भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 18

काशीबाईचा दुल्हेरावाच्या घरातील वावर तिने मुद्दामहूनच, फक्त त्याच्या घरातील स्त्रिया जिथपर्यंत वावरत, तिथपर्यंतच ठेवला होता. कारण दुल्हेराव अत्यंत धूर्त होता व त्याने काशीबाईबरोबर तीन महिने कामही केलेले होते. अशी धूर्त, लबाड व लोभी व्यक्ती आपल्याला सहजपणे ओळखू शकेल, ह्याची पूर्ण खात्री काशीबाईला होती.
लमाण स्त्रिया गावठी व वनौषधी देतात व स्त्रियांच्या हातपाय दुखणे, कंबर दुखणे, डोके दुखणे व डोक्यात उवा होणे ह्यासाठी चांगले मर्दन (मालिश) करतात हे सगळ्यांनाच ठाऊक असल्यामुळे काशीबाईला व मोतीबाईला दुल्हेरावच्या घरात भरपूरच कामे मिळू लागली.
दुल्हेरावला अकरा स्त्रिया होत्या व लग्नाशिवायच्या अजून चार स्त्रिया बाळगलेल्या होत्या. ह्या पंधराजणींची आपापसांत भांडणे चालायची व त्या भांडणाचा फायदा उठवून, अवघ्या पंधरा दिवसांत काशीबाई व मोतीबाईने मिळून दुल्हेरावच्या घराचा कानाकोपरा जाणून घेतला व दुल्हेराव कुठे जातो-येतो व त्याचे इतर शौक काय आहेत, ह्याची माहिती मिळवली.
सरदार मंजुनाथ पहाडी व मुंदरबेगमने गावात ठिकठिकाणी फिरून, दुल्हेरावची जमीन कुठे-कुठे आहे व गावातील मंडळी कशी आहेत, हे नीट माहीत करून घेतले. त्यातून एक गोष्ट बाहेर आली की दुल्हेरावने जहागीरदार बनल्यापासूनच अर्थात गेल्या दीड महिन्यात, गावातील लोकांमध्ये भरपूर मिठाया, धनधान्य व वस्त्रे वाटली आहेत व त्यामुळे संपूर्ण गाव त्याच्या अधीन आहे. तसेच गावातील सर्व लोक दुल्हेरावाचे जवळचे व लांबचे नातेवाईकच असल्यामुळे, ते दुल्हेरावला मदत करणार हे नक्की होते.
एक माहिती मात्र खूप आश्चर्यकारक होती. दुल्हेरावच्या त्या राहत्या घरामध्ये त्याचे नोकर भरपूर होते. परंतु सशस्त्र सैनिक एकही नव्हता.
काशीबाईने रात्रीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना सांगितले, “दुल्हेरावचे घर मुळातूनच पहिल्यापासून एखाद्या मोठ्या वाड्यासारखेच आहे व गावकरी त्याच्या पाठीशी आहेत व घरात जवळजवळ चाळीस ते पन्नास (40-50) नोकरपुरुष व तीस-चाळीस (30-40) नोकरस्त्रिया असतात. रात्रीसुद्धा त्यांतील अर्धे सेवक व सेविका दुल्हेरावच्या वाड्यातच राहात असतात. अशा परिस्थितीत आपण हल्ला केल्यास अख्खा गाव व सर्व नोकर आपल्या विरोधात लढू शकतात आणि स्वतः दुल्हेरावकडे चार रायफली आहेत व त्याचे तीन भाऊही लढण्यात उस्ताद आहेत. काय करावे?”
मोतीबाई अतिशय शांतपणे म्हणाली, “आपल्याला अजून एक आठवडाभर थांबणे आवश्यक आहे. उतावीळपणा करून चालणार नाही. गावातील घरे एकमेकांना लागून आहेत व एकूण दीडशे (150) घरांतून जवळजवळ अडीचशे (250) पुरुष दुल्हेरावच्या मदतीला येऊ शकतात आणि दुल्हेराव त्याच्या जहागिरीमध्ये कुठेही जाताना कमीतकमी पन्नास (50) पुरुष बरोबर असल्याशिवाय जातच नाही व त्या प्रत्येक नोकराकडे कुठले ना कुठले शस्त्र असतेच. आपण फक्त 65 जण आहोत.”
कधीही आपल्या मनाचे संतुलन न ढळू देणाऱ्या लालाभाऊ बक्षींनी आज प्रथमच वैतागल्या सुरात विचारले, “दुल्हेरावला गनिमी काव्याने मारण्याचा डाव असेल, तर तो मला अजिबात मान्य नाही. आपला हेतू, ‘ह्या गद्दार फितुर विश्वासघातक्याला सर्व लोकांसमोर सजा व्हावी व तीदेखील हाल-हाल करून’ असा आहे. मग गुपचूप ठार मारण्यात आपला हेतू पूर्ण होणार काय?”
कधीही शांत व खंबीर असणारे लालाभाऊ बक्षी अस्वस्थ झाल्याचे पाहताच मोतीबाईला शंका आली. तिने बैठकीमधूनच सरदार मंजुनाथ पहाडींबरोबर लालाभाऊ बक्षींना बाजूच्या तंबूत नेले व आदरपूर्वक विचारले, “तुमचे शौर्य व मुत्सद्दीपणा ह्यांबरोबर तुमची राणी लक्ष्मीबाईवरील निष्ठा ह्यांविषयी आम्हाला पूर्ण खात्री आहेच. तुम्ही नेहमी सबुरीनेच वागता. परंतु तुमच्या मगाचच्या बोलण्यावरून मला असे नक्की वाटू लागले आहे की तुम्हाला हे कार्य संपविण्याची घाई झालेली आहे व त्यामागे एकच कारण असू शकते. ते म्हणजे, तुमची प्रकृती ढासळत चालली असावी. खरे काय ते सांगा. तुम्हाला राणी लक्ष्मीबाईची शपथ आहे.”
