मंगलमूर्ती मोरया!

मंगलमूर्ती मोरया!

Previous Article 

English  हिंदी  ગુજરાતી  ಕನ್ನಡ  বাংলা

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (१५-०९-२००७)

‘लहानपणापासून आमच्या घरातील वातावरण पूर्णपणे शुद्ध वैदिक संस्कारांचे, परंतु तरीही पूर्णपणे सोवळं-ओवळं, जात-पात, कर्मठ कर्मकांड ह्यांचा लवलेशही नसणारे. माई व आजी ह्यांचे संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासावरील प्रभुत्व व सर्व संहिता मुखोद्गत असल्यामुळे  वेदमंत्रांचे शुद्ध व लयबद्ध उच्चार सदैव कानावर पडत आलेले. आजही त्या दोघींच्या आवाजातील वैदिक मंत्रांचे व सूक्तांचे मधुर स्वर अंत:करणात उमटत राहतात. गणपतीच्या आरतीनंतर म्हटली जाणारी मंत्रपुष्पांजली, ही आजच्या काळातील ‘शॉर्टकट'प्रमाणे ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त....' पासून सुरू न होता ‘ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे....' पासून सुरू व्हावयाची व जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चालायची. त्यातील आरोह, अवरोह, आघात, उद्धार इत्यादि सर्व नियम पाळूनसुद्धा त्या मंत्रपुष्पांजलीमधील माधुर्य, कोमलता व सहजता तशीच्या तशी जिवंत रहायची कारण त्या मंत्रोच्चारामध्ये श्रेष्ठत्वाच्या प्रदर्शनाची हौस नव्हती तर पूर्ण भक्तिरसाने डवरलेले प्रफुल्लित अंत:करण असावयाचे.

पुढे माझ्या वयाच्या पाचव्या वर्षी माझ्या आजोळच्या म्हणजेच पंडितांच्या घरातील गणपतीपुढे मला त्या दोघींनी मंत्रपुष्पांजलीची शास्त्रीय पद्धती पहिल्यांदा शिकविली. त्यावेळेस माझ्या आईच्या तीनही काकू, माई व आजी अशा पाच जणींनी माझे औक्षण करून मला भरपूर मोदक खायला घातले. त्यावेळपर्यंत माझ्या आजोळी मी एकमेव नातू होतो व म्हणूनच संपूर्ण पाध्ये व पंडित घराण्यांचा अत्यंत लाडकाही होतो. त्याच दिवशी माईने पाध्ये घराण्याच्या परंपरेनुसार बालगणेशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धतीही मला समजावून सांगितली व म्हणूनच आजही आमच्या घरात गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना होणारी मूर्ती बालगणेशाचीच असते.

mangalmoorti morya

मी एकदा माईला विचारले की ‘दरवर्षी बालगणेशच का गं?' माईने माझ्या गालावरून हात फिरवून उत्तर दिले, “अरे बापुराया, बाळ घरी आलं आणि त्याचं आपण कोडकौतुक केलं की मग त्यामुळे त्या बाळाच्या पाठोपाठ त्याचे माता व पिता येतातच व सुखावतात. ह्या बालगणेशाच्या भक्तांनी केलेल्या कोडकौतुकामुळे पार्वतीमाता व परमशिव ह्यांचेही आपोआपच स्वागत व पूजन होत असते आणि दुसरं म्हणजे अनोळखी सामान्य मानवाच्या गोजिऱ्या लहान बाळाशी वागतानाही आपल्या मनात आपोआपच एक निष्काम प्रेम प्रगटत असते. मग ह्या अत्यंत देखण्या मंगलमूर्तीच्या बालरूपाच्या सहवासात भक्तांच्या मनात भक्तिप्रेम तसेच निष्काम व पवित्र असेल नाही का?”

