भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 21

मोतीबाई एका वृद्ध, विधवा महाराष्ट्रीयन ब्राह्मण स्त्रीच्या वेशात काशीच्या दिशेने निघाली होती. तिच्याबरोबर येण्यासाठी त्यांच्या गटातील प्रत्येक जण आतुर होता. परंतु मोतीबाईने ह्या गोष्टीला ठाम नकार दिला होता. बाकीच्या सर्वांनी तात्या टोपेंकडे जाऊन पोहोचणे आवश्यक होते आणि ते जमले नाही तर तो गट गुपचूप बुंदेलखंडमधील एका डोंगराळ गावात वस्ती करून राहणार होता व हळूहळू करून आपापल्या स्थानी परतणार होता.
मोतीबाईच्या पाठीवर ह्या सहा जणांच्या पवित्र अस्थी असलेले सहा पवित्र कुंभ एका रेशमी गाठोड्यात बांधून ठेवलेले होते आणि तिच्या काखेतील झोळीत तिची वस्त्रे व जपमाळ होती. तिने मुद्दामहून एकही शस्त्र आपल्याबरोबर घेतले नव्हते कारण एका वृद्ध ब्राह्मण विधवेकडील शस्त्र कुणी पाहिले असते, तर अनेक संशय निर्माण झाले असते व तिच्या कार्यात अडथळा उत्पन्न झाला असता आणि ही गोष्ट मोतीबाईला अजिबात नको होती.
मोतीबाई एकटीच हातातील काठीचा आधार घेत घेत, त्या जंगलातून जवळच्याच एका गावातील धर्मशाळेत येऊन पोहोचली, तेव्हा दुपारचे बारा वाजलेले होते आणि गावात शिरताक्षणीच तिच्या डोळ्यांसमोरच राम मंदिर असल्याचे दिसले. तिने मंदिराबाहेर उभे राहूनच गाभाऱ्यातील राम-लक्ष्मण-जानकीच्या मूर्तींस नमस्कार केला व दंडवतही घातला. तिने मनोमन प्रार्थना केली - ‘हे प्रभु रामभद्रा! ह्या पवित्र अस्थी काशीला जाऊन गंगेत विसर्जन करण्याचे माझे कार्य सफल कर. ह्या जिवांचे कुठलेही मंत्रोक्त अंत्यसंस्कार झालेले नाहीत. परंतु रूढी सांगते की अस्थी काशीमधील गंगेच्या काठावरून विसर्जित झाल्या, तर इतर कर्मकांडाची आवश्यकता उरत नाही.
हे स्वयंभगवान रामभद्र! तुझा बाणही अमोघ आहे आणि तुझे वरदानही. तुझे नाम घेतच हनुमंताने एवढा मोठा समुद्र उल्लंघिला. त्याला काय अशक्य आहे! आणि तू तर ‘दीनदयाळ’ हे ब्रीद धारण करणारा आहेस. माझ्यासारख्या एकाकी स्त्रीला तूच आधार देशील, हा माझा विश्वास आहे.`
मोतीबाई तिच्या पाठीवरील व काखेतील सामान घेऊन मंदिराच्या समोरच असणाऱ्या एका विशाल वटवृक्षाखाली जाऊन बसली. गावातील काही ब्राह्मण पुरुष, ही मराठी ब्राह्मण विधवा स्त्री आहे, हे ओळखून स्वत:च्या स्त्रियांना घेऊन तिच्याकडे आले.
त्या लोकांमध्ये, राम मंदिराचा पुजारी भास्कर भट व त्याची पत्नी नर्मदाबाई हे मूळचे मध्यप्रदेशमधील रहिवासी होते व त्यामुळे त्या दोघांना मराठी भाषा बऱ्यापैकी येत होती. नर्मदाबाईने मोतीबाईच्या जवळ येऊन सहानुभूतीने विचारले, “मावशी! तुम्ही एकट्याच हे एवढे अस्थिकुंभ घेऊन कुठे चालला आहात? तुमच्याबरोबर कुणीही आप्त नाही. तुमचे दु:ख आम्ही समजू शकतो. काय झाले ते सांगाल काय? आम्ही दोघे तरी तुम्हाला नक्कीच मदत करू. आमच्या गावातील इतर लोकही अतिशय चांगल्या मनाचे आहेत.”
