भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 12

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 12

Previous Article 

हिंदी    English   ગુજરાતી   বাংলা   తెలుగు  മലയാളം  ಕನ್ನಡ  தமிழ்

पहिल्यांदाच राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व, प्रत्यक्ष लढाईमध्ये केले होते. राणी लक्ष्मीबाईने उघडपणे शत्रुत्व स्वीकारणे आवश्यक आहे, हे नीट जाणूनच मेजर एरस्किनच्या सैन्यावर हल्ला चढवला होता. मेजर एरस्किन, त्याचे पाच ब्रिटीश सैनिक व शंभर भारतीय वंशाचे ब्रिटिशांचे सैनिक ह्यांच्यासह अक्षरश: पळत सुटला होता. तो थोडाही वेळ न घालवता मेजर जनरल ह्यूज रोजला जाऊन भेटला. परंतु ह्या प्रवासासाठी त्याला पाच दिवसांऐवजी पंधरा दिवस लागले.

 

          पाच दिवसांचा प्रवास पंधरा दिवसांपर्यंत लांबवला गेला, तो राणी लक्ष्मीबाईच्या, गावागावात व जंगलातील दऱ्याखोऱ्यांमध्ये दडवून ठेवलेल्या सैनिकांच्या टोळ्यांनी दिलेल्या विविध प्रकारच्या त्रासांमुळे.

 

          ब्रिटीश सैन्याला अन्नदाणा मिळू शकणार नाही असेही प्रयत्न केले गेले होते. चार-पाच ठिकाणी तर त्यांच्या स्वयंपाकाच्या चुलींवरच पाण्याचा मारा केला गेला व उपाशी-तापाशी अवस्थेत मेजर एरस्किन व त्याच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी पळावे लागले होते.

 

          राणी लक्ष्मीबाईच्या दृष्टीने हे दहा-पंधरा दिवस खूप महत्त्वाचे होते कारण कालपी ह्या यमुना नदीच्या काठावरील एका प्रमुख शहरी, नानासाहेब पेशव्यांचे पुतणे रावसाहेब ह्यांचे मुख्यालय होते व पेशव्यांचा सेनापती तात्या टोपे, कानपूरचा राजा आणि स्वत: राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैनिकांची सेना तयार केली गेली होती व त्यांच्यातील प्रशिक्षित सैनिकांचे सहाय्य झाशीच्या लढाईसाठी आवश्यक होते.

 

          मेजर एरस्किनच्या छावणीवर हल्ला करून त्याची लावलेली वाट पाहून, झाशी व आजूबाजूच्या प्रदेशातून शेतकरी व मजूर वर्ग फार मोठ्या प्रमाणात झाशी शहरामध्ये गोळा होऊ लागला. त्यांतील तगड्या मंडळींना देता येईल तेवढे प्रशिक्षण देऊन, त्यांच्या हातात तलवार, भाला, कसायाचा सुरा, सुताराची करवत अशी अस्त्रे दिली जात होती.

 

          हा देशप्रेमाने भारलेला व धर्माच्या रक्षणासाठी तयार झालेला फार मोठा समुदाय ‌‘सैनिक‌’ म्हणून युद्धासाठी तयार नव्हता; परंतु त्यांच्या हृदयातील आग प्रबळ होती. ते मारण्यासही तयार होते आणि मरण्यासही तयार होते.

 

 

ह्यांना प्रशिक्षण मिळावे व तात्या टोपे ह्यांना त्यांच्या हाताखालील सैन्य लक्ष्मीबाईसाठी पाठविणे शक्य व्हावे, ह्या दोन कारणांसाठी मेजर एरस्किनचा प्रवास पंधरा दिवसांपर्यंत यशस्वी रित्या ताणला गेला होता.

