सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ११

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १४०० व १४०१.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १४०० या अग्रलेखामध्ये लिहितात,
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनींसह आदिमातेच्या ‘श्रीविद्या'रूपास प्रणाम केला व ते सर्वजण लोपामुद्रेच्या नेतृत्वाखाली आदिमाता श्रीविद्येसमोर ‘ध्यानास' बसले.
ह्या सर्वांकडे इतर सर्व उपस्थित अगदी एकटक बघत होते.
त्या सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनींच्या चेहऱ्यांवर हळूहळू एक अत्यंत आल्हाददायक, शांतिरसपूर्ण व प्रसन्न भाव विलसू लागला व हा भाव वाढतच चालला होता.
मात्र फक्त एका लोपामुद्रेचा चेहरा पूर्णपणे स्तब्ध व शांतच होता. तिच्या चेहऱ्यावर असा प्रसन्न भावही नव्हता व अप्रसन्नताही नव्हती व हे पाहून सर्व उपस्थित अधिक जिज्ञासू बनत होते.

भगवान त्रिविक्रमाने आता ‘ॐ नमश्चण्डिकायै' ह्या मंत्राचा जप सुरू केला व ब्रह्मवादिनी लोपामुद्रेच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला.
त्याबरोबर लोपामुद्रेच्या चेहऱ्यावरही तसाच आल्हाददायक, शांतिरसपूर्ण व प्रसन्न भाव पसरू लागला
आणि ब्रह्मवादिनी लोपामुद्रेचे ओठ एकमेकांपासून विलग झाले व ती स्वतःसुद्धा ‘ॐ नमश्चण्डिकायै' हा जप करू लागली
व त्याबरोबर इतर सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनींनी आपापले डोळे उघडले,
मात्र ब्रह्मवादिनी लोपामुद्रेचे डोळे मात्र अजून बंदच होते व ती मोठ्याने मंत्रोच्चार करत असूनही ती अजून ‘ध्यानातच' आहे हे प्रत्येकाला स्पष्टपणे कळून येत होते.
लोपामुद्रेच्या मस्तकावरील भगवान त्रिविक्रमाचा वरदहस्त तिच्या केसांपासून आता अलग होताच ब्रह्मवादिनी लोपामुद्रा पद्मासनातून उठून उभी राहिली व तिने तिचे दोन्ही हात जोडले; पण तरीदेखील अजूनही ती पूर्णपणे ‘ध्यानातच' होती.
ह्यावेळचा लोपामुद्रेचा चेहरा फक्त आनंद दाखवीत होता, जणू आनंदाचे विविध रंग, विविध स्रोत, विविध प्रवाह, विविध अर्णव तिच्या एका चेहऱ्यावर आनंदाने वास्तव्य करून राहिले होते.
भगवान त्रिविक्रमाचे शब्द प्रत्येकाच्या कानावर आले, “ही ब्रह्मानंद स्थिती. हीच खरी पूर्ण स्थिती व पूर्ण गती.
असा हा ब्रह्मानंद श्रीशांभवीविद्येच्या सतराव्या व अठराव्या कक्षा (पायऱ्या) पार केल्यावरच प्राप्त होतो.
ह्या इतर सर्व ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनींनासुद्धा हा ब्रह्मानंद प्राप्त झालेलाच आहे. परंतु ज्येष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रेकडे मात्र आणिक एक वेगळी गोष्ट आहे -
- लोपामुद्रेने केलेल्या आदिमातेच्या भक्तीच्या प्रसारामुळे अर्थात अब्जावधी गुणसंकीर्तनांमुळे व तेदेखील ‘मी गुणसंकीर्तन करते आहे' हा भाव जराही नसल्यामुळे ही लोपामुद्रा सहजपणे आपला ब्रह्मानंदसुद्धा आदिमातेच्या चरणी एका क्षणाला अर्पण करू लागली
व लोपामुद्रेने अर्पण केलेला तो ब्रह्मानंद, आदिमाता जेथून व्यक्त झाली त्या मूळ स्थानावर अर्थात श्रीदत्तगुरुंच्या चरणी पोहोचला
व अशा रितीने लोपामुद्रेकडील ब्रह्मानंदास सच्चिदानंदाची जोड मिळाली व ह्यामुळे ती ब्रह्मवादिनी लोपामुद्रा, तिचे प्रत्येक कार्य करीत असतानासुद्धा सदैव ब्रह्मानंदातच निमग्न असते.
