सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ६

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ६

Previoust Article  

हिंदी 

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३९० व १३९१.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३९० या अग्रलेखामध्ये लिहितात,

ब्रह्मवादिनी लोपामुद्रेचे बोलणे चालू असतानाच ब्रह्मर्षि कात्यायनाची पत्नी महामति ‘कृति' (जशी ‘राजर्षि'ला समांतर ‘राजयोगिनी', तशी ‘महर्षि'ला समांतर ‘महामति') तेथे धावत आली. ती तिच्या तपश्चर्येतून उठून आलेली होती.

तिला फक्त आपल्या लाडक्या लेकीला पहायचे होते. कारण रोज तिला बघणे कृतिला शक्य नव्हते - कारण ती ‘ब्रह्मवादिनी' नव्हती.

कृतिची आतुरता पाहून ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्मितहास्य करून म्हणाली, “बघा! कैलाशावर आतापर्यंत एवढे सगळे प्रसंग घडून आले. नवदुर्गांची पाच रूपेही प्रकटली. परंतु त्यामुळेसुद्धा ह्या महामति कृतिची तपश्चर्या ढळली नाही.

परंतु तिची एकुलती एक लाडकी लेक नवदुर्गा कात्यायनी येथे आली आहे, ही घटना मात्र महामति कृतिला तपश्चर्येतून जागी करती झाली.

हे महर्षिजनहो! मी तुम्हाला एक प्रश्न विचारते - अशा रितीने स्वतःच्या प्रपंचासाठी तपश्चर्या भंग करून येथे आलेली ही महामति कृति आता ‘ब्रह्मवादिनी' बनू शकेल काय?

कारण ह्या तपश्चर्येमुळेच ती ब्रह्मवादिनी बनू शकणार होती व ही तर साक्षात आदिमातेची व त्रिविक्रमाचीच योजना होती.”

मणिद्वीपनिवासिनी आदिमाता जगदंबा आणि स्वयंभगवान श्रीत्रिविक्रम 

तेथील उपस्थित सर्वांनाच हा प्रश्न पूर्णपणे गोंधळात टाकून गेला. कुणालाही नीट उत्तर सुचत नव्हते

व हे पाहून ब्रह्मवादिनी लोपामुद्रा म्हणाली, “हे वत्सहो! ह्याचे उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. आपण थोडी वाट पाहूया.”

महामति कृतिला मात्र लोपामुद्रेचा प्रश्न ऐकूही आलेला नव्हता. कृति फक्त अनिमिष नेत्रांनी भगवती कात्यायनीस पाहत होती.

कृतिने हातही जोडलेले नव्हते.

कृति कन्येला मिठीत घेण्यासाठी पुढे जातही नव्हती.

कृति आपल्या कन्येशी काही बोलतही नव्हती.

मात्र कृतिच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधान विलसत होते

आणि त्याच वेळेस भगवती कात्यायनीने बालरूप धारण केले व ती सिंहावरून उडी मारून उतरली आणि धावत जाऊन आपल्या मानवी मातेच्या - कृतिच्या कुशीत शिरली.

आता मात्र कृतिने बालकात्यायनीला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवले व ती कन्येच्या गालांची वारंवार चुंबने घेऊ लागली आणि तिच्या केशकलापातून आपला हात फिरवू लागली.

बालकात्यायनीसुद्धा ‘अंब! अंब!' (माझी आई, माझी आई) असे वारंवार म्हणत मातेच्या कुशीत अत्यंत तृप्तीने विसावली होती.

परंतु एका क्षणाला महामति कृतिच्या डोळ्यांतून फक्त दोनच अश्रू टपकले व ते तातडीने बालकात्यायनीने आपल्या मस्तकावर घेतले.

त्यानंतरच्या पुढच्याच क्षणात, राजर्षि शशिभूषणच्या जीवनात थोड्या वेळापूर्वी जसे घडले होते व तो ‘ब्रह्मर्षि' झाला होता, जवळपास तसेच घडत होते.