 

      अशा प्रकारे छुपे अर्थात गनिमी हल्ले करून मेजर एरस्किनच्या सैन्याला बेजार करून सोडणे, राणी लक्ष्मीबाईच्या काही सहकाऱ्यांना पटत नव्हते. त्यांचे म्हणणे होते की अशा गोष्टींमुळे मेजर जनरल ह्युज रोज अधिक भडकून उठेल व स्वत:ही भलेमोठे सैन्य घेऊन झाशीवर आक्रमण करेल.

 

      ह्या विचाराच्या सर्व निष्ठावान सहकाऱ्यांना राणी लक्ष्मीबाईने पटवून दिले की आपण कसेही वागलो, तरीदेखील हे स्वार्थी व कपटी ब्रिटीश कंपनी सरकार, आज ना उद्या आपल्यावर मोठमोठे हल्ले करतच राहणार आहे.

 

ह्या सहकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर राणी लक्ष्मीबाईने जवळजवळ दीडशे (150) प्रमुख सहकाऱ्यांची बैठक बोलावली व इथे राणी लक्ष्मीबाईने केलेले भाषण, पुढच्या काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकासाठी व सेनानीसाठी सदैव प्रेरणादायक ठरले.

 

 

झाशीची राणी म्हणाली, संपूर्ण भारतवर्षाला गिळण्याचा हा डाव आहे. ह्याला विरोध करणे काही सोपी गोष्ट नाही, हे मी नक्कीच जाणते. परंतु ब्रिटिशांकडील अफाट दारुगोळा, प्रचंड ताकदीच्या व अत्यंत दूरपर्यंत तोफगोळे डागणाऱ्या शेकडो तोफा व त्यांच्याकडील अक्षरश: लक्षावधी सैनिक ह्यांना भिऊन आपण गप्प बसायचे ठरवले, तर काय ते आपल्याला प्रेमाने व आदराने वागविणार आहेत?

 

      ज्या प्रकारे ब्रिटीश कंपनी सैन्याने धनसिंह गुर्जरला ठार मारले, त्याच्या सैनिकांची कत्तल केली व केवळ आणि केवळ सामान्य भारतीयांना दहशत बसावी म्हणून शेकडो गावांमध्ये चौकाचौकात अनेकांना फासावर लटकविले, ते पाहता खोटी मनोराज्ये रंगवण्यात अर्थ नाही.

 

      आपले झाशीचे राज्य ते मुळीच स्वतंत्र राहू देणार नाहीत, किंबहुना आपले अस्तित्वच मिटवून टाकतील. ना झाशी संस्थान उरेल, ना मी व तुम्ही असे झाशीचे नेते उरू, ना झाशीतील प्रमुख नागरिक.

 

      मला मिळालेल्या बातम्यांनुसार लॉर्ड डलहौसीने स्वतः आदेश दिला आहे की झाशीतील प्रत्येकाला वेचून-वेचून मारावे व झाशीत एकही व्यापारी, जमीनदार, पाठशाळा व मंदिर उरू नये.

 

      मला सांगा, अशा ब्रिटिशांना घाबरून व म्हणून गप्प राहून उंदराप्रमाणे मरणे चांगले की ह्यांना विरोध करून जबरदस्त लढाई करत पुढे-पुढे जात राहणे श्रेयस्कर?

 

      लढलो तर वाचण्याची थोडी तरी आशा आहे, पण लढलो नाही तर सर्वनाश नक्की होईल.

 

लढता-लढता आपला पराभव झाला, आपण पकडले गेलो, आपण मारले गेलो, तरीदेखील मरता-मरता ब्रिटीश कंपनी सरकारला असा धडा शिकवू की त्यांना भारतीयांचे शौर्य व एकजूट ह्यांचा धाक बसलाच पाहिजे.

 

      कधी ना कधी मरायचे तर प्रत्येकालाच आहे. मी अमर नाही व तुम्हीही नाही. मग मरायचेच तर देशासाठी व स्वधर्मासाठी मरू. त्यातूनच पुढे लाखो योद्धे भारतभर तयार होतील.