श्रीशांभवीविद्येच्या अठराच्या अठरा कक्षा पार केल्यावरच ही सच्चिदानंदाची प्राप्ती होते
व अशी प्राप्ती फक्त लोपामुद्रेकडेच आहे आणि म्हणूनच ती ‘श्रीविद्यासंहिते'ची, श्रीशांभवीविद्येची, श्रीशांभवीमुद्रेची, श्रीशांभवीध्यानाची आणि सच्चिदानंद उपासनेची सर्वोच्च मार्गदर्शक गुरु आहे.”
भगवान त्रिविक्रमाने ‘अवधूतचिंतन....' असे म्हणताच, ब्रह्मवादिनी लोपामुद्रेचे डोळे उघडले गेले व तेदेखील ‘....श्रीगुरुदेवदत्त' हे शब्द उच्चारीतच.

भगवान त्रिविक्रमाने लोपामुद्रेस बोलण्याची अनुज्ञा देताच ती ज्येष्ठ ब्रह्मवादिनी बोलू लागली, “हे प्रिय आप्तगणहो! श्रीशांभवीविद्येच्या सतराव्या व अठराव्या कक्षांची (पायऱ्यांची) अधिष्ठात्री आहे, ती नववी नवदुर्गा ‘सिद्धिदात्री'.
ही सिद्धिदात्रीच नवरात्रीच्या नवमी तिथीच्या रात्र व दिवसाची नायिका आहे.
श्रीशांभवीविद्येच्या सतराव्या कक्षेत येणाऱ्या साधकाला भगवान त्रिविक्रम स्वतः ‘श्रीशांभवीध्यानम्' शिकवितो व तो त्याचा सरावही करून घेतो.
मगाशी आम्ही सर्वजण ज्या ध्यानात बसल्यामुळे आम्ही ब्रह्मानंदाने भरून गेलो होतो, ते ध्यान म्हणजेच ‘श्रीशांभवीध्यानम्'.
ह्या सतराव्या पायरीवर भगवान त्रिविक्रम त्या साधकाचा हात नवदुर्गा सिद्धिदात्रीच्या हातात देतो
व ती माता सिद्धिदात्री त्या साधकास आपल्या अपत्याप्रमाणे मानवी १००८ वर्षे स्वतःच्या जवळ सांभाळते व मग तेव्हाच श्रीशांभवीध्यानम् पूर्णरूपास पोहोचते.
अठराव्या पायरीवर मात्र हीच सिद्धिदात्री भगवान त्रिविक्रमाच्या संमतीने त्या साधकाचा हात पुन्हा भगवान त्रिविक्रमाच्याच हातात देते.
भगवान त्रिविक्रम जराही विलंब न करता, त्या साधकास स्वतःच्या दोन्ही हातांत एखाद्या बालकाप्रमाणे उचलून घेतो
व त्या साधकाला आठ वर्षीय बालक बनवून आदिमातेच्या ‘मणिद्वीपनिवासिनी' रूपाकडे अर्थात ‘सिंहासनस्थ अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी' रूपाकडे अर्थात ‘ललिताम्बिका' रूपाकडे अर्थात मूळ ‘श्रीविद्या' रूपाकडे नेऊन पोहोचवितो.
मणिद्वीपामध्ये मग ते बालक बालक्रीडा करत सदैव राहते - अर्थात ब्रह्मर्षि किंवा ब्रह्मवादिनी बनूनच.
मणिद्वीपात बालक म्हणून वावरत असतानाच, हे सर्व साधक मग वसुंधरेवर किंवा मानवी वस्ती असलेल्या इतर कुठल्याही ग्रहावर त्यांच्या मूळ रूपातसुद्धा वावरतात, कार्यही करतात आणि काहीवेळा तर जन्मही घेतात व तेथील स्थितीनुसार मृत्यूही स्वीकारतात. परंतु ह्यांच्या जन्मास व मृत्यूस काहीच अर्थ नाही. हे सदैव ‘ब्रह्मानंदी'च असतात.”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने एवढे बोलून झाल्यावर आदिमाता श्रीविद्येच्या चरणांवर विविध रंगांची सुगंधित पुष्पे अर्पण केली व त्याबरोबर आदिमातेचे सिंहासनस्थ मणिद्वीप-स्वरूप तेथे विलसू लागले
आणि आदिमातेच्या डाव्या बाजूला चार व उजव्या बाजूला चार अशा प्रतिपदा ते अष्टमीच्या नवदुर्गा उभ्या होत्या
व आदिमातेच्या मस्तकावर सुवर्णकमलछत्र धरून नववी नवदुर्गा सिद्धिदात्री उभी होती.
हिच्या चेहऱ्यात व आदिमातेच्या चेहऱ्यात अंशमात्रही फरक नव्हता.
