मोद-क

English हिंदी ગુજરાતી ಕನ್ನಡ বাংলা
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (०६-०९-२००६)
श्रीगणपतीचे स्मरण होताक्षणीच प्रत्येक भक्ताला किंवा नास्तिकालाही त्वरित स्मरण होते, ते मोदकांचे. आजकाल माव्याचे मोदक मिळतात परंतु असे हे माव्याचे मोदक म्हणजे दुधाची तहान ताकावरच. अगदी लहानेलहानपणापासून आजतागायत मी अत्यंत आवडीने खाल्लेले मोदक म्हणजेच परंपरागत मोदक, ज्यात तांदळाचे पीठ लोण्यात मळले जाते व आतील सारण ताज्या व चवदार नारळाच्या किसापासून घरगुती तुपामध्ये बनविलेले असते. वर आणखी मोदक खाताना तो फोडून त्यात आणखी एक चमचा साजूक तूप घालावयाचे. सगळ्या बाळगोपाळांना हा ‘लवथवता' मोदक अत्यंत आवडीचा. हा परंपरागत मोदक म्हणजे आहारातील सौम्य, स्निग्ध व गुरु गुणांचा परमोत्कर्ष आणि म्हणूनच मूलाधार चक्राचे नियंत्रण करणाऱ्या म्हणजेच अत्युष्ण व अर्धस्निग्ध व लघु स्थानाचे नियंत्रण करणाऱ्या श्रीमहागणपतींसाठी सर्वोत्कृष्ट नैवेद्य. आजकाल परिस्थितीवशात् प्रत्येकालाच असे मोदक करणे जमेल हे शक्य नाही. परंतु जमेल त्याने असे परंपरागत मोदक करून त्याचा नैवेद्य श्रीमहागणपतीस अत्यंत प्रेमाने अर्पण करावा. दूर्वा व शमीपत्रांचा बाह्योपचार व परंपरागत मोदकांचा नैवेद्य खरोखरच उग्र, रूक्ष व लघु गुणांचा नाश करून सौम्यत्व, स्निग्धत्व व गुरुत्व (स्थैर्य) स्थापन करणारा असल्यामुळे, तो मंगलमूर्ती वरदविनायक विघ्नांचा नाश करण्यासाठी प्रत्येकाच्या प्राणमय देहात व मनोमय देहात अवतरतोच.

