सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ४

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ४

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३८ व १३८.

 

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३८ या अग्रलेखामध्ये लिहितात,

भगवान हयग्रीव त्या नवपरिणीत दांपत्यासह मार्कण्डेयाच्या आश्रमाकडे निघताच राजर्षि शशिभूषणने अत्यंत विनम्रपणे लोपामुद्रेस विचारले, “हे ज्येष्ठ ब्रह्मवादिनी! आता एक महिन्यापर्यंत, किंबहुना अधिक काळपर्यंत गौतम व अहल्या येथे असणार नाहीत. मग तू येथून पुढे जे शिकविणार आहेस, त्याला ते मुकतील काय, असा प्रश्न मला भेडसावत आहे. तू न्यायी आहेस, हे जाणूनच मी तुला हा प्रश्न करीत आहे.”

लोपामुद्रेने अत्यंत हळुवारपणे उत्तर दिले, “कन्येची तिच्या पतीबरोबर पाठवणी केलेल्या वधूपित्याचा भाव तुझ्या डोळ्यांत स्पष्ट दिसत आहे व तुझ्या ह्या वत्सल भावाचा मान ठेवूनच तुला सांगते - १) एकतर हे दोघेजण मार्कण्डेयाकडून श्रीशांभवीविद्येच्या नवव्या व दहाव्या पायऱ्या सविस्तर व सखोलपणे शिकणार आहेत. तसेच त्याच्या पुढील सर्वही त्यांना तेथे मिळणार आहे व योग्य वेळेस ते येथे परतही येतील. २) सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट विसरलास व तेसुद्धा तुझ्या वात्सल्यामुळेच, म्हणून तुला आठवण करून देते की कैलाशावर नित्यसमयच असतो. काळाला येथे स्थान नाही.”

राजर्षि शशिभूषणने आनंदाने भावभरल्या आवाजात लोपामुद्रेचे आभार मानले व अत्यंत शांतचित्ताने तो परत एकदा एकचित्त साधक बनून अभ्यासास बसला.

लोपामुद्रेने आता परत बोलण्यास सुरुवात केली, “नवव्या व दहाव्या पायरीवर अत्यंत महत्त्वाचे असणारे ‘श्रीललितासहस्रनाम' तुम्हा सर्वांनासुद्धा शिकायचे आहे.

ते केवळ तोंडपाठ असणे किंवा त्याचे पाठावर पाठ करीत राहणे ही काही खरी साधना नव्हे.

कारण श्रीललितासहस्रनामातील प्रत्येक नाम म्हणजे सहस्रारचक्राच्या एका किंवा अनेक पाकळ्यांना सतेज करणारी व रस देणारी रसवाहिनीच आहे.

येथे बसलेला प्रत्येक ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनी हे त्या त्या पदाला तेव्हाच पोहोचले, जेव्हा हे ललितासहस्रनाम आणि त्यांचे सहस्रार चक्र ह्यांचे अनन्य नाते उत्पन्न झाले. अर्थात जेव्हा मानवाच्या सहस्रार चक्रातील एक एक दल हे ललितासहस्रनामातील एका एका नामाने भरभरून व पूर्णपणे भारून जाते, तेव्हाच ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनीचा जन्म होतो.

मग इतरांचे काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, किंबहुना पडलाच पाहिजे. कारण प्रश्नाशिवाय प्रयास नाही, प्रयासाशिवाय उत्तर नाहीउत्तराशिवाय प्रगती नाही

आणि श्रीशांभवीविद्येची नववी व दहावी पायरी म्हणजे प्रत्येकाचे स्वतःतील अंतर्गत आसुरी वृत्तीशी घडणारे युद्धच असते

कुठलेही युद्ध ललितासहस्रनामाशिवाय विजयी ठरूच शकत नाही.

ललितासहस्रनामाच्या पाठिंब्याने व आधाराने लढणारा पक्ष हा देवयानपंथाचा असतो व त्याला निर्भेळ यश मिळते

आणि दोन्ही पक्ष जर ललितासहस्रनामाच्या आधाराने युद्ध करणारे असतील, तर स्वतः ललिताम्बिका अशा युद्धात हस्तक्षेप करते व त्या दोन पक्षांत सलोखा घडवून आणते.

कारण ‘ललिताम्बिका' हे स्वरूपच मुळी युद्धकर्त्रे पण आहे आणि शांतिकर्त्रे पण आहे.

आदिमाता महिषासुरमर्दिनी पूजन

आणि म्हणूनच ललिताम्बिकेचे धनुष्य कुठल्याही धातूने बनलेले नसते, तर नित्यनूतन अशा इक्षुदंडाचे (ऊस) असते आणि हिचे बाण कमळाचे देठ व कमलकलिका ह्यांचेच बनलेले असतात.

