भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 25

हिंदी English ગુજરાતી বাংলা తెలుగు ಕನ್ನಡ தமிழ்
1879 साली बाळ गंगाधर टिळक मुंबईच्या गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमधून एल.एल.बी.ची पदवी घेऊन परत पुण्याला आले आणि मग त्यांचे कार्य अधिक वेगाने पुढे पुढे जाऊ लागले व त्यांच्या कार्याचा विस्तारही अनेक दिशांना व वेगवेगळ्या मार्गांनी होऊ लागला.
पहिल्यांदा त्यांनी सन 1880 साली ‘न्यू इंग्लिश स्कूल फॉर सेकंडरी एज्युकेशन’ ही शाळा सुरू केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव नामजोशी आणि गोपाळ आगरकर हे टिळकांचे ह्या शाळेच्या बांधणीमध्ये प्रमुख सहकारी होते.
केवळ शाळा-कॉलेजेस काढणे, लोकांना सुशिक्षित करणे अशा माफक विचारांनी लोकमान्यांनी ती शाळा सुरू केली नव्हती. टिळकांना ब्रिटिशांनी सुरू केलेली शिक्षणप्रणालीच (Education System) बदलायची होती. ब्रिटीश भारतीयांना भारताचा चुकीचा इतिहास शिकवत होते व विविध मार्गांनी भारतीयांच्या संस्कृतिमूल्यांवर (Cultural Principle & Values) सतत घाव घालत होते आणि हे थांबविले नाही तर ब्रिटिशांच्या मुठीतून भारत कधीच सुटू शकणार नाही, हे टिळकांचे ठाम मत होते.
शाळेला प्रचंड यश मिळाले व त्यामुळे टिळकांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने 1884 मध्ये ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची (डेक्कन शिक्षणसंस्था) स्थापना केली व एका वर्षाच्या आत पुण्यामधील सुप्रसिद्ध ‘फर्ग्युसन कॉलेज’ निर्माण झाले.
परंतु अवघ्या चार वर्षांत टिळकांना, केवळ शिक्षणक्षेत्रात रमणे आपल्याला मर्यादित करत आहे, असे वाटू लागले व शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था आपल्या सहकाऱ्यांच्या हाती सोपवून त्यांनी 1890 साली अधिक व्यापक कार्यास जोरदारपणे सुरुवात केली.
ह्यामुळे टिळक सर्वत्र संचार करण्यास मोकळे झाले. त्यांचा गाढा अभ्यास, भारतीय व जागतिक इतिहासाचे सखोल ज्ञान, अमोघ वक्तृत्व व हृदयभेदी लिखाण ह्यांमुळे टिळकांची भाषणे ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. जरी अजूनही पुणे हेच त्यांचे मुख्यालय होते, तरीदेखील हळूहळू त्यांना इतर ठिकाणच्या विविध विद्वानांकडून, देशसेवी संघटनांकडून व्याख्यानासाठी बोलविण्यात येऊ लागले व टिळकांनी क्षणाचीही विश्रांती न घेता त्यांचे देशभ्रमण सुरू केले.
1890 साली टिळकांनी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’मध्ये प्रवेश घेतला. परंतु इंडियन नॅशनल काँग्रेसचे कार्य बघून लोकमान्य टिळक खूप निराश झाले व त्यामुळे खंतावलेल्या टिळकांनी आपले बोलणे मांडण्यास सुरुवात केली, “सर ह्यूम ह्या ब्रिटीश अधिकाऱ्याने सुरू केलेली इंडियन नॅशनल काँग्रेस ब्रिटिशांना पाहिजे किंवा नावडणार नाही अशाच पद्धतीने कार्य करत आहे व हे कार्यसुद्धा फक्त सरकारला पत्रलेखन, सरकारला विनंतिपत्रे व दर वर्षी अधिवेशन भरविणे एवढ्यापुरतेच मर्यादित झाले आहे. ह्या असल्या बोटचेप्या मृदू (Soft) उपचारांनी ‘ब्रिटीश राज्य’ नावाचा रोग बरा होणार नाही. त्यासाठी प्रत्येक भारतीयाला स्वत:च्या अधिकारांसाठी ब्रिटीश सरकारबरोबर वैर घेणे आवश्यक आहे व वैर जहालच असावे लागते. (Hardliner)”
टिळकांचे काँग्रेसमधील वर्चस्व व प्रभाव दिवसेंदिवस वाढतच गेले व त्यामुळे ब्रिटिशांशी मैत्री राखून व प्रत्यक्ष कार्यात न उतरता, केवळ पोकळ भाषणे ठोकून मिरवू पाहणाऱ्या नेत्यांचा ग्रुप ‘मवाळ’ गट (Softliners) म्हणून ओळखला जाऊ लागला व लोकांपासूनही लांब जाऊ लागला, तर लोकमान्य टिळकांचा जहाल गट अत्यंत जोमाने कृतिशीलरित्या वाढू लागला होता व ह्या गटाचे सभासदही मवाळ गटाच्या पाच पट अधिक होते.
नामदार गोखले इत्यादि मवाळ नेत्यांनी मग हळूहळू टिळकांना विरोध करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला टिळकांचे जुने सहकारी व मित्र गोपाळराव आगरकर हे ‘स्वातंत्र्याआधी सामाजिक सुधारणा’ हे तत्त्व घेऊन लोकमान्यांपासून दूर गेले व टिळकांना जाहीरपणे विरोध करू लागले.