उपस्थित ब्रह्मर्षिंनी व ब्रह्मवादिनींनी टाळ्यांचा कडकडाट करून, ह्या अजोड माता-कन्येच्या जोडीवर पुष्पवर्षाव सुरू केला

आणि भगवान त्रिविक्रमाने घोषित केले, “हे कृति! तू जी तपश्चर्या करत होतीस, ती आताच्या ह्या आचरणापुढे खूपच क्षुद्र आहे

आणि म्हणूनच तू स्व-अधिकाराने आणि आदिमातेच्या कृपेने ‘ब्रह्मवादिनी' झाली आहेस.”

त्याच क्षणाला नवब्रह्मवादिनी कृतिच्या मस्तकाचे कन्या कात्यायनीने चुंबन घेतले.

त्याच क्षणाला बालरूपातील कात्यायनी अर्थात कन्याकात्यायनी आपल्या ‘भगवती'रूपात सिंहारूढ दिसू लागली

आणि नवब्रह्मवादिनी कृति भानावर येऊन दोन्ही हात जोडून सहावी नवदुर्गा कात्यायनीचे स्तोत्र गाऊ लागली.

हा सर्वांगसुंदर सोहळा पाहणाऱ्या सर्व उपस्थितांना ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने भानावर आणले व ती बोलू लागली, “शांभवीविद्येच्या अकराव्या व बाराव्या पायरीवर (कक्षेवर) नवव्या व दहाव्या पायरीवर असुरमुक्त केलेल्या आपल्या मनातील वात्सल्य, प्रेम, अनुकंपा, सहानुभूती, दया, करुणा व विनास्वार्थ दुसऱ्यासाठी सहाय्य करण्याची कृति ह्या गुणांना चालना द्यायची असते, त्यांचे वर्धन करायचे असते व ही सर्व तत्त्वे आपल्या जीवनाचा सहजभाग बनावा ह्यासाठी तपाचरण करायचे असते.

दुसऱ्याच्या मनाला विनाकारण दुखविणे, दुसऱ्याविषयी सहानुभूती नसणे, दया व करुणा ह्यांनी युक्त कृती करणे शक्य असूनही तसे न करणे ह्या गोष्टींना कायमची तिलांजली द्यावी लागते

व हे सर्व घडवून आणणारी आदिमातेची शक्ती म्हणजे सहावी नवदुर्गा कात्यायनी;

आणि म्हणूनच तिने एका पवित्र; परंतु सर्वसामान्य स्त्रीच्या उदरी जन्म घेतला - जिचे नामच मुळी कृति आहे.

ही सहावी नवदुर्गा कात्यायनी ब्रह्मवादिनी कृतिची कन्या आहे.

होय! कात्यायनीच्या जन्माच्यावेळेससुद्धा कृति ब्रह्मवादिनीच होती.

ब्रह्मर्षि कात्यायनाच्या तपश्चर्येला जोड मिळावी म्हणून - अर्थात आपल्या उदरी भगवती ‘कन्या' म्हणून येण्यासाठी तिने आपले ‘ब्रह्मवादिनी'पद विसर्जित केले होते.

हे सर्व जनहो! ‘पवित्र, श्रेष्ठ व उचित मातृत्व' ही सर्वांत मोठी तपश्चर्या आहे.”

श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे नवरात्रीदरम्यान आदिमाता अनसूयेचे पूजन करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

बापू पुढे तुलसीपत्र - १३९१ या अग्रलेखामध्ये लिहितात,

ब्रह्मवादिनी लोपामुद्रा मातृवात्सल्याचे गुणगान करीत असतानाच अगस्त्यपुत्र ब्रह्मर्षि कत आपल्या स्नुषेजवळ, कृतिजवळ येऊन उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूने कताची पत्नी ब्रह्मवादिनी कांति हीसुद्धा तेथेच आली.

ब्रह्मर्षि कत व ब्रह्मवादिनी कांति ह्या दोघांनीही भावविभोर अवस्थेतील आपल्या स्नुषेला (सुनेला) अत्यंत प्रेमाने जवळ घेतले. ब्रह्मवादिनी कांति ही ब्रह्मर्षि कश्यपांची कन्या.