नवदुर्गा स्कन्दमाता हीच ललितासहस्रनामाच्या अध्ययनाची दिग्दर्शिका आहे व भगवान हयग्रीव ह्या सहस्रनामाचे सदैव गायन करीत असतो.

भगवान स्कन्दाच्या जन्मानंतर बरोबर एक वर्षाने ही स्कन्दमाता पार्वती ललितासहस्रनामाचे पठण करताना ध्यानात एवढी बुडून गेली की तिला कसलेच भान उरले नाही.

तो एक वर्षाचा बालक स्कन्द अर्थात कुमार हा खेळत खेळत हिमालयाच्या मणिशिखरावर (एव्हरेस्ट-Everest) जाऊन पोहोचला व तेथून खाली झेप घेऊ पाहत होता.

तेव्हा सदैव जागृत असणारी ललिताम्बिका तत्क्षणी मणिशिखरावर येऊन पोहोचली व तिने खाली पडणाऱ्या कुमार कार्तिकेयाचा उजवा हात घट्ट धरला

व बरोबर त्याच वेळेस आंतरिक वात्सल्याने जागृत झालेली स्कन्दमाता पार्वतीदेखील तिच्या स्थानावरून मणिशिखरापर्यंत धावत चढली व तिने खाली पडणाऱ्या कुमार कार्तिकेयाचा डावा हात पकडला.

त्या दोघींच्याही मनात एकमेकींविषयी अत्यंत कृतज्ञतेचा भाव होता व पुढे देवसेनापती होणाऱ्या कुमार कार्तिकेयावरील अपरंपार वात्सल्य होते.

स्कन्दमाता पार्वतीचे ललितासहस्रनामाचे पठण, ती जागृत झाल्यावर, ती धावत पळत शिखर चढत असताना व कार्तिकेयाला सावरल्यानंतरही चालूच राहिले

व ह्यामुळे ती ललिताम्बिका अत्यंत प्रसन्न झाली.

आता स्कन्दाच्या सहाही मुखांना एकाच वेळेस भूक लागली होती व ते जाणून त्या दोघी जणींना एकाच वेळेस पान्हा फुटला.

स्कन्दकार्तिकेयाने त्या दोघींचेही हात घट्ट धरूनच ठेवलेले होते व तो दोघींचेही स्तनपान करीत होता

आणि त्याला पूर्ण स्तनपानानंतर सहाही मुखांतून ढेकर आले - ते ढेकर साधेसुधे नसून श्रीललितासहस्रनामाचे नैसर्गिकसहज उच्चारण होते

व ह्यामुळे त्या क्षणापुरत्या ललिताम्बिका व स्कन्दमाता पार्वती एकरूप झाल्या

व मग ज्याप्रमाणे ‘श्रीयंत्र' हे लक्ष्मी व महालक्ष्मी ह्या दोघींचे एकत्र स्थान आहे व ‘श्रीसूक्त' हे लक्ष्मी व महालक्ष्मीचे एकत्र स्तोत्र आहे,

त्याप्रमाणेच ‘श्रीललितासहस्रनाम' हे पार्वतीचे व ललिताम्बिकेचे एकत्र स्तोत्र बनले व ‘शांभवीविद्या' हे दोघींचे एकत्र स्थान ठरले.”    

श्रीयन्त्राची आरती करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

बापू पुढे तुलसीपत्र - १३८ या अग्रलेखामध्ये लिहितात,

हे सर्व कथानक ऐकत तेथेच आसनस्थ असलेल्या भगवान स्कन्दाच्या मनामध्ये ‘त्या' जुन्या वत्सल आठवणी अत्यंत वेगाने जागृत झाल्या व त्याने जन्मदात्री माता पार्वती हिच्या चरणांवर मस्तक ठेवून ललितासहस्रनामाच्या पठणास प्रारंभ केला - आपोआप व सहज;

आणि नेमक्या त्याचवेळेस राजर्षि शशिभूषणच्या डोळ्यांना पार्वतीच्या नेहमीच्या ‘चंद्रघंटा' स्वरूपाऐवजी ‘स्कन्दमाता' हे स्वरूप दिसू लागले.

एवढेच नव्हे, तर त्या स्कन्दमातेची आकृती अत्यंत सावकाशपणे विस्तृत व व्यापक होत राहिली आणि एका क्षणाला त्याला संपूर्ण आकाश स्कन्दमातेच्या रूपाने भरलेले जाणवू लागले

व ह्याबरोबर राजर्षि शशिभूषण उठून उभा राहिला व सहजभावाने त्या आकाशव्यापी स्कन्दमातेच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी त्या चरणांच्या दिशेने जाऊ लागला.

