भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 17

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 17

    मोतीबाईच्या आणि सरदार मंजुनाथ पहाडींच्या नेतृत्वाखाली ही सर्व मंडळी लमाण आदिवासींच्या वेशात जंगलातून दुसऱ्या दिशेने बाहेर पडू लागली. मोतीबाईने लमाणांची वस्त्रे, आयत्यावेळेस त्या ‌‘खून की घाटी‌’मधील एका लमाण जमातीच्या गटापासून मिळविली होती आणि त्या बदल्यात त्यांना भरपूर द्रव्यही दिले होते व ते लमाणही ब्रिटिशांच्या छावणीच्या विरुद्ध दिशेनेच प्रवास करणारे असल्यामुळे, कुणाला त्याची काळजी नव्हती.

    परंतु मोतीबाई अजून तेवढी स्वस्थचित्त नव्हती. कारण लमाणांची वस्त्रे व जाड मण्यांचे अलंकार त्यांच्याकडे असले, तरीदेखील लमाणांकडे नेहमीच असणारी गुरे-ढोरे त्यांच्यापाशी नव्हती व तो लमाण गट त्यांच्याकडील गुरे द्यायला तयार नव्हता. मोतीबाई व मुंदरबाई मिळून हे वीसजण, लमाण स्त्रीपुरुषांच्या वेशात ‌‘पलधाडी‌’ गावाच्या दिशेने निघाले. त्या गावाला जाण्याचे तिने का ठरवले, ह्याविषयी कुणालाच काही माहिती नव्हती. परंतु कुणीही काही विचारले नाही.

    अगदी पहाट होता-होता ते वीसजण पलधाडी गावाच्या सीमेजवळ येऊन पोहोचले. त्या गावाच्या सीमेबाहेर लागूनच दुर्गादेवीचे छोटेसे मंदिर होते व ते सर्वांच्याच परिचयाचे होते.

    मोतीबाईने सर्वांना, ह्या लमाण गटाकडून मिळालेल्या साहित्याच्या आधारे ह्या मंदिराच्या बाजूलाच पाच तंबू उभारण्यास सांगितले - अगदी खऱ्याखुऱ्या लमाणांच्या तंबूंप्रमाणे; आणि ती स्वतः मात्र कुणाची तरी वाट पाहात किंवा कोणाला तरी शोधत, त्या मंदिराच्या मागेच असणाऱ्या एका उंच पाषाणावर चढून बसली.

    पहाट संपून सकाळ सुरू होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. पूर्णपणे उजाडायच्या आत घोड्यांची व्यवस्था करणे आवश्यक होते, हे प्रत्येकाला पटत होते. परंतु कोणाच्याकडेही कुठलाही मार्ग नव्हता.
    इतर १९ जण लमाण तंबू बांधून व त्यांत लमाणांकडूनच घेतलेली गाडगी, मडकी व टोपल्या ठेवून, लमाणांप्रमाणेच सकाळी-सकाळी जळणासाठी सरपण (लाकडे) जमा करू लागले. नशिबाने अजून कुणीही गावकरी मंदिराच्या दिशेने आलेला नव्हता.

    मोतीबाई त्या उंच पाषाणावरून ह्या सर्वांना खूण करून खाली उतरू लागली आणि तेवढ्यात मंदिराच्या उजव्या भागाकडील दाट झाडीतून एक वेडसर दिसणारी व चाळे करणारी स्त्री धावतच पुढे आली.

    मुंदरबेगमला व इतर दोन सहकाऱ्यांना भलताच संशय आला व ते तिला पकडण्यासाठी तिच्या अगदी जवळ जाऊन ठेपले. परंतु पाषाणावरून घाईघाईने उतरणाऱ्या मोतीबाईने त्या सर्वांना हाताने इशारा करून अडविले व त्याचवेळेस मागून येणाऱ्या इतरांमधून राजकुंवर यादव चपळाईने पुढे झाली.

    राजकुंवर हलक्या आवाजात सर्वांना म्हणाली, “ही ‌‘काशीबाई कुंबिन‌’. (काही ठिकाणी ‌‘काशीबाई कुणबीण‌’ असाही उल्लेख आढळतो.) तिच्याकडेच दामोदररावला (राणी लक्ष्मीबाईचा दत्तक पुत्र) सोपविले आहे व ही पलधाडी गावातील एका झोपडीतच ‌‘एक वेडसर बाई‌’ म्हणून तिच्या लहानशा मुलाबरोबर राहात आहे. मीसुद्धा हिला प्रथम ओळखू शकले नाही, एवढे हिने बेमालूम वेशांतर केले आहे.”

