भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 24

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 24

“बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत स्वतंत्र विचारांचे, लढाऊ बाण्याचे व अन्यायाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहणारे होते.

ते 16 वर्षांचे असताना त्यांचे वडील गंगाधर टिळक ह्यांचा अल्पशा आजाराने 1872 साली मृत्यू झाला. तेव्हा बाळ गंगाधर टिळक फक्त 16 वर्षांचे होते आणि त्यांचा विवाहही झालेला होता. त्यांच्या पत्नीचे माहेरचे नाव ‌‘तापीबाई‌’ असे होते व सासरचे नाव ‌‘सत्यभामाबाई‌’ असे होते.

लोकमान्यांच्या लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आत गंगाधरराव टिळकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे काही आप्त व काही ग्रामस्थ सत्यभामाबाईंना दोष देऊ लागले. तिच्या पायगुणामुळेच तिच्या घरात येण्यानंतर वर्षाच्या आत सासर्‍यांचा मृत्यू झाला. त्या काळात अशा चुकीच्या मान्यता भारतात सर्वत्र पसरलेल्या होत्या व अशा घटनांमध्ये गोवल्या गेलेल्या स्त्रीस ‌‘पांढर्‍या पायाची, अपशकुनी, अवलक्षणी व वाईट पायगुणाची‌’ असे म्हणून हिणवले जात असे.

लोकमान्यांना त्यांच्या वडिलांचे तेराव्याचे कार्य करताना ही गोष्ट विशेषतः लक्षात आली कारण त्या दिवशी सत्यभामाबाई वाढायला आल्यानंतर कुणीही, काहीही वाढून घेत नव्हते आणि तीच वस्तू, तोच पदार्थ दुसर्‍या कुणा स्त्रीने वाढण्यास आणला की घेतला जात असे.

लोकमान्य स्वतःसुद्धा पंक्तीत जेवायला बसलेले होते कारण मृत व्यक्तीचा जवळचा नातेवाईक, विशेषतः कुटुंबीय, तेराव्याच्या पंक्तीत असणे आवश्यक असे. त्या व्यक्तीने पहिला घास घेतल्यानंतरच इतर व्यक्तींचे भोजन सुरू होई. लोकमान्यांच्या चाणाक्ष नजरेने सत्यभामाबाईंची कोंडी बघितली. परंतु एकतर त्यांचे स्वतःचे वय खूप लहान होते व असा समज असणार्‍यांची संख्या खूप मोठी होती. टिळकांनी कुणालाही न दुखवता ह्या प्रसंगाला उत्तर काढून दाखविले.

लोकमान्यांनी, एका कोपर्‍यात हिरमुसल्या होऊन उभ्या राहिलेल्या 14 वर्षांच्या सत्यभामाबाईंना नजरेनेच समजावले व वडे वाढायला येण्याची खूण केली. त्या वड्याचे ताट घेऊन वाढायला आल्यावर, टिळकांनी अगदी शांतपणे स्वतःच्या पत्रावळीवर पाच-सहा वडे वाढून घेतले व तेदेखील सत्यभामाबाईंच्या हातानेच.

पहिल्यांदा त्या खूपच घाबरल्या व त्यांचा हात थरथरत होता. परंतु टिळकांनी अगदी खणखणीत आवाजात अख्ख्या पंक्तीत सांगितले की “मी नसत्या गैरसमजुतींना व अंधश्रद्धांना काडीचीही किंमत देत नाही. माझे वडील आपला विवाह ठरण्याच्या आधीपासूनच आजारी होते. तुमच्या गृहप्रवेशामुळे काहीही अशुभ घडलेले नाही.” 

टिळकांनी हे शब्द स्पष्टपणे उच्चारल्यानंतर इतरही काही समविचारी मंडळींनी, सत्यभामाबाईंकडून वडे मुद्दामहून मागून घेतले. त्यांच्या खणखणीत आवाजाचा व विचारांच्या स्पष्टतेचा असा परिणाम झाला की इतर कुणीदेखील काहीही आक्षेप घेऊ शकले नाही.

त्या रात्री आपल्या मित्रांसोबत ह्याच विषयावर बोलत बसलेल्या टिळकांना, त्यांच्या मित्रांनी बोलता-बोलता जाणीव करून दिली - “बाळ! तुझा करारी चेहरा, खणखणीत आवाज व विचारांची स्पष्टता ह्यांच्यापुढे अगदी कट्टर व कर्मठ असे विरोधकसुद्धा गप्पच बसले. तू पुढे मोठा नेता बनू शकशील.” टिळक ह्या बोलण्यावर फक्त हसले व म्हणाले, “एवढ्याशा लहान गोष्टीमुळे तुम्ही मला एकदम भारताचा नेता बनवून टाकलेत. मी तर ह्या खेड्यातला फक्त मॅट्रिक पास झालेला मुलगा.”

एवढ्यात टिळकांच्या खांद्यावर हात देऊन, त्यांना शाबासकी देत, टिळकांच्या मागून आलेले त्यांचे शिक्षक चिंतामणी बर्वे हे पुढे होत म्हणाले, “बाळ! ह्या तुझ्या मित्रांचे म्हणणे अगदी खरे आहे. हा प्रसंग घडला तेव्हा मीही तेथेच होतो. मी गेली 25 वर्षे रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रमुख शाळेत शिकवत आलो आहे व गेली दोन वर्षे ह्या गावात स्वतःहून आलो आहे.

