भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 28

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 28

Previous Article 

हिंदी   English  ગુજરાતી  বাংলা  తెలుగు  ಕನ್ನಡ தமிழ்

लाला लजपतराय व बिपिनचंद्र पाल ह्या दोघांनी पंजाब प्रांत व बंगाल प्रांतामध्ये टिळकांचे दौरे आयोजित केले. त्यावेळच्या पंजाब प्रांतात सध्याचा भारतातील पंजाब, हरियाणा व सध्या पाकिस्तानात असलेला पंजाबचा उर्वरित भाग येत असे आणि तेव्हाच्या बंगाल प्रांतामध्ये आत्ताचा संपूर्ण बांगलादेश, भारतातील पश्चिम बंगाल व आजूबाजूचा काही प्रदेश येत असे. 

कलकत्त्यामध्ये टिळकांची सभा हा तर त्या काळातील वर्तमानपत्रांचा चर्चेसाठीचा खूप मोठा विषय बनला. एकेका सभेला अक्षरश: पाच-पाच हजार माणसे उपस्थित असत व कधी-कधी तर हा आकडा त्याच्या दुप्पट वा तिप्पटही होई. कलकत्ता व पंजाब प्रांतातील लोक टिळकांना खुल्या दिलाने ‌‘भारताचे सर्वोच्च नेते` मानू लागले व तसा उल्लेखही तेथील नेत्यांच्या भाषणामध्ये होऊ लागला.

भारतातील ब्रिटीश गव्हर्न्मेंटने १८९७, १९०९ आणि १९१६ मध्ये टिळकांना राजद्रोहाच्या व ब्रिटिशांविरुद्ध असंतोष भडकावण्याच्या आरोपांखाली दीड-दीड वर्ष तुरुंगात पाठविले. १८९७च्या राजद्रोहाच्या केसमध्ये व एका वैयक्तिक दर्जाच्या केसमध्येही बॅरिस्टर महंमद अली जिना ह्यांनी टिळकांचे वकीलपत्र आदराने घेतले. १९१३च्या व १९१६च्या केसमध्ये तर जिना टिळकांना ह्या आरोपांपासून सोडवू शकले.

जिना हे अत्यंत उच्चशिक्षित व आधुनिक विचारांचे काँग्रेसचे नेते होते व त्यांना टिळकांविषयी प्रचंड आदर होता. त्यामुळे सुशिक्षित मुस्लिम तरुणवर्ग टिळकांच्या मागे उभा राहू लागला. टिळकांची लोकप्रियता पंजाब व बंगाल प्रांतांतून सर्वत्र पसरू लागली व हे पाहून ब्रिटिशांचा जळफळाट सुरू झाला व कपट-कारस्थानेही; व ह्यामुळे लॉर्ड कर्झन ह्या अत्यंत मुत्सद्दी, कपटी व क्रूर स्वभावाच्या व्यक्तीला भारतात पाठविले गेले व ह्या इसमाने हिंदू-मुसलमानांमध्ये वैर उत्पन्न करणे व हिंदू-मुसलमान दंगे पेटवून देणे हे दोन मुख्य मुद्दे डोळ्यांसमोर ठेवले.

ह्यामुळे त्याने संयुक्त बंगाल प्रांताचे ‌‘मुस्लिम बहुल पूर्व बंगाल‌’ व ‌‘हिंदू बहुल पश्चिम बंगाल‌’ असे विभाजन घडवून आणले. ह्यात कुठलीही भूमिका घेतली तरी टिळकांचे नुकसानच होईल व भारतही दुभागला जाईल, ह्याची लॉर्ड कर्झनला खात्री होती परंतु तसे घडू मात्र शकले नाही.

लोकमान्य टिळकांनी बिपिनचंद्र पाल ह्यांच्या मदतीने संपूर्ण बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधातच कडवे आंदोलन उभे केले. ब्रिटीश सरकारला फितूर असलेल्या काही लालची भारतीयांनी काही ठिकाणी हिंदू-मुसलमान दंगे भडकवण्याचे प्रयासही केले. परंतु टिळकांच्या अनेक सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून व गावोगावी फिरून टिळकांची भूमिका लोकांना समजावून सांगितली व ह्या बंगालच्या फाळणीला होणारा विरोध अधिकच जोरदार केला. शेवटी ही फाळणी १९११ साली रद्द केली गेली.

ह्याच वेळेस ‌‘अरोबिंदो घोष‌’ हे बंगाली जहाल नेते पुढे आले व टिळकांच्या वतीने संपूर्ण उत्तर भारतामध्ये प्रचार व प्रसार करू लागले. ह्या अरोबिंदो घोषांनीच पुढे पाँडेचरीमध्ये एक आश्रम बांधून एका आगळ्यावेगळ्या आणि तरीदेखील पूर्णपणे वेदांना अनुसरून असणाऱ्या आध्यात्मिक वसाहतीची स्थापना केली.

त्याच वेळेस ‌‘चिदंबरम पिल्लाई` हे दक्षिण भारतामध्ये टिळकांचे प्रतिनिधित्व करू लागले व त्यामुळे संपूर्ण दक्षिण भारतातील अगदी सामान्य व अशिक्षित नागरिकालासुद्धा, ‌‘टिळक हे आपले नेते आहेत व आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे व त्यांच्या कार्यात सक्रियपणे उतरले पाहिजे‌’ असे ठामपणे वाटू लागले.

