भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 16

राणी लक्ष्मीबाईचा देह निष्प्राण होताक्षणीच ब्रिटीश वंशाच्या सैनिकाच्या वेशात व ढंगात असलेल्या सरदार मंजुनाथ पहाडी ह्यांनी क्षणाचाही विलंब न लावता राणी लक्ष्मीबाईचा मृतदेह उचलून आपल्या घोड्यावर घेतला व ‘हा मृतदेह मेजर ह्यूज रोजला दाखविण्यासाठी घेऊन जात आहे’ असे ओरडत व भासवत सरदार मंजुनाथ पहाडी, एका घनदाट वृक्षांची गर्दी असलेल्या भागात चपळाईने शिरला.
ब्रिटिशांची छावणी जंगलातच होती. आधी काहीच ठरलेले नसतानासुद्धा सरदार मंजुनाथ पहाडींनी ही कृती करण्यास सुरुवात करताच, राणीच्या बरोबर असणारे मुंदरबेगम, मोतीबाई, राजकुंवर व रामचंद्रराव तेवढ्याच चपळाईने वेगवेगळ्या बाजूंनी त्यांच्या पाठोपाठ जंगलात शिरले. जंगलाचा हा भाग ‘खून की घाटी’ म्हणूनच तेथील जनमानसात प्रसिद्ध होता व ‘ह्या भागात भुतांचा वावर असतो’ असा दाट समज पसरलेला असल्यामुळे, ब्रिटीश सैन्यातील भारतीय वंशाच्या सैनिकांनी ह्या विभागातील झाडे तोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्या घाटीकडे जाणाऱ्या त्या ब्रिटीश सोल्जरच्या मागे, अर्थात सरदार मंजुनाथ पहाडींच्या मागे एकही भारतीय सैनिक धावला नाही व तसे करू पाहणाऱ्या दहा-वीस ब्रिटीश सैनिकांना, ब्रिटीश सैन्यातील भारतीय सैनिकांनीच रोखून ठेवले.
राणीचे अंतिम संस्कार पूर्ण होताच मुंदरबेगमने सरदार मंजुनाथ पहाडींना विचारले, “तुम्ही ही ‘खून की घाटी’ आधीच पाहून ठेवली होती की काय? तुम्हाला हे कसे काय सुचले?”
जंगलातून पुढे जात असतानाच सरदार मंजुनाथ पहाडींनी उत्तर दिले, “ही घाटी मला राणी लक्ष्मीबाईसाहेबांनी नीट बघून ठेवण्यास सांगितले होते. ग्वाल्हेरला आल्याच्या पहिल्या रात्रीच राणीसाहेबांनी मला हा हुकूम दिला. कारण मी जरी झाशीचा रहिवासी असलो, तरीदेखील ग्वाल्हेरचा हा परिसर माझे आजोळ (आईचे माहेर) आहे. मी एकदा जाऊन आल्यानंतर राणी लक्ष्मीबाईच्या सूचनेनुसार, आपल्या गुप्तचर खात्यातील एक प्रमुख गुप्तचर ‘साधू भगवानदास’ ह्याने गेले चौदा दिवस अहोरात्र खपून ब्रिटीश सैनिकांमध्ये ह्या जागेविषयी भरपूर अफवा पसरविल्या व त्यामुळे येथपासून खूप मोठ्या अंतरापर्यंत ब्रिटिशांचे सैन्य फिरकतच नसे.
तेच साधू भगवानदास आज राणीसाहेबांना, त्या युद्धासाठी बाहेर पडण्याच्या आधी येऊन भेटले व त्यांच्या सांगण्यानुसारच राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांच्या छावणीत घुसण्याचा मार्ग निश्चित केला.
जणूकाही राणीसाहेबांनी स्वतःचा मृत्यू स्वतःच निश्चित केला होता आणि त्यांच्या अंतिम संस्काराचीही व्यवस्था त्यांनीच करून ठेवली होती.”
मुंदरबेगमच्या मुखातून प्रथमच निघालेल्या हुंदक्यामुळे बरोबरील प्रत्येकजण चमकून तिच्याकडे पाहू लागला. ती वेळ रडण्याची निश्चितच नव्हती व म्हणूनच प्रत्येकजण मुंदरबेगमला सावरू पाहात होता.
परंतु झाशीच्या राणीची खास अंगरक्षिका असणाऱ्या बहादूर मुंदरबेगमने एका क्षणात अश्रू गिळत सांगितले, “तो साधू भगवानदास म्हणजे राणीसाहेबांचे पिताजी होते व म्हणूनच आपल्याला त्यांच्या अंतिम संस्काराचीही तयारी करणे आवश्यक आहे.”
हे शब्द ऐकताच प्रत्येकजण हादरलेला होता. मंजुनाथ पहाडी नमस्कार करत म्हणाले, “पित्याचा मृत्यू स्वतःच्या नजरेसमोर घडल्यानंतर राणीसाहेब एका मिनिटात बाहेर आलेल्या होत्या व बाहेर उभे असलेल्या आम्हां सर्वांना काहीच कळू दिले नाही. राणीसाहेबही महान आणि त्यांना जन्म देणारा पिता श्री. मोरोपंत तांबेही महान.
मोरोपंतांनीच अर्थात भगवानदासांनीच मला राणीसाहेबांना भेटण्याच्या आधीच सांगून ठेवले होते की ‘खून की घाटी’मधील पडक्या मंदिराच्या मागे, अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ठेवून दिलेल्या आहेत.