कांति कृतिचा हात हातात घेऊन तिला म्हणाली, “हे कन्ये! मला फक्त आठ पुत्र झाले परंतु एकही कन्या झाली नाही. त्यामुळे कन्यासुखाची अभिलाषा माझ्या मनात सदैव जागृत राहिली व ह्या लालसेमुळेच मी ‘महामति'ची ‘ब्रह्मवादिनी' बनू शकत नव्हते व हे मला तात कश्यप व अगस्त्य ह्या दोघांनी सांगूनही, माझे मन मात्र कन्यासुखाचा त्याग करण्यास अजिबात तयार नव्हते.

मात्र ज्या क्षणी तुझा विवाह माझा ज्येष्ठ पुत्र कात्यायन ह्याच्याशी झाला व तू आमच्या आश्रमात वावरू लागलीस, तेव्हापासून तू मला तुझ्या प्रेमभावाने नितांत कन्यासुख दिलेस व अशी कन्यासुखाने तृप्त झालेली मी मग ‘ब्रह्मवादिनी' झाले.”

आता ब्रह्मर्षि कत बोलू लागले, “हे स्नुषे कृति! तू खरोखरच धन्य आहेस व आमच्या कुलालाही धन्य केलेस.

हे पुत्र कात्यायन! तुझी व तुझ्या पत्नीची वात्सल्यभक्ती अपरंपार आहे; किंबहुना एकमेव अद्वितीय आहे. जी तुमचे आराध्यदैवत आहे, तिलाच तुम्ही ‘कन्या'रूपाने प्राप्त करून घेतलेत व तिला अपत्याप्रमाणेच वाढवत असताना तुम्ही दोघे तिचीच उपासनाही दृढपणे करत होतात व अजूनही करत आहात.

हे पिता अगस्त्य व कश्यप! तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हां दोघांनाही नीट ठाऊक आहे की वात्सल्यभक्ती हीच खरीखुरी मधुराभक्ती आहे आणि अशा ह्या खऱ्याखुऱ्या मधुराभक्तीचाच प्रसार सर्वत्र होणे, ही तर द्वापारयुगाची व कलियुगाची अनिवार्य गरज असते.

ह्याकरिता मी व माझी पत्नी काही करू इच्छितो. आम्हांस काही उपदेश व आज्ञा द्यावी.”

आता ब्रह्मर्षि अगस्त्य व ब्रह्मर्षि कश्यप आपापल्या धर्मपत्नींसह आपापल्या अपत्यांच्या बाजूला येऊन उभे राहिले व त्या चौघांनी आदिमाता श्रीविद्येस व त्रिविक्रमास हाच प्रश्न विचारला.

भगवान त्रिविक्रमाने आता एकमुखी रूप धारण करून त्या चौघांना अत्यंत विनयाने व प्रेमाने सांगितले,

तुम्हां चौघांचेही ज्ञान अफाट आहे व भक्तीही.

तुम्ही मला हा प्रश्न का विचारीत आहात?”

त्या चौघांनीही एकरवाने, एकमुखाने उत्तर दिले, “कारण तूच एकमेव सर्वश्रेष्ठ मातृभक्त आहेस म्हणून.”

त्रिविक्रमः होय, असेलही! परंतु ह्याचा अर्थ एकच.

माझ्याकडे मातृभक्ती कुठून व कशामुळे आली?

कारण खरीखुरी सर्वोत्कृष्ट व सर्वोच्च वात्सल्यभक्ती ही माझ्या मातेकडेच आहे.

तिचे जेवढे अकृत्रिम प्रेम माझ्यावर आहे, तेवढेच ते प्रत्येक सच्च्या श्रद्धावानावर आहे व म्हणूनच माझी आदिमाता चण्डिकाच वात्सल्यभक्तीचा अर्थात खऱ्याखुऱ्या मधुराभक्तीचा एकमेव व मूळ स्रोत आहे व तो स्रोत जेव्हा शिवपत्नी पार्वतीने संपूर्णपणे ‘स्कन्दमाता' रूपात प्राशन केला, तेव्हाच स्कन्दमातेपासून ‘कात्यायनी' ही सहावी नवदुर्गा प्रकटली.

