भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 29

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 29

प्रफुल्ल चाकी हा टिळकांचे बंगालमधील प्रमुख सहकारी अरविंद घोष व भगिनी निवेदिता ह्यांच्या भाषणांच्या व चर्चासत्रांच्या प्रभावाने आंतरबाह्य ध्येयासक्त झालेला तरुण, ब्रिटिशांचे राज्य उलथवून टाकण्यासाठी बेचैन झालेला होता. त्यातच टिळकांचे कलकत्त्यामधील भाषण ऐकल्यानंतर व विशेषत: त्यांची ‌‘ती‌’ प्रसिद्ध वार्ताहर परिषद पाहिल्यानंतर तर प्रफुल्ल चाकीची खात्रीच पटली की फक्त टिळकच भारताला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करू शकतात.

ह्याच कलकत्त्याच्या सभेमध्ये त्याला एक नवीन मित्र मिळाला - खुदीराम बोस. हा खुदीराम बोस कधी अरविंद घोषांच्या सहकारी गटाचा मेंबर बनला, ते कुणाला कळलेही नाही, अगदी त्याच्या घरातील आई, वडील व तीन बहिणी आणि ‌‘बंगाल स्वदेशी मूव्हमेंट‌’ ह्या घोषांच्या संघटनेतील ज्येष्ठ सहकार्‍यांनासुद्धा कारण ह्याने ‌‘कार्यकर्ता‌’ म्हणून नाव नोंदवलेच नाही.

हा लहान वयाचा तरुण मुलगा खुदीराम बोस एवढा परिपक्व होता की त्याने ह्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात करतानाच हे जाणले होते की क्रांतिकारी चळवळीचे यश गुप्ततेवर (Secrecy) अवलंबून असते. तो ‌‘संघटनेसाठी पत्रके छापून घेणे, निरोपांची देवाणघेवाण करणे, बैठकीच्या खोल्या व्यवस्थित राखणे व भूमिगत झालेल्या लोकांना डबे पुरवणे अशी छोटी-मोठी कामे करणारा एक सामान्य कार्यकर्ता‌’ असेच त्या गटाच्या प्रमुख नेत्यांचे मत होते.

एकटे अरविंद घोष मात्र खुदीरामच्या डोळ्यांतील भाव नीट जाणत होते आणि त्यांनी इतरांच्याही नकळत खुदीराम बोसला आपला स्वत:चा असिस्टंट म्हणून नेमले व येथेच खुदीरामचे जीवन बदलून गेले.

खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी ह्या दोघांनी ‌‘बाँब कसा बनवावा‌’ ह्या कार्यशाळेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हे दोघेही जण टिळकांना भेटून आल्यानंतर तर त्यांनी विविध प्रकारचे बाँब बनवण्याचा धडाकाच सुरू केला. ह्या दोघांनी मिळून पहिल्यांदा एक ‌‘पुस्तक-बाँब‌’ बनविला. कुणालाही ‌‘ते‌’ पुस्तक घेऊन जाणारी व्यक्ती अर्थात तो बाँब घेऊन जाणारा, ह्या दोघांसारखा तरुण मुलगा, एक अभ्यासू विद्यार्थीच वाटला असता. पुस्तकाची पहिली काही पाने उघडल्यावरसुद्धा, पोलिसांनाही बाँबचा संशय येऊ शकला नसता.

ह्या दोघांनी बाँबचे साहित्य अशा कौशल्याने त्या पुस्तकाच्या मध्यभागात लपविलेले असे की ह्या पुस्तकाचे वजनसुद्धा फारसे जड वाटत नसे.

तीन पोलीस चौक्यांवर, दोन ब्रिटीश ऑफिसर्सवर व एका ब्रिटिशांचा खबऱ्या असणाऱ्या फितुराच्या घरावर, ह्या दोघांकडील लहानगे पुस्तकी बाँब वापरण्यात आले कारण हे फक्त टेस्टिंग होते व त्या टेस्टमध्ये ह्यांचे पुस्तकी बाँब पूर्णपणे यशस्वी ठरले होते.

30 मार्च 1908 रोजी खुदीराम बोस एकटाच टिळकांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये येऊन दाखल झाला व परतला, तो त्यांचे पहिले सावज व टार्गेट निश्चित करूनच.