मोतीबाईने हिंदुस्तानी भाषेतच उत्तर दिले, “मीदेखील झाशीमध्येच रहात असे. मूळची मी पुण्याची. माझे हे सहाही नातेवाईक, ब्रिटीश फौजांनी झाशीवर केलेल्या आक्रमणामध्ये उगीचच्या उगीच मारले गेले. ह्यात तीन स्त्रिया व तीन पुरुष आहेत. माझ्या कुटुंबामध्ये फक्त एक नातू वाचला आहे. त्याला माझ्या बहिणीकडे ठेवून मी काशीला निघाले आहे. आम्ही गरीब ब्राह्मण. माझ्याबरोबर एवढ्या लांबच्या प्रवासाला कोण येणार?” ‘माझा वाचलेला नातू’ असे म्हणताना मोतीबाईच्या डोळ्यांसमोर राणी लक्ष्मीबाईचा दत्तक पुत्र दामोदरराव दिसत होता.
मोतीबाई पुढे म्हणाली, “संपूर्ण झाशी शहरात ब्रिटिशांनी ठिकठिकाणी जाळपोळ केली व त्यामध्ये हे सर्व घडले. तेथून मजल-दरमजल प्रवास करीत मी येथे येऊन पोहोचले आहे. कुणी काशीला जाणारे असेल तर त्याची सोबत मिळेल. माझे सूतकही संपलेले आहे. त्यामुळे स्पर्श-अस्पर्श असा प्रश्न उभा राहणार नाही. बरोबर अस्थिकुंभ आहेत म्हणून मंदिरात शिरले नाही एवढेच. आज रात्रीसुद्धा येथेच मुक्काम करून विश्रांती घेईन.”
मोतीबाईचे बोलणे ऐकणारा प्रत्येक जण हळहळत होता. त्या गावातील अनेकांचे आप्त-गोत झाशीमध्ये होतेच होते. मोतीबाईने मुद्दामहून हुंदका दिला व अश्रू गाळण्यास सुरुवात केली. त्याबरोबर तीन-चार स्त्रिया तिच्या सांत्वनासाठी पुढे झाल्या. त्यांतील एक स्त्री मोतीबाईला म्हणाली, “तुमच्याबरोबर गावातून नक्की कुणीतरी येईल कारण आम्ही सर्वांनीच झाशीमधील कुणाला ना कुणाला गमावलेच आहे व राम मंदिर पुजारी भास्कर भट व त्यांच्या पत्नी नर्मदाबाई तर हल्ल्याच्या वेळेस झाशीमध्येच होते. त्यांनी सर्व वृत्तांत आम्हाला सांगितलेला आहे. इतर कुणीही नाही आले, तरीदेखील मी एकटी तुमच्याबरोबर येईन कारण माझे संपूर्ण माहेर झाशीमधील जाळपोळीत मृत्युमुखी पडले आहे. तुमच्याकडील ह्या अस्थी विसर्जन करताना मी माझ्या आप्तांच्याही नावाने गंगेचे अर्घ्य देईन.” त्या सुभद्राबाईच्या डोळ्यांतूनही घळघळा अश्रू वाहू लागले. तिने मोतीबाईला घट्ट मिठी मारली. तिचा माहेरचा शोक जोराने बाहेर पडत होता.
मोतीबाईला मनातून हायसे वाटले की कुणीतरी आपल्यासोबत येऊ शकते कारण ब्रिटिशांचे गुप्तहेर तिला शोधतच असणार, ह्याची तिला खात्रीच होती. तिचे एकटे प्रवास करणे फितुरांच्या नजरेत भरले असते. तिला कुणीही ‘मोतीबाई’ म्हणून ओळखणे शक्य नव्हते. परंतु तिच्याकडील प्रत्येक अस्थिकलशामध्ये त्या त्या व्यक्तीची एक महत्त्वाची खूण होती व ती ओळखली जाण्याचा संभव होता.
सुभद्राबाईच्या पाठीवरून हात फिरवत नर्मदाबाई म्हणाली, “तू हिच्याबरोबर जरूर जा! आम्ही दोघेही गावातील चार-पाच जणांना तरी हिच्याबरोबर नक्की पाठवू शकू.” बोलता-बोलता नर्मदाबाईच्याही डोळ्यांतून अश्रू येत होते. मोतीबाईला जाणवले की नर्मदाबाई व भास्कर भट त्यांचे दु:ख लपवू पहात आहेत. अर्थात त्यांनाही झाशीसंबंधी काहीतरी दु:ख आहे. परंतु मोतीबाई गप्पच राहिली. तिने स्वत:चे नाव ‘चिमाबाई आचार्य’ असल्याचे सांगितले होते.
मंदिराच्या धर्मशाळेत मोतीबाईच्या राहण्याची सोय केली गेली. रात्री तिच्यासाठी भोजन घेऊन नर्मदाबाई व भास्कर भट असे दोघेच आले आणि तिला म्हणाले, “गावातील दहा-बारा मंडळी तुझ्याबरोबर यायला तयार झाली आहेत कारण त्या प्रत्येकाचेसुद्धा कुणी ना कुणी मारले गेलेच आहेत.”
