भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 26
हिंदी English ગુજરાતી বাংলা తెలుగు ಕನ್ನಡ தமிழ்
टिळकांच्या आजूबाजूला हळूहळू करून सतत वेगवेगळ्या माणसांची गर्दी राहू लागली. किंबहुना टिळक साधे पाच मिनिटांच्या अंतरावरील कार्यालयाकडे निघाले, तरीदेखील त्यांच्याबरोबर कमीत कमी ५० ते १०० माणसांचा घोळका असेच असे. टिळकांच्या भोवती वावरणारी ही मंडळी म्हणजे केवळ बघ्यांची गर्दी नव्हती. ज्याला ज्याला म्हणून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची आवश्यकता भासत असे व भारताच्या स्वातंत्र्याची स्वप्ने पडत असत, असा प्रत्येक जण टिळकांना भेटण्यासाठी येईच येई कारण त्या काळात ‘इंडियन नॅशनल काँग्रेसचे नेते’ म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांवरील विश्वास चांगलाच घसरणीला लागला होता.
संपूर्ण भारतामध्ये प्रभाव असणारे, बाळ गंगाधर टिळक हेच एकमेव लोकप्रिय नेते होते. ब्रिटीश सरकारचे सर्व लक्ष त्यामुळेच लोकमान्य टिळकांवरच केंद्रित झालेले होते.
टिळक जाहीर रित्या कधीही, ‘सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारा’ असे उघडपणे बोलत नसत कारण टिळकांनी १८५८च्या नंतर भारतीयांच्या मनात बसलेली ब्रिटिशांची दहशत ओळखलेली होती व त्यामुळे ‘प्रथम भारतीयांच्या मनातील ब्रिटिशांविषयीची भीती कमी-कमी करीत नेणे’ हाच मार्ग स्वीकारला. टिळकांचे दोन्ही वृत्तपत्रांमधील लेख ब्रिटीश सरकारवर अत्यंत खरमरीत शब्दांत जोरदार टीका करत असत व सभांमधील भाषणांमध्ये टिळक, ‘ब्रिटीश सरकार कसे जुलूम करत आहे’ ह्याविषयी तीव्र संताप व्यक्त करत व लोकांना, ‘ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा’ सल्ला देत राहिले.
१८९४ साली बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक रित्या गणेशोत्सव सुरू केले. स्वतःच्या वाड्यातच सर्वांत मोठ्या गणेशोत्सवाला आरंभ झाला. ह्याचे अनुकरण पुणे, मुंबई, नागपूर, नासिक, नगर, सातारा अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये व आजचा मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा, बंगाल, पंजाब व उत्तरप्रदेश येथेही एका वर्षातच सुरू झाले.
गणेशोत्सव सुरू करण्यामागे टिळकांचे चार प्रमुख हेतू होते. १) हे धार्मिक कारण असल्यामुळे, राणीच्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटीश सरकार हे उत्सव थांबवू शकत नव्हते व ‘गणपती’ हे दैवत संपूर्ण भारतभर प्रत्येक पूजेत व मंगलकार्यातही प्रथम स्थान पटकावून होते.
२) उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये दुपारी व सायंकाळी विविध कार्यक्रम आखले जाऊ लागले. उदा. - लहान मुलांची पौराणिक विषयांवरील नाटके, विविध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम, खो-खो, हुतूतू (कबड्डी), लगोरी असे खेळ, पळण्याच्या व लांब उडीच्या शर्यती, नकला व जादूचे प्रयोग.
हे कार्यक्रम पाहण्यासाठी व गणपतीच्या दर्शनासाठी अक्षरशः बेसुमार गर्दी होऊ लागली. ह्या कार्यक्रमांसाठी आलेले लोक आपापसांत विविध विषयांवर गप्पा मारू लागले. टिळकांचे, टिळकांनीच तयार केलेले उत्साही, तरुण कार्यकर्ते अशा लोकांमध्ये फिरून ‘ब्रिटीश कसे वाईट व भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ’ ह्या तत्त्वांशी संबंधित गप्पांना अर्थात चर्चांना प्रेरित करू लागले.
जवळपास ३०-३५ वर्षांनंतर भारतीय ह्या विषयांवर उघडपणे बोलू लागले व अनेक जण आपल्या मनातील भित्या टाकून टिळकांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तयार होऊ लागले.
३) ह्या उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत उत्सवनिधी गोळा करण्यास सुरुवात केली व ह्या पैशांचा उपयोग ठिकठिकाणी आखाडे व व्यायामशाळा उघडणे, मैदानी खेळांच्या स्पर्धा भरवणे व मुख्य म्हणजे क्रांतिकारकांना सहाय्य करणे ह्यासाठी होऊ लागला. ह्यामुळे महाराष्ट्र, बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारकांचे नवे नवे गट तयार होऊ लागले.
पंजाबमधून लाला लजपतराय व बंगालमधून बिपिनचंद्र पाल असे दोन वाघ टिळकांचे साथीदार बनले व सर्व भारतभर ‘भारत-त्रिमूर्ती’ अर्थात ‘लाल-बाल-पाल’ ह्या नावाने प्रसिद्ध झाले.