    मोतीबाई जवळ येऊन पोहोचताच तिने काशीबाईला अत्यंत आवेगाने घट्ट मिठी मारली. त्या दोघींची अगदी लहानपणापासूनची जीवश्चकंठश्च मैत्री होती.

    मोतीबाईने मारलेल्या मिठीतून काशीबाई समजून चुकली की ‌‘राणी लक्ष्मीबाई ह्या जगात उरलेली नाही.‌’ तिला अश्रू आवरणे जमूच शकले नाही. तिला सांभाळणे मोतीबाई व राजकुंवरलाही जमत नव्हते. काशीबाई व मोतीबाई ह्या दोघीही राणी लक्ष्मीबाईच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी होत्या व मुख्य म्हणजे काशीबाई ही मोरोपंतांची प्रमुख सहाय्यक होती व हे फक्त मोतीबाईलाच ठाऊक होते.

    शेवटी सरदार मंजुनाथ पहाडी वेळ ओळखून पुढे झाले व वडीलकीच्या नात्याने त्या दोन तरुण स्त्रियांना म्हणाले, “तुम्ही दोघी माझ्या मोठ्या मुलीपेक्षा लहान आहात. त्यामुळे पित्याच्या नात्याने सांगतो की ही वेळ शोक करण्याची नाही हे तुम्हालाही समजत नाही का? असे काय गुपित आहे की ज्यामुळे तुम्ही दोघी एवढ्या मुत्सद्दी असूनही भान हरवून बसल्या आहात?”

    त्यासरशी दोघीही सावरल्या. मोतीबाईने सगळ्यांनाच सांगितले, “राणी लक्ष्मीबाईने, तिचा मृत्यू झाल्यास, आपल्यासारख्या तिच्या सहकाऱ्यांना मदत मिळावी म्हणून काशीबाईकडेच स्वतःकडील अलंकार, वस्त्रे व सुवर्णमोहरांनी आणि धनाने भरलेला हंडा देऊन ठेवलेला आहे. ह्या दुःखद आठवणीमुळेच लक्ष्मीबाईची महानता अधिकच जाणवली व म्हणून रडू कोसळले.”

    काशीबाई शांतपणे ह्या सर्वांना घेऊन दुर्गामंदिराच्यामागील तिच्या घरात घेऊन गेली. तिथे सहा वर्षांच्या दामोदररावाला खेळवत काशीबाईची आई गंगाबाई बसलेली होती. ह्या गंगाबाईस गेल्या दोन महिन्यांपासूनच मोरोपंतांनी ह्या गावात आणून ठेवलेले होते व ‌‘ह्या गंगाबाईस एक वेडसर विधवा मुलगी असल्याचे‌’ वृत्त गावातील प्रत्येकाला ठाऊक होते. मोरोपंतांनी गंगाबाईला ‌‘एका सुखवस्तू व दानशूर धार्मिक स्वभावाच्या विधवेचे‌’ रूप दिले होते. ती म्हणे एका बनारसमधील साधूच्या आदेशानुसार, पलधाडी गावातील दुर्गादेवीच्या सेवेसाठी येऊन राहिली होती.

    गंगाबाईला मोतीबाईकडून लमाणांकडील गुरांचा प्रश्न समजताच ती स्वतःच्या लेकीला काशीबाईला म्हणाली, “गेल्या दोन महिन्यांत श्रीमंत मोरोपंतांनी मला नीट तयार केलेले आहे. मी गावात सर्वांशी व्यवस्थित संबंध ठेवून आहे. मी गावात सांगूनच ठेवले आहे की ‌‘हिला भूत झोंबलेले आहे‌’ म्हणून. मी आज सांगेन की ‌‘भुताने गायींची व म्हशींची दाने लमाण जमातीस करण्यास सांगितले आहे कारण भूत लमाण जातीच्या स्त्रीचे आहे.‌’ मी सकाळी-सकाळी गायी-म्हशी गोळा करीन, अर्थात विकत घेईन व त्यांना ह्या लमाण गटाला दान म्हणून देईन. परंतु त्यासाठी एक मांत्रिक कुठून मिळणार?”

