भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 31

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 31

लोकमान्य टिळकांच्या निधनाची खबर अक्षरश: वायुवेगाने सर्व भारतभर पसरली. इ.स. 1920 मध्ये दूरसंपर्काची साधने अत्यल्प होती आणि तरीदेखील आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाचे वृत्त कानाकोपर्‍यातील भारतीयांना अवघ्या दोन तासांत मिळालेले होते.
टिळकांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली. भारताच्या कानाकोपर्‍यातून अनेक नेते व सामान्य भारतीयसुद्धा अंत्ययात्रेसाठी येण्यास निघाले. परंतु प्रवासाच्या मर्यादित साधनांमुळे (ट्रेन, बसेस, प्लेन्स) सर्व जण वेळेत येऊन पोहोचणे शक्यच नव्हते.

एका ब्रिटीश वृत्तपत्रकाराने नमूद करून ठेवल्याप्रमाणे ते वर्णन असे आहे - ‌‘बातमी मुंबई व महाराष्ट्रात सर्वप्रथम पसरली आणि सरदारगृहाबाहेर जणू अख्खी मुंबईच येऊ लागली. कोण कोणाला आवरणार?
भारतीय वंशाच्या अनेक पोलीस ऑफिसर्सनासुद्धा अश्रू व हुंदके अनावर झाले होते. त्या गर्दीतील प्रत्येक स्त्री-पुरुष रडत होता, लोकमान्य टिळकांच्या नावाने गर्जना करत होता आणि अंगातील सर्व जोर लावून दर्शनाच्या दिशेने पुढे-पुढे जात होता.

अफाट गर्दीमुळे दर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला गेला परंतु ‌‘त्या दिवशी‌’ सामान्य भारतीय नागरिकसुद्धा ब्रिटीश कॉन्स्टेबल्सनाच काय, पण ब्रिटीश वंशाच्या मोठमोठ्या हुद्यांवरील पोलीस ऑफिसर्सनाही जराही जुमानत नव्हता.
दर्शन थांबविल्यामुळे दुखावलेल्या भारतीय जनतेचा क्षोभ व प्रचंड संताप ह्यांचे चांगलेच जोरदार चटके ब्रिटीश ऑफिसर्सना बसू लागले.

मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने व्हाईसरॉयशी संपर्क साधला व सर्व वृत्त निवेदन केले. ब्रिटिशांना कळून चुकले होते की अंत्यदर्शनापासून व अंत्ययात्रेत सहभागी होण्यापासून एकाही भारतीयाला रोखले, तर प्रचंड दंगली उसळतील व ह्या प्रचंड मोठ्या संतापलेल्या जमावापुढे ब्रिटीश सरकार, ब्रिटीश ऑफिसर्स व ब्रिटीश सैनिकसुद्धा दुबळे पडतील आणि गोळीबार जर केला, तर संपूर्ण भारतभर ब्रिटिशांना ‌‘दे माय धरणी ठाय‌’ अशी स्थिती भोगावी लागेल. त्यांना मुख्य भीती वाटत होती की अशा घटनांमुळे भारतीय जनतेला त्यांच्या सामर्थ्याची नीट ओळख होईल व ह्याचे दूरगामी परिणाम ‌‘स्वराज‌’ स्थापनेमध्येच होईल  
आणि टिळकांचे जाहीर वचन - ‌‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच‌’, टिळकांच्या निधनामुळे लवकरात लवकर खरे होईल

 व त्यामुळे कपटी व कावेबाज वृत्तीच्या ब्रिटीश सरकारने अचानक आपली भूमिका बदलली आणि भारतीय नेत्यांना व समाजाला क्रोध उत्पन्न होईल अशी गोष्ट जराही न करण्याचे आदेश वरपासून खालपर्यंत दिले गेले.
    ब्रिटीश पोलीस ऑफिसर्स व सार्जंट्स जनतेला अंत्यदर्शनासाठी व अंत्ययात्रेच्या दरम्यान सहाय्य करताना दिसून आले. त्यात प्रेम, आपुलकी व आदर नव्हता; तर भविष्याची चिंता होती. हा एक मोठा कपटी डाव होता.