४) ह्या गणेशोत्सवाच्या कार्यामध्ये निरनिराळ्या व्याख्यानमाला सुरू केल्या गेल्या व त्यामुळे अनेक लोकांना उघड्या मैदानात येऊन भाषणे ऐकण्याची सवय लागली. सामान्य माणसाला भीती वाटू नये म्हणून पहिल्या वर्षी व्याख्याने अगदी साध्या विषयांवर ठेवली. उदा. - शिवाजी महाराज व त्यांचा पराक्रम, महाभारताचे युद्ध व गीता, आदिशंकराचार्य व त्यांचे कार्य, निरनिराळी व्रते व त्यांचे माहात्म्य व रामायणाच्या कथा. ह्या रामायणकथांमधून, टिळकांनी खास निवडलेले रामायणी कथाकार, रावणाला ब्रिटिशांचा मूळ स्रोत म्हणून उघडपणे दर्शवू लागले. परंतु ते ‘ब्रिटीश’ हे नाव मात्र उच्चारत नव्हते.
एकाच वर्षामध्ये लोकांची, जाहीर सभांना उपस्थित राहण्याची भीती पूर्णपणे नाहीशी झाली व ह्यातून प्रेरणा घेऊन टिळकांनी १८९५ साली ‘श्रीशिवाजीमहाराज फंड कमिटी’ नावाची समिती स्थापन केली. तिचे प्रमुख उद्दिष्ट १) शिवाजी महाराजांची जयंती सार्वजनिक रित्या साजरी करणे व ‘छत्रपती शिवाजी महाराज’ ह्या नावाची ध्वजा उंच-उंच फडकवणे हे होते. २) दुसरे उद्दिष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीची उत्तम रित्या देखभाल करणे व रायगडावर आणि राजगडावर तरुण स्त्री-पुरुषांच्या शैक्षणिक सहली आयोजित करणे हे होते.
अशा प्रत्येक सहलीच्या वेळेस टिळकांचा एक-एक खंदा व जाणकार कार्यकर्ता जातीने उपस्थित असे व त्या मंडळींना, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या प्रचंड लढ्याविषयी सविस्तर सांगत असे.
त्यातही मुख्य रोख असायचा तो अक्राळविक्राळ पसरलेल्या व पाच लाखांवर सेना असणाऱ्या मुघल बादशहाशी व विजापूरच्या आदिलशाहशी छत्रपती व त्यांचे मावळे कसे लढले व जिंकले, ह्यावरच.
ह्या सहलींनी व अशा कार्यक्रमांनी सामान्य भारतीयांच्या मनातील ब्रिटिशांची दहशत कमी-कमी होऊ लागली व टिळकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रचंड संख्येने भारतीय भाग घेऊ लागले.

आणि २२ जून १८९७ उजाडला. गुढीपाडव्याच्या दिवशीच कार्यास शुभारंभ केलेल्या चाफेकर बंधूंनी, प्लेगच्या साथीचा फायदा घेऊन भयंकर अत्याचार माजवणारे ‘कमिशनर रँड’ (Rand) व लेफ्टनंट आयर्स्ट (Ayerst) ह्यांना गोळ्या घातल्या आणि त्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले सर्व जनतेने पाहिले.
ह्या प्रसंगाची छायाचित्रे व बातम्या भारतातील प्रत्येक भाषेतील वृत्तपत्रांत, साप्ताहिकांत व मासिकांमध्ये ताबडतोब छापण्यात आल्या.
ह्या घटनेमुळे भारतातील प्रत्येक ब्रिटीश ऑफिसर, अगदी व्हाईसरॉयसुद्धा चांगलाच हादरून गेला होता आणि ब्रिटनमध्ये बसलेल्या ब्रिटीश गव्हर्न्मेंटला खूप मोठा हादरा बसला.
ह्या हत्यांमागे लोकमान्य टिळकांचा हात आहे ह्याविषयी ब्रिटीश सरकारची खात्री झालेली होती परंतु त्यांना एकही पुरावा मिळू शकला नाही कारण चाफेकर बंधू टिळकांना नेहमी भेटत, ते ग्रामीण, अशिक्षित शेतकऱ्यांच्या वेशातच. चाफेकर बंधूंचे इतर सहकारी टिळकांना तेली, तांबोळी, सुतार (पांचाळ), धनगर, कुंभार, लोहार, माळी व समारंभासाठी फुलांची रचना करणारे फुलवाले अशा वेशात भेटत होते
व टिळकांकडे अशा अठरा पगड जातींचा नेहमीच राबता असे. ह्यामुळेच टिळकांना ब्रिटीश ऑफिसर्स व मवाळ काँग्रेस गट, ‘तेल्यातांबोळ्यांचा पुढारी’ अर्थात ‘गरीब कामगारांचा नेता’ असे म्हणून त्यांचा उपहास करीत. परंतु टिळकांनी मात्र ह्याला उपहास न मानता, स्वतःचा गौरवच मानले.
ह्या गर्दीतून टिळकांच्या कार्याने जोरदार वेग घेतला. चाफेकर बंधूंच्या एका गुप्तपणे राहण्याच्या जागेत ब्रिटिशांना टिळकांचा भगवद्गीतेवरील तो लेख सापडला, ज्यात ‘जुलमी अन्याय करणाऱ्यांना ठार मारणे हे पाप नव्हे’ असे लोकमान्यांनी स्वतःच्या शब्दांत मांडले होते.
सगळी सूत्रे जुळत होती. परंतु क्रांतिकारकही घट्टपणे मूकच राहिले व चाफेकरांच्या इतर सहकाऱ्यांनी सर्व पुरावे नष्ट करून टाकल्यामुळे, ब्रिटीश सरकार टिळकांना फासावर चढवू शकले नाही.
(कथा चालू)
