भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 27

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 27

Previous Article 

हिंदी   English  ગુજરાતી  বাংলা  తెలుగు  ಕನ್ನಡ தமிழ்

ज्या योजनाबद्ध व शिस्तबद्ध रितीने कमिशनर रँड व लेफ्टनंट आयर्स्ट ह्यांना भर रस्त्यात, आजूबाजूला भरगच्च गर्दी असताना व तेसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या दिवशी गोळ्या घालून मारले गेले, त्यामुळे ब्रिटीश सरकारची पूर्ण खात्री झाली होती की हे काम केवळ तीन चाफेकर बंधू व त्यांचा ‌‘महादेव रानडे‌’ नावाचा आप्त करू शकणार नाहीत.

१८५८ नंतर पहिल्यांदाच एवढ्या उघडपणे खूप उच्च पदावरील ब्रिटीश ऑफिसर्सवर जीवघेणा हल्ला झाला होता 

आणि तो दिवस होता २२ जून १८९७ अर्थात ब्रिटीश राणी व्हिक्टोरियाच्या हीरक महोत्सवाच्या समारंभाच्या दिवशी. (Diamond Jubilee of Queen Victoria)

पुण्याच्या गव्हर्न्मेंट हाऊसमध्ये हा सोहळा झाला होता आणि त्याहून परतणाऱ्या कमिशनर रँडवर गोळीबार केला गेला. ब्रिटिशांचा जळफळाट आणखी एका गोष्टीमुळे अधिक वाढला कारण लेफ्टनंट आयर्स्ट (Ayerst) जागच्या जागी मृत्यू पावला, परंतु कमिशनर रँड मात्र बारा दिवस मृत्यूशी झुंजत ३ जुलै १८९७ रोजी ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावला

आणि त्याच्या तब्येतीच्या बातम्या देण्याच्या निमित्ताने टिळकांचे ‌‘केसरी‌’ व ‌‘मराठा‌’ ही क्रांतीची ज्योत अधिकाधिक उजळवत राहिले.

सर्व जनतेच्या मनातील असंतोष ह्या घटनेच्या माध्यमातून प्रकट झाला होता आणि खरेच होते ते. प्लेगची साथ रोखण्यासाठी आरोग्यविषयक काळजी घेणे आवश्यकच होते. परंतु कमिशनर रँडने ह्या कार्यासाठी ब्रिटीश सैनिक उतरविले व आणीबाणी जाहीर करून सैन्याच्या हातात सर्वाधिकार दिले.

ह्या ब्रिटीश सैन्याने काय म्हणून केले नाही? हे सैनिक घराघरात घुसून, घरातील अगदी म्हाताऱ्या-कोताऱ्या व्यक्तींपासून ते लहान मुलांपर्यंत कुणालाही अक्षरश: खेचाटत रस्त्यावर आणायचे व घराची लादी उखडली जात असे, घरातील सामान जाळले जात असे, मौल्यवान वस्तू, दागिने, चांदीची पूजेची उपकरणे व पैसे सरळसरळ लुटले जात होते आणि सगळ्यात भयंकर म्हणजे स्त्रियांच्या अब्रूशी खेळले जात होते.

ठिकठिकाणी लोक ह्याला विरोध करतच होते परंतु अशा विरोध करणाऱ्यांना क्रिमिनल प्रॉसिक्युशनला सामोरे जावे लागत असे व सजा अर्थातच भयंकर असत.

ज्या गणेशखिंडीमध्ये ह्या दोघां युरोपियन ऑफिसर्सवर हल्ला झाला, त्या ठिकाणी शेकडो लोक अगदी दुसऱ्या दिवसापासून सकाळ-संध्याकाळ जमू लागले. काही जण तर तेथील माती उचलून कपाळाला लावू लागले.

३ जुलै रोजी रँडचा मृत्यू झाला आणि तरीदेखील ब्रिटिशांना ‌‘अपराधी कोण‌’ ह्याचा जराही पत्ता लागू शकला नव्हता, परंतु ७ ऑक्टोबर १८९७ रोजी ‌‘द्रविड‌’ आडनावाच्या दोन बंधूंनी ब्रिटीश पोलीस ऑफिसर्सना पैसे घेऊन बातमी दिली की ‌‘दामोदर हरि चाफेकर ह्याचा ह्या हत्यांशी संबंध आहे.‌’ ८ ऑक्टोबर रोजी दामोदर हरि चाफेकरला अटक झाली आणि १८ एप्रिल १८९८ रोजी त्याला फाशी दिले गेले. बाळकृष्ण हरि चाफेकर भूमिगत झाला होता, परंतु त्याचाही सुगावा त्याच्या एका जिवाभावाच्या मित्रानेच, फितूर होत दिला व त्याला जानेवारी १८९९ मध्ये अटक झाली.