लोकमान्य टिळकांच्या अंत्यदर्शनासाठी मोठमोठे दिग्गज नेते, समाजसुधारक, पत्रकार, लेखक, वकील, उद्योगपती ह्यांची रीघ लागली. मुंबईतील गुजराथी व मारवाडी समाजाने तर लोकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व लिंबूसरबताची सोय केली. अनेक धनिकांनी, रांगेत तासनतास उभे राहिलेल्या लोकांसाठी पाण्याची, दुधाची व केळ्यांची सोय केली आणि मुख्य म्हणजे ह्यांतील कुणीही धनिक व्यक्ती, समाज वा संस्था आपले बोर्ड लावून मिरवत नव्हते.
त्या गर्दीतील मराठी, गुजराथी, मारवाडी, उत्तरप्रदेशी, बंगाली, कानडी, तेलगु, सीख अशा विविध भारतीयांची गर्दी पाहून, त्या त्या समाजांच्या जमावांचे फोटो ब्रिटीश पोलिसांनी काढले व व्हाईसरॉयसाठी ताबडतोब रवाना केले.

    लोकमान्य टिळकांचा मृतदेह हा त्यांच्या पाठीराख्यांसाठी साधारण मृतदेह नव्हताच मुळी. त्यांच्यासाठी ती लोकमान्यांची संजीवन समाधी होती. दिव्य योगारूढ स्थिती होती, कर्मयोगाची अंतिम स्थिती होती 
    आणि ह्यामुळे टिळकांचा देह पद्मासनात बसविला गेला होता. न. चिं. केळकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ‌‘मंडालेसारख्या भीषण तुरुंगातसुद्धा ब्रिटिशांसमोर कधीही आडवे न पडलेल्या लोकमान्यांचा मृतदेहदेखील आडवा ठेवला जाणार नाही.‌’    

अंत्ययात्रा अफाट गर्दी असूनही शांतपणे सुरू झाली. ठिकठिकाणी, चौकाचौकात टिळकांवर पुष्पवर्षाव केला जात होता. सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांचे कार्यकर्ते प्रचंड मोठे हार घेऊन ठिकठिकाणी उभे होते. टिळकांच्या ‌‘छत्रपती शिवाजी महाराज कमिटी‌’चे दमदार कार्यकर्ते रस्त्यारस्त्याला ब्रिटिशांच्या विरोधात उघडपणे घोषणा देत होते व हे विशेष वृत्तदेखील गव्हर्नरने व्हाईसरॉयला व ब्रिटनमधील पार्लमेंटला ताबडतोब रवाना केले

    आणि टिळकांच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व मौलाना शौकत अली ह्या मवाळ गटाच्या नेत्यांना अंत्ययात्रेमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले व ‌‘त्यांच्या नेतृत्वाखालीच अंत्ययात्रा चालू आहे‌’ असे जनतेला दाखविले गेले व ह्या एका गोष्टीमुळे गांधीजींचे महत्त्व सामान्य प्रजेला खूप मोठे वाटू लागले.
    अंत्ययात्रेत सामील होणार्‍यांमध्ये स्त्रियांचे प्रमाणही खूप मोठे होते. त्या काळात घरातच राहणार्‍या स्त्रिया, आज केवळ घराबाहेर पडल्या नव्हत्या, तर अंत्ययात्रेत सामील झाल्या होत्या, घोषणा देत होत्या व अंत्यसंस्काराच्या वेळेसही उपस्थित राहिल्या. अगदी केस काढलेल्या विधवा स्त्रियासुद्धा सर्व नियम झुगारून देऊन त्या महान युगपुरुषाच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाल्या होत्या.

