भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 22

गेल्या अकरा दिवसांच्या प्रवासामध्ये मोतीबाईचे स्नेहसंबंध नर्मदाबाई, भास्कर भट आणि सुभद्राबाई ह्यांबरोबर अतिशय घट्ट झाले होते कारण मोतीबाईकडील अनेक हकीगती, अर्थात तिने स्वत: पाहिलेल्या व केलेल्या गोष्टींविषयी ह्या तिघांना काही ना काहीतरी माहीत होतेच व अधिक जाणून घेण्याची जिज्ञासाही होती. त्यामुळे ह्या चौघांच्या अखंड गप्पा चालत. मात्र हे चौघेही वृद्धरूपात बैलगाडीत बसून प्रवास करत होते व सकाळ होण्याच्या आतच नदी किंवा तलावकिनारी जाऊन प्रातर्विधी व स्नान आटोपून घेत कारण ते गावातून निघत असतानाच कंपनी सरकारच्या पोलिसांची एक टीम त्या गावातही चौकशीसाठी आलेली होती व राणी लक्ष्मीबाईशी संबंधित असलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला शोधून काढून फासावर लटकवण्याचे काम त्यांच्याकडे होते.
गावातील जे जे म्हणून राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातून लढले होते, ते सर्व जण ह्या जथ्थ्यात मुद्दामहून सामील झालेले होते व तेदेखील बुंदेलखंडातील मराठी माणसांच्या वेशातच.
काशीविश्वनाथाच्या मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन ही सर्व मंडळी गंगेच्या घाटावर गेली. स्नानादि आटोपून ते नदीकिनारी असणाऱ्या एका वृक्षाच्या छायेत बसले. भास्कर भटांनी काशीमधील एका ब्राह्मण पुरोहिताचे सहाय्य घेतले. हा ब्राह्मण अतिशय हुशार होता व लोभीही होता. त्याची पैशाची हाव पाहूनच भास्कर भटाने त्याला निवडले होते. त्याचबरोबर त्याच्याकडे धनसंपत्ती अजिबात नव्हती, हेही पाहिले होते. भास्कर भटांनी आधीच दिलेल्या व्यवस्थित धनामुळे तो पुरोहित त्यांना वाटेल ती मदत करण्यास तयार होता.
आपल्या ह्या जथ्थ्याला विधिपूर्वक अस्थिविसर्जन करून लवकरात लवकर काशीतून बाहेर पडायचे होते कारण काशीमध्ये राणी लक्ष्मीबाई येऊन गेल्याची खबर (संदर्भ : कथामंजिरी ४-३-१४) ब्रिटिशांना लागलेली असल्यामुळे, पोलीस एका ब्रिटीश ऑफिसरच्या नेतृत्वाखाली ठाण मांडूनच बसलेले होते.
सकाळी अकरा वाजेपर्यंत काशीबाई, सुंदरबाई, लालाभाऊ बक्षी व मंजुनाथ पहाडी ह्यांच्या अस्थींचे विसर्जन झाले. त्यानंतर स्वत: भास्कर भटांनी त्यांच्या काकांचे अर्थात मोरोपंतांच्या अस्थींचे विसर्जन केले आणि सर्व मंडळी परत त्याच वृक्षाखाली परतली. दुपारचे भोजन त्या पुरोहितानेच आणले होते. त्या जथ्थ्यातील प्रत्येक जण एकही शब्द न बोलता त्या वृक्षाखाली नुसता बसून होता. प्रत्येकाच्या मनात अनेक आठवणी दाटून येत होत्या. परंतु ‘हे बरोबर दिसणार नाही’ हे ओळखून सदैव सावध असणाऱ्या मोतीबाईने ह्या सर्वांना ताबडतोब भानावर येण्यास सांगितले व इतर यात्रेकरूंप्रमाणेच वागण्यास सांगितले. बरोबर आलेल्या गावातील चार पुरुषांनी मुंडनही करून घेतलेले होते व घाटावर गर्दीही बरीच होती. त्यामुळे ओळखले जाण्याची शक्यता फार मोठी वाटत नव्हती परंतु मोतीबाईला अत्यंत सावधानपणा आवश्यक होता.
