अत्रिऋषिंची दिव्य लीला व स्वयंभू मूलार्कगणेशाची प्रकट कथा - निरीक्षणशक्तीचे महत्व

अत्रिऋषिंची दिव्य लीला व स्वयंभू मूलार्कगणेशाची प्रकट कथा - निरीक्षणशक्तीचे महत्व

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी तुलसीपत्र ६९५ या अग्रलेखामध्ये मानवाच्या जीवनातील १० कालांचा संदर्भ दिला आहे. ह्यातील ९व्या कालाचे विवेचन तुलसीपत्र ७०२ अग्रलेखांपासून सुरू होते. या संदर्भामधील अग्रलेखांमध्ये किरातरुद्र - किरातकाल विशद करताना सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी मूलार्कगणेशाचे व नवदुर्गांचे महत्त्व सांगितले आहे.
 
संदर्भ - सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या दैनिक प्रत्यक्षमधील संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी विरचित श्रीरामचरितमानसच्या सुन्दरकाण्डावर आधारित ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख - तुलसीपत्र - १३७७ ते तुलसीपत्र - १३७९

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू तुलसीपत्र-१३७७ या अग्रलेखामध्ये लिहीतात,

सत्ययुगाचे चार चरण असतात व ते चारही चरण समान काळाचे असतात. 

सत्ययुगाचा पहिला चरण समाप्त होताना देवर्षि नारदांनी सर्व ब्रह्मर्षिंची परिषद बोलावली व ‘पुढील चरणासाठी काय करणे आवश्यक आहे' ह्याची सखोल चर्चा केली. त्यांच्या सभेमध्ये काही निर्णय झाल्यानंतर त्या सर्वांना घेऊन देवर्षि नारद अत्रिऋषिंना जाऊन भेटले. 

त्यावेळेस अत्रिऋषि शांतपणे नैमिषारण्याची रचना करण्यामध्ये मग्न होते. देवर्षि नारद व सर्व ब्रह्मर्षि दिसताच अत्रिऋषिंनी त्यांच्या नेहमीच्या शांत, स्थिर व गंभीर स्वभावानुसार त्या सर्वांना प्रश्न केला, “हे आप्तजनहो! तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या कार्यासाठी आला आहात, हे तुमच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत आहे व तुम्ही सर्वजण मानवाच्या कल्याणासाठी सर्वत्र संचार करीत असता, हे तर मला माहीतच आहे. तुमच्याकडे स्वार्थाचा लवलेशही नाही, ह्याविषयीही मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच मानवकल्याणाविषयी तुम्हाला काही प्रश्न विचारावयाचे असल्यास मी तुम्हाला अनुमती देतो. 

श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्‌ येथे विराजमान श्रीमूलार्क गणेशाच्या स्थापनेच्या वेळी झालेल्या यागाचे दर्शन घेताना परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

परंतु मी सध्या ह्या पवित्र नैमिषारण्याच्या रचनेत मग्न आहे व ह्या स्थानाचा संबंध शंबला नगरीशी जोडण्यातही व्यग्र आहे व ह्यासाठी मी कुणाच्याही प्रश्नांची उत्तरे मुखाने किंवा लिहून देणार नाही, असा संकल्प सोडलेला आहे. 

त्यामुळे हे आप्तजनहो! तुम्हां सर्वांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. तुम्ही मला कितीही प्रश्न कुठल्याही वेळेस विचारू शकता. परंतु तुम्हाला त्यांची उत्तरे मात्र मी माझ्या कृतीतूनच देईन.”

अत्रिऋषिंचे हे शब्द ऐकताच देवर्षि नारदांसह सर्व ब्रह्मर्षिंना जाणीव झाली की आपले प्रश्न ह्या आदिपित्याला अर्थात भगवान अत्रिंना आधीच समजलेले आहेत. कारण त्या सर्वांना एकच प्रश्न पडला होता - की ‘ह्या कल्पातील सत्ययुगाच्या प्रथम चरणाच्या अंतीच मानव क्रियात्मकदृष्ट्या एवढा दुर्बल झालेला आहे, तर मग त्रेतायुगात व द्वापारयुगात काय होईल? आणि ह्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?' 

