही पिटविला गेल्या व ह्याचा परिपोष म्हणून अनेक लाचार व लोभी भारतीय, राणीच्या हालचालींच्या बातम्या ब्रिटिशांना पुरविण्याचे काम करू लागले व ब्रिटिशांना निरनिराळ्या कामात मदतही करू लागले. 

    अशाच एका फितुराच्या मार्गदर्शनानुसार मेजर जनरल ह्यूज रोजने 14 जून 1858 च्या सकाळी ग्वाल्हेरवर अक्राळविक्राळ अशा तीस हजारांच्या सैन्यासह जोरदार आक्रमण केले. 

    हे आक्रमण एकूण सहा बाजूंनी केले गेले. प्रत्येक ठिकाणी पाच हजार सैनिक, 150 तोफा व 550 अत्याधुनिक रायफल्स अशी मांडणी केली गेली.

    तसेच ह्या सहा ब्रिटिश गटांच्या मध्ये फितूर झालेल्या भारतीयांची मानवी साखळी निर्माण केली गेली व त्यासाठी 10000 भारतीय उपयोगात आणले गेले. 

    राणी लक्ष्मीबाईने तिच्याकडील सर्व सैन्याचेही असेच ब्रिटिशांना प्रत्युत्तर देणारे विभाग तयार केले. सर्वांनाच राणी लक्ष्मीबाईचे नेतृत्व मान्य होते.

    सहाही स्थानांवर अक्षरश: घनघोर युद्ध सुरू झाले. ब्रिटिशांकडून तोफांचा व रायफलींचा आधी उपयोग केला जायचा व मग त्यांचे सैन्य पुढे पुढे जात रहायचे. 

    राणी लक्ष्मीबाई ह्या सहाही स्थानांवर सातत्याने फिरून सर्वांना प्रोत्साहनही देत होती, वेळोवेळी व्यूहरचनाही बदलत होती व स्वत:देखील जोमाने लढत होती. 

    एकट्या राणी लक्ष्मीबाईने 14 व 15 जून ह्या दोन दिवसांत 300 ब्रिटीश सैनिकांना व 170 ब्रिटीश वंशाच्या आर्मी ऑफिसर्सना यमसदनी धाडले. तिच्या अंगावरील त्या जुन्या 59 जखमा अजून भरलेल्याही नव्हत्या. 

    16 जून रोजी सकाळी 9 वाजल्याच्या दरम्यान राणी लक्ष्मीबाईच्या खास विश्वासातील एक गुप्तहेर ‌‘साधू भगवानदास‌’ राणीला भेटण्यासाठी आला. हा भगवानदास गेली दोन वर्षे राणीसाठी गुप्त कार्य करीत होता. हा साधू राणी लक्ष्मीबाईला दिवाण रघुनाथसिंगांनीच मिळवून दिला होता व राणीचे वडील ‌‘श्री. मोरोपंत तांबे‌’ ह्यांनी ‌‘साधू भगवानदास हा पूर्वाश्रमीचा ‌‘चिंतामणी रास्ते‌’ नावाचा मोरोपंतांचा स्वत:चा खास व विश्वासू मित्र असल्याचे‌’ सांगितले होते.  

    साधू भगवानदासाने राणीला ब्रिटिशांच्या सैन्यबळाची व तोफखान्याची सखोल माहिती दिली. हा भगवानदास ब्रिटिशांच्या सैन्यामधील हिंदूंच्या पूजापाठांसाठी सदैव फिरत असे व त्यामुळे त्याच्याविषयी ब्रिटीश ऑफिसर्सना कधीच संशय आला नाही. मात्र राणी लक्ष्मीबाईला नेहमी वाटत असे की जटा, दाढी-मिशा व भस्म, तसेच रुद्राक्षमाळांचे जंजाळ ह्या सर्वांनी झाकले गेलेल्या भगवानदासाच्या रूपाचे डोळे मात्र खूप ओळखीचे वाटतात. 