हे आदिमाते! हे महिषासुरमर्दिनी! हे महादुर्गे! हे श्रीविद्ये! हे अनसूये! तूच आता ह्या चौघांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेस, अशी माझी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.”

भगवान त्रिविक्रमाच्या ह्या उद्गाराबरोबर आदिमातेची ‘अनसूया' व ‘श्रीविद्या' ही दोन्ही रूपे एकत्र होऊन, प्रथम सर्व आयुधांनी सज्ज होऊन उभी ठाकलेली अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी आपल्या तेजाने विलसू लागली व ज्याक्षणी भगवान त्रिविक्रमाने बालभावाने धावत जाऊन तिचा पदर पकडला, त्या क्षणाला मणिद्वीपातील सिंहासनारूढ अष्टादशभुजा चण्डिका ‘प्रसन्न व शांत स्मित करत बसलेली व वात्सल्यप्रेम तिच्या नयनांतून स्रवत आहे' अशी दिसू लागली.

आदिमाता ‘अष्टभुजा’

आता तिने भगवान एकमुखी त्रिविक्रमाच्या मस्तकास हाताने स्पर्श करताच तो आठ वर्षाच्या बालरूपात दिसू लागला आणि धावत जाऊन तो तिच्या मांडीवर बसला

आणि त्याला कुरवाळत ही चिदग्निकुंडसंभूता आदिमाता बोलू लागली, “होय! माझ्या लाडक्या पुत्रांनो व कन्यांनो! त्रेतायुगामध्ये आता लवकरच ‘परशुराम' व ‘श्रीराम' जन्मास येतील आणि ह्या दोघांचीही बालरूपातील उपासना अर्थात खरीखुरी मधुराभक्ती श्रद्धावानांना आकर्षित करेल.

परशुरामाचा व श्रीरामाचा जन्मदिवस त्या दोघांच्या बालमूर्तीला वत्सल उपचार करून अर्थात नामकरण, पाळणा, कुशीत जोजविणे, स्त्री व पुरुषांनी दोघांनी मिळून पाळणा गाणे व त्यांच्या बालमूर्तींचे अभिषेकादि उपचारांनी पूजन करणे, श्रद्धावानांना अनेक पापांतून मुक्त करेल.

तसेच जेव्हा परशुरामावरची बालभक्ती दुष्टबुद्धीजन हळूहळू लोप करू बघतील, तेव्हा त्या द्वापारयुगात श्रीकृष्ण जन्म घेईल व बालरूपात असंख्य लीला, क्रीडा व मधुर कृत्ये करील व स्वतःच प्रेमरस बनून राहील.

अशा ह्या मधुराधिपती, गोकुलनिवासी बालकृष्णाच्या जन्मदिवसाचे माहात्म्य मी स्वतः त्याची भगिनी म्हणून व ‘विन्ध्यवासिनी' बनून वाढवीन.

कलियुगात श्रीरामाचा जन्मोत्सव श्रद्धावानांना भक्ती दृढ करण्यासाठी सहाय्य करेल आणि प्रत्येक श्रद्धावान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव अत्यंत प्रेमाने व उत्साहाने साजरा करून ‘पावित्र्य हेच प्रमाण' ह्याचे रहस्य सांगणारी श्रीकृष्णाची रासलीला ह्याच्या जन्मदिवशी साजरी करून खऱ्याखुऱ्या मधुराभक्तीला थेट माझ्याकडूनच प्राप्त करील.

हे अगस्त्य व कश्यप! ब्रह्मर्षि कात्यायन व ब्रह्मवादिनी कृति हे दोघेच ‘दशरथ' व ‘कैौसल्या' बनून श्रीरामाचे माता व पिता होतील आणि हेच दोघे ‘वसुदेव-देवकी' बनून श्रीकृष्णाचे माता-पिता होतील आणि ब्रह्मर्षि कत व ब्रह्मवादिनी कांति ‘नंद-यशोदा' बनून मलाच जन्मास घालतील व श्रीकृष्णाच्या बाललीलांचा आनंदाने उपभोग घेतील.”