तिच्या ह्या शब्दांबरोबर लालाभाऊ बक्षींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, “होय. माझ्या पाठीच्या कण्यावर झालेल्या तलवारीच्या वाराची जखम खूप खोल आहे व त्यातून सतत रक्तस्राव होतच असतो. माझा अशक्तपणा वाढू लागला आहे व मरायच्या आत मला दुल्हेरावला व स्मिथला उडवायचेच आहे.”
सरदार मंजुनाथ पहाडींनी विनंतीपूर्वक, अर्थात लालाभाऊंच्या वयाचा मान राखून त्यांची जखम पाहिली व ते हडबडूनच गेले, “कसे सहन करत आहात तुम्ही हे? किती बोळे जखमेत भरून ठेवले आहेत!”
मोतीबाईने काशीबाईला व तिची आई गंगाबाईला बोलावून घेतले. कुणालाच माहीत नव्हते, परंतु गंगाबाई एक उत्कृष्ट व निष्णात वैद्य स्त्री होती. गंगाबाईने जखमेमधील बोळे काढून नीट पाहिले व म्हणाली, “का एवढे दिवस उशीर केलात? माझ्याकडे औषधेही आहेत व त्याचबरोबर मला कुठल्याही जखमेवर टाके घालून जखम शिवता येते.”
एक क्षणात लालाभाऊ व मंजुनाथ चमकून व संशयी नजरेने गंगाबाईकडे पाहू लागले. त्यांना शांत करीत मोतीबाई म्हणाली, “गावठी वैद्यकीचे ज्ञान गंगाबाईंकडे वंशपरंपरेने आलेले आहे आणि टाके घालण्याचे काम त्यांनी एका ब्रिटीश डॉक्टरच्या हाताखाली काम करून मिळविलेले आहे आणि तेसुद्धा राणी लक्ष्मीबाईच्या आदेशानुसारच. हिने मग पाच पुरुष व पाच स्त्रियांना टाके घालण्यात निष्णात केले व त्यांच्यामुळेच आपण किल्ला एवढा लढवू शकलो. राणी लक्ष्मीबाईच्या सात अतिखोल जखमांनासुद्धा टाके घातले गेले होते. परंतु राणी लक्ष्मीबाईकडे वेळ कमी असल्यामुळे तिने उपचारात जास्त वेळ घालवला नाही.”
ह्याबरोबर लालाभाऊ उपचार घेण्यास तयार झाले आणि सकाळपर्यंत लालाभाऊ बक्षींचा आत्मविश्वास पूर्ववत झालेला होता.
पुढच्याच दोन-तीन दिवसांत गावातील लोकांविषयीच्या अनेक माहित्या मिळत गेल्या व त्यांतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातील पुरुष जराही व्यसनी नाहीत व लंपटही नाहीत. पण लोभी मात्र आहेत व प्रत्येकाच्या मनात, दुल्हेरावप्रमाणेच ब्रिटिशांची मर्जी संपादन करून श्रीमंत व्हायची इच्छा आहे.
ही माहिती मिळताच सरदार मंजुनाथ पहाडींनी मुंदरबाईंना विश्वासात घेतले व ती ‘गावाच्या पलीकडील जंगलात शिकारीसाठी आलेली ब्रिटीश ऑफिसर’ झाली व तिच्या पाठोपाठ दहाएक भारतीय सैनिकही होते. ह्या आपल्या लमाणांची संख्या वाढून लवकरच दीडशेपर्यंत (150) पोहोचली होती.
जंगलातील त्या ब्रिटीश ऑफिसरला (पुरुषाला) खूष करण्यासाठी म्हणून गावातील पुरुष वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करू लागले. मुंदरबाईकडे पुरुषी आवाज काढण्याचे कसब होते. ती चांगलीच उंच होती, धडधाकट होती व गोरीपानही होती.
तिने अवघ्या तीन दिवसांत गावकऱ्यांशी बोलून बातमी सोडून दिली की ‘ह्या ब्रिटीश ऑफिसरला दुल्हेराववर नजर ठेवण्यासाठीच पाठविले गेले आहे व ब्रिटीश ऑफिसरला सहाय्य करणाऱ्याला भरपूर बक्षीस मिळू शकेल. कारण दुल्हेरावने त्या ब्रिटीश ऑफिसरच्या बॉसच्या पत्नीचा विनयभंग केलेला आहे.’
अवघ्या चार-पाच दिवसांत प्रत्येक गावकऱ्याला ही बातमी समजली होती व कुणीही दुल्हेरावच्या मदतीला जाणार नव्हते.
सात दिवसांनी पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री सरळसरळ, उघडपणे दुल्हेरावच्या वाड्यावर हल्ला करण्याचे ठरवले. मात्र दुर्गादलाच्या 35 सैनिक स्त्रिया आपापल्या शस्त्रास्त्रांसह ‘नोकराणी’ म्हणून शिरून, वाड्यात ठिकठिकाणी आधीच लपून बसणार होत्या व हल्ला बाहेरून होणार होता आणि वाड्याच्या आतूनही.
प्रत्येकाच्या मनात वीरश्रीने अगदी जोरदारपणे ठाण मांडले होते. लालाभाऊ बक्षी, मंजुनाथ पहाडी आणि मुंदरबाई व मोतीबाई हे तर प्रत्येक क्षण कसाबसा ढकलत होते.
एकच व्यक्ती अतिशय शांत होती - काशीबाई कुंबिन.
(कथा चालू)