पहिले काही दिवस टिळकांनी ह्या दोन्ही गटांना व्यवस्थित प्रत्युत्तरे दिली. परंतु लवकरच टिळकांच्या लक्षात आले की आपला खूप मोठा वेळ, ह्या लोकांना विरोध करण्यामध्ये व्यय होत आहे व ही गोष्ट निरर्थक आणि निरुपयोगी आहे. त्यांनी आपल्या विरोधाचा रोख संपूर्णपणे फक्त ब्रिटीश सरकारवरच ठेवला.
टिळकांची भाषणे मराठीतून, इंग्लिशमधून, काही ठिकाणी हिंदीतूनही होत. दक्षिण भारतामध्ये टिळकांची इंग्लिश भाषणे, त्या त्या प्रदेशातील भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्याचे काम एखादा प्रमुख कार्यकर्ता करत असे व अशा रितीने प्रचंड समुदायाला, टिळक समोर उभे राहून बोलत असताना, त्यांचे भाषण प्रादेशिक भाषांमध्ये मिळू लागले.
टिळकांची दोन वृत्तपत्रे ‘केसरी’ (मराठी) व ‘मराठा’ (English) ही सर्वदूर पसरू लागली. ह्या दोन्ही वृत्तपत्रांना ब्रिटीश सरकार ‘टिळकांच्या तोफा’ मानत होते व तेव्हाच्या व्हाईसरॉयने तर ह्या शब्दांत लंडनला पत्र पाठविले की ‘बाळ गंगाधर टिळक हे भारतातील असंतोषाचे एकमेव जनक आहेत.’ (Tilak is the father of Indian unrest and freedom fight.)
ह्यामुळे टिळकांच्या मागावर ब्रिटिशांचे अनेक गुप्तचर कार्यरत झाले. त्यांना चुकवून, आपल्याला पाहिजे त्या लोकांना भेटण्यासाठी टिळक अनेक व विविध मार्गांचा अवलंब करीत.
ह्यासाठी त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये व स्वत:च्या राहत्या जागीदेखील विविध लोकांची प्रचंड वर्दळ असेल, असे करण्याचे ठरविले. परंतु टिळकांच्या सहकाऱ्यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, “आपल्याला त्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारताच्या प्रत्येक प्रांतामधून प्रचंड मोठे मानवसमूह टिळकांना भेटण्यासाठी किंवा कमीत कमी त्यांच्या वृत्तपत्रांची कार्यालये बघण्यासाठी सतत परवानगी मागत असतात. त्यांना होकार कळविला की झाले.” आणि तसेच घडले. लोकमान्यांची कार्यालये व कार्यकेंद्रे गजबजून गेली व टिळकांना त्या गर्दीच्या आडून कुणालाही भेटणे शक्य होऊ लागले व टिळकांच्या मनातील क्रांतिकारक योजनांना प्रकट रूप देण्यासाठी आतुर असणाऱ्या व बलिदानासाठी तयार असणाऱ्या तरुणांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
1895-96 मध्ये मुंबईत सुरू झालेली प्लेगची साथ पुण्यामध्येही पसरू लागली व त्या साथीला रोखण्याचे निमित्त करून ब्रिटीश सरकार व त्यांचे भारतीय एजंट्स् प्रत्येक भागात बळजबरी करू लागले. लोकांना, विशेषत: टिळकांच्या समर्थकांना गावाबाहेर हाकलले जाऊ लागले. कुणाच्याही घरात बेकायदेशीररित्या शिरून काहीही विध्वंस करण्याचा, मारहाण करण्याचा अधिकारच ब्रिटिशांच्या पोलीस दलाला व सैन्याला दिला गेला होता व ह्याविरुद्ध तक्रार करणाऱ्यास लगेचच अटक करून व एखाद तासाच्या कोर्टाच्या सुनावणीने तुरुंगात टाकले जाऊ लागले.
लोकांचे हे हाल पाहून व ब्रिटिशांची क्रूरवृत्ती पाहून लोकमान्य टिळक संतापून उठले. ही साथ केवळ मुंबई-पुण्यातच नव्हे, तर भारतात अनेक ठिकाणी पसरलेली होती व तिथेदेखील ब्रिटीश असेच वागत होते.
परिणामस्वरूप ‘केसरी’ व ‘मराठा’ ह्या टिळकांच्या दोन तोफा ब्रिटीश अत्याचाऱ्यांच्या विरोधात कडाडू व धडाडू लागल्या.
आणि टिळकांनी भगवद्गीतेचा संदर्भ घेत लोकांना आपल्या लिखाणातून स्पष्टपणे सांगितले - ‘अन्याय करणाऱ्या सत्ताधीशांना विरोध करणे किंवा त्यांना ठार मारणे (To Kill) ह्यामुळे कर्त्यास दोष वा पाप लागत नाही.’
टिळकांच्या सततच्या दौऱ्यांमुळे टिळकांचे पक्ष व विचार भारतभर पसरू लागले आणि 1897च्या गुढीपाडव्याच्या दिवशी टिळकांना भेटण्यासाठी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हरि चाफेकर ही तीन भावंडे आली. टिळकांशी झालेल्या पहिल्या भेटीनेच हे चाफेकर बंधू विलक्षण प्रभावित झाले आणि 1858 साली विझवला गेलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग पुन्हा एकदा धैर्याने बांधला जाऊ लागला.
(कथा चालू)
