सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ७    

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ७    

Previoust Article  Next Article 

हिंदी  English  ગુજરાતી  বাংলা  తెలుగు   ಕನ್ನಡ   മലയാളം  தமிழ்

 

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३९२ व १३९३. 

 सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३९२ या अग्रलेखामध्ये लिहितात,

मणिद्वीपसिंहासनारूढ आदिमातेच्या मुखातून मधुराभक्तीचे माहात्म्य व तिच्या वृद्धीसाठी त्रेतायुगात व द्वापारयुगात होणारे परशुराम, श्रीराम व श्रीकृष्ण हे तीन अवतार ह्यांचे रहस्य ऐकून तेथील सर्व उपस्थित भारावून गेले होते.

श्रीश्वासम् उत्सवात मुख्य मंचावर विराजमान मणिद्वीपसिंहासनारूढ आदिमाता जगदंबा आणि श्रीचण्डिकाकुल

‘ब्रह्मर्षि कत व ब्रह्मवादिनी कांति हे साक्षात आदिमातेसच जन्मास घालणार आहेत व ब्रह्मर्षि कात्यायन आणि ब्रह्मवादिनी कृति हे श्रीरामास व श्रीकृष्णास जन्मास घालणार आहेत' हे ऐकताच तेथील सर्वजणांनी ह्या चौघांच्या भोवती जमून आपला आनंद प्रकट करण्यास सुरुवात केली.

संपूर्ण कैलाशावर आनंदाचे आणि उत्साहाचे भरते आले होते. आपल्याला काय काय प्राप्त होत आहे, काय काय बघायला व अनुभवायला मिळत आहे, हे जाणून सर्व ऋषिवर व शिवगणही अंबज्ञ' ‘अंबज्ञ' व ‘धन्य धन्य' असे उद्गार काढू लागले

आणि शिवगणांच्या मनातील अंबज्ञता तर एवढी तीव्र होऊ लागली व वाढतच गेली की त्या ‘अंबज्ञ' भावनेने एका शुभ्रधवल इष्टिकेचे (वीट) रूप धारण केले.

सर्व शिवगणांच्या, प्रत्येकाच्या हातात एक एक शुभ्रधवल इष्टिका होती. त्यांना कुणाला काहीच कळत नव्हते. ते आश्चर्यचकित होऊन शिव-ऋषि तुंबरुंकडे पाहू लागले.

शिव-ऋषि तुंबरुंनी आदिमातेची अनुज्ञा घेऊन अत्यंत प्रेमळपणाने सर्व शिवगणांना सांगितले, “हे शिवगणहो! तुमच्या मनातील अंबज्ञता स्थूलरूपात ह्या इष्टिकेच्या रूपाने प्रकटली आहे. ही इष्टिका तुमच्या मस्तकावर अत्यंत प्रेमाने धारण करा.”

श्रीश्वासम् उत्सवात मुख्य मंचावर विराजमान अंबज्ञ इष्टिका

परंतु शिव-ऋषि तुंबरुंनाही ‘ह्या इष्टिकेचे करायचे काय' हे मात्र कळत नव्हते व हे जाणून सहावी नवदुर्गा भगवती कात्यायनी पुढे झाली व आदिमातेस प्रणाम करून त्या सर्व शिवगणांना संबोधून म्हणाली, “हे प्रिय वत्सहो! तुमच्या हातातील ही इष्टिका म्हणजे मधुराभक्तीच्या प्राप्तीमुळे निर्माण झालेल्या अंबज्ञतेचे रूप आहे व ह्या मधुराभक्तीचा मूळ स्रोत ही आदिमाता चण्डिकाच आहे व आपली सर्वांची अंबज्ञता ही आदिमातेच्या मनातील दत्तगुरुंविषयीच्या ‘दत्तज्ञते'तूनच (मातृवात्सल्य उपनिषद) प्रकट झालेली आहे.

त्यामुळे हे श्रद्धावानहो! तुम्ही सर्वांनी आपापल्या हातातील ही शुभ्रधवल इष्टिका, आदिमातेने तिचा जो उजवा चरण खाली सोडलेला आहे, त्याखालील जलावर ‘तिचे चरणपीठ' म्हणून ठेवावीत.”

भगवती कात्यायनीच्या ह्या शब्दांबरोबर सर्व शिवगण आपापली इष्टिका डोक्यावर घेऊन धावत आदिमातेच्या चरणांपाशी येऊन त्या इष्टिका अर्पण करू लागले.