दिवसेंदिवस टिळकांची लोकप्रियता वाढतच राहिली व टिळकांनी हळूहळू करून ‌‘प्रत्येक भारतीयाला सहजतेने ब्रिटिशांना विरोध करता येईल` असे स्वातंत्र्यलढ्याचे मार्ग लोकांसमोर ठेवले.
१) पहिले म्हणजे परदेशी मालावर बहिष्कार - विशेषत: ब्रिटनहून येणाऱ्या मालावर बहिष्कार. ब्रिटीश भारतातील कच्चा माल अगदी स्वस्तात नेऊन, त्यापासूनच ब्रिटनमध्ये बनलेला पक्का माल भारतीयांना चौपट भावाने विकत. काही वेळा तर हे प्रमाण दसपटही असे.

ह्या कार्यक्रमाअंतर्गत टिळकांनी लोकांना, ब्रिटीश माल विकणाऱ्या दुकानांसमोर जाऊन ‌‘पिकेटिंग‌’ करण्यास सांगितले व लोक तसे पिकेटिंग करूही लागले. लोकांसाठी ही गोष्ट सरळ व साधी होती - परदेशी मालाच्या दुकानात शिरू पाहणाऱ्या लोकांना अडविणे, त्यांना ब्रिटिशांची नीति समजावून सांगणे व तरीदेखील जर लोकांनी मानले नाही, तर देशभक्तांचे समूह मानवी साखळी करून दुकानात शिरण्याचा मार्ग बंद करून टाकत. ह्यामुळे ब्रिटिशांच्या मालाची विक्री पन्नास टक्क्यांनी कमी झाली आणि ब्रिटीश सरकारला व ब्रिटीश उद्योगपतींना खूप मोठा अधिक फटका झेलावा लागला.

२) स्वदेशी चळवळ - ही चळवळ लोकमान्य टिळकांनीच भारतात पहिल्यांदा सुरू केली. त्यासाठी त्यांनी त्यांच्या भाषणांमधून जाहीर केले की केवळ ब्रिटीश मालावर बहिष्कार टाकून चालणार नाही, तर त्या मालाच्या जागी भारतात बनलेला माल मिळणे आवश्यक आहे व अगदी कराचीपासून ते मद्रासपर्यंत अनेक भारतीय लहान-मोठे उद्योजक हिरिरीने भारतात माल बनवू लागले.

हे सर्व पाहून संतापलेल्या लॉर्ड कर्झनने, त्याचे काही खास विकत घेतलेले भारतीय पत्रकार, टिळकांच्या कलकत्त्यामधील सभेनंतरच्या वार्ताहर परिषदेमध्ये घुसविले.

ह्या ब्रिटीशधार्जिण्या पत्रकारांनी एकच गिल्ला करून टिळकांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यांचा सवाल असा होता - “मिस्टर टिळक! १८१८च्या आधी दोन तृतीयांश भारतावर मराठ्यांचे राज्य होते. तुम्हीही मराठीच आहात. तुम्हाला तसेच स्वत:चे मराठा राज्य भारतावर आणायचे आहे ना?”

टिळकांना बिगरमराठी भाषिकांपासून तोडण्याचा हा चालाख प्रयत्न होता.

परंतु लोकमान्य टिळकांनी अगदी स्पष्ट शब्दांत व जाहीररित्या माईकवरून उत्तर दिले, “ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे. ह्या आधुनिक युगात भारतातील सर्वच प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे लोकशाही सरकार येईल व माझ्या गटात बंगाली नेते आहेत, पंजाबी नेते आहेत, तेलगु, कन्नड व मद्रासी नेते (तामिळ) आहेत व आमचे कार्यकर्तेही सर्वदूर पसरलेले आहेत. त्यामुळे ब्रिटीश भारत सोडून गेले की कुणा एका विशिष्ट समुदायाचे राज्य स्थापन होणार नाही; किंबहुना ‌‘राजा-प्रजा‌’ ही व्यवस्थाच नाहीशी होईल व लोकांचे सरकार बनेल.”

टिळकांच्या ह्या जाहीर व स्पष्ट उत्तरामुळे लॉर्ड कर्झनची कूटनीति सपशेल अयशस्वी ठरली व संपूर्ण भारत व अखिल भारतीय, लोकमान्य टिळकांनाच आपला एकमेव सर्वोच्च नेता मानू लागले.

१९०७ला सुरत येथे भरलेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनामध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी टिळकांना नामोहरम करण्यासाठी खूप प्रचार व प्रसार केला. त्यांना जहाल गटाचे अस्तित्वच मान्य नव्हते. टिळकांचे पाठीराखे खंबीर राहिले परंतु गोखले काँग्रेस फोडण्यात यशस्वी झाले. काँग्रेसचे ‌‘जहाल‌’ व ‌‘मवाळ‌’ असे दोन भाग अस्तित्वात आले.

१९०७ सालच्या मार्च महिन्यात खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी हे दोन बंगाली टिळक-समर्थक टिळकांना प्रथम कलकत्त्यात येऊन भेटले व नंतर तीन वेळा टिळकांना पुण्यात येऊन भेटले. ‌‘टिळकांनी त्यांना नेमके काय सहाय्य केले‌’ हे एक भगवंतच जाणे.

परंतु ह्या दोघांनी खूप मोठा इतिहास घडवला. 

(कथा चालू)