    लालाभाऊ बक्षी ताबडतोब तयार झाले व त्यांनी लमाण वेश टाकून, काळ्या डगल्यातील मांत्रिकाचे रूप धारण केले.

    दिवसाढवळ्या ह्या लमाण वस्तीला भरपूर गुरे-ढोरे मिळाली. कुणाही गावकऱ्याच्या मनाने हे टिपले नाही की ह्या लमाणांकडे आधीची गुरे नव्हती. कारण ‌‘त्यांची गुरे घेऊन एक लमाण जंगलात भल्या पहाटेच गेल्याचे‌’ गंगाबाईनेच सांगितले होते.

    गुरा-ढोरांचे दान मांत्रिकाकरवी पूर्ण होताच, गंगाबाईची मुलगी काशीबाईची बाधा पूर्णपणे नाहीशी झाली व ती एका क्षणात व्यवस्थित वावरू लागली व त्याबरोबर ह्या मांत्रिकाच्या पाया पडण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली.

    जाणत्या व अनुभवी लालाभाऊ बक्षींनी ही गोष्ट नीट हेरली की ‌‘गाव त्यांच्या नादी लागला आहे व ह्याचा फायदा उठवायलाच हवा.‌’ त्यांनी मोतीबाई व सरदार पहाडींबरोबर बसून पुढील कार्यासाठी हव्या असणाऱ्या सर्व गोष्टींची यादी (List) तयार केली व अनेक गावकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या बहाण्याखाली बहुतेक सर्व वस्तू रात्रीपर्यंत जमा केल्या. पुढली गोष्ट सर्वांत महत्त्वाची होती आणि ती म्हणजे शस्त्रास्त्रे - तलवारी व बंदुका. परंतु तोही प्रश्न काशीबाईने सोडविला.

‌    ‘बाजूच्या गावातील एका लालची सावकाराकडे दरोडेखोर येत-जात असतात व तोच शस्त्रे विकत देत असतो‌’ असे सांगून. 

    रात्रीच्या पोटात राणी लक्ष्मीबाईचेच धन देऊन शस्त्रास्त्रे विकत घेतली गेली आणि पुढच्या सकाळी हा लमाणांचा तांडा गुरा-ढोरांसकट पुढच्या प्रवासासाठी निघाला आणि मांत्रिकाने तेथून जाताना गावातील प्रत्येकाला एक-एक ताईत मंत्रवून दिला व आठ तास घरे बंद करून आत बसण्यास सांगितले.

    गंगाबाई, बरी झालेली काशीबाई व तिचा लहान पुत्र, असे तिघे ह्या मांत्रिकाबरोबरच निघून गेले. त्यांच्याकडील सर्व सामान अर्थात शस्त्रास्त्रे, लमाणांकडील गाढवांच्या पाठीवर होते.

    प्रत्येकाच्या मनात सूड खदखदत होता. काशीबाई व मोतीबाई मात्र अत्यंत शांत डोक्याने परंतु अत्यंत टोकाच्या बदल्याच्या भावनेने विचार करत होत्या.

    पलधाडी गावापासून थोडे दूर जाताच त्या लमाण टोळीने आपली दिशा बदलली. काशीबाईला दुल्हेरावचा ठावठिकाणा नीट माहीत होता. कारण तीही स्वतः गुप्तचरच होती.

    तीन दिवसांची वाटचाल पूर्ण करून हा लमाणांचा तांडा दुल्हेरावच्या वाड्यासमोरील मोकळ्या माळरानात येऊन तंबू ठोकू लागला. मात्र ह्यावेळेस हा तांडा जवळजवळ ५०-६० जणांचा होता. राणी लक्ष्मीबाईच्या ‌‘दुर्गादल‌’ व ‌‘महादेवशिवदल‌’ ह्यांतील विखुरलेले स्त्रीपुरुष त्यांना येऊन मिळाले होते. मुख्य म्हणजे सरदार मंजुनाथ पहाडींना लमाण भाषा नीट येत होती आणि बाकीचे सर्वही त्यांनी शिकवून नीट तयार केले होते.

    दिसायला अत्यंत सुंदर असणारी व वीजेप्रमाणे कुणावरही कोसळू शकणारी २५ वर्षांची काशीबाई दुल्हेरावच्या घरी, ‌‘दुधाचा रतीब घालणारी लमाण स्त्री‌’ म्हणून निर्भयपणे वावरू लागली.


(कथा चालू)