भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 30

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 30

लोकमान्य टिळकांनी आपल्या ‌‘केसरी‌’मधून अगदी स्पष्ट शब्दांत खुदीराम बोसच्या हौतात्म्याचे कौतुक केले व ‌‘स्त्रियांवरील हल्ला चुकीच्या गाडीमुळे घडला‌’ असे सर्वांना पटवून दिले. एवढ्यावरच न थांबता टिळकांनी हेही सांगण्यास सुरुवात केली की ब्रिटिशांचे अत्याचार, कमिशनर रँड (प्लेग केस), चीफ मॅजिस्ट्रेट डग्लास किंग्जफोर्ड (सुशीलसेन केस) ह्या मार्गावरून अधिकाधिक वाढत जाणार आहेत आणि त्यामुळेच भारतीयांनी ताबडतोब ‌‘स्वराज‌’ अर्थात ‌‘सेल्फ रूल‌’ (Self Rule) साठी सर्व प्रकारांचा वापर करून लढा द्यायलाच हवा, असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली व टिळकांच्या अशा लिखाणांची भाषांतरे पत्रकांच्या व पत्रिकांच्या रूपात भारतातील प्रत्येक प्रांतात वाटली जाऊ लागली.

अनेक भारतीय संस्थानिक राजांनी ‌‘आपल्या संस्थानात टिळकांची वर्तमानपत्रे किंवा त्यांतील लेखांची पत्रके येऊ नयेत‌’ म्हणून ब्रिटिशांपेक्षाही जास्त कडक धोरणे स्वीकारली. परंतु त्यांची जनता हळूहळू त्यांच्याच विरोधात जाऊ लागली व संस्थानिकांना टिळकांच्या पत्रिकांना विरोध करणे थांबवावे लागले. 

परंतु अशा गोष्टींमुळे भारतातील ब्रिटीश सरकार टिळकांचा काटा काढायच्या मागे लागले. टिळकांना संपवण्याच्या अनेक योजना गुप्तपणे आखल्या जाऊ लागल्या. परंतु ब्रिटनमधील पार्लमेंटमध्ये काही लेबर पार्टीच्या सदस्यांनी ह्या गोष्टीस तीव्र विरोध केला व ‌‘अशा गुप्त गोष्टी बाहेर पडल्या, तर ब्रिटिशांना एक दिवसही भारतात राहता येणार नाही‌’ असे मत नोंदविले.

शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला व टिळकांना सहा वर्षांची सक्तमजुरीची काळ्या पाण्याची सजा सुनावली गेली व तीसुद्धा ब्रह्मदेशातील (म्यानमार) ‘मंडाले‌’सारख्या भीषण तुरुंगात.
ह्या केसमध्ये महंमद अली जिना हे टिळकांचे प्रमुख वकील होते आणि त्यांनी टिळकांची केस लढविण्यासाठी अक्षरश: रात्रीचा दिवस केला. (असा हा निधर्मी विचारसरणीचा व खराखुरा देशभक्त जिना, पुढे गांधी व जवाहरलाल नेहरू ह्यांच्या अतिशय चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या विरोधात गेला व पाकिस्तानचा जनक बनला.)

शिक्षा सुनावल्यानंतर जस्टिस डावर दिनशॉ ह्यांनी टिळकांना त्यांचा अभिप्राय विचारला.

लोकमान्य टिळक भर कोर्टात कडाडले, “मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यूरींचा निर्णय काहीही असो, मी निर्दोषच आहे. ह्या जगतावर खरी सत्ता परमात्मशक्तीची आहे आणि तो ईश्वरच सर्वकाही घडवत असतो. आज त्या सर्वसक्षम भगवंताची इच्छा (The will of Omnipotent Providence) अशी असावी की माझी भाषणे व माझे लेख ह्यांच्यापेक्षाही अनेक पट जोरदार कार्य व प्रभाव माझ्या तुरुंगातील वेदनांमुळे व्हावा.”

संपूर्ण भारतभर लोकमान्य टिळकांना समर्थन देण्यासाठी व ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी मोर्चे, मिरवणुका, सभा, चर्चासत्रे, व्याख्याने असे देशभक्तिपर विविध कार्यक्रम अनेक दिवसपर्यंत होत राहिले.

ब्रिटिशांनी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेमध्ये नेले आणि त्या ५२ वर्षांच्या, वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तीचा अतोनात छळ सुरू केला. काथ्या (Coir - सुंभ) वळण्याचे व त्यापासून सुंभाच्या दोऱ्या, चटया व गोणपाटे बनविणे असे काम टिळकांना दररोज करावे लागे.

त्यातच टिळकांना दिले जाणारे खाणेसुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे असे व मुद्दामहून गोड पदार्थच दिले जात. साधे जेवण त्यांना दिले जात नव्हते कारण टिळकांना थोडासा मधुमेह (Early Diabetes) होता. टिळकांची औषधे थांबविली गेली व खाण्यासाठी फक्त गोड पदार्थ, ह्यामुळे लोकमान्य टिळकांचा डायबेटीस दिवसेंदिवस बळावतच गेला.

त्यातच टिळकांना कुठल्याही प्रकारची सवलत नाकारली गेली. गांधी व जवाहरलाल नेहरू ह्यांना ब्रिटीश सरकार तुरुंगात ठेवत असे, ते त्यांच्या लवाजम्यासह व कुठलेही काम करायला न लावता - जसे ‌‘आगाखान पॅलेस‌’सारखी आलीशान वास्तु.

