सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ५

Previoust Article Next Article
English हिंदी ગુજરાતી বাংলা తెలుగు ಕನ್ನಡ മലയാളം தமிழ்
संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३८८ व १३८९.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३८८ या अग्रलेखामध्ये लिहितात,
ॐ कल्पनारहितायै नमः।
हा जप संपवून ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने ब्रह्मर्षि अगस्त्यांकडून नवब्रह्मर्षि शशिभूषणच्या गळ्यात ब्रह्मर्षिरुद्राक्षमाला घातली. त्याबरोबर ब्रह्मर्षि शशिभूषणने दोन्ही हात जोडून आदिमातेच्या उपस्थित सर्व रूपांस मनःपूर्वक प्रणाम केले व अत्यंत नम्रपणे लोपामुद्रेस प्रश्न केला, “ ‘ॐ कल्पनारहितायै नमः' हा श्रीललितासहस्रनामातील मंत्र अजूनही माझ्या मनात घुमतच आहे. ह्याविषयीचे स्पष्टीकरण तू मला सांगशील काय?”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने एखाद्या लहान बालकाप्रमाणे शशिभूषणास जवळ घेतले व म्हणाली, “हे वत्स! ह्या नामाचा अर्थ तूच इतर सर्वांना सांगावास, अशी माझी आज्ञा आहे.
कारण इतरांस शिकवीत असतानाच मानव अधिक हुशार बनत असतो.
कारण इतरांस उचित ज्ञान देण्यासाठी त्या सच्च्या शिकविणाऱ्याला आपले सर्व पूर्वज्ञान व पूर्वानुभव कसास लावावे लागतात व त्यातूनच तो खरा विद्वान बनत असतो.
आता तर तू ब्रह्मर्षि झाला आहेस व ब्रह्मर्षि वा ब्रह्मवादिनीचे प्रमुख कर्तव्य ज्ञानात किंवा विज्ञानात भेसळ न होऊ देणे व सामान्य मानवांपर्यंत आवश्यक तेवढे ज्ञान सुलभपणे पोहोचविणे हेच असते.”
ब्रह्मर्षि शशिभूषणने काही क्षणांपुरते ध्यानात जाऊन स्वतःची खात्री करून घेतली व तो सर्व ऋषिंना, ऋषिकुमारांना व शिवगणांना संबोधून बोलू लागला, “हे सज्जनहो! आदिमातेचे हे नाम खरेच तिच्या सामर्थ्याची, सत्तेची व तिच्या क्षमेची आणि प्रेमाची खरी ओळख पटवून देणारे आहे. आपण मानव आपले बहुतांश जीवन नानाविध कल्पनांमध्येच किंवा त्यांच्या सहाय्याने जगत असतो.
कल्पना म्हणजे काय, तर ‘पुढे काय होईल, कशातून काय व कसे घडेल, जे घडून गेले व तरी ज्याची मला माहिती नाही, ते कसे घडले असेल ह्याविषयी आपापल्या कुवतीनुसार केलेले निरनिराळे विचार किंवा तर्क किंवा संशय किंवा भीती म्हणजेच कल्पना.'
बऱ्याचवेळा आपापली ‘कर्मफळाची अपेक्षा' हीच सर्व कल्पनांची मूळ जननी असते
आणि म्हणूनच फलाशा व कल्पना आणि तर्ककुतर्क, संशय व भय ह्यांचे एकमेकांशी घट्ट नाते असते.
कल्पना करणे मुळीच वाईट नाही. परंतु ज्या कल्पनांना अनुभवाची, चिंतनाची, अध्ययनाची व ज्ञानाची जोड नाही व नीतिची मर्यादा नाही, ती कल्पना नेहमीच मानवाला चुकीच्या दिशेने नेत असते.
बऱ्याचवेळा मानवांचे एकमेकांविषयी होणारे गैरसमज हे अशा चुकीच्या कल्पनांमधूनच होत असतात.
प्रत्येक मानवाला फलाशा ही असणारच; परंतु फलाशेमध्ये किती अडकायचे, हे मात्र त्याला ठरवावेच लागते. कारण फलाशेच्या जाळ्यात अर्थात कल्पनेच्या राज्यात जेव्हा तो अडकून पडतो, तेव्हा त्याची उद्यमशीलता कमकुवत होत राहते व त्याच्या कार्यशक्तीचा ऱ्हास होत राहतो.
त्यामुळेच सनातन भारतीय वैदिक धर्म निष्काम कर्मयोगाला नेहमीच प्राधान्य देत आला आहे.
परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की मानव जे काही करणार आहे, त्याच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा त्याने विचारच करून ठेवू नये.
कारण असे विचार म्हणजे कल्पना नव्हेत, तर असे विचार म्हणजे विवेक व बुद्धीचे स्थैर्य.