ते सर्वजण भगवान अत्रिंच्याच आश्रमामध्ये राहू लागले. आदिमाता अनसूया मात्र तेथे नव्हती. ती अत्रिऋषिंचे गुरुकुल सांभाळत, सर्व ऋषिस्त्रियांना निरनिराळे विषय व पद्धती समजावून सांगत होती व तो आश्रम नैमिषारण्यापासून खूपच दूर होता. 

सायंकाळपर्यंत अत्रिऋषि फक्त समिधा गोळा करीतच फिरत होते. ते प्रत्येक समिधा अगदी बारकाईने पारखूनच निवडत होते. सर्व ब्रह्मर्षिंनी वारंवार अत्रिऋषिंना विनवण्या केल्या, “हे भगवन! हे काम आम्ही करू.” परंतु भगवान अत्रिंनी मानेनेच नकार दिला होता. 

सूर्यास्त झाल्यानंतर अत्रिऋषि सर्वांसह आश्रमात परतले व मग भोजनोत्तर अत्रिऋषि स्वतः समिधांचे वेगवेगळे विभाजन करू लागले - वृक्षानुसार, लांबीनुसार, ओलेपणानुसार व गंधानुसार. 

अशा रितीने सर्व समिधांचे नीट वर्गीकरण करून त्यांनी वेगवेगळ्या समिधांच्या जुड्या वेगवेगळ्या पात्रात ठेवल्या.
त्या सर्वांना वाटले की आतातरी अत्रिऋषि विश्राम करतील. परंतु लगेचच अत्रिऋषि पलाशवृक्षाची पाने घेऊन त्याच्यापासून पत्रावळी व द्रोण बनवू लागले. 

ह्यावेळेससुद्धा त्या सर्वांच्या विनंतीला नकार देऊन अत्रिऋषि स्वतः एकटेच पत्रावळी व द्रोण बनवू लागले. अत्यंत काटेकोरपणे ते पानांची निवड करत होते व अत्यंत सुबक काठ असलेल्या पत्रावळी व द्रोण तयार करत होते. 

देवर्षि नारदांनी सर्व ब्रह्मर्षिंना नजरेनेच खुणावले - ‘बघा! एकाही पानाला अगदी लहानसेही छिद्र नाही किंवा एकही पान थोडेसेसुद्धा खंडित झालेले नाही.' 

पत्रावळी व द्रोण बनवून होताच त्या सर्व गोष्टी अत्रिऋषिंनी एका रिकाम्या कोनाड्यात ठेवून दिल्या व त्या ब्रह्मर्षिंना म्हणाले, “तुमच्या मनात मला सहाय्य करण्याचे आहे ना! मग उद्याच्या दिवसात ह्या सर्व ताज्या पलाशपर्णांच्या हिरव्या पत्रावळी व द्रोण उन्हात सुकवून ठेवण्याचे काम करा.” एवढे बोलून भगवान अत्रिऋषि त्यांच्या ध्यानासाठी ध्यानकुटीमध्ये गेले. 

दुसऱ्या दिवशी सर्व ब्रह्मर्षि नित्यानुसार ब्राह्ममुहुर्तावर उठून आपापल्या साधना पूर्ण करून, सूर्योदयापासून आपल्या कामास लागले. अत्यंत तन्मयतेने प्रत्येक ब्रह्मर्षि आपले काम करीत होता. सूर्यास्तापर्यंत त्या सर्व पत्रावळी व द्रोण व्यवस्थित सुकले होते व कोरडे झाले होते.

सूर्यास्ताला अत्रिऋषि आश्रमात परत येताच सर्व ब्रह्मर्षिंनी अगदी बालकाच्या आनंदाने त्या सर्व पत्रावळी व द्रोण कसे व्यवस्थित सुकले आहेत, हे अत्रिऋषिंना दाखविले. 

