सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंच्या दृष्टीकोनातून गणेशभक्ती

आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करतो, तेव्हा ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून आपल्या विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे स्मरण करतो, पूजन करतो आणि त्याची प्रार्थना करतो. अगदी लहानपणी अक्षरे गिरवायला शिकतानाही, आपण सर्वात आधी 'श्रीगणेशाय नमः' असंच लिहायला शिकतो. कितीही वेगवेगळ्या देवांची मंदिरं असली तरी, श्रीगणेश मात्र प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर विराजमान असतोच. ‘मंगलमूर्ती श्रीगणपती’ हे खरंच सगळ्या शुभकार्यांच्या अग्रस्थानी असणारं, आपल्या भारतभरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असणारं दैवत आहे.

 याच गणपतीविषयी, दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक डॉ. श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू) यांनी त्यांच्या हृदयातून अभ्यास व चिंतनातून आलेले विचार अनेक अग्रलेखांमधून मांडले आहेत. हे अग्रलेख केवळ माहितीपुरते मर्यादित नसून, श्रद्धावानांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणारे, भक्तीला अधिक अर्थपूर्ण बनवणारे आणि गणपतीच्या विविध रूपांची खोलात जाऊन ओळख करून देणारे आहेत.

 या अग्रलेखांमध्ये बापूंनी वेद, पुराणे, संतवाङ्‌मय यामधून गणपतीचे स्वरूप आणि त्यामागील तत्त्वज्ञान अगदी सहज, सोप्या भाषेत उलगडले आहे. ब्रह्मणस्पति-गणपति संकल्पना, विश्वाचा घनप्राण गणपती, गणपतीच्या जन्मकथेमागील सिद्धांत, सार्वजनिक गणेशोत्सव यामागील भूमिका, मूलाधारचक्राचा अधिष्ठाता गणपती, गणपतीची प्रमुख नावे, त्याचे वाहन मूषकराज, व्रतबंध कथा, मोदक कथा आणि त्या कथांचा भावार्थ…...या सर्व गोष्टी बापूंनी अशा रचनेत मांडल्या आहेत की, जणू ते आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

गणपती या दैवतासंबंधीचे हे विवेचन श्रद्धावान भक्तांसाठी केवळ माहिती नाही, तर भावनिक दृष्टिकोनाने आपल्या श्रद्धेला अधिक दृढ करणारे आहे.
दैनिक ‘प्रत्यक्ष’मधून वेगवेगळ्या काळात प्रकाशित झालेले हे अग्रलेख आता blogpost च्या रूपात आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होत आहेत — बापूंनी दिलेल्या त्या अमूल्य विचारांचा गंध आपल्या मनामनात दरवळावा या एकाच उद्देशाने.

मंगलमूर्ती

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचा दै. प्रत्यक्ष मधील अग्रलेख (२७-०८-२००६)

मंगलमूर्ती मोरया! अगदी प्रत्येकाच्या ओठावर सहजतेने येणारे हे दोन मधुर व महन्मंगल शब्द. श्रीगणपतीची मूर्ती दुकानातून शिरावर धारण करताना, ही मंगलमूर्ती घराच्या उंबरठ्यावर आल्यावर, मूर्ती मखरात स्थापन करताना, प्रत्येक आरतीनंतर, विसर्जनास निघताना आणि विसर्जन करतानासुद्धा अगदी सहजतेने प्रत्येक भक्ताच्या मुखात व मनात ‘मंगलमूर्ती मोरया' हे बिरुद जपले जातेच. हे नाम आहे की बिरुदावली, हा मंत्र आहे सर्वसामान्यांनी स्वत:च्या हजारो वर्षांच्या परंपरेने व भक्तिभावभरित अंत:करणाने सिद्ध केलेला. 

जे जे म्हणून सर्वकाही महन्मंगल, शुभ आणि पवित्र; त्याची एकरस, एकरूप, अक्षय्य सगुण साकार मूर्ती म्हणजेच श्रीमहागणपती. संपूर्ण भारतवर्षात व जिथे जिथे म्हणून भारतीय आहेत, त्या जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातदेखील गणेशचतुर्थीला गणपती बसविलाच जातो. ज्या घरात गणपती बसविला जातो, त्या घरात दिवाळीपेक्षाही खूपच मोठा उत्सव साजरा होत असतो. 