मोदक म्हटले की मला एक अत्यंत जुनी कथा आठवते. एक सम्राट होता. तो स्वतः अत्यंत विलासी वृत्तीचा असून त्याने कुठल्याही प्रकारे अध्ययन केलेले नव्हते. त्यामुळे त्याच्या पित्याने त्याला गादीवर बसविताना त्या विद्याहीन राजपुत्राचा विवाह एका अत्यंत विद्वान व सुजाण राजकन्येशी करून दिला होता. असा हा अडाणी राजा व त्याची विद्वान, पतिव्रता राणी संपूर्ण राजपरिवारासह सरोवरात जलक्रीडेसाठी गेले होते. तिथे सरोवरात जलक्रीडा करीत असताना राजा, राणीच्या अंगावर हाताने पाणी उडवू लागला. संस्कृत भाषा हीच विवाहापर्यंत अध्ययनभाषा व बोलीभाषा असणारी ती राणी पटकन म्हणाली, “मोदकैः सिञ्च”. तत्क्षणी राजाने सेवकाला जवळ बोलावून त्याच्या कानात काही सांगितले. थोड्याच वेळात सेवकाने मोदक भरलेली पाच सहा पात्रे तेथे आणली व राजा एकापाठोपाठ एक मोदक नेम धरून राणीवर मारू लागला. ह्या सर्व विक्षिप्त प्रकारामुळे प्रथम पूर्ण गोंधळून गेलेली राणी थोड्याच वेळात सावरली व इतर राजस्त्रिया व अमात्यादि राजपरिवार सदस्यांच्या चेहऱ्यावरील कुत्सित हास्य बघून अत्यंत लज्जित व दुःखी झाली; कारण राणीस म्हणावयाचे होते, “मा उदकैः सिञ्च” म्हणजेच मला पाण्याने भिजवू नकोस. परंतु फक्त संस्कृत बोलीभाषाच जाणणाऱ्या त्या अडाणी राजास संस्कृतमधील व्याकरणाचे नियम माहीत नसल्यामुळे ‘मोदकैः' ह्याचा संधिफोड न करताच चुकीचा अर्थ घेतला. पुढे कथा खूप वेगळे वळण घेते पण मला मात्र राणीच्या अंगावर मोदकांचा वर्षाव करणारा तो मूर्ख राजाच आजकाल अनेक रूपांनी ठिकठिकाणी वावरताना आढळतो. गणपतीला मोदक आवडतात व दूर्वा आवडतात म्हणून आदराने गणपतीस ह्या वस्तू अर्पण करणे हे विहितच आहे, तसेच त्या परमात्म्याची रूपेही अनेक म्हणून विविध स्वरूपांतील मूर्ती बनविणे, हेसुद्धा अत्यंत उचितच आहे परंतु अशा ह्या गणपतीस दूध पाजण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लावणे म्हणजे त्या राजाची पुनरावृत्तीच होय. मला एक कळत नाही की खरे म्हणजे गणपतीस मोदक अत्यंत प्रिय असताना, तो ठिकठिकाणी दूधच का पितो? मोदक का बरे खात नाही? आणि मुख्य म्हणजे हा प्रश्नही आम्हां कोणाला पडत नाही. तो मंगलमूर्ती परमात्मा भक्तांनी अत्यंत प्रेमाने अर्पण केलेले साधे भाकरीचे शिळे तुकडेसुद्धा अत्यंत प्रेमाने ग्रहण करीतच असतो, ह्यात मला जराही शंका नाही. मग भले मूर्तीसमोरील नैवेद्याच्या ताटातील एक कणही कमी झालेला दिसला नाही तरी हरकत नाही. गीतेमध्ये तर साक्षात भगवान श्रीकृष्णांनीच स्पष्टपणे स्वतःच्या मुखानेच ही ग्वाही सर्व भक्तांना देऊन ठेवलेली आहे. मुख्य म्हणजे परमात्म्यास अशा गोष्टी करून स्वतःचे माहात्म्य वाढविण्याची जराही आवश्यकता वाटत नाही, तसेच जनमानसातील भक्ती वाढविण्यासाठीही परमात्म्यास अशा उपाययोजनांची अजिबातच गरज नाही. भक्त व अभक्त अशा प्रत्येकाच्या समग्र अस्तित्वाची पूर्ण जाणीव असणाऱ्या व प्रत्येकाच्या कर्माचे फळ फक्त ज्याच्याच हातात आहे, त्या खऱ्याखुऱ्या परमात्म्यास अशा विक्षिप्त गोष्टींची कधीच आवश्यकता भासत नाही.'

अग्रलेखाचा समारोप करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात -
‘मित्रांनो, त्या परमात्म्याला हवी आहे तुमची अचल श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेच्या भावनेने केलेली भगवंताची व भगवंताच्या असहाय्य लेकरांची सेवा. हा खरा नैवेद्य, नव्हे हा सर्वश्रेष्ठ नैवेद्य हा परमात्मा अख्खाच्या अख्खा ग्रहण करीत असतो व त्याचे सहस्रगुणे फळ प्रसाद म्हणून भक्तास देत असतो.
मोदक नैवेद्य म्हणून जरूर अर्पण करा व आवडीने स्वतःही भक्षण करा परंतु मोद म्हणजे आनंद हे विसरू नका. परमात्म्यास व इतरांस आनंद होईल असे वागणे, हाच सर्वश्रेष्ठ मोदक होय.'