त्या सर्व इष्टिका एकत्र होऊन आपोआप एकच इष्टिका आदिमातेच्या उजव्या चरणाखाली तरंगताना दिसू लागली - मात्र आता त्या एकमेव ‘अंबज्ञता' इष्टिकेचा वर्ण शेंदूर रंगाचा होता.

आता शृंगीप्रसाद व भृंगीप्रसाद आपापल्या मस्तकावरील इष्टिका घेऊन आदिमातेच्या चरणांजवळ जाऊन पोहोचले होते व ते दोघेजण आपापल्या मस्तकावरील इष्टिका आदिमातेच्या चरणांवर वाहण्यासाठी उचलू लागले. परंतु त्या दोघांच्याही मस्तकावरील इष्टिका एकदम एकाएकी एवढ्या जड होऊ लागल्या की त्यांना कणभरही उंच उचलणे त्या दोघांनाही शक्य होत नव्हते.

शृंगीप्रसाद व भृंगीप्रसाद ह्या दोघांनीही अत्यंत काकुळतीने त्यांच्या अष्टवर्षीय आराध्यदैवतास, त्रिविक्रमास विचारले, “हे भगवान त्रिविक्रम! आमच्या हातून अशी काय चूक घडली आहे की ज्यामुळे ही इष्टिका स्वीकारण्यास आदिमाता तयार नाही?”

त्या दोघांच्या ह्या भक्तिपूर्ण प्रश्नाबरोबर आदिमातेने पुत्र त्रिविक्रमास त्यांच्याजवळ जाण्याची खूण केली व मातेच्या मांडीवरून खाली उतरलेला तो एकमुखी भगवान त्रिविक्रम आपले बालरूप सोडून त्या दोघांच्या खांद्यांवर हात ठेवून उभा राहिला.

स्वयंभगवान त्रिविक्रम

त्रिविक्रमाच्या स्पर्शाबरोबर त्या दोघांच्याही मस्तकावरील इष्टिका हलक्या होऊ लागल्या. परंतु त्रिविक्रमाने त्या दोघांना फक्त नजरेच्या इशाऱ्याने इष्टिका वाहण्यास प्रतिबंध केला

व त्याबरोबर सहावी नवदुर्गा कात्यायनीतूनच इतर आठही नवदुर्गा तेथे प्रकट झाल्या.

त्या नऊही नवदुर्गांनी आपापले सर्व हस्त त्या दोन्ही इष्टिकांना लावले व त्यासरशी त्या दोन्ही इष्टिकांची मिळून एकच इष्टिका तयार झाली

व त्याबरोबर भगवान त्रिविक्रमाने त्या दोघांना ती इष्टिका आपल्या मातेच्या चरणपीठावर ठेवण्याची आज्ञा केली.

आता इष्टिका हलकी झालेली होती.

ती इष्टिका आदिमातेच्या चरणपीठावर ठेवली जाताच स्वतः भगवान त्रिविक्रमाने तिला शेंदूर फासला व मग ती इष्टिका चरणपीठावर असतानाच भगवान त्रिविक्रमाने ह्या नऊही नवदुर्गांच्याकडून त्यांच्या नयनांतील काजळ मागून घेतले व त्या काजळाने त्या इष्टिकेवर आदिमातेचा चेहरा रेखांकित केला

व त्या नऊही नवदुर्गांनी क्रमाने आपापल्या पदराचा एक भाग काढून त्या आदिमातेच्या मुखवट्याला क्रमाक्रमाने ‘चुनरी' म्हणून अर्पण केला.

आता भगवान त्रिविक्रम दोन हात जोडून आपल्या मातेच्या समोर उभा राहिला व त्याने डोळ्यांनीच आदिमातेची प्रार्थना केली

व त्याबरोबर आदिमातेने सुस्मित वदनाने बोलण्यास सुरुवात केली, “अश्विन नवरात्रामध्ये किंवा इतर कुठल्याही मंगल वा शुभदिनी अशी इष्टिका तयार करून तिचे श्रद्धावानाने केलेले पूजन हे पुत्र त्रिविक्रमाच्याकडून मला थेट पोहोचेल.