    आजही तसेच घडले. सर्व बातम्या राणीला देऊन साधू भगवानदास तिला मुजरा करून गुप्त मार्गाने जाण्यासाठी निघाला. तो पाठमोरा वळताच त्याच्या पाठीवरील वस्त्राच्या रक्ताच्या डागांमुळे व त्याच्या भगव्या अंगरख्यातून गळणा‌र्याप रक्ताच्या थेंबांमुळे राणी लक्ष्मीबाई कळवळून पुढे झाली आणि तिच्या नजरेसमोरच भगवानदास खाली कोसळला....

    आणि त्याबरोबर त्याच्या डोक्यावरील जटा बाजूला पडल्या व नकली दाढी-मिशाही. 

    राणी लक्ष्मीबाईच्या नजरेसमोर तिचा पिता मोरोपंत तांबे शेवटचा श्वास घेत होता. राणी लक्ष्मीबाईने आवेगाने आपल्या पित्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले व त्या क्षणाला मोरोपंतांनी देह सोडला. एक क्षणभर राणी लक्ष्मीबाई शोकाने खचून गेली - ‘ह्या डोळ्यांना मी कसे ओळखले नाही?’

    परंतु दुसर्याबच क्षणाला पित्याच्या चरणांवर मस्तक ठेवून राणी लक्ष्मीबाई तिच्या बादल नावाच्या घोड्यावर स्वार झाली. हा ‌‘बादल‌’ तिला तिच्या वडिलांनीच भेट दिलेला होता.

    राणी लक्ष्मीबाईने तुंबळ युद्ध सुरू केले. ती सर्व ताकदीनिशी लढत होती. तिने एक क्षणभरही झोप घेतलेली नव्हती.  

    18 जूनला पहाटे पहाटेच ब्रिटिशांच्या तोफा राणी लक्ष्मीबाई असलेल्या जागेवर सर्व बाजूंनी तोफगोळे डागू लागल्या.

    एका बाजूला राणी लक्ष्मीबाई, मुंदरबेगम, राजकुंवर यादव व मंजुनाथ पहाडी आणि तिच्यावर अत्यंत प्रेम करणारा तिचा भाचा ‌‘रामचंद्रराव‌’ व 250 सैनिक आणि त्यांच्या चहूबाजूला 150 ब्रिटीश वंशाचे ऑफिसर्स, 250 तोफा आणि दहा हजार ब्रिटिश सैनिक.

    राणी लक्ष्मीबाईच्या अंगावर रक्त वाहत नसलेली एकही जागा नव्हती आणि तरीही ती लढतच होती. 

    तिच्या बादलच्या चारी पायांमध्ये गोळ्या घातल्या गेल्या व राणीला घोड्यावरून पाडण्यात आले. 

    पडता पडता राणी लक्ष्मीबाईने पाठीला बांधलेला दत्तकपुत्र ‌‘दामोदरराव’ ह्याला राजकुंवर यादवच्या स्वाधीन केले व सुरक्षितरित्या जाण्याचा मार्ग दाखवून दिला. 

    जमिनीवर कोसळलेल्या व हातात तलवार घेऊन अजूनही लढत असणार्या  राणी लक्ष्मीबाईने तशाही स्थितीत नवीन घोड्यावर उडी घेतली.  

    दोन्ही हातात तलवार घेऊन लढणार्याउ राणी लक्ष्मीबाईच्या पाठीत एका ब्रिटिश सैनिकाने घाव घातला. 

    शेवटचे श्वास घेता घेता राणी लक्ष्मीबाईने राजकुंवर व रामचंद्ररावना ओरडून सांगितले, “एकाही ब्रिटिशाचा स्पर्श माझ्या मृतदेहाला होता कामा नये.”

    तिच्या मुखात गीतेचे श्लोक येत होते. 

    राणी लक्ष्मीबाई झाशीच्या दिशेने बघत होती. तिच्या नजरेसमोर दिसणार्याण भगवान श्रीकृष्णाला डोळे भरून पाहिले, “वासुदेवा! मी फक्त तुलाच शरण आहे.” 

    पुढच्या पाच मिनिटांत तिचा देह रामचंद्रराव, राजकुंवर व मोतीबाई ह्यांनी जंगलात नेला व अग्निसंस्कार झाले. 

    राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कधी होऊच शकत नाही. 

    ती आजही भारतमातेच्या हृदयात आहेच आहे  

    आणि सदैव असणारच आहे. 


(कथा चालू)