मोतीबाईने क्षणभर राम मंदिराच्या शिखराकडे पाहिले व प्रार्थना केली - ‘देवाधिदेवा! ज्याच्यामुळे विघ्न होईल, ब्रिटिशांना संशय येईल अशी कुणी व्यक्ती पाठवू नकोस.`
ती हे मनातल्या मनात बोलते ना बोलते तोच धर्मशाळेच्या खिडकीतून आत शिरलेल्या एका खारीने मोतीबाईच्या गाठोड्यावरच उडी मारली व ती आत शिरली. तिच्या गडबडीमुळे हे मातीचे कलश फुटू नयेत म्हणून मोतीबाईने घाईघाईने त्या गाठोड्याची गाठ सोडली.
प्रभु रामभद्रांनी त्यांचे काम केले होते. लालाभाऊ बक्षींच्या अस्थिकलशाला बांधलेली, त्यांच्या गळ्यातील विशिष्ट प्रकारची मोत्यांची माळ व तिच्यातील एक विशिष्ट चिन्ह असलेले पदक नर्मदाबाईंना दिसले.
नर्मदाबाईंनी अत्यंत आवेगाने ते पदक हातात घेऊन पाहिले व त्यावरील खूणही पाहिली व त्या रडत-रडत म्हणाल्या, “चिमाबाई! तू नक्की कोण आहेस? ही लालाभाऊ बक्षींची माळ आहे व तो माझा सख्खा मोठा भाऊ होता. तो राणी लक्ष्मीबाईच्या सैन्याचा सरदार होता, एवढेच मला माहीत आहे. हे पदक फक्त त्याचेच होते व हे चिन्ह त्याच्या जन्मपत्रिकेनुसारचे होते. नीट बघ! त्या पदकावरील कलाकुसरीमध्ये त्याचे नाव लिहिलेले आहे. मी तुझ्याबरोबर येणार.”
भास्कर भट घाईघाईने स्वतःच्या पत्नीला शांत करीत म्हणाले, “आपल्याला शांत डोक्याने काम करायला हवे कारण ह्या कुंभावरील लालाभाऊच्या पदकाप्रमाणे इतर व्यक्तींच्या खुणांच्या गोष्टीदेखील ओळखल्या जाऊ शकतील.
बाई! तुमचे खरे नाव काय ते मला सांगा कारण लालाभाऊ बक्षी केवळ हिचा सख्खा भाऊ नव्हता, तर माझा जीवश्चकंठश्च मित्र होता. त्याच्या अस्थी तुमच्याकडे आहेत, ह्याचा अर्थ तुम्हीदेखील राणी लक्ष्मीबाईच्या खास असणार!”
मोतीबाईने मग जराही न बाचकता थोडक्यात सर्वकाही सांगितले. भास्कर भट ते ऐकताना एकाएकी अतिशय भावुक झाले. त्यांनी राणी लक्ष्मीबाईचा अस्थिकुंभ मस्तकाला लावला व अत्यंत हळू आवाजात म्हणाले, “राणी लक्ष्मीबाई ही माझी सख्खी मावस बहीण व चुलत बहीणही. आम्ही दोघे एकाच वंशाचे आहोत. ह्यापुढे सर्व जबाबदारी माझी.”
सकाळी सूर्योदयाच्या वेळेस ५०-६० यात्री येऊन राम मंदिराच्या प्रांगणात जमा झालेले होते. मोतीबाईबरोबर भास्कर भट, नर्मदाबाई आणि सुभद्राबाई तर आप्तस्वकीयच म्हणून येणार होते. भास्कर भट्टांनी गोळा केलेल्या यात्रेकरूंमधील प्रत्येक जण राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातून लढलेला होता आणि मोतीबाईच्या मूळ स्वरूपाला व अधिकाराला ओळखत होता.
यात्रा काशीच्या दिशेने सुरू झाली. मोतीबाई वृद्ध, विकेशा विधवेच्या रूपातच चालत होती आणि अस्थिकलश एवढ्या जणांच्या सामानात लपवून ठेवले गेले होते. त्यांतील प्रत्येक जण ‘आपल्याला काहीतरी करायला मिळाले आहे’ ह्या भावनेनेच प्रत्येक पाऊल टाकत होता.
अकरा दिवसांच्या प्रवासानंतर काशीविश्वनाथाचे शिखर दिसू लागले.
(कथा चालू)