मात्र त्या परिणामांच्या विचारांनी भिऊन जाणे किंवा आनंदाने वेडे होणे ह्या दोन्हीही गोष्टी मात्र कल्पनेचीच अपत्ये होत.
ही आपली सर्वांची आदिमाताच एकटी अशी आहे की जिने केलेली कल्पना ही तरल, सूक्ष्म व स्थूल अशा तीनही स्तरांवर प्रत्यक्षात प्रकट होते - हे सामर्थ्य इतर कुणाचेही नाही

आणि मानवाला जर हिची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, तिचे सामीप्य प्राप्त करून घ्यायचे असेल, तर हिच्याविषयी कल्पना करून अजिबात चालणार नाही.
मग त्याने काय करावे?
हा प्रश्न आपल्याला पडतोच. त्याचे उत्तरही अगदी सोपे आहे व ते म्हणजे १) हिच्या आपल्याला आवडणाऱ्या रूपाचे ध्यान करणे. २) हिच्या गुणांचे अर्थात चरित्राचे वाचन, पठण, मनन, चिंतन व गुणसंकीर्तन करणे आणि ३) आपल्या सर्व फलाशा हिच्या चरणी समर्पित करणे.
हे आप्तजनहो! आपले स्वतःचे मन ज्या क्षणांना पूर्णपणे कल्पनाविरहित होते, त्या त्या क्षणांना आपण हिचा पदर पकडलेला असतो.”
ब्रह्मर्षि शशिभूषण एवढे बोलून एकाएकी तटस्थ झाला. त्याच्या बंद डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहत होते. त्याच्या पापण्या थरथरत होत्या व त्याच्या सर्वांगावर रोमांच फुलून आलेले होते
आणि बरोबर त्याच क्षणाला सद्गुरु भगवान श्रीत्रिविक्रम तिथे प्रकटला व त्याने शशिभूषणला आपल्या कवेत घेऊन आपल्या अंकावर (मांडीवर) बसविले व त्याच्या कपाळाचे वात्सल्यप्रेमाने चुंबन घेऊन त्रिविक्रमाने त्याला डोळे उघडण्यास सांगितले.
डोळे उघडले ब्रह्मर्षि शशिभूषणने परंतु आश्चर्याने थक्क झाले, ते मात्र तेथील सर्व महर्षि, ऋषि, ऋषिकुमार व शिवगण.
बापू पुढे तुलसीपत्र - १३८९ या अग्रलेखामध्ये लिहितात,
असे काय दिसले होते? असे काय पाहिले होते? आणि नेमके असे काय घडत होते? - की ज्याच्यामुळे हे सर्वजण आश्चर्यचकित झाले होते आणि डोळे उघडणारा नवब्रह्मर्षि शशिभूषण मात्र शांत, स्थिर व अत्यंत प्रसन्नचित्त होता. त्याला हे काहीच दिसत नव्हते काय?
खरेच खूप अद्भुत घडत होते.
भगवान त्रिविक्रमाच्या मागून नवदुर्गा स्कन्दमाता तिच्या सिंहावर बसून व मांडीवर बालस्कन्दाला घेऊन बाहेर आली होती व सर्वांच्या मधोमध येऊन थांबली होती
आणि त्याचवेळेस अवकाशव्यापिनी स्कन्दमाताही तशीच स्थिर होती
व एवढेच नव्हे, तर भगवान त्रिविक्रमाच्या ‘शिवनेत्रां'तून (राम, शिव, हनुमंत मुखांपैकी) बाहेर प्रक्षेपित होणाऱ्या अत्यंत सुंदर सुवर्णवर्णाच्या प्रकाशझोतामध्येही स्कन्दमाता दिसत होती.
मात्र अवकाशव्यापिनी स्कन्दमातेचा सिंह ज्येष्ठ पुत्र ‘वीरभद्र' होता,
सर्वांच्या मधोमध स्थिर झालेल्या स्कन्दमातेचा सिंह घनप्राण ‘श्रीगणपती' होता

आणि त्रिविक्रमाच्या शिवनेत्रांतून निघालेल्या प्रकाशझोतातील स्कन्दमातेचा सिंह ‘स्कन्दकार्तिकेय' होता.
ते तीनही सिंह अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने व आदराने नवदुर्गांच्या नऊ नामांचा क्रमाने उच्चार करीत होते.