बापू पुढे तुलसीपत्र - १४०१ या अग्रलेखामध्ये लिहितात,
नववी नवदुर्गा सिद्धिदात्री सर्व उपस्थितांच्या समोर येऊन कैलाशाच्याही भूमीला पदस्पर्श न करता उभी राहिली.
माता सिद्धिदात्रीचा वर्ण ताज्या गुलाबपुष्पाच्या पाकळ्यांप्रमाणे होता.
तिचे डोळे अत्यंत विशाल असून भेदक होते, जणूकाही हिची नजर कशाच्याही आरपार जाऊ शकत होती.
ती चतुर्हस्ता होती व हिच्या भालप्रदेशावर तृतीय नेत्राच्या ऐवजी कुंकुमतिलकच दिसत होता.
हिच्या चार हातांमध्ये मिळून शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुधे होती.
हिचे वस्त्र लाल रंगाचे व सोनेरी काठाचे होते
आणि मुख्य म्हणजे हिची अगदी प्रत्येक हालचाल अतिशय नाजूक, कोमल व हळुवार होती.
माता सिद्धिदात्रीच्या चेहऱ्यावर एकच भाव प्रसन्नपणे विलसत होता आणि तो म्हणजे ‘समाधान'
व ते समाधान मातेच्या चेहऱ्यापासून निघून प्रत्येक श्रद्धावानाकडे आपोआप स्वबलाने पोहोचत होते.
भगवान त्रिविक्रमाने खूण करताच ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने नवदुर्गा सिद्धिदात्रीच्या गळ्यात सुगंधित मोगऱ्याच्या पुष्पांची माला अर्पण केली व तिच्या चरणांवर चाफ्याची व गुलाबाची पुष्पे अर्पण केली.
पुढील गोष्ट बघून मात्र प्रत्येकजण अत्यंत आश्चर्यचकित झाला; कारण सिद्धिदात्रीच्या चरणांवर वाहिलेले प्रत्येक पुष्प ब्रह्मवादिनी लोपामुद्रेच्या गळ्यात येऊन त्यांची एक सुंदर पुष्पमाला तयार झाली.
आपल्याकडील सर्व पुष्पे वाहून झाल्यानंतर लोपामुद्रेने आदिमातेची व सिद्धिदात्रीची अनुज्ञा घेऊन सर्व उपस्थितांशी बोलण्यास प्रारंभ केला, “हे भाग्यवान आप्तगणहो! तुम्ही सर्वजण खरंच अतिशय भाग्यवान आहात कारण तुम्हां सर्वांना अगदी नेमक्या क्रमाने नऊच्या नऊ नवदुर्गांचे दर्शनही घडले व त्यांचे माहात्म्यश्रवणही घडले.
ह्या विश्वात अणिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व व वशित्व, सर्वकामावसाहिता, सर्वज्ञत्व अशा अनंत सिद्धी आहेत.
त्यांपैकी अणिमा, लघिमा, महिमा आदि आठ प्रमुख सिद्धी मानल्या जातात.
वसुंधरेवरच काय, इतर पृथ्वींवरही अनेकजण ज्या तपश्चर्या करीत असतात, त्या बहुधा कुठल्या ना कुठल्या सिद्धीच्या प्राप्तीसाठीच असतात.

जो जो तपस्वी ज्या ज्या चण्डिकाकुल सदस्याला आपले आराध्यदैवत मानून तपश्चर्या करतो किंवा साधना करतो, त्याला त्या त्या दैवताकडून वरदान मिळते व ही वरदाने सिद्धींची असल्यास ही नववी नवदुर्गा सिद्धिदात्री त्या साधकाला मिळणाऱ्या सिद्धीवरसुद्धा आपली नजर ठेवून असते.
कारण नवदुर्गा सिद्धीदात्रीच्या प्रभामंडलातूनच सर्व प्रकारच्या सिद्धी निर्माण होतात व तेथूनच ह्या सर्व सिद्धींचे खरे कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते.
खरं तर सिद्धींची अपेक्षा बाळगणे हे चुकीचेच आहे कारण सिद्धी प्राप्त झाल्यामुळे जी सत्ता प्राप्त होते, ती वापरणारी बुद्धी जर न्यायी नसेल व पवित्र नसेल, तर त्या साधकाचा असुर बनण्यास वेळ लागत नाही
आणि मुख्य म्हणजे खर्या श्रद्धावानाला कुठलीही सिद्धी प्राप्त करून घेण्याची गरजच नसते.