जसजसा तो त्या चरणांच्या जवळ जात होता, तसतसे स्कन्दमातेचे ते दोन्ही चरण पृथ्वीपासून वर वर जाऊ लागले.

आता त्या सिंहवाहिनी स्कन्दमातेचा उजवा चरण पृथ्वीच्या दिशेने सहजावस्थेत होता, तर तिने आपला डावा पाय मुडपून त्यावर बालस्कन्दाला धारण केले होते व म्हणून तिचा डावा चरण आडवा असूनही उभा होता.

स्कन्दमाता आणि तिचा डावा चरण

राजर्षि शशिभूषण तो उजवा चरण त्याला अधिक जवळ असूनही, तिच्या त्या डाव्या चरणाकडेच पूर्णपणे आकृष्ट झालेला होता.

त्याला त्या डाव्या चरणाच्या

उभ्या तळव्यावर काय

दिसत होते?

राजर्षि शशिभूषण पूर्णपणे वेडावून गेला होता, तो आनंदाची एक एक पायरी वर चढत चालला होता आणि आता तो हळूहळू स्पष्ट आवाजात बोलू लागला, “हे स्कन्दमाते! हे नवदुर्गे! तुझ्या ह्या डाव्या चरणाच्या तळव्यावर मला सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनींच्या तपश्चर्या दिसत आहेत

आणि त्या तपश्चर्या करणाऱ्या ब्रह्मर्षिंच्या नजरेसमोरही मला परत फक्त हा तुझा डावा चरण असाच दिसत आहे

व त्या प्रत्येक ब्रह्मर्षिला तुझ्या तळव्यामध्ये काय दिसत आहे, हे मात्र मला कळलेले नाही - मात्र त्यांचे दोन्ही नयन तुझ्या त्या तळव्याकडे पाहत विस्फारले जात आहेत, एवढे मात्र मला दिसत आहे.

अहाहा! तुझ्या डाव्या व उजव्या हातातील दोन्ही कमलपुष्पे आता त्या ब्रह्मर्षिंच्या मस्तकास स्पर्श करीत आहेत.

अहाहा! तुझ्या त्या दोन हातांतील कमलपुष्पे ही खरंतर तुझी व शिवाची सहस्रारचक्रे आहेत व त्यांचा स्पर्श होताच....”

एवढे बोलून राजर्षि शशिभूषण मृत झाल्याप्रमाणे, श्वासोच्छ्वास व हृदयक्रिया नसणारा असा होऊन अवकाशात तरंगू लागला.

त्याची धर्मपत्नी पूर्णाहुति अत्यंत प्रेमाने व अत्यानंदाने अंतराळात झेप घेऊन आपल्या पतीच्या देहाचा उजवा हात हातात पकडून त्याला हळूहळू परत कैलाशावर उतरवू लागली

आणि ज्याक्षणी राजर्षि शशिभूषणची पाऊले कैलाशभूमीला स्पर्श करती झाली, त्याक्षणी तो परत पूर्ण प्राणवान झाला

आणि त्याच्या पहिल्या श्वासाबरोबर त्याचे सहस्रारचक्रकमल पूर्णपणे उमलून त्याच्या मस्तकातून दाहीदिशांनी बाहेर पडू लागलेले सर्वांना दिसू लागले.

कुणालाही ब्रह्मर्षि होताना आज ब्रह्मर्षि नसलेले अनेकजण पाहत होते

व ज्येष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रा सांगत होती, “आता शशिभूषण ‘ब्रह्मर्षि' झाला आहे व मगाशी मी सांगितलेली, ब्रह्मर्षिचा जन्म होण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही सर्वांनी आता पाहिलीच आहे.”

‘ब्रह्मर्षि शशिभूषणचा

जयजयकार असो'

अशा घोषणा देत तेथील सर्व उपस्थित आनंदाने नृत्य करू लागले.

अगदी शिव, महाविष्णू, प्रजापतिब्रह्मा, गणपती, वीरभद्र, देवर्षि नारद व शिव-ऋषि तुंबरुसुद्धा ह्यात सामील झाले होते

आणि ब्रह्मर्षि शशिभूषणचे दोन्ही डोळे उघडताच त्याने आदिमाता श्रीविद्येच्या चरणांवर लोळण घेतली

आदिमाता श्रीविद्या

व बरोबर त्याच क्षणाला स्कन्दकार्तिकेयाच्या मुखातून ललितासहस्रनामातील एक विलक्षण अद्भुत नाम उच्चारले गेले,

‘ॐ कल्पनारहितायै नमः'

आणि ह्या नामाच्या उच्चाराबरोबर ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने व नवदुर्गा स्कन्दमातेने स्कन्दाच्या आवाजात आवाज मिसळून त्याच नामाचा १०८ वेळा उच्चार केला.