नंतरच्या काळात वासुदेव हरि चाफेकर, महादेव विनायक रानडे आणि खंडो विष्णू साठे ह्या तिघांनी ९ फेब्रुवारी १८९९ रोजी द्रविड बंधूंचा वध केला, परंतु ह्या तिघांनाही लवकरच अटक झाली.  

खंडो विष्णू साठे हा तर अवघ्या पंधरा वर्षांचा होता, परंतु त्यालासुद्धा दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली.

ह्या घटनेविषयीच्या बातम्या न्यूयॉर्क टाईम्स, सिडने मॉर्निंग हेराल्ड अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वर्तमानपत्रांनी छापल्या व ब्रिटिशांची सर्वत्र छीथू होऊ लागली.

काँग्रेसच्या मवाळ गटाचे ज्येष्ठ नेते गोपाळ कृष्ण गोखले हे सरकारच्या निमंत्रणावरून ब्रिटनला गेलेले असताना, त्यांनी मँचेस्टर गार्डियन ह्या दैनिकाला मुलाखत दिली आणि ब्रिटीश सैनिकांना भारतीयांच्या धर्मिक व सांस्कृतिक भावनांना चिरडण्यासाठी दोषी ठरविले. आयुष्यात प्रथमच त्यांनी, ‌‘ब्रिटीश सैनिकांनी काय-काय घाणेरडे अपराध केले‌’ ह्याविषयी जाहीर मत व्यक्त केले.

परंतु गोखल्यांचे हे धैर्य काही दिवसांपुरतेच टिकले. त्यांच्या ब्रिटीश मित्रांनी त्यांना ‌‘सरळ केले‌’ व शेवटी गोखल्यांनी बिनशर्त माफी मागितली व स्वत:ची अटक टाळली. ह्या एका गोष्टीमुळे मवाळ काँग्रेस भारतीयांच्या मनातून पूर्णपणे उतरली व संपूर्ण भारतीय जनता ‌‘आधार व नेता‌’ म्हणून ‌‘लाल-बाल-पाल‌’ ह्यांच्याकडेच पाहू लागली.

काही दिवस आधीच आगरकरांचे आजाराने अल्पायु निधन झालेले होते व गोपाळ कृष्ण गोखले भारतीयांच्या मनातून उतरलेले होते. त्या दोन वर्षांतील काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये एकसुद्धा ब्रिटीशविरोधी खणखणीत ठराव पास होऊ दिला गेला नाही व ह्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व आपोआपच जीवतोड परिश्रम करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांकडेच आले.

ब्रिटीश सरकार टिळकांचा जेवढा द्वेष करत नसेल, त्याच्या अनेक पट टिळकद्वेष काँग्रेसमधील मवाळ गट व काही, समाजसुधारणांच्या नावाखाली लोकनेते म्हणून मिरवणारे भारतीय लोक करत होते व ह्यातूनच लोकमान्य टिळकांवर अनेक खासगी खटले दाखल होऊ लागले. ‌‘ताईमहाराज खटला‌’ हा सर्वांत गाजला. ही एक दत्तकविधानाची वैयक्तिक बाब होती आणि टिळक हे केवळ एक विश्वस्त होते. परंतु ‌‘टिळकांना नामशेष करायचे‌’ ह्या निश्चयाने पेटून उठलेले हे तथाकथित सुधारक काही ठिकाणी यशस्वी झाले व टिळकांना दोन वेळा अशा क्षुल्लक कारणांसाठी तुरुंगवास पत्करावा लागला.

परंतु लोकमान्य टिळकांनी अशा परिस्थितीतही ब्रिटिशांना विरोध चालूच ठेवला. टिळक कारावासात असताना न. चिं. केळकरांनी व धोंडोपंत विद्वांसांनी (टिळकांचे जावई व भाचे) टिळकांची वृत्तपत्रे व कार्य निष्ठेने चालू ठेवले. 

(कथा चालू)