अत्रिऋषिंनी त्यांच्या कष्टांचे कौतुक केले व मग विचारले, “ह्यांतील मध्याह्नापर्यंत सुकलेल्या पत्रावळी व द्रोण कुठले? मध्याह्नापासून दुपारपर्यंत सुकलेले कुठले? व ज्यांना सुकण्यास सूर्यास्तापर्यंत वेळ लागला ते कुठले?” 

आता सर्वच ब्रह्मर्षि बुचकळ्यात पडले होते. त्यांनी असे निरीक्षण केलेच नव्हते व आध्यात्मिक अधिकार वापरून हे जाणून घेणे भगवान अत्रिंच्यासमोर चुकीचे ठरले असते. 

ह्यामुळे सर्व ब्रह्मर्षिंनी लज्जित होऊन आपली चूक कबूल केली.

त्यावर अत्रिऋषिंनी विचारले, “पण असे कसे घडले? तुम्हाला तर ह्या प्रक्रियेचे महत्त्व नीट ठाऊक आहे.” 

कुणाकडेच ह्याचे उत्तर नव्हते.

बापू पुढे तुलसीपत्र-१३७८ मध्ये लिहीतात, 

मनोमन वरमलेल्या त्या सर्व ब्रह्मर्षिंकडे अत्यंत सौजन्याने पाहत अत्रिऋषि म्हणाले, “पुत्रहो! अपराधीपणाची भावना सोडून द्या

कारण आपल्या चुकीमुळे अपराधीपणाची भावना निर्माण झाली की मग हळूहळू खंत वाटू लागते आणि ही खंत सतत मनाला बोचत राहिली की त्याचेच रूपांतर विषादात होते किंवा न्यूनगंडात होते व हे तर अधिक चुकीचे आहे. 

आज तुम्हीच पलाशवृक्षाची पाने गोळा करा, तुम्हीच पत्रावळी व द्रोण बनवा आणि तुम्हीच उद्या ते सुकत ठेवा व तेव्हा निरीक्षण करण्यास चुकू नका.

मी माझ्या ध्यानासाठी आंतरकुटीत जात आहे व उद्या सूर्यास्ताच्या वेळेसच मी बाहेर येईन. त्यावेळेस सर्व काम संपवून तयार रहा.” 

सर्व ब्रह्मर्षि अत्यंत विचारपूर्वक व उत्साहाने आपल्या कामास लागले. त्यांनी अत्यंत चोखपणे सर्व कार्य अत्रिऋषिंच्या आज्ञेनुसार करून दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत व्यवस्थित मांडून ठेवले. 

एकट्या देवर्षि नारदांनी मात्र काहीच काम केले नव्हते. ते फक्त त्या प्रत्येक ब्रह्मर्षिबरोबर फिरत होते.

अत्रिऋषि बरोबर सांगितलेल्या वेळेस त्यांच्या ध्यानकुटीतून बाहेर आले आणि त्यांनी प्रश्नार्थक नजरेने त्या सर्व ब्रह्मर्षिंकडे पाहिले व त्याबरोबर प्रत्येक ब्रह्मर्षिने पुढे येऊन आपापले काम दाखविले. 

श्री अनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथील श्रीमूलार्कगणपतीचे दर्शन घेताना श्रद्धावान भक्त

प्रत्येकाचे काम अगदी नेटके झाले होते व त्यांना सुकणाऱ्या पानांची वर्गवारीही व्यवस्थित करता आली. 

परंतु तरीदेखील अत्रिऋषिंच्या चेहऱ्यावर काहीच समाधान दिसेना. आता त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस कुणाही ब्रह्मर्षिला होत नव्हते. कारण इतर सर्व ब्रह्मर्षि हे निर्मिती होते, तर भगवान अत्रि स्वयंभू होते - आदिशक्तीचे पुरुषरूप होते. 