 

      होय! नक्कीच तयार होतील कारण राजकुंवर यादव व तिचा भाऊ बिहारीलाल यादव ह्या दोघांना मी स्वत: तयार केले आहे. आपल्या युद्धाची, आपल्या प्रत्येक लढाईची व चढाईची इत्थंभूत खबर ठेवण्यासाठी आणि आपण हरलो, पकडले गेलो किंवा मारले गेलो, तर ह्या दोघांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षित गट भारतात सर्वत्र फिरून आपल्या शौर्याची गाथा, आपल्या प्रयासांची गाथा आणि आपल्या तळमळीमागील व्यथा गावागावात जाऊन सांगतील आणि त्याचबरोबर ‌‘ब्रिटीश कसे जुलमी व क्रूर आहेत‌’ हेदेखील सांगतील.

 

 

 मुंबादेवी‌’ नावाचे सात बेटांचे शहर ब्रिटिशांनी नीट विकसित केले आहे. तेथे विविध भारतीय वंशांचे व्यापारी गब्बर झाले आहेत. हे लोक ब्रिटिशांचीच साथ देणार आहेत ह्याची खात्री मी करून घेतली व म्हणून मुंबानगरीतील एक अत्यंत मान्यवर श्रीमंत ‌‘श्री. जगन्नाथ शंकर शेठ‌’ ह्यांच्या मी नित्य संपर्कात आहे.

 

 

ते गुप्तपणे आपल्याला सहाय्य करत आहेत. त्याचबरोबर मुंबई नगरीतच राहणारे हवालदार सय्यद हुसेन, नाईक मंगल गुडरिया आणि वटेश्वर पाठक ह्या तीन प्रमुख व्यक्तीदेखील गुप्तपणे कार्यरत आहेत.

 

त्याचबरोबर कोल्हापुरातून चीमासाहेब, साताऱ्यातून रंगो बापूजी गुप्ते, नरगुंडचे बाळासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातून भागोजी नाईक आणि कोल्हापूरच्या छावणीतील हवालदार रामजी शिरसाट अशी आपली खास माणसे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा देत आहेत व वेळ पडल्यास आपापल्या जागी बंडही पुकारणार आहेत. हे एवढे विविध प्रांतांतील सामान्य भारतीय नागरिक ह्या वेळेला एकत्र उभे राहात आहेत ह्याचा अर्थ नीट समजून घ्या. - आपला भारत व भारतीय संस्कृती महान आहेत व ब्रिटिशांना आपण सुखाने राज्य करू देणार नाही.

 

      माझा पूर्ण विश्वास आहे की मी मारले गेले तरी पुन्हा भारतातच जन्म घेईन व परत ब्रिटिशांशी लढीन आणि तेव्हा तरी नक्कीच विजयी होईन.

 

      राणी लक्ष्मीबाईच्या ह्या तेजस्वी वाणीने व विचारांनी भरलेल्या भाषणामुळे प्रत्येक उपस्थित भारला गेला व अधिक जोमाने तयार झाला.

 

      ह्या सभेस मुंबईचे जगन्नाथ शंकर शेठ व साताऱ्याचे रंगो बापूजी गुप्ते गुप्त वेशात उपस्थित होते. ह्या दोघांनी महाराष्ट्रातील, विशेषत: मुंबईतील नागरिकांकडून जमविलेला निधी राणी लक्ष्मीबाईच्या चरणांवर अर्पण केला व मगच ते परत गेले.

 

ह्यानंतर बरोबर आठच दिवसांनी मेजर एरस्किनने पंधरा हजार सैनिकांसह झाशीवर चहूबाजूंनी हल्ला चढविला. त्याच्या पाचशे तोफा झाशीवर चारी बाजूंनी तोफगोळे टाकू लागल्या

आणि राणी लक्ष्मीबाईने भर राजदरबारात जाहीर केले, ‌मेरी झाँसी नहीं दूँगी!‌

 

(कथा चालू)