गजवदन

गजवदन

Previous Article 

हिंदी ಕನ್ನಡ   తెలుగు   தமிழ்

संदर्भ - सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (३१-०८-२००६)

श्रीगणपतीच्या जन्मकथेतून प्रगट होणारा दुसरा महत्त्वाचा सिद्धांत आज आपल्याला पहायचा आहे. शिव म्हणजे अपवित्रतेचा नाश करणारी परमात्म्याची अभिव्यक्ती. अगदी सामान्यातला सामान्य व अशिक्षित भारतीयसुद्धा अपवित्र व घृणास्पद परिस्थिती वा घटना प्रत्यक्ष बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतरसुद्धा सहजपणे ‘शिव' ‘शिव' काय हे! असे म्हणून जातो. कुठलेही रूढ आध्यात्मिक प्रशिक्षण झालेले नसतानाही प्रत्येक भारतीयास परंपरेने आपोआप माहीत झालेले असते की जे जे म्हणून अपवित्र आणि घाणेरडे, त्याचे समूळ उच्चाटन ‘शिवा'कडून केले जाते. भारतातील सर्व प्रांतातील लोकांमध्ये एक समज अत्यंत दृढ आहे की स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने शिवास अभिषेक वा शिवाची उपासना केल्यास त्या व्यक्तीस तत्काळ त्याच्या पापाची कठोर शिक्षा मिळते. एवढेच नव्हे, तर अशा व्यक्तीसाठी अशी उपासना करणाऱ्या त्याच्या आप्तांसही कठोर दुर्दैवाचा सामना करावा लागतो. दुसरा समज म्हणजे की सोळा वर्षांखालील बालकांचा छळ करणाऱ्या व्यक्तींस शिव कधीही शांती, समाधान व आरोग्य लाभू देत नाही. ह्या सर्व परंपरागत, रूढ मान्यतांमधून प्रगट होते ते परमात्म्याचे परमशिव स्वरूप, सदैव पावित्र्याच्या रक्षणासाठी दक्ष असणारे व पापांच्या नाशासाठी सहजसिद्ध असणारे. 

असा हा पावित्र्यरक्षक शिव बालगणेशाचे, एका निरपराध बालकाचे मस्तक कसे बरे तोडू शकेल? शक्यच नाही! ही घटनाच मुळी घडते ती अतिमानस पातळीवर. शिवाच्या ‘कर्पूरगौर' म्हणजेच कापरासारखा गौरवर्णाचा अशा शुद्धतम स्वरूपास मायेच्या पसाऱ्यात अनेकविध साधना व उपासनांमुळे निर्माण झालेल्या मंत्र व श्लोकांमधील मानवी अपवित्र भावना सहन होईनाशा झाल्या. द्रव्यशक्ती पार्वतीमातेच्या सामर्थ्यामुळेच सिद्ध होणाऱ्या नानाविध उपासना किंवा यज्ञादि कर्मकांडे जेव्हा ‘शिवा'स विरोध करू लागली म्हणजेच अपवित्र कार्यांसाठी परमात्म्याची उपासना वापरण्याचे प्रयोग होऊ लागले तेव्हा साहजिकच हा परमशिव परमात्मा क्रोधित होऊन उठला व त्याने अशा मंत्र व यज्ञविधानांना लावली जाणारी ‘मायाबीजे' कापून काढली व त्याऐवजी प्रत्येक परमात्मा-उपासनेच्या मंत्राच्या आधी ‘ओम्‌‍' (ॐ) म्हणजेच प्रणव उच्चारणे अनिवार्य केले. ॐकार हेच ते गजमुख, जे बालगणेशाच्या धडावर लावले गेले.

वेदांमध्येही पहिल्यांदा विनायक गणांचा उल्लेख त्रासदायक व विघ्नकारक असाच येतो तर ब्रह्मणस्पती ह्या गणेशाच्या मूळ रूपाचा उल्लेख मात्र पवित्रतम स्वरूपातच होतो. ह्या दोन गोष्टींमधील विरोध हा मूलत: विरोधच नसून ब्रह्मणस्पती (गणपती) शासनविरहित विनायक गण म्हणजेच ॐकारविरहित अशुद्ध मंत्रतंत्र, हे महत्त्वाचे सूत्र येथे प्रतिपादिलेले आढळते.

घरच्या गणेशोत्सवातील गणेशमूर्तीस पुष्पहार अर्पण करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

‘ॐ' ह्या प्रणवाच्या चिन्हाचा ऐतिहासिक विकास बघितला असताही ही गोष्ट सहजतेने समजू शकते. इसवीसनपूर्व काळातील सापडलेल्या लिखित वा आलेखित वाङ्मयामध्ये प्रणव अर्थात ओम्‌‍कार हा आपण सध्या ज्याप्रमाणे लिहितो (ॐ) त्याप्रमाणे नसून () ह्या प्रमाणे कोरलेला आढळतो.  

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा,

ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा॥

अशा स्पष्ट व सोप्या शब्दांत ह्या गणेशाने ह्या विश्वातील प्रथम अभिव्यक्ती ॐकार हा ध्वनी हेच आपले रूप म्हणून धारण केले आहे व म्हणून तो स्वसंवेद्य आहे हे मांडले आहे.

श्रीगणपती अथर्वशीर्ष म्हणजे तर श्रीमहागणपतीच्या जन्मकथेच्या स्पष्टीकरणाचा परमोत्कर्ष. ‘थर्व' म्हणजे चंचलता व गोंधळ आणि हे चांचल्य व मानसिक गोंधळ दूर करणारे स्तोत्र, ते अथर्वस्तोत्र व असे अथर्वशीर्ष म्हणजेच सर्व मंत्रांचे शीर्ष अर्थात मस्तक असणारा तो महागणपती.

पार्वतीमातेचे ह्या गणरायावर म्हणूनच आत्यंतिक प्रेम आहे व त्या अनुषंगाने अनेक कथाही प्रचलित आहेत. जे जे अनुचित त्यास कधीही बळ न देणे व जे जे उचित त्यासच बळ देणे हा ॐकाराचा सर्वात प्रमुख गुणधर्म होय व म्हणूनच ह्या गजवदन, मंगलमूर्ती महागणपतीच्या नमस्काराशिवाय कुठलेही मानवी कार्य शुभ होऊच शकत नाही.