मॅजिस्ट्रेट डग्लस एच. किंग्जफोर्ड (Kingsford) हा बंगालचा प्रमुख मॅजिस्ट्रेट होता आणि ह्याला क्रांतिकारकांचा टोकाचा द्वेष होता. ‌‘चीफ प्रेसिडेंसी मॅजिस्ट्रेट ऑफ कलकत्ता अँड मुजफ्फरपूर‌’ ह्या त्याच्या अधिकारपदाचा तो सरळसरळ गैरवापर करत होता.

केवळ संशय आला आणि काहीही पुरावा मिळाला नाही, तरीदेखील हा अगदी वृद्धांनासुद्धा अतिशय क्रूर शिक्षा बजावत असे व अशा शिक्षांची तरतूद ब्रिटीश गव्हर्न्मेंटच्या घटनेमध्ये (Constitution) नसतानासुद्धा.

30 मार्च रोजी जेव्हा खुदीराम बोस पुण्यात आला होता, त्याच्या दोन महिने आधी ह्या किंग्जफोर्डने ‌‘जुगंतर‌’ (युगांतर) ह्या बंगाली वर्तमानपत्राच्या संपादकांना अत्यंत कठोर शिक्षा सुनावली होती. ह्यांना तुरुंगात सक्तमजुरीवर तर पाठवलेच, परंतु त्याच्या आधी भररस्त्यातून मारत-मारत व खेचाटत गल्ल्या-गल्ल्यांमधून फिरवण्याचा हुकूमही दिला.

ह्या वृद्ध संपादकाचे असहाय्य, वेदनायुक्त ओरडणे खुदीरामच्या मनाला पूर्णपणे अस्वस्थ करून गेले.

त्यानंतर 24 मार्च रोजी किंग्जफोर्डने ‌‘सुशीलसेन‌’ नावाच्या स्वदेशीसाठी कार्य करणार्‍या व तेदेखील शांतपणे कार्य करणार्‍या अवघ्या पंधरा वर्षांच्या अबोध, 8वीतील विद्यार्थ्याला पकडले व तेसुद्धा तो जुगंतरच्या संपादकांवर झालेल्या क्रूर कारवाईचा विरोध करण्यास, निषेध करण्यास लोकांना विनंती करत फिरत होता म्हणून.

ह्या किंग्जफोर्डने ह्या अवघ्या पाच फूट उंचीच्या व किरकोळ बांध्याच्या कोवळ्या मुलाला, आसुडांच्या पंधरा फटक्यांची शिक्षा सुनावली व तीसुद्धा बाजारातील भरगर्दीच्या मुख्य चौकात.

कळस पुढेच झाला. आसुडाच्या प्रत्येक फटक्याबरोबर सुशीलसेन, “वंदे मातरम्‌‍” असे ओरडतच राहिला व हे पाहून किंग्जफोर्ड चवताळूनच उठला व त्याने, पंधरा फटक्यांची शिक्षा, एकेका ‌‘वंदे मातरम्‌‍‌’साठी, असा हुकूम दिला.

जवळजवळ अर्धा तास तो कोवळा किशोरवयीन विद्यार्थी ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चा गजर करतच राहिला. मात्र त्याचा आवाज हळूहळू क्षीण होत गेला व शेवटी तो बेशुद्ध होऊन पडला आणि तेव्हाच फटके थांबले.

ह्या घटनेमुळे खुदीराम व प्रफुल्ल अतिशयच अस्वस्थ झाले व त्याचबरोबर जवळपास प्रत्येक जाणता भारतीय नागरिकही. ‌‘सुशीलसेन‌’ हा ब्रिटीश अत्याचाराचे प्रतीक बनला व संपूर्ण भारतभर ह्या घटनेविरुद्ध निदर्शने सुरू झाली.

पुण्याहून परतलेल्या खुदीराम बोसने ह्या निर्दयी किंग्जफोर्डला उडवायचे नक्की केले. त्यातच ब्रिटीश सरकारने किंग्जफोर्डला मुजफ्फरपूरमध्येच मॅजिस्ट्रेट म्हणून काम बघण्याची आज्ञा केली - कलकत्त्यातील जनक्षोभ शांत व्हावा म्हणून.