ह्या त्रिविध रूपांस सर्व ब्रह्मर्षिंनी व ब्रह्मवादिनींनी लोटांगण घालून भावपूर्ण प्रणिपात केला आणि देवर्षि नारद व शिव-ऋषि तुंबरु श्रीललिताम्बिकेचे अर्थात आदिमाता महादुर्गेच्या ‘ललितासहस्रनाम' स्तोत्राचे गायन करू लागले
व ते स्तोत्र पूर्ण होताक्षणीच स्कन्दमातेची तीनही रूपे एका क्षणात एकरूप होऊन आदिमाता श्रीविद्येच्या स्वरूपामध्ये विलीन झाली
व बरोबर त्याच क्षणाला एक तेजःपुंज तलवार व एक श्वेतकमल आदिमाता श्रीविद्येच्या अभयहस्तातून बाहेर आले
व त्यासरशी ब्रह्मर्षि ‘कात्यायन' उठून ब्रह्मानंदाने नृत्य करू लागले. अगस्त्यपुत्र ‘कत' ह्याचा पुत्र ब्रह्मर्षि ‘कात्य' व ह्या ब्रह्मर्षि कात्यांचा पुत्र ‘कात्यायन'.
ह्या ब्रह्मर्षि कात्यायनाने आदिमातेचे पराम्बापूजन करत १०८ वर्षे कठोर तपश्चर्या केली होती व ‘पराम्बेने भगवती पार्वतीस आपल्या उदरी जन्म द्यावा' अशी इच्छा व्यक्त केली होती व त्याप्रमाणे पराम्बेच्या वरानुसार कात्यायनाची पत्नी ‘कृति' हिच्या पोटी सहावी नवदुर्गा ‘कात्यायनी' जन्मली होती.
ह्या कात्यायनाची भक्ती सदैव वात्सल्यभक्तीच राहिली होती व आतादेखील तो ‘माझी लाडकी कन्या मला भेटणार' ह्या आनंदभावाने, एक वत्सलपिता म्हणून नृत्य करीत होता.
त्याला तिचे नवदुर्गास्वरूपही मान्य होते. ‘सहावी नवदुर्गा' म्हणून तो तिच्या चरणांवर मस्तकही ठेवीत असे आणि त्यानंतर अत्यंत वात्सल्यभावाने भगवती नवदुर्गा कात्यायनीच्या मस्तकाचे चुंबनही घेत असे.
ब्रह्मर्षि कात्यायन दररोज ब्राह्ममुहूर्ताला कात्यायनीच्या बालरूपाचे ध्यान करून पितृप्रेमाचा आनंद लुटत असे,
जसजसा माध्याह्नसमय जवळ येई, त्या त्या वेळेस ब्रह्मर्षि कात्यायन कात्यायनीस ‘आपली माता' म्हणून तिची पुत्रकर्तव्यानुसार सेवा व पूजा करीत असे,
तर दुपार कलल्यावर सूर्यास्तापर्यंत कात्यायन तिला ‘आपली पितामही' (आजी) मानून तिच्याकडून स्वतःचे लहान बालकाप्रमाणे लाड करून घेत असे, तर सूर्यास्तानंतर मात्र तो तिलाच साक्षात आदिमाता ललिताम्बिका म्हणून तिच्या विश्वातीत रूपाचे अवगाहन करीत असे.
असा हा वात्सल्यभक्तीचा शिरोमणि ब्रह्मर्षि कात्यायन त्या तलवारीला व कमळाला कुरवाळू लागताच, आपोआप ती तलवार व ते कमलपुष्प आपल्या डाव्या दोन हातांत धारण करणारी व उजवे दोन हात अभयमुद्रेत व वरदमुद्रेत असणारी सहावी नवदुर्गा कात्यायनी तेथे प्रकट झाली.
मुखावर चंद्राचे तेज असणारी; परंतु चंद्राचा डाग नसणारी ही नवदुर्गा कात्यायनी हीसुद्धा सिंहवाहिनीच होती.
परंतु हिचा सिंह एकाच वेळेस पराक्रम व प्रसन्नता हे दोन्हीही भाव धारण करीत होता.
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा हातातील तबकात १०८ शुभ्रकमले घेऊन पुढे आली व ‘ॐ कात्यायन्यै नमः' हा मंत्र उच्चारीत तिने त्यांतील १०७ कमले नवदुर्गा कात्यायनीच्या चरणांवर वाहिली
व शेवटचे १०८वे कमलपुष्प त्या सिंहाच्या मस्तकावर अर्पण केले
व त्याबरोबर त्या सिंहदेहामध्ये ब्रह्मर्षिंपासून सामान्य श्रद्धावानापर्यंत आदिमातेचा प्रत्येक भक्त दिसू लागला.
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा अत्यंत वात्सल्यभावाने बोलू लागली, “ही सहावी नवदुर्गा ‘कात्यायनी' ही नवरात्रीच्या षष्ठी तिथीच्या दिवस व रात्रीची नायिका आहे
आणि ही शांभवीविद्येच्या अकराव्या व बाराव्या पायऱ्यांची (कक्षांची) अधिष्ठात्री आहे.
ही कात्यायनी म्हणजे भक्तमाता पार्वतीच्या वात्सल्यभावाचा सहजसुंदर व सर्वश्रेष्ठ आविष्कार.”