कारण ‘महर्षि शृंगी' व ‘महर्षि भृंगी'पासून ‘शृंगीप्रसाद' व ‘भृंगीप्रसाद' येथपर्यंत ह्या दोघांनीही केलेला सर्व खडतर प्रवास व त्याचे पुण्य ह्यांचा भार ह्या दोघांनाही अजिबात नको होता व तो पुण्याचा भार ह्यांच्या अंबज्ञतेमुळेच ह्यांच्या मस्तकातून निघून ह्या इष्टिकेत गेला व म्हणूनच त्या इष्टिका ह्यांच्या अपरंपार पुण्यामुळे जड झाल्या

व ते अपरंपार पुण्य माझ्या चरणाशी अर्पण होताच, माझ्या पुत्राने केलेल्या आग्रहानुसार मी त्या इष्टिकेचा ‘माझे पूजनीय स्वरूप' म्हणून, ‘पूजनप्रतीक' म्हणून व तसेच ‘नवदुर्गाप्रतीक' म्हणून स्वीकार केला आहे. तथाऽस्तु.”

हे ऐकताच त्रिविक्रमाने आदिमातेच्या चरणाखालील ती इष्टिका अर्थात चण्डिकापाषाण आपल्या हातात घेऊन तिचे स्वतः पूजन सुरू केले.   

श्रीश्वासम् उत्सवात अंबज्ञ इष्टिका पूजन करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

बापू पुढे तुलसीपत्र - १३९३ या अग्रलेखामध्ये लिहितात, 

भगवान त्रिविक्रम ती भगवतीइष्टिका अर्थात मातृपाषाण आपल्यासमोर ठेवून अत्यंत शांत मनाने पूजन करीत होता.

त्याने क्रमाने नवदुर्गांचे मंत्र जपण्यास सुरुवात केली. ‘ॐ शैलपुत्र्यै नमः' पासून ‘ॐ सिद्धिदात्र्यै नमः' असे म्हणून होंताच आदिमाता म्हणाली, “नवरात्री प्रतिपदा”. नंतर ह्याच क्रमाने त्रिविक्रमाने असे उच्चार करताच आदिमातेने “नवरात्री द्वितीया.... .... .... नवरात्री नवमी” अशा तिथी उच्चारल्या.

अशा रितीने नवरात्रीपूजन संपन्न होताच भगवान त्रिविक्रमाने तो चण्डिकापाषाण, नवदुर्गांचे मूळ रूप असणाऱ्या भक्तमाता पार्वतीस बहाल केला व तिच्या हातात जाताच त्या मातृपाषाणाचे रूपांतर पार्वतीच्या हातातील कंकणांमध्ये व गळ्यातील मोहनमाळेमध्ये झाले. ह्या मोहनमाळेला नऊ पदर होते.

सर्व ऋषिसमुदाय व शिवगण ह्यांना कळून चुकले होते की नवरात्रिपूजन खरे कसे असावे.

आता त्या सर्व नवदुर्गा परत एकदा सहावी नवदुर्गा कात्यायनीमध्ये विलीन झाल्या.

आता भगवान त्रिविक्रमही शिव-ऋषि तुंबरुंच्या मस्तकावर हात ठेवून परत आपल्या अढळपदावर जाऊन बसला, अष्टवर्षीय बालकाच्या रूपात;

व त्याबरोबर शिव-ऋषि तुंबरुंनी सहावी नवदुर्गा कात्यायनीस प्रणाम करून बोलण्यास सुरुवात केली, “हे आप्तजनहो! ही सहावी नवदुर्गा कात्यायनी अर्थात शांभवी विद्येच्या अकराव्या व बाराव्या पायरीची (कक्षेची) अधिष्ठात्री येथे प्रकटल्यावर खूपच विलक्षण व अद्भुत गोष्टी आपल्यासमोर आल्या. ह्याचे कारण तिच्या कार्यातच आहे.

भगवती नवदुर्गा कात्यायनीची प्रमुख सहा कार्ये मानली जातात.

१)      ही नवदुर्गा कात्यायनी श्रद्धावानांच्या मनात नीति, दया, करुणा अशा सात्त्विक भावनांचा उदय करून त्यांच्या शौर्याला क्रौर्याचे व अधर्माचे रूप न येऊ देता बलवान करीत राहते

व ह्यामुळेच चण्डिकाकुलाचा श्रद्धावान कितीही शूर, पराक्रमी व विजयी झाला तरीदेखील ‘असुर' कधीच बनत नाही.

२)      कात्यायनी प्रपंचातील श्रद्धावान मातापित्यांस आपल्या अपत्यांच्या संरक्षणासाठी उचित बुद्धी व उचित कृतीचे सहाय्य करते.