संध्याकाळ होण्याच्या आतच हा सर्व जथ्था परतीच्या प्रवासाला निघाला. एकटी मोतीबाई अर्थात ‘चिमाबाई आचार्य’ नावाची वृद्ध विकेशा ब्राह्मण स्त्री तिच्या थोड्याशा सामानासह मागे राहून गेली. ही मंडळी निघून दोन तास झाल्यानंतर अर्थात सूर्यास्ताच्या वेळेस मोतीबाईने गळा काढून रडण्यास सुरुवात केली.
त्याबरोबर तिच्याभोवती बघ्यांची बऱ्यापैकी गर्दी जमा झाली. त्यांमध्ये तो सकाळचा ब्राह्मण पंड्याही होता. मोतीबाईने त्यालाच विचारण्यास सुरुवात केली, “माझे सर्व नातेवाईक कुठे गेले? मला सोडून गेले की काय? त्यांनी मला मिठाई ‘प्रसाद’ म्हणून खाण्यास दिली व मी झोपी गेले. उठल्यानंतर गेले दोन तास मी त्यांना शोधत आहे.”
काशीतील लोकांना अशा प्रकारांची सवयच होती. अनेक जण आपापल्या घरातील वृद्ध स्त्री-पुरुषांना काशीत मरायला सोडून तेथून पळून जात असत आणि ह्या पंड्याला तर भास्कर भटाने भरपूर पैसा देऊन ठेवलेला होता. त्यामुळे त्याने अगदी नि:संदिग्ध शब्दांत सर्वांना सांगितले, “ही म्हातारी खूप कटकट करते असे मला तिच्या मुलाने व सुनेनेच सांगितले. घरातील सर्वांनाच ही नकोशी झालेली आहे. त्यांनी माझ्याकडे पैसे देऊन ठेवले आहेत. तिच्या खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था मी माझ्या ओसरीवर करणार आहे कारण ही दूरच्या नात्याची बहीणच आहे.”
मोतीबाई आपली असहाय्यता दाखवीत, आपले गाठोडे डोक्यावर घेऊन त्या पंड्याच्या ओसरीवर जाऊन बसली. त्या ओसरीवरून गंगेचा एक घाट व्यवस्थित दिसत होता.
रात्री सर्वत्र सामसूम झाल्यानंतर मोतीबाई एका हातात काठी, एका हातात गाठोडे व खांद्यावर वस्त्रांची झोळी अशी निघून चालत-चालत गंगेच्या त्या समोरच्या घाटावरच आली. एक चिटपाखरूही तेथे नव्हते.
मोतीबाईकडच्या गाठोड्यामध्ये राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी होत्या व राणी लक्ष्मीबाईच्या रक्ताने माखलेला राणी लक्ष्मीबाईचा फेटाही होता. सर्वांत महत्त्वाची आणि सावधपणा बाळगण्यास लावणारी गोष्ट होती आणि ती म्हणजे राणी लक्ष्मीबाईची तलवार.
राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी आणि राणी लक्ष्मीबाईचा रक्त लागलेला फेटा व राणी लक्ष्मीबाईची तलवार राणी लक्ष्मीबाईच्याच इच्छेनुसार ब्रिटिशांचा स्पर्शही न होऊ देता गंगेत विसर्जन करणे आवश्यक होते.
