रामरक्षा प्रवचन -३१ | श्रीरामांच्या दिव्य आयुधांची अनुभूती — भवसागरातील ओझ्यातून मुक्तीचा मार्ग

रामरक्षा प्रवचन -३१ | श्रीरामांच्या दिव्य आयुधांची अनुभूती — भवसागरातील ओझ्यातून मुक्तीचा मार्ग

 

रामरक्षा-कवचातील ‘स्कन्धौ दिव्यायुध: पातु’ अर्थात ‘दिव्य आयुधे असणारा राम माझ्या खांद्यांचे रक्षण करो’ ही पंक्ती सद्गुरु अनिरुद्ध बापू, दि. २३ जून २००६ रोजी केलेल्या रामरक्षेवरील प्रवचनात समजावून सांगत आहेत.

 

‘खांदे’ हा अवयव अनेकदा ओझ्याशी जोडला जातो (‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’), ह्याची आठवण करून देताना सद्गुरु बापू स्पष्ट करतात की रामरक्षा कवचामध्ये बुधकौशिक ऋषींनी लिहिलेल्या ह्या पंक्ती, ह्या केवळ शरीराच्या त्या-त्या अवयवाशी संबंधित नसून त्यांच्यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे.

 

आम्ही आयुष्यात नेहमी अनेक ओझी घेऊनच वावरत असतो. ही ओझी खरं तर आमच्याच चुकीच्या धारणांमुळे व अवाजवी अपेक्षांमुळे निर्माण झालेली असतात, ज्याने आम्हाला जीवनात दु:ख भोगायला लागते. इथे सद्गुरु बापू आम्हाला, ही ओझी कशी व कुठे तयार होतात ते समजावून सांगून, ह्या ओझ्यांच्या चक्रातून बाहेर पडण्याचा जणू राजमार्गच दाखवून देतात. त्या अनुषंगाने, त्यांच्या ओळखीच्या एका गृहस्थांची गोष्ट सांगून, पूर्वी तशाच परिस्थितीत सापडलेल्या संत चोखामेळा महाराजांची गोष्टही ते सांगतात आणि वरकरणी समान दिसणार्‍या ह्या परिस्थितींतील फरक समजावून सांगताना ते क्रमवारपणे हेही उलगडून दाखवतात की आपल्या आयुष्यातील ओझी कशी दूर होऊ शकतात.

 

प्रत्येकाचे विश्व वेगळे असते, ते कसे हे स्पष्ट करतानाच सद्गुरु अनिरुद्ध, ‘आपल्या खांद्यावरचे खरे ओझे कोणते’ ते समजावून सांगतात व त्या अनुषंगाने, ‘ऍक्शन अँड रिऍक्शन आर इक्वल, बट ऑपोझिट’ हा भौतिकशास्त्राचा अतिशय महत्त्वाचा नियम आध्यात्मिक जीवनातही कसा लागू आहे ते उदाहरणांसहित उलगडून दाखवतात. मुख्य म्हणजे, ज्याच्या बाजूला भगवंताची दिव्य आयुधे, त्यालाच विजय प्राप्त होतो, हा त्रिकालाबाधित नियम ते समजावून सांगतात. आमच्या खांद्यावरील ही ओझी दूर करण्यासाठी रामाची आयुधे दिव्य बनून आमच्या कामाला कधी व कशी येतात, ते गुपितही सद्गुरु अनिरुद्ध बापू, रामचरित्रातील त्राटिका राक्षसी व कृष्णचरित्रातील पूतना राक्षसी ह्यांच्या कथांच्या सहाय्याने उकलून दाखवतात.