त्यामुळे १६ जून १९१४ रोजी अर्थात पूर्ण सहा वर्षांची शिक्षा भोगल्यानंतरच जेव्हा टिळक तुरुंगाबाहेर आले, तेव्हा लोकमान्य टिळकांची तब्येत चांगलीच ढासळलेली होती. त्यांना प्रत्येक पाऊल टाकणे कठीण झाले होते परंतु अशा अवस्थेतही टिळकांनी आपल्या दौऱ्यांची गती यत्किंचितही कमी केली नाही व ब्रिटीश राजवटीवर आपल्या लेखणीने पुन्हा एकदा जोरदार हल्ले सुरू केले. 

लोकमान्य टिळकांनी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या मवाळ नेत्यांची कारस्थाने पाहिली व ह्या वर्तनाचा कंटाळा येऊन त्यांनी ‌‘होमरूल लीग‌’ची स्थापना, ‘ डॉ. अ‍ॅनी बेझंट ’ ह्यांच्या सहकाराने केली.

डॉ. अ‍ॅनी बेझंट  ह्यांचा जन्म १ ऑक्टोबर १८४७ रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे माहेरचे नाव ‌‘अ‍ॅनी वुड‌’ असे होते. त्यांची आई ही आयरिश वंशाची होती आणि आयरिश जनता ब्रिटीश गव्हर्न्मेंटविरुद्ध स्वतंत्र आयर्लंडसाठी लढा देत होती.

अ‍ॅनी बेझंट ह्या अत्यंत खंबीर अशा आयरिश व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यादेखील भारतात येऊन ब्रिटीश गव्हर्न्मेंटविरुद्ध लढू लागल्या.

 इ.स. १९०२ साली डॉ. अ‍ॅनी बेझंट ह्यांनी अत्यंत कडक शब्दांत भारतावरील ब्रिटीश राज्याचे वर्णन केले होते - “ब्रिटीश हे भारताच्या प्रगती व विकासासाठी राज्य करीत आहेत, हा खोटारडेपणाचा कळस आहे. इंडियाला प्रचंड नफा मिळवण्याचे साधन म्हणूनच वापरले जात आहे आणि इंडियाच्या नागरिकांना (The sons of the land) गुलामांसारखे वापरले जात आहे.”

 इ.स. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध (First World War) सुरू झाले, तेव्हा ब्रिटिशांनी भारतातून सैनिकभर्ती करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस टिळकांशी गुप्त संपर्क साधून, ‘न्यू इंडिया‌’ ह्या वर्तमानपत्राच्या संपादिका म्हणून अ‍ॅनी बेझंट कडाडल्या - “England’s need is India’s opportunity (इंग्लंडची गरज ही भारतासाठी सुसंधी आहे.)” १९१४ नंतर परत टिळक तुरुंगात गेल्यानंतर डॉ. अ‍ॅनी बेझंट  ह्यांनी होमरूल लीगचे कार्य जोरात चालू ठेवले २८ एप्रिल १९१६ रोजी होमरूल लीगची स्थापना झाली. डॉ. बेझंट बहुतेक करून भारतीय वेशच परिधान करून असत.

मंडाले येथे तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर सखोल विवेचन करणारा ‌‘गीतारहस्य‌’ नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहिला. काथ्याचे सुंभ वळल्यामुळे स्वतःच्या हाताला अनेक जखमा झालेल्या असूनही टिळकांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिला - त्या जखमी व सुजलेल्या हातांमध्ये लेखणी धरून. हा ग्रंथ संपूर्ण भारताला कर्मयोगाची प्रखर शिकवण देऊ लागला.
तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर लोकमान्य टिळकांनी संपूर्ण भारत अक्षरश: पिंजून काढायला सुरुवात केली व त्यासाठी ते अक्षरश: शेकडो छोटी-छोटी शहरे व हजारो (जवळजवळ ९००००) गावांमधून फिरले. प्रत्येक ठिकाणी सभा भरवत राहिले.

भारतीय खेड्यांमधील जनतेला जागृत करण्याचे कार्य, ह्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात प्रथम टिळकांनीच केले. अगदी कोपऱ्यातील खेडेगावामध्येसुद्धा टिळकांच्या सभेला हजारो माणसे जमत व तेसुद्धा त्या गावाची लोकसंख्या जेमतेम ५०० असूनही.टिळकांचे तुफानी दौरे व वादळी लिखाण ह्यांमुळे ब्रिटीश सत्तेला जोरदार हादरे बसू लागले. त्यांनी अत्यंत परखड शब्दांत गांधीजींना अहिंसेची अवाजवी भलामण करण्यापासून दूर राहण्यास सांगितले. परंतु पाच बैठकांनंतरही गांधीजींनी टिळकांचे ऐकण्यास स्पष्ट नकार दिला व उलट काँग्रेसमधील मवाळ गट अधिक बलवान करण्यास सुरुवात केली.

टिळक १९१६ साली परत एकदा दीड वर्षांसाठी तुरुंगात गेले. तेथून बाहेर आल्यावरही त्यांचे कार्य चालूच राहिले. परंतु १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे ‌‘सरदारगृह‌’ नावाच्या मुंबईतील हॉटेलमध्ये एक दिवसाच्या आजाराने निधन झाले.

प्रत्येक भारतीयासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. प्रत्येक भारतीयाची नक्की खात्री झाली होती की ब्रिटिशांनी टिळकांना विष दिले. खरे काय ते भगवंत जाणतोच.

 

(कथा चालू)