कारण जेव्हा सच्चा श्रद्धावान दोन्ही नवरात्रींमध्ये आदिमातेचे/नवदुर्गांचे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने नियमित पूजन करतो, आदिमातेच्या चरित्राचे वारंवार पठण करीत राहतो व तिच्या गुणसंकीर्तनामध्ये तल्लीन होऊन जातो तेव्हा त्याच्या आयुष्यात आवश्यक असणाऱ्या सर्व सिद्धींचे कार्य ही माता सिद्धिदात्री, प्रार्थना न करताही श्रद्धावानाला पुरवीतच राहते.

एवढेच नव्हे, तर आदिमातेच्या ह्या चण्डिकाकुलातील सर्व पुत्र व कन्या ह्यांची पूर्ण भक्ती करणाऱ्याससुद्धा ही नवदुर्गा सिद्धिदात्री योग्य वेळेस योग्य सिद्धींचे कार्य नक्कीच पुरवीत राहते.
तिच्या चेहऱ्यावर सतत विलसणारे समाधानच सर्व श्रद्धावानांना दिलासा देऊन जाते की तुमची श्रद्धापूर्वक केलेली प्रत्येक गोष्ट ही संतोषाने स्वीकारते व तुमच्या अल्पसेवेनेही ही प्रसन्न होते - मात्र तुम्हाला सिद्धी हव्या असतील तर मात्र मग हिच्या चेहऱ्यावरील समाधान तुम्हाला दिसू शकणार नाही.
प्रत्येक ब्रह्मर्षि व ब्रह्मवादिनीकडे विविध प्रकारच्या सिद्धी आहेत व त्यांना पाहिजे त्या सिद्धी त्यांना कधीही मिळू शकतात.”
एवढे बोलून ज्येष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रा एकाएकी थांबली व भगवान त्रिविक्रमाने बोलण्यास सुरुवात केली, “हे माझ्या बालकांनेो! ह्या सर्व ब्रह्मर्षिंना व ब्रह्मवादिनींना श्रीशांभवीविद्येच्या अठराव्या पायरीवरच (कक्षेवरच) प्रथम १०८ सिद्धी प्राप्त होतात व त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यासाठी सर्वच्या सर्व सिद्धी उपलब्धही होतात.
परंतु खरी गोम येथेच आहे. जो कुणी ह्या प्राप्त झालेल्या सर्व सिद्धी तत्काळ आदिमातेच्या चरणी अर्पण करणार नाही व त्यांच्यापासून मुक्त होऊ इच्छित नाही, तो ‘ब्रह्मर्षि'च बनू शकत नाही.
अठराव्या पायरीवर प्राप्त झालेल्या सर्व सिद्धी जेव्हा आदिमातेच्या चरणी अर्पण केल्या जातात, तेव्हा त्यांचा हा निष्काम भाव पाहून आदिमाता त्या त्या ब्रह्मर्षि वा ब्रह्मवादिनीच्या सर्व सिद्धी ह्या सिद्धिदात्रीकडे सोपविते
व ही सिद्धिदात्री प्रत्येकाच्या सिद्धी आपल्या प्रभामंडलामध्ये ज्याच्या त्याच्या नावानेच जपून ठेवते
व मगच आदिमाता, श्रीदत्तात्रेय व सिद्धिदात्री त्या त्या ब्रह्मर्षि वा ब्रह्मवादिनीला त्यांच्याकडे नसलेल्या सिद्धी केवळ सिद्धिदात्रीच्या स्मरणाने वापरण्याचे वरदान देतात.”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने भगवान त्रिविक्रमास मनोमन प्रणाम केला व म्हणाली, “हे आप्तगणहो! प्रापंचिकांसाठी ही नववी नवदुर्गा सिद्धिदात्री त्यांचा सर्वप्रकारे अभ्युदय करण्यासाठी तत्पर असते.
दुसऱ्याला अन्यायाने दुःख न पोहोचविता, जेवढे म्हणून सुख श्रद्धावानाला हवे असते, तेवढे सर्वच्या सर्व ही नवदुर्गा सिद्धिदात्री श्रद्धावानाला पुरवीत राहते.
मुख्य म्हणजे ही नवदुर्गा सिद्धिदात्री आणि आदिमातेचे सर्व विद्यांवर साम्राज्य गाजविणारे सिद्धेश्वरी स्वरूप एकमेकांशी अन्योन्य नात्याने बांधलेले आहे.
पार्वती आपल्या जीवनाच्या ह्या नवव्या टप्प्यानंतरच अन्नपूर्णा, सदापूर्णा, भावपूर्णा, प्रेमपूर्णा व शक्तिपूर्णा ह्या पंचविध कार्यांनी आदिमातेच्या ‘क्षमा' ह्या सहजभावनेची प्रत्येक श्रद्धावानाला प्राप्ती व्हावी म्हणून अखंड कार्यरत आहे
व ती कायम तशीच राहील.”