अत्रिऋषिः- “हे मित्रजनहो! देवर्षि नारदांनीच काय ते सर्वोत्कृष्ट काम केलेले आहे. तुम्हां सर्वांचे काम फक्त शंभर गुणांपैकी १०० गुणांचे झालेले आहे, १०८ गुणांचे नाही.” 

आता तर सर्व ब्रह्मर्षि अधिकच बुचकळ्यात पडले. ‘देवर्षि नारदांनी तर एकही पलाशपर्ण गोळा केले नव्हते, एकही द्रोण किंवा पत्रावळ बनविली नव्हती. मग हे कसे काय?' हा विचार त्या प्रत्येकाच्या मनात येत होता. 

परंतु त्या प्रत्येकाला मात्र एक पुरेपूर खात्री होती की भगवान अत्रि कधीही असत्य भाषण करणार नाहीत, पक्षपात करणार नाहीत किंवा आपली परीक्षा घेण्यासाठी वास्तव बदलून मांडणार नाहीत. 

तेवढ्यात त्या सर्व ब्रह्मर्षिंना जाणवले की आश्रमाबाहेर त्या सर्वांचे प्रमुख ऋषिशिष्य आलेले आहेत - ज्यांत काही महर्षि आहेत, काही तपस्वी ऋषि आहेत, काही नवीन ऋषि आहेत आणि काही ऋषिकुमारही आहेत. 

आता अत्रिऋषिंनी त्या सर्वांना परत दोन दिवस तेच कार्य त्यांच्या त्यांच्या शिष्यांकडून करून घेण्याची आज्ञा दिली व म्हणाले, “ह्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रत्येक शिष्याला त्याच्या त्याच्या कार्यानुसार गुण देणार आहात व मी तुम्हाला.” 

सर्व ब्रह्मर्षिंनी आपापल्या शिष्यांना अत्रिऋषिंची आज्ञा समजावून सांगितली व ते स्वतः प्रत्येक शिष्याच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण करू लागले. 

दोन दिवसांनी अत्रिऋषि परत त्याचवेळेस बाहेर आले व त्याबरोबर प्रत्येक ब्रह्मर्षिने .आपापल्या शिष्याचे काम अत्रिऋषिंना दाखवून, त्याच्याचबरोबर त्या प्रत्येकाला मिळालेले शंभरपैकी गुणही सांगितले.

ह्यानंतर भगवान अत्रिंनी ब्रह्मर्षिंच्या सर्व शिष्यांना त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाण्यास सांगितले. 

ते सर्व महर्षि व ऋषि तेथून निघून जाताच, सर्व ब्रह्मर्षिंनी अत्यंत बालभावाने अत्रिऋषिंकडे अत्यंत उत्कंठेने व जिज्ञासेने पाहिले. 

अत्रिऋषि त्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद देऊन बोलू लागले, “प्रिय आप्तजनहो! तुमच्या अगदी ‘महर्षि'शिष्यांनासुद्धा १०० पैकी १०० गुणसुद्धा मिळालेले नाहीत. ह्याचे कारण काय?” 

सर्व ब्रह्मर्षिंनी खूप विचार केला. परंतु त्यांना उत्तर सापडेना व उत्तर शोधण्यासाठी ते त्यांच्याकडील सिद्धी अत्रिआश्रमात वापरू शकत नव्हते. त्यामुळे त्या सर्वांनी अत्यंत विनयाने प्रणिपात करून भगवान अत्रिंना सांगितले, “आम्हाला ह्यामागील कारण कळत नाही आहे. 

आम्हाला स्वतःलाही १०० पैकी १०८ गुण मिळू शकले नाहीत व आमच्या शिष्यांना तर १०० गुणही मिळू शकले नाहीत. आमची मती कुंठित झालेली आहे. 

हे देवर्षि नारद! तुलाच १०० पैकी १०८ गुण मिळालेले आहेत. तू तरी कृपा करून आमच्या प्रश्नांची उत्तरे दे.”