धन्य तो पिता व अतिधन्य त्याची कन्या! स्वतःच्या अंतिम संस्कारांची तयारी करूनच ह्या दोघांनीही मृत्यूला मिठी घातली. पण मोरोपंतांविषयी काय करायचे? आपण किल्ल्यात फिरणार कसे? किल्ल्यामध्ये तर शेकडो ब्रिटीश सैनिक निरनिराळ्या वाटांनी घुसत आहेत.”
तेवढ्यात उजव्या बाजूच्या लहानशा टेकडीवरून एक वृद्ध आदिवासी, लाकडांच्या मोळ्या बांधून व त्यांना पाठीवर घेऊन उतरताना दिसला. त्याच्याकडे कुणाही ब्रिटीश सैनिकाचे लक्ष जाणे शक्यच नव्हते. कारण त्यांना लूटपाट करायची होती व हा गरीब वृद्ध आदिवासी व त्याच्या लाकडी मोळ्यांमध्ये कुणालाच स्वारस्य नव्हते.
आपल्या ह्या मंडळींचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले, तेसुद्धा त्या वृद्धाने एक मोठा दगड गडगडत खाली सोडला म्हणूनच.
सर्वजण आपापले शस्त्र पारजून तयार झाले. परंतु मोतीबाईने सर्वांना रोखले, “हे सरदार लालाभाऊ बक्षी आहेत. (संदर्भ : कथामंजिरी ४-३-१०) हे मला सांगूनच मागे राहिले होते. त्यांच्या मस्तकावरील मोरपीसांची टोपी हीच खूण ठरली होती.”
अवघ्या पाच मिनिटांत लालाभाऊ बक्षी त्या लाकडांच्या मोळ्यांचा ढीग पाठीवर घेऊन त्यांच्याजवळ येऊन पोहोचले. त्या लाकडांच्या मोळ्यांच्या ढिगामध्येच मोरोपंतांचा मृतदेह होता.
त्यांचे अंतिम संस्कार करताना त्याच लाकडाच्या मोळ्या वापरल्या गेल्या आणि मुंदरबेगमने तिच्याकडे जपून ठेवलेली, राणी लक्ष्मीबाईच्या अंगावरील शाल मोरोपंतांच्या देहावर पांघरली गेली.
त्यांचे अग्निसंस्कार होत असताना रामचंद्रराव दुःखाने म्हणाले, “ह्या दोघांना वाहण्यासाठी फुलेही नव्हती व साधी तुलसीपत्रेही नव्हती. मला गीता तोंडपाठ आहे एवढेच.”
मोतीबाई गंभीरपणे म्हणाली, “त्या दोघांच्याही मुखात तुलसीपत्र स्वतः स्वयंभगवानानेच ठेवले असेल व फुले आई जगदंबेनेच उधळली असतील.
राजकुंवर! तू मात्र स्वतःला वाचव व तुझा भाऊ बिहारीलालला जाऊन भेट. तुम्हां दोघांवर राणी लक्ष्मीबाईने ‘ह्या स्वातंत्र्यसंग्रामाचा खराखुरा वृत्तांत जनमानसामध्ये पसरवण्याचे’ कार्य सोपविलेले आहे व राणी लक्ष्मीबाईची कुठलीच इच्छा अपूर्ण राहता कामा नये.”
“आणि राहणारही नाही!” हे वाक्य होते लालाभाऊंच्याच वाटेने डोंगर उतरलेल्या कमलकुमारी चौहान हिचे. ती राजपुत्र दामोदररावाला सुरक्षित जागी पोहोचवून आली होती.
मोतीबाईचे नेतृत्व तेथील सर्वांनाच मान्य होते. कारण राणी लक्ष्मीबाईने स्वतःच तिला मुख्य राजकीय सल्लागार बनविलेले होते. मोतीबाई बरोबरील सर्वांना घेऊन घाटीच्या दरीत उतरली. तिच्यासकट एकूण १६ पुरुष व ती स्वतः, कमलकुमारी, राजकुंवर आणि मुंदरबेगम अशा चार स्त्रिया होत्या.
मोतीबाईने सगळ्यांशी नीट बोलून निर्णय जाहीर केला, “सगळ्यात मोठा फितूर (गद्दार) असलेल्या सरदार दुल्हेरावचा वध करायचाच व तेसुद्धा त्याला आधी अद्दल घडवूनच; आणि त्यानंतर राणी लक्ष्मीबाईच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या ब्रिगेडिअर स्मिथला तर हाल-हाल करून मारायचे.
दुल्हेरावाच्या हत्येमुळे भारतातील फितुरांना दहशत बसली पाहिजे, तर ब्रिगेडिअर स्मिथच्या हत्येमुळे ब्रिटिशांमध्ये भय उत्पन्न झाले पाहिजे.”
प्रौढ वयाचे सरदार लालाभाऊ बक्षी म्हणाले, “आणि ह्या दोन्ही हत्या शेकडो लोकांच्या समक्ष झाल्या पाहिजेत. पण त्या हत्या करताना आपण प्रत्येकजण मरण्यास तयार असलो पाहिजे.”
लालाभाऊ बक्षींनी सगळ्यांना शपथ उच्चारण्यास सांगितले, “दुल्हेराव व ब्रिगेडिअर स्मिथ ह्यांच्या हत्या, हीच खरी राणी लक्ष्मीबाईच्या व आपल्या इतर अगणित सहकाऱ्यांच्या मृत्यूवरील आपली पुष्पांजली असेल. वीरांना पुष्पांजली रक्ताचीच असावी.”
आज पहिल्यांदा घोषणा निनादली, “जय राणी लक्ष्मीबाई! जय भारतमाता!”
(कथा चालू)