परंतु खुदीराम व प्रफुल्लला ती बदली सोयीची वाटली. कलकत्त्यासारख्या अत्यंत गजबजलेल्या शहरामध्ये किंग्जफोर्डवर बाँब फेकणे अवघड गेले असते व त्यामध्ये कदाचित निरपराध नागरिकांचाही उगीचच बळी गेला असता व म्हणूनच किंग्जफोर्ड मुजफ्फरपूरमध्ये रहायला गेल्यामुळे हे दोघे खूप खूष झाले. मुजफ्फरपूर हे कलकत्त्याच्या मानाने अत्यंत लहान व शांत शहर होते आणि हा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड रोज संध्याकाळी नियमितपणे ‌‘युरोपियन क्लब‌’मध्ये जात असे.

30 मार्च 1908ची संध्याकाळ हा मुहूर्त ठरला. ते दोघे जण विद्यार्थ्यांच्या गणवेशात त्या क्लबच्या समोरील बसथांब्यावर जणू बसची वाट पहात बसून राहिले.

क्लबमधील चैनबाजी आटोपून किंग्जफोर्ड त्याच्या बग्गीतून घरी परतण्यास निघाला. त्याच्याबरोबरच दुसरा एक ब्रिटीश ऑफिसर प्रिंजल केनेडी (Pringle Kennedy) ह्याची पत्नी व तरुण कन्या होती. आयत्या वेळेस ह्या दोघींना किंग्जफोर्डने स्वत:च्या आलीशान बग्गीमध्ये बसण्याची विनंती केली कारण त्यांची बग्गी लहान होती व त्यांच्याबरोबर ऑफिसर प्रिंजल केनेडी व अजून दोन ब्रिटीश स्त्रिया होत्या. किंग्जफोर्ड स्वत: केनेडीच्या छोट्या बग्गीमध्ये बसला. त्या काळातील घोड्यांच्या बग्ग्या अधिकारानुसार लहान-मोठ्या असत व चारी बाजूंनी बंद असत.

ह्या आयत्या वेळच्या अदलाबदलीची खबर खुदीराम व प्रफुल्लला मिळणे शक्यच नव्हते व त्यामुळे ‌‘हर्बर्ट ब्रूम‌’च्या (Herbert Broom) ‌‘कमेंट्रीज ऑन द कॉमन लॉ‌’ ह्या एल.एल.बी.च्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकात लपविलेला सहा औंसाचा डायनामाईट, डिटोनेटर आणि ब्लॅक पावडर फ्यूज ह्यांतून बनलेला बाँब बग्गीवर खुदीरामने स्वत: फेकला.

परंतु किंग्जफोर्ड दुसर्‍याच बग्गीत असल्यामुळे तो पूर्णपणे वाचला. खुदीरामने व प्रफुल्लने किंग्जफोर्डच्या बग्गीचा नीट अभ्यास केलेला होता. परंतु किंग्जफोर्डच्या स्वत:च्या बग्गीमध्ये त्या दिवशी केनेडी कुटुंब होते व त्यातील दोन स्त्रिया मृत पावल्या.

खुदीराम व प्रफुल्ल दोघेही काही काळातच पकडले गेले परंतु ब्रिटीश सरकारला भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला बदनाम करण्याचे साधन मिळाले व ब्रिटिशांनी ‌‘युरोपियन महिलांवर हल्ला‌’ अशा शीर्षकाखाली सर्व खर्‍याखुर्‍या नेत्यांची बदनामी सुरू केली.

लोकमान्य टिळकांनी मात्र त्यांच्या ‌‘मराठा‌’ व ‌‘केसरी‌’मध्ये सुशीलसेनचे प्रकरण नेटाने लावून ठेवले आणि खुदीरामचे खुलेपणाने समर्थनही केले. टिळकांची तोफ धडाडतच राहिली व ब्रिटिशांच्या युक्तिवादाच्या ठिकर्‍या-ठिकर्‍या उडू लागल्या

आणि नेमक्या ह्याच वेळेस साऊथ आफ्रिकेतून भारतात परतून स्वत:चे नेतृत्व स्थापन करू पाहणार्‍या ‌‘मोहनदास करमचंद गांधी‌’ ह्या नवीन नेत्याने खुदीरामच्या कृतीचा कडक शब्दांत निषेध केला व त्याला ‌‘महिलांवर अत्याचार करणारा‌’ ठरविले

व इथेच ‌‘टिळकांविरुद्ध गांधी‌’ ह्या नवीन युगाची नांदी सुरू झाली कारण टिळकांचे शत्रू असणार्‍या गोपाळ कृष्ण गोखल्यांचे गांधी हे शिष्य होते.

(कथा चालू)