राणी लक्ष्मीबाईने फक्त ‘ब्रिटिशांचाच स्पर्श होऊ नये’ एवढीच अट घातली होती परंतु मोतीबाईला त्या पवित्र गोष्टी, गंगेच्या पवित्र जलातच विसर्जित करावयाच्या होत्या आणि तेसुद्धा स्वत:च्या हस्तेच. राणी लक्ष्मीबाई तिला सख्खी बहीण मानत असे व मोतीबाईच्या प्रत्येक शब्दावर राणी लक्ष्मीबाईचा पूर्ण विश्वास असावयाचा. ह्यामुळे त्या वीरांगनेच्या अस्थी, शस्त्र व फेटा गंगेत स्वत: विसर्जन करणे ही मोतीबाईची सर्वोच्च व एकुलती एक इच्छा होती.
दिवसाढवळ्या तलवार विसर्जित करणे अशक्य होते. ती तलवार नक्कीच ब्रिटिशांच्या हातांत पडली असती. त्यामुळेच मोतीबाईने ही मध्यरात्रीची वेळ निवडली होती.
मोतीबाई काखेतील झोळीत राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी, तलवार व फेटा ठेवूनच घाटावर आली होती. घाटाची प्रत्येक पायरी उतरताना मोतीबाईला अनेक गोष्टी क्रमवार आठवत होत्या. परंतु त्या आठवणी आज तिला जराही दु:ख देत नव्हत्या. मोतीबाईला स्वतःलासुद्धा ह्याचे आश्चर्य वाटत होते. एरवी लक्ष्मीबाईची आठवण येताच मोतीबाईला आपले अश्रू बळजबरीने आवरावे लागत होते.
आज मात्र वेगळेच घडत होते. लक्ष्मीबाईच्या प्रत्येक आठवणीबरोबर मोतीबाई घाटाची एक-एक पायरी उतरत होती व प्रत्येक पायरीबरोबर तिच्या मनातील सुखद भावना, अभिमानाची भावना व पावित्र्याची भावना वाढतच चालल्या होत्या.
शेवटच्या पायरीवर येताच मोतीबाईने राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी प्रथम विसर्जित केल्या. नंतर तिचा फेटा विसर्जित केला व मग मोतीबाईने राणी लक्ष्मीबाईची ‘ती’ शेवटची तलवार दोन्ही हातांत धरून प्रथम मस्तकाला लावली व राणी लक्ष्मीबाईचा अत्यंत आवडता व नित्यजपाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हा जप मोतीबाईच्या मुखात होता. तो १०८ वेळा झाल्यावरच मोतीबाई ती तलवार गंगेला अर्पण करणार होती.
परंतु जप ८०च्या आसपास पोहोचत असतानाच ब्रिटीश वंशाचा पोलीस ऑफिसर त्याच्या सशस्त्र तुकडीसह तिलाच पकडण्यासाठी तिच्यावर धावून आला. त्याच्याच एका भारतीय पोलीस शिपायाने मोतीबाईला घाट उतरताना पाहिले होते व ओळखलेही होते.
कारण मोतीबाई वृद्ध विधवेच्या वेशात नव्हती, तर ती झाशीच्या सैनिकी वेशात होती. वीरांगना राणी लक्ष्मीबाईच्या अस्थी व तलवार लपून-छपून विसर्जित करणे मोतीबाईला पटलेच नसते.
त्या सशस्त्र तुकडीबरोबर मोतीबाईची झटापट सुरू झाली. राणी लक्ष्मीबाईची तलवार डाव्या हातात धरून, उजव्या हातातील आपल्या तलवारीने लढत-लढत ती जप पूर्ण करण्याच्या मागे लागली.
ज्या क्षणाला जप १०८ वेळा पूर्ण झाला, त्या क्षणाला मोतीबाईने राणी लक्ष्मीबाईची तलवार गंगेत अर्पण केली व दुसऱ्या क्षणाला सैनिकी वेशातील ती वीरांगना मोतीबाई ब्रिटिशांची गोळी लागून गंगेत पडली आणि सगळ्यांच्यापासून व सगळ्यापासून दूर होऊन गंगेतच शेवटचा श्वास घेती झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद व कृतार्थता ह्याला इतिहासात तोड नाही.
(कथा चालू)
