विज्ञानमय कोषाचे मस्तक

English हिंदी ગુજરાતી ಕನ್ನಡ বাংলা తెలుగు
संदर्भ - सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (०२-०९-२००६)
श्रीमहागणपतीच्या जन्मकथेतून स्पष्ट होणारा तिसरा सिद्धांत आज आपल्याला पहायचा आहे. द्रव्यशक्ती व चैतन्य ह्यांचा ह्या विश्वपसाऱ्यात प्रत्येक ठिकाणी अत्यंत महन्मंगल व सहजसिद्ध सहयोग आढळून येतो. परंतु मानवाच्या मानवी विश्वात मात्र ह्या द्रव्यशक्तीची विविध रूपे व आविष्कार आणि त्या मूळ शुद्ध व परमपवित्र चैतन्याचे नानाविध आविष्कार ह्यांचा सहयोग आढळतोच परंतु मानवास प्राप्त असलेल्या बुद्धिस्वातंत्र्यामुळे म्हणजेच कर्मस्वातंत्र्यामुळे संघर्षही आढळतो. परंतु हा संघर्ष शिव व शक्तीमधील संघर्ष नसून त्यांच्या अनुयायांच्या मानसिकतेमधील संघर्ष आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

द्रव्यशक्तीचे एक रूप म्हणजेच मानवी भौतिक विकासास सहाय्यक असणारी विद्येची विज्ञानशाखा. विज्ञान, मग ते भौतिकशास्त्राचे असो, रसायनशास्त्राचे असो की जीवशास्त्राचे असो, सदैव मानवाची सर्वांगीण प्रगतीच करीत राहते व तीच त्या जगन्मातेची मूलभूत प्रेरणा आहे. परंतु जेव्हा त्या जगन्मातेच्या वात्सल्यामुळे हे विज्ञान वाढू लागते तेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या षड्रिपूंच्या संवर्धनासाठी मानव विज्ञानाचा वापर जगन्मातेला म्हणजेच महाप्रज्ञेला मान्य नसणाऱ्या गोष्टी करण्यासाठी करू लागतो. ही जगन्माता आपल्या आत्यंतिक वात्सल्यामुळे तरीदेखील आपल्या अपत्यांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून त्यांना अधिकाधिक विकासाची संधी देतच राहते. परंतु जेव्हा सर्व भौतिक विद्यांचा उपयोग त्या परमात्म्याच्या सत्य, प्रेम व आनंद ह्या त्रिसूत्रीला सोडून होऊ लागतो तेव्हा तीच जगन्माता आपल्या अपत्यांना उचित मार्गावर आणण्यासाठी कार्यास उद्युक्त होते. पावित्र्य व सत्य ह्यांस विन्मुख झाल्यामुळेच जीवास अपरंपार दुःखे भोगावी लागतात, हे जाणून ती करुणामयी माता आता आपल्या मातृत्वाचा अनुशासनप्रिय अवतार धारण करते. एक सामान्य मानवी आईसुद्धा चुकणाऱ्या किंबहुन मला मुळीच आवडत नाहीस.” असे केवळ तोंडाने म्हणत व प्रेम फक्त हृदयात ठेवून उचित वेळी ताडनसुद्धा करते तर मग सर्व जाणणारी ही विश्वमाता आपल्या बालकांचे अधःपतन टाळण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यास जरा तरी कचरेल काय?

भौतिक विज्ञानाच्या बळामुळे भगवंतास विसरलेल्या व म्हणूनच उन्मत्त होऊन भगवंताचा न्याय आपल्याला लागू नाही, अशा घमेंडीने सर्व भौतिक विद्यांचा व कलांचा उपयोग आणि विनियोग जेव्हा मानव राक्षसी महत्त्वाकांक्षांसाठी करू लागतो तेव्हा ह्या विज्ञानाची जननी मानवाच्या ह्या भौतिक बळास स्वतःच्या मनगटावरील बाह्यलेपाच्या मळासमान जाणून स्वतःपासून दूर करते व तेही त्यास सुंदर व गोंडस रूप देऊनच. एवढेच नव्हे तर स्वतःच्या शुद्धीचे म्हणजेच स्नानाचे कारण सांगून मानवानेच उमेच्या वात्सल्याचा उपयोग करून निर्माण केलेल्या भौतिक बळास स्वतःच्या अंतर्गृहाच्या दरवाजाबाहेर काढते आणि तेथेच उभे करून ठेवते व ज्या क्षणी तिचा दरवाजा बंद होतो त्याच क्षणी थोडासाही अहंकार किंवा अत्यल्पही अपवित्रता सहन न करणारा तो परमशिव तेथे येतो. अर्थातच मानवी अहंकार व परमात्म्याचे अकारण कारुण्य ह्यांचा संघर्ष सुरू होतो व अर्थातच द्रव्यशक्तीच्या सामर्थ्याने म्हणजेच भौतिक बळाने स्वतःस बलशाली समजणाऱ्या त्या तामसी अहंकाराचे मस्तक छाटले जाते. परंतु कितीही कठोर बनली तरीही मातेचे हृदय कळवळतेच व ती स्वतःच बंद करून घेतलेले दरवाजे उघडून धावत बाहेर येते व आपल्या पतीशी संघर्षास तयार होते कारण त्या जगन्मातेस विज्ञाना'चा समूळ नाश नको असतो तर फक्त विज्ञानाच्या तामसिक मस्तकाचाच नाश फक्त अपेक्षित असतो. तिचे विज्ञानरूपी लाडके बाळ तिला सदैव जिवंत रहावयासच हवे असते. देवांचे गुरु बृहस्पती म्हणजेच पावित्र्याबरोबर आवश्यक असणारा सावधपणा. हा वैश्विक सावधपणा शिवशंकरास आज्ञा देतो, त्या बालकास पुन्हा जिवंत करण्याची व मग तो सावधपणा स्वीकारलेले पावित्र्य म्हणजेच परमशिव, त्या बालकास गजमुख लावतात कारण त्या पार्वतीमातेनेच त्या बालकास जन्माबरोबरच ‘अंकुश' शस्त्र म्हणून दिलेला असतो. हे गजमस्तक म्हणजे सर्व भौतिक विद्यांच्या व बळांच्या वर असणारे विज्ञानाचेच मंगलमूर्ती स्वरूप व असा हा गजानन परत एकदा शिव-पार्वतीच्या मांडीवर विराजमान होतो.
मानवाच्या सर्व सामर्थ्यांस व क्रियांस म्हणूनच हा महागणपतीच शुभत्व, पावित्र्य व मांगल्य प्राप्त करून देऊ शकतो.