तुझ्यासारखा बाणेदार स्वभावाचा व स्पष्ट विचारांचा एकही विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा प्रौढ नागरिक आढळलेला नाही. लोक घरगुती भांडणे खूप करतात. परंतु एका वैचारिक मुद्द्याविषयी ठामपणे विचार मांडून, सर्वांना विरोध करण्याचा पवित्रा घेणारा तुझ्याशिवाय मला कुणीही आढळला नाही.

बाळ! तू खरंच भारताचा भाग्यविधाता बनू शकशील. मी मनापासून सांगतो की तू रत्नागिरी सोडून पुण्यात किंवा मुंबईत जाऊन उच्चशिक्षण घ्यावेस.

ह्या ब्रिटीश कॉलेजेसमध्ये शिकताना जगातील घडामोडींची माहिती मिळू लागते व त्यामुळे आपले अनुभवविश्व विस्तार पावू लागते.

तसेच ह्या इंग्लिश कॉलेजांमध्ये मोठमोठी ग्रंथालये (Libraries) आहेत. त्यांतील पुस्तके जगभरातील ज्ञान देतात असे मी ऐकले आहे. तू ह्या ग्रंथांचा अभ्यास करून तुझ्या ह्या बाणेदार वृत्तीला अधिक प्रगल्भ बनवू शकशील.

ब्रिटिशांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे, रावसाहेब पेशव्यांचे व तात्या टोपेंचे काय केले? तुला हा इतिहास माहीतच आहे. मीच तर तुम्हां विद्यार्थ्यांना हे गेली दोन वर्षे शिकविले आहे.
ब्रिटीश भारताला अक्षरशः लुटत आहेत व भारतीय संस्कृतीचेही हनन करीत आहेत. तुझ्यासारख्या नेत्याची भारतीय जनतेला नितांत आवश्यकता आहे. आपले राजे-महाराजे मर्यादित अधिकारांमध्ये खूष आहेत व स्वतःला ब्रिटीश समजू लागले आहेत.

मात्र लक्षात ठेव की तात्या टोपेंना कसे फाशी चढविले गेले, मंगल पांडेचीही तीच गत झाली व वीरांगना राणी लक्ष्मीबाईही कपटाने मारली गेली व त्यानंतर आलेल्या ब्रिटीश सरकारने सूडबुद्धीने, भारतातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांना फासावर चढविले. त्यामुळे तू स्वतःचा मार्ग सावध राहून आख कारण ब्रिटिशांची सत्ता खूपच प्रबळ झालेली आहे.” 

बर्वे मास्तर व बाळचे मित्र तेथून निघून गेल्यानंतर बाळ गंगाधर टिळक एकटेच अंगणात विचार करीत बसले. त्यांना बर्वे मास्तरांचे म्हणणे पूर्णपणे पटलेले होते आणि त्यांच्या मनात स्वतःच्या पुढील जीवनाविषयी अनेक विचार सुसूत्रपणे सुरू झाले होते कारण टिळकांच्या स्वतःच्या मनातही असेच विचार एक-दोन वर्षे सतत येत असत.

रात्रभर टिळक जागेच होते. त्यांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला व 1873 साली ते पुण्यातील डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी बनले आणि त्या कॉलेजमधूनच त्यांनी ‌‘बी.ए. मॅथेमॅटिक्स‌’ (फर्स्ट क्लास) ही डिग्री संपादन केली. 

टिळक पदवीसाठी गणिताचा अभ्यास जरूर करत होते; परंतु डेक्कन कॉलेजच्या समृद्ध लायब्ररीमध्ये बसून पॉलिटिक्स, फिलॉसॉफी ह्यांच्या अभ्यासाबरोबरच संस्कृत ग्रंथांचाही अभ्यास करत राहिले. 
त्यांनी 1877 मध्येच एम.ए. ला अ‍ॅडमिशन घेतली व अभ्यास सुरू केला. अभ्यासान्ती त्यांचे एक मत निश्चित झाले होते - ‌‘धर्म, अध्यात्म आणि व्यावहारिक जीवन हे एकमेकांपासून जराही वेगळे करता येणार नाहीत. केवळ स्वतःपुरते पाहून स्वतःसाठी जगण्याच्या ऐवजी स्वतःच्या राष्ट्राला स्वतःचे कुटुंब मानणे आवश्यक असते व ह्या घडीला त्याचीच प्रचंड गरज आहे. देशसेवेनंतरची पायरी म्हणजे माणुसकी, सेवा अर्थात दीनदुबळ्यांची सेवा आणि सर्वोच्च पायरी म्हणजे वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, राष्ट्रसेवा व मानवसेवा हे सर्व मार्ग चालत असतानाच भगवंताशी अनुसंधान साधणे.‌’टिळकांनी ब्रिटीश प्रोफेसर्सचे व इतर ब्रिटीश अधिकार्‍यांचे वागणे पाहून राजकारणात शिरण्याचा निर्णय पक्का केला होता व म्हणून त्यांनी एम.ए. चा अभ्यास अर्धवट सोडून मुंबईच्या ‌‘गव्हर्न्मेंट लॉ कॉलेज‌’मध्ये अ‍ॅडमिशन घेतली.”


(कथा चालू)