वैदिक गणपती

वैदिक गणपती

Previous Article   Next Article 

 

हिंदी English  ગુજરાતી  ಕನ್ನಡ   বাংলা  తెలుగు  

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (१५-१२-२००६)

‘ऋग्वेदामधील ब्रह्मणस्पति-सूक्त आणि अथर्ववेदातील गणपति-अथर्वशीर्ष ह्या नावाने ओळखले जाणारे एक उपनिषद, ह्या दोन समर्थ संदर्भांनी श्री गणेशांचे वैदिक अस्तित्व सिद्ध होते.

          ऋग्वेदामधील हा मूळ मंत्र पुढीलप्रमाणे आहे -

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्‌‍ ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम्‌‍ ॥

 ऋग्वेद २/२३/१

भावार्थ - समुदायाचा प्रभु म्हणून तू गणपती, सर्व ज्ञानीजनांमध्ये तू सर्वश्रेष्ठ, सर्व कीर्तिवंतांमध्ये तू सर्वोच्च वरिष्ठ व तूच सर्व सत्ताधाऱ्यांचाही सत्ताधारी आहेस, तुला आम्ही अत्यंत आदराने आमंत्रित करीत आहोत, तू आपल्या सर्व सामर्थ्यासह ये आणि ह्या आसनावर (मूलाधार चक्रामध्ये) विराजमान हो. (फक्त तुझाच अधिकार मूलाधार चक्राच्या आसनावर चालू दे.)

श्रीब्रह्मणस्पति पूजनसमयी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू

ब्रह्मणस्पती ह्या वैदिक देवतेचेच एक नाव गणपती आहे म्हणजेच गणपतीचेच एक नाव ब्रह्मणस्पती आहे. वैदिक कालामध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ब्रह्मणस्पतीच्या आवाहनानेच होत असे व आजही त्याच मंत्राने गणपतीस आवाहन करून पवित्र कार्यारंभ केला जातो. ऋग्वेदामधील ब्रह्मणस्पती हा ज्ञानदाता व श्रेष्ठ ज्ञानी आहे, जसा गणपतीही ज्ञानदाता व बुद्धिदाता देव आहे. ब्रह्मणस्पतीच्या हातातील सुवर्णाचा परशू आजही गणपतीच्या हातात आहेच. भारताच्या प्राचीन इतिहासात ‘समन्वय' हे प्रधान तत्त्व असल्यामुळे अनेक दैवतांचे आध्यात्मिक पातळीवर एकरूपत्व होत गेले व वेदांतीलच सर्वकाही ‘ब्रह्म' आहे ह्या तत्त्वामुळे व ‘एकं सत्‌‍ विप्रा बहुधा वदन्ति।' (ते मूळ अस्तित्व (परमेश्वर) एकच आहे, ज्ञानी लोक त्याला अनेक नावांनी जाणतात वा आवाहन करतात.) ह्या संकल्पनेमुळे अनेक मूर्ती व अनेक रूपे असली तरीही भारतीय संस्कृतीत व्यावहारिक पातळीवरही विविध पंथांच्या उपास्य दैवतांचे एकत्व सिद्ध होण्यास कधीच अडचण आली नाही.

ब्रह्मणस्पतिच्या मूर्तीस अभिषेक

भारतीय संस्कृतीच्या लोकमानसात परमात्म्याच्या विविध रूपांमागील एकत्वाची म्हणजेच केशवत्वाची जाणीव एवढी समर्थ व खोलवर रुजलेली असल्यामुळे सामान्य परंतु सुशिक्षित किंवा अशिक्षित समाजासाठीही गणपती हा आर्यांचा देव, वैदिकांचा देव, छोट्या छोट्या टोळ्यांचा देव की वेदात अस्तित्व नसलेला व पुराणांमधून उत्पन्न झालेला देव अशा वादांना काहीही अर्थ नसतो. हे वाद फक्त काही इतिहासाचे प्रामाणिक अभ्यासक किंवा तथाकथित नास्तिक बुद्धिवाद्यांसाठीच असतात. खरे व प्रामाणिक इतिहास संशोधक त्यांच्या कुठल्याही दैवतविषयक संशोधनाचा उपयोग फक्त संस्कृतीच्या इतिहासाचे मार्गदर्शक स्तंभ म्हणून करतात तर कुत्सित बुद्धीने असे संशोधन करणारे समाजामध्ये फूट पाडण्यासाठी अशा संशोधनांचा उपयोग करून घेतात, परंतु कुठल्याही मार्गाने व कुणीही दैवतविषयक संशोधन केले किंवा स्वत:च्या मतानुसार दैवतविषयक विचार मांडले तरीही आध्यात्मिक पातळीवरील त्या दैवताच्या अस्तित्वास कधीच धोका पोहोचू शकत नाही.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू ब्रह्मणस्पतिचे दुर्वांकुराने अर्चन करताना