परमात्म्याच्या शुद्धतम, मंत्रमय रूपाचे अधिष्ठान असणारा हा प्रणवाकृती गजमुख म्हणजे प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी अग्रपूजेचा निरपवाद मान असणारे प्रसन्न दैवत. ह्याचे स्मरण व पूजन करून केलेले सत्कार्यच निर्विघ्नपणे पूर्ण होते, ही भारतीय जनमानसाची सुदृढ श्रद्धा आहे व ही केवळ कल्पना किंवा कपोलकल्पित शब्दभ्रमाची गोष्ट नव्हे. परमात्मा आपल्या भक्तांसाठी ज्याच्या त्याच्या आवश्यकतेनुसार विविध रूपे धारण करीत राहतो. तो अनंत आणि त्याचे भक्तही असंख्य म्हणूनच त्याची रूपेही विविध. शैव, शाक्त, वैष्णव अशा विविध आध्यात्मिक प्रवाहांमध्ये विनासायास आणि आनंदाने मान्य झालेले श्रीगणेश हे तसे एकमेव दैवत. ज्या काळात वैष्णव व शैवांच्या मधून विस्तवही जात नव्हता, त्या काळातसुद्धा हा गौरीनंदन विनायक दोघांनाही मान्य व पूज्यच होता, हे त्या दैवताचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. वेदांमधील विघ्नकारक गणांना काबूत ठेवून देवांचा मार्ग सदैव निर्विघ्न करणारा व दिव्य प्रकाशमय देवगणांना कार्यचातुर्य व कार्यकुशलता देणारा हा ब्रह्मणस्पती स्वत:च्या रूपामध्येच सर्वसमावेशकता धारण करता झाला. 

विशाल, स्थूलतनु व लंबोदर असणारा गणपती आणि त्याचे प्रिय वाहन मात्र एक अत्यंत लहानुशा आकाराचा, प्राणिमात्रातील निम्न स्तरावरील उंदीर. ह्या परमात्म्याने ह्याद्वारे भक्तमानसास समजावून दिले की माझा भार कितीही प्रचंड असला तरी तो वाहण्यासाठी एक लहानसा व क्षुद्र उंदीरही समर्थ होऊ शकतो परंतु कधी? तर माझी कृपा आहे तोपर्यंतच. ह्याचाच अर्थ एवढ्या मोठ्या गणपतीला वाहून नेतो म्हणून उंदीर श्रेष्ठ ठरत नाही. आम्हांस कळले पाहिजे की क्षुद्र व उपेक्षित मूषकाकडून स्वत:स वाहून घेणे हे त्या परमात्मा गणपतीचे सामर्थ्य आहे. जो महागणपती एका क्षुद्र उंदराकडूनसुद्धा हे प्रचंड कार्य सहजतेने करवून घेऊ शकतो तर मग त्याच गणपतीचा सच्च्या मनाने भक्त असणाऱ्या मानवाकडून तो काय करवून घेऊ शकणार नाही? श्रीमहागणेशाने ह्या विरोधी टोकाच्या (भार व वाहन) दोन गोष्टींचे अस्तित्व एकत्र आणून सर्व भक्तगणांस स्पष्टपणे ग्वाही दिली आहे की हे मानवा, तू कितीही असमर्थ व दुबळा असशील पण जर तू माझाच असशील तर तुला कुठलेही प्रचंड ओझे उचलण्याची ताकद देण्यास मी तयार आहे. परंतु तू म्हणशील की तू मला उचलले आहेस तर मात्र तुझे ओझे तुलाच पेलावे लागेल.

उंदीर म्हणजे बिळात राहणारा प्राणी म्हणजेच श्वासोच्छ्वासाचे प्रतीक आणि हा गणपती म्हणजे विश्वातील घनप्राण. उंदीर म्हणजे कुठलेही अभेद्य कवच कुरतडणारा प्राणी म्हणजेच मानवी बुद्धीला, सुमतीला असणारे षड्रिपुंचे कवच कुरतडणारा विवेक आणि हा महागणपती म्हणजे बुद्धिदाता अर्थात विवेकाचे मूळ स्थान. हा उंदीर अत्यंत चपळ परंतु आकाराने लहान. मानवाचा विवेकही असाच असतो, आकाराने लहान परंतु अत्यंत चपळ. ज्या क्षणी भक्त भक्तिमय अंत:करणाने भगवंताचे नामस्मरण करतो तेव्हाच ह्या विवेकावर हा घनप्राण, बुद्धिदाता महागणपती अलगदपणे येऊन बसतो आणि तेथेच सर्व विघ्नांचा नाश सुरू होतो.