सूर्यकोटीसमप्रभ - १

संदर्भ - सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (०३-०९-२००६)
‘भारतीय कीर्तनपरंपरेमध्ये विविध परमात्मस्वरूपांच्या नानाविध कथा व आख्याने सांगितली जातात. गेली अक्षरश: हजारो वर्षे ही नारदीय पद्धतीची कीर्तन परंपरा भारतात अव्याहतपणे चालू आहे. श्रीसाईसच्चरितात तर परमपूज्य श्री. हेमाडपंतांनी कीर्तनसंस्था ही नारदाची गादी असल्याचे ठामपणे प्रतिपादित केले आहे. ह्या कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनांद्वारे निखळ भक्तीचा प्रचार व प्रसार केला, तसेच समाज जास्तीतजास्त एकसंघ राहण्यासाठीही अपरंपार प्रयत्न केले व ह्या प्रयत्नांतूनच ह्या नारदीय गादीच्या अनेक अधिकाऱ्यांनी भगवंताचे माहात्म्य वर्णन करणाऱ्या गुणाधिष्ठित कथा प्रचलित केल्या. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या परमात्मस्वरूपांच्या भक्तसमुदायांना जोडणे सहज शक्य झाले. श्रीमहागणपतीच्या कीर्तनांमध्येही अनेक कथा श्रीरंग म्हणून घेण्यात येतात. त्यामधीलच एक प्रसिद्ध व लोकप्रिय लोककथा म्हणजे ‘अंध:कासुर आख्यान'.

बालगणेशाला गजमुख प्राप्त झाले व हे बालगणेश शिव-शक्तींसह म्हणजेच आपल्या माता-पित्यासह कैलास पर्वतावर बालक्रीडा करू लागले. थोरले बंधू कार्तिकेयस्वामी पित्याच्या आदेशानुसार बृहस्पतीच्या आश्रमात अध्ययनासाठी गेले होते. एकदा शिवशंकर आपल्या गणांसहित विश्वसंचाराला निघाले असताना बालगणेशांनी त्यांच्याबरोबर येण्याचा हट्ट धरला. महादेवांच्या विश्वसंचारामध्ये अर्थातच अनेक असुरांशी सामना होणे अपेक्षितच होते. त्यामुळे पार्वतीमातेस बालगणेशाने आपल्या पित्याबरोबर जाऊ नये असे वाटत होते. परंतु श्रीमहादेव मात्र आपल्या पुत्रास आपल्याबरोबर घेऊन जाण्यास तयार होते. बालगणेशाच्या बुद्धीची व सामर्थ्याची जाणीव शिव-पार्वती दोघांनाही होतीच. परंतु शेवटी आई ती आईच. तिचे मातृहृदय, बाळ कितीही सामर्थ्यवान असले तरीही काळजी करणारच. बालगणेशाचा हट्ट व पतीचा कोपिष्ट आणि जिद्दी स्वभाव ह्यामुळे पार्वतीमाता पेचात सापडली. पार्वतीमातेने आपल्या लाडक्या भावाचे म्हणजेच श्रीविष्णूचे स्मरण केले. (आजही मीनाक्षी मंदिरात शिव-पार्वती विवाहदृश्यात श्रीविष्णू पार्वतीचे ज्येष्ठ बंधू म्हणून कन्यादान करताना दिसतात.) त्याच क्षणी स्मर्तृगामी श्रीविष्णू तेथे प्रगटले. भावाबहिणीचे नाते मानवी पातळीवरसुद्धा अत्यंत प्रेमाचे असते. दैवी पातळीवर तर ह्या नात्याचे अर्थ व संदर्भ अत्यंत पवित्र सांकेतिक स्वरूपाचे असतात कारण ह्या सर्वांमध्ये अभेद असतो.
पार्वतीने आपली समस्या श्रीविष्णूस सांगितली व श्रीविष्णूंनी लगेच एक उपाय सुचविला. श्रीविष्णूंनी पार्वतीमातेस महादेवांशी ह्या विषयावर वाद घालण्यास सांगितले व ‘त्यांचा क्रोधयुक्त पहिला शब्द बाहेर पडताच, त्या शब्दाचेच रूपांतर मी एका असुरात करेन व बालगणेशाच्या मनात त्या अक्राळविक्राळ बागुलबुवाविषयी भय उत्पन्न करेन. त्यामुळे श्रीबालगणेशच आपला हट्ट सोडून देतील व शिवशंकरही आपला क्रोध आवरून आपल्या अपत्याच्या प्रेमामुळे बालगणेशास बरोबर घेऊन जाण्याची जिद्द सोडून देतील', असे सांगितले. त्याप्रमाणे सर्व घडूनही आले व श्रीशिव आपल्या कार्यास निघाले. बालगणेश मातेसह कैलासावर मागे राहिले. महादेवांच्या क्रोधयुक्त प्रथम शब्दापासून विष्णूने उत्पन्न केलेला तो असुर कार्य संपन्न होताच विरघळून गेला परंतु श्रीबालगणेशांच्या मनात उत्पन्न झालेली ही भीती बालगणेशाने केवळ मातृप्रेमामुळे स्वीकारलेली होती, बालकानेच आईचा हट्ट पुरविला होता. श्रीमहादेव तेथून निघून जाताच बालगणेशाने ही मनातील भीती थुंकून टाकली व त्या थुंकीतूनच एक अतिशय भयंकर दैत्य निर्माण झाला. थुंकलेल्या भीतीतून निर्माण झालेला हा दैत्य म्हणजेच अंध:कासुर. ह्या अंध:कासुराने निर्माण होताक्षणीच आपले रूप व आकार अधिकाधिक वाढविण्यास व भयंकर करण्यास सुरुवात केली. बालगणेशांनी त्याच्याशी युद्ध सुरू केले परंतु शेवटी साक्षात गणेशाच्या मनातून बाहेर फेकल्या गेलेल्या मलापासूनच तो बनलेला होता. त्यामुळे त्याचे सामर्थ्यही काही कमी नव्हते. हे युद्ध एकोणतीस दिवस चालले. तिसाव्या दिवशी मामाने भाच्यास सहाय्य करण्याचे ठरविले व श्रीविष्णूंनी बालगणेशाच्या कानातील भिकबाळीवर सूक्ष्म रूपात बसून स्वत:च्या (गणेशाच्या) ‘सूर्यकोटीसमप्रभ' स्वरूपाची आठवण करून दिली व त्याबरोबरच कोटी सूर्यांचे तेज बालगणेशांच्या कांतीतून तळपू लागले व मग अर्थातच अंध:कासुर समूळ नष्ट झाला. श्रीमहादेवांनी परत आल्यावर जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा त्यांनी तडक विष्णुलोकात जाऊन श्रीविष्णूस अत्यंत कृतज्ञतेने व प्रेमाने आलिंगन दिले.
गणपतीच्या कानात भिकबाळी घालण्याची प्रथा ह्या कथेतूनच सुरू झालेली दिसते.'
अग्रलेखाच्या अंती सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात -
‘ह्या कथेचा आध्यात्मिक अर्थ व प्रभाव आपण उद्या (म्हणजेच आपल्या पुढच्या पोस्टमध्ये) पाहूया.'