गणपतीला अगदी कोणाचाही देव ठरविले तरीदेखील ‘विश्वाचा घनप्राण' हे गणपतीचे मूळ स्वरूप काही बदलत नाही किंवा नाहीसे तर कधीच होणार नाही कारण गणपती काही कुणा संशोधकांच्या संशोधनातून सिद्ध व प्रसिद्ध झालेला नाही; तर गणपती हे दैवत आपल्या मूळ रूपाने भक्ती व ज्ञानाचा समन्वय साधणाऱ्या ऋषिंच्या चिंतनाद्वारे प्रगट झाले, भक्तांच्या हृदयात प्रेमाने सिद्ध झाले व उपास्य आणि उपासक ह्यांच्या परस्परप्रेमामुळे प्रसिद्ध झाले. त्यामुळेच ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती हा कुणी वेगळाच होता व त्यास फक्त गणपती म्हणून संबोधले गेले होते, ह्या तर्काशी भक्तहृदयाचे काही नाते नसते. शिवाचा आणि पार्वतीचा पुत्र असणारा हा गणपती, म्हणूनच सर्व उपासकांच्या व पंथांच्या शुभकार्यातील प्रथम मानाचा धनी होतो. शैव, देवी-उपासक, वैष्णव, सूर्योपासक अशा विविध संप्रदायांमध्येही गणपती एक सुंदर सेतू निर्माण करतो.

बापूंच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी साजरा केल्या जाणाऱ्या श्री माघी गणेशोत्सवातील सामूहिक श्रीगणपती-अथर्वशीर्ष पठण

अथर्ववेदातील श्री गणपति-अथर्वशीर्ष तर अगदी सुस्पष्ट शब्दांत आजही प्रचलित व सर्वमान्य असलेल्या गणपतीच्या रूपाचे, आयुधांचे व स्वभावविशेषाचे वर्णन करते. ह्या अथर्वशीर्षातही ह्या गणपतीस स्पष्टपणे ‘तू रुद्र, विष्णु, अग्नि, इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण सर्वकाही आहेस' असे स्पष्टपणे उच्चारलेले आहे. मग ह्या सर्व रूपांचे ऐतिहासिक संदर्भ गणपतीच्या ऐतिहासिक संदर्भांशी ताडून बघणे काय उपयोगाचे ठरेल? अशी संशोधने म्हणजे ज्यांचा वेळ जात नाही, त्यांची निरर्थक व पोकळ बडबड असते व त्यांचा संस्कृतीच्या संवर्धनासाठी काडीचाही उपयोग होत नाही.

ज्यांचे ज्ञानमार्गातील श्रेष्ठत्व वादातीत आहे, त्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभीच -

‘ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या।

जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा॥

देवा तूचि गणेशु। सकलार्थमतिप्रकाशु।

म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी॥'

असे स्पष्टपणे श्री महागणपतीविषयी लिहून ठेवले आहे. जर गणपती व ब्रह्मणस्पती एकच नसतील  व वेदात गणपतीचे प्रतिपादन नाही असे मानले तर श्री ज्ञानेश्वर महाराजांचे हे वचन त्याच्या विरोधात ताकदीने उभे राहते. इतिहासाचा अभ्यास व संशोधन कुणी कितीही साधनांद्वारे केले तरीही काळाच्या प्रचंड बलवान प्रवाहात उपलब्ध साधनांच्या व संदर्भांच्या हजारो पट गोष्टी नाहीशा झालेल्या असतात, त्यामुळे विशेषत: सांस्कृतिक इतिहासाचे संशोधन करताना कुणीही आपलेच मत एकमेव सत्य म्हणून मांडू शकत नाही. जिवंत संस्कृतीचे एक प्रमुख लक्षण म्हणजे तिची प्रवाहितता म्हणजेच संस्कृतीचा प्रवास म्हणजेच अक्षरश: लक्षावधी कारणांमुळे घडत गेलेले बदल. ह्या बदलांतून पूर्णपणे व निश्चळपणे उरते, ते फक्त पूर्ण सत्यच व सत्य म्हणजे केवळ खरे वास्तव नाही, तर सत्य म्हणजे पावित्र्य उत्पन्न करणारे वास्तव व अशा पवित्र वास्तवातूनच आनंद उत्पन्न होत असतो आणि म्हणूनच भक्तहृदयाचे नाते अशा ‘सत्या'शी असते, केवळ कागदाच्या व पुराव्यांच्या तुकड्यांवर नाही.

ब्रह्मणस्पति-सूक्त व अथर्वशीर्ष गणपतीचे वैदिक स्वरूप सिद्ध करतात की नाही, ह्याच्याशी माझा काडीचाही संबंध नाही कारण हजारो वर्षे मानवी समाजाच्या भक्तमानसात दृढ झालेले व अधिष्ठित झालेले प्रत्येक रूप त्या ॐकाराचे म्हणजेच प्रणवाचेच म्हणजेच केशवाचेच स्वरूप आहे ह्याबद्दल मला कधीही संशय वाटला नाही, वाटत नाही व वाटणारही नाही कारण केशव म्हणजे शवाच्या अर्थात आकृतीच्या पलीकडे असणारा चैतन्याचा मूळ स्रोत. त्याचे अस्तित्व सर्व जगाने जरी नाकारले तरीही नाहीसे  होऊच शकत नाही.'

अग्रलेखाच्या अंती सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात -

‘मित्रांनो, म्हणूनच नसती भारंभार चर्चा करीत बसण्यापेक्षा संपूर्ण श्रद्धेने व विश्वासाने परमात्म्याची उपासना करा, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच.'