३)      नवदुर्गा कात्यायनी श्रद्धावानाच्या मनातील ‘अंबज्ञ' भाव वाढवीत राहते व त्यायोगे त्याचे सद्गुरु त्रिविक्रमाशी असणारे नाते अधिकाधिक दृढ होत राहते.

४)      नवदुर्गा कात्यायनी ‘श्रद्धावानांच्या घरात शांती व सौख्य नांदेल' अशी कृपा करते.

५)      नवदुर्गा कात्यायनी श्रद्धावानांना त्यांच्या हितशत्रूंची ओळख करून देते

६)      हीच नवदुर्गा कात्यायनी चण्डिकाकुलाच्या भक्तांचे शत्रू प्रबळ होऊ लागताच निर्विकल्प समाधीमध्ये स्वतः स्थिर होऊन,

सातवी नवदुर्गा कालरात्रिस आवाहन करते.”

एवढे बोलून शिव-ऋषि तुंबरुंनी भगवती कात्यायनीच्या चरणांवर मस्तक ठेवून, ‘मला सदैव अंबज्ञ ठेवावेस' अशी कृपायाचना केली

आणि

त्याबरोबर भगवती कात्यायनी अदृश्य होऊन, एकाएकी सर्वत्र घनदाट अंधःकार पसरला.

स्वतः आदिमातेनेसुद्धा त्या काळोखाआड स्वतःच्या तेजाला लपविले होते

आणि उपस्थित सर्वच ऋषिवर व शिवगण अत्यंत उत्सुकतेने - ‘पुढे काय घडणार आहे? आपल्याला काय पहायला मिळणार आहे? आणि आपण किती भाग्यवान आहोत' अशा विचारांनी आनंदात बुडून गेले होते

आणि एकाएकी ह्या आजूबाजूला पसरलेल्या अंधःकारात लक्षावधी विद्युत्‌‍-शलाका चमकू लागल्या व हळूहळू कडाडू लागल्या

आणि एका क्षणाला त्या विद्युल्लतांच्या प्रकाशात सातवी नवदुर्गा कालरात्रि स्पष्टपणे दिसू लागली.

नवदुर्गा कालरात्रि अंधःकारापेक्षाही सहस्रगुणे अधिक काळी असल्यामुळे, ती अंधारातही स्पष्ट दिसत होती.

हिला तीन नेत्र होते आणि हे तीनही नेत्र ब्रह्मांडाच्या आकाराचे होते.

भगवती कालरात्रिच्या ह्या तीनही डोळ्यांमधून विलक्षण दाहक तेज बाहेर फेकले जात होते. परंतु तेथील कुणाही उपस्थिताला त्या तेजाचा स्पर्शही होत नव्हता.

भगवती कालरात्रिच्या दोन्ही नाकपुड्यांमधून प्रखर अग्नीचे लोळच्या लोळ सर्वत्र बाणांसारखे फेकले जात होते. परंतु त्यांपैकी एकाचाही स्पर्श श्रद्धावानांना होत नव्हता.

भगवती कालरात्रिच्या गळ्यात विजेच्या माळा होत्या.

भगवती कालरात्रि चतुर्हस्ता होती. तिचे उजवे दोन हात ‘अभय' व ‘वरद' मुद्रांमध्ये होते. तिच्या डाव्या बाजूच्या वरच्या हातात लोखंडाचे कंटकास्त्र होते व खालच्या हातात खड्ग व कट्यार ह्यांचा समन्वय असणारी चांद्रतलवार होती.

 

भगवती कालरात्रि एका प्रचंड व हिंस्र अशा गर्दभावर बसलेली होती.

अशा रितीने अत्यंत भयकारी स्वरूप असणारी ही सातवी नवदुर्गा कालरात्रि प्रकट होताच सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनी अत्यंत आनंदाने नाचू गाऊ लागले

व एकमुखाने ‘जय जय शुभंकरी कालरात्रि' असे तिचे गुणगान करू लागले.

एकाही श्रद्धावानाला तिच्या रूपाचे अल्पही भय वाटत नव्हते.

--------- 

(सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे नवरात्रिपूजनाचे विधिविधान म्हणजे नवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन माझ्या ब्लॉगवरून गुरुवार दि. १४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसारित करण्यात आले आहे. त्याची लिंक येथे देत आहे - https://sadguruaniruddhabapu.com/post/navaratri-poojan-ashwin-marathi )