    हे संपूर्ण चित्र ब्रिटीश राजसत्तेचा थरकाप उडविणारे होते. टिळकांची अंत्ययात्रा भारतीयांना अधिक सशक्त, बलवान व निर्भय बनवत राहणार होती व ह्याचीच भीती ब्रिटिशांना अधिक वाटू लागली.
    टिळकांच्या निधनाच्या वार्तेने खुश झालेले ब्रिटीश गव्हर्न्मेंट अंत्ययात्रेच्या वर्णनांमुळे जबरदस्त सावध झाले.
    व्हाईसरॉयने तातडीने संदेश पाठवून दिला की - ‌‘सर्व प्रजाजनांची सोय व्हावी म्हणून, सर्व नियम बाजूला सारून, लोकमान्य टिळकांचे अंत्यसंस्कार गिरगावच्या आलीशान चौपाटीवर व्हावेत.‌’ (त्या काळातील गिरगाव चौपाटी अनेक एकर्सची होती.) 

‌  ‘लोकमान्यांची चिता साध्या लाकडांची असताच कामा नये‌’ असा निर्णय सच्चे भारतीय असणार्‍या उद्योगपतिवर्गाने घेतला व लोकमान्यांची चिता संपूर्णपणे चंदनाच्या काष्ठांनी बनविली गेली. 
    परंतु एक अजब व विलक्षण गोष्ट सुरू झाली. अंत्ययात्रेत सामील झालेल्या अनेकांनी आपापल्या आर्थिक कुवतीनुसार चंदनाची खोडे आणली होती व त्यांचे मोठमोठाले ढीग तयार झाले होते.
    ज्या पारशी समाजाकडे चंदनाचा व्यापार होता, त्या समाजातील धुरिणांनी बैलगाड्या भरून चंदन अर्पण केले.

    सनातन वैदिक धर्माचे कट्टर अभिमानी असणार्‍या व त्यासाठी वेळप्रसंगी आक्रमकही बनणार्‍या लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेला प्रत्येक मोठ्या मंदिरापुढे थांबावेच लागले कारण तेथील पुजारी समाज व उपाध्यायवर्ग सर्व शास्त्रे बाजूला सारून, मोठमोठे हार घेऊन टिळकांच्या चरणांची पूजा करत होते.
    अनेक दर्ग्यांनी टिळकांच्या मृतदेहावर फुले उधळली व पठण केले.

    ब्रिटीश गव्हर्नरच्या अंदाजानुसार चार लाख पुरुष व एक लाख स्त्रिया त्या अंत्ययात्रेत सामील झाल्या होत्या व ह्यांतील प्रत्येक जण ‌‘लोकमान्य टिळक अमर रहें, ब्रिटीश राज मुर्दाबाद, लाला लजपतराय झिंदाबाद‌’ अशा घोषणा देत होते.

‌‘टिळकांप्रमाणेच आक्रमक स्वभावाचे असणारे लाला लजपतराय ह्यांच्याकडे नेतृत्व गेले, तर टिळकांचा जहाल गट व क्रांतिकारक ह्यांचा विजय होईल‌’ असा अभिप्राय व्हाईसरॉयने व्यक्त केला
व लाला लजपतराय ह्यांना बाजूला सारून, टिळकांच्या जहाल मतांचा प्रभाव कमी करण्यासाठी ब्रिटीशधार्जिण्या जवाहरलाल नेहरूंना हाताशी धरले गेले व गांधीजींना पुढे काढण्याचा निर्णय झाला कारण पहिल्या महायुद्धाच्या वेळेस टिळकांनी सेनाभर्तीला विरोध केला होता, तर गांधीजींनी पाठिंबा दिला होता. टिळकांची चिता सतत सात दिवस जळत होती कारण भारताच्या विविध प्रांतांतून लोक येतच होते व चंदन वाहिले जात होते.

पुढच्या काळात गांधीजींचे नेतृत्व प्रस्थापित झाले परंतु त्याची शक्ती टिळकांच्या श्रमातूनच निर्माण झाली. 

(कथा चालू)