माईच्या ह्या भावना म्हणजे एका अत्यंत शुद्ध व पवित्र भक्तिमय अंत:करणाच्या रसरशीत सहजवृत्ती होत्या. आम्ही सर्वही अक्षरश: कोट्यवधी लोक गणपती घरी बसवत असतो, कुठे दीड दिवस तर कुठे दहा दिवस. अगदी विविध प्रकारच्या गणेशमूर्ती असू देत, परंतु ह्या विघ्नांतक गणेशाशी आम्ही आमचे असे आपुलकीचे व जवळिकीचे घरगुती नाते निर्माण करतो का?

घरी आलेला गणपती हा केवळ घराची परंपरा मोडू नये, मोडल्यास विघ्ने येतील, ह्या भावनेनेच काही ठिकाणी आणला जातो. काही ठिकाणी नवसपूर्तीसाठी आणला जातो तर काही ठिकाणी फक्त उत्सव व मौजमजा म्हणून आणला जातो. अशा गणपतीस्थापनेमध्ये  मंत्र असतात, मंत्रपुष्पांजली असते, आरती असते, महानैवेद्य असतो व रीतिरिवाज आणि शास्त्र पुरेपूर पाळण्याची भयाखालील धडपडसुद्धा असते. परंतु ह्या सर्वांच्या गोंधळामध्ये हरवलेला असतो, तो ह्या आराधनेमधील मूळ गाभा अर्थात प्रेमळ भक्तिभाव.

मंगलमूर्ती मोरया व सुखकर्ता दु:खहर्ता, ही ह्या श्रीगणपतीची बिरुदे प्रत्येकास माहीतच असतात. किंबहुना ह्या ‘सुखकर्ता दु:खहर्ता' बिरुदावळीमुळेच तर आम्ही गणपतीस घरी आणण्यास तयार होत असतो, पण ‘मंगलमूर्ती' ह्या बिरुदाचे काय? तो सिद्धिविनायक सर्व काही मंगल करणारच आहे पण त्याला घरी आणल्यानंतर आम्ही त्याला कितपत मंगल वातावरणात ठेवतो? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.

केवळ दूर्वांचे भलेमोठे हार घालून, एकवीस मोदक सकाळ-संध्याकाळ त्याच्या समोर ठेवून, लाल फुले वाहून व आरत्यांना टाळ कुटून आम्ही आमच्या परिने व आमच्या क्षमतेनुसार मांगल्य निर्माण करत असतो का? उत्तर बहुतांश वेळा ‘नाही' असेच मिळेल.

मग त्या मंगलमूर्तीला आमच्याकडून अपेक्षित असणारे ‘मांगल्य' आम्हाला त्यास कसे बरे अर्पण करता येईल? उत्तर अगदी साधे व सोपे आहे. त्या मूर्तीचे स्वागत करताना एक वर्षाने आपला जिवलग आप्त घरी परत येत आहे, ही भावना ठेवा; एकवीस मोदकांसह नैवेद्याने भरलेले ताट त्याच्यासमोर ठेवून त्याला लडिवाळपणे आग्रह करा, आलेल्या पाहुण्यांच्या आगतस्वागताच्या दिमाखापेक्षा त्या गणेशाच्या आराधनेकडे जास्त लक्ष द्या, आरती म्हणताना कुणाशी स्पर्धा करू नका व मुख्य म्हणजे हा महाविनायक परत त्याच्या स्थानी जाण्यास निघतो, तेव्हा अंत:करण गदगदून भरून येऊ दे व हक्काची प्रेमळ विनवणी होऊ दे, ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.'

अग्रलेखाच्या अंती सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात -

‘माझ्या श्रद्धावान मित्रांनो, ‘पुढच्या वर्षी लवकर या', ह्या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. येण्याची तिथी तर ठरलेली असते, मग केवळ तोंडाने ‘लवकर या' म्हणण्यामागे काय बरे अर्थ असावा? ह्यात एकच अर्थ आहे आणि तो म्हणजे पुढच्या वर्षीची वाट पाहू नका, देवा मोरया, तुम्ही रोजच येत रहा आणि तेही लवकरात लवकर घडू दे.'