देवर्षि नारदांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “भगवान अत्रिंच्या शब्दाबाहेर जाणे मलादेखील शक्य नाही व माझा भगवान अत्रिंच्या अनुकंपेवर व अनुग्रहावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तेच काय करायचे ते करतील.” 

भगवान अत्रिंनी तत्काळ आदिमाता अनसूयेचे स्मरण केले व आता क्षणार्धात अत्रिऋषिंच्या बाजूला आदिमाता अनसूया दिसू लागली. 

त्या वत्सल आदिमातेला पाहताच त्या सर्व ब्रह्मर्षिंना रडू कोसळले. आदिमाताच ती! तिचे हृदय कळवळून उठले व तिने तत्काळ श्रीविद्यापुत्र त्रिविक्रमास तेथे पाचारण केले. 

बापू पुढे तुलसीपत्र-१३७९ मध्ये लिहीतात, 

आदिमाता अनसूयेच्या आज्ञेनुसार भगवान त्रिविक्रम त्या आश्रमात येऊन त्या सर्व ब्रह्मर्षिंशी बोलू लागला, “हे मित्रजनहो! तुम्ही सर्व ब्रह्मर्षि माझे अत्यंत निकटचे आप्त आहात आणि तुम्हां प्रत्येकाची क्षमता, कार्यक्षमता व ज्ञान अफाट आहे.

परंतु ह्या क्षणाला तुम्ही सर्वजण ‘आपण कुठेतरी कमी पडलो' ह्या भावनेत गुंतून पडला आहात. 

भगवान अत्रिंना तुम्ही जो प्रश्न विचारण्यासाठी येथे आलात - ‘ह्या कल्पामध्ये सत्ययुगाच्या प्रथम चरणानंतरच मानवसमाज अकार्यक्षम व दुर्बल होत चालला आहे, तर मग पुढे कसे होणार?' - ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच भगवान अत्रिंनी ही सर्व लीला घडवून आणली. 

तुम्ही काय, पण मी व ज्येष्ठ भ्राते हनुमंत व श्रीदत्तात्रेयही अत्रि-अनसूयेसमोर बालभावातच असतो.

आणि नेमके हेच तुम्ही सर्व विसरता आहात व म्हणूनच तुम्ही गुण कमी मिळाल्यामुळे लज्जित झाला आहात. तसे होण्याचे काहीच कारण नाही. कारण ब्रह्मर्षि अगस्त्य वेगळा व अत्रि-अनसूयेसमोर उभा राहिलेला बालभावातील अगस्त्य वेगळा. 

श्री अनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथील श्रीमूलार्कगणपति

बघा! येथे घडलेल्या सर्व कृतींकडे नीट पहा! तुमच्या हातून घडलेली पहिली चूक म्हणजे - तुम्ही अत्रिऋषिंच्या आज्ञेचे पालन करून पत्रावळी व द्रोण बनविलेत. परंतु स्वतः भगवान अत्रि द्रोण बनवीत असताना तुम्ही त्यांच्या कृतीचे नीट निरीक्षण केले नाहीत व त्यामुळेच अत्रि ऋषिंनी स्वतः बनविलेल्या वस्तूंचे वर्गीकरण कसे केले, ते तुमच्या लक्षात आले नाही. 

नेमकी हीच चूक ह्या कल्पाच्या सत्ययुगातील मानवाकडूनही होत आहे. तो ज्ञानार्जन करीत आहे, कामही करत आहे. परंतु ह्या कल्पातील हा मानव निरीक्षणशक्तीचा वापर करण्यात कमी पडत आहे. 

व नेमके हेच भगवान अत्रिंनी तुम्हाला दाखवून दिले आहे. 

तुमच्या प्रश्नाचे अर्धे उत्तर मिळाले ना?” 

आनंदित होऊन सर्व ब्रह्मर्षिंनी तत्काळ ‘साधू साधू' म्हणत भगवान त्रिविक्रमाच्या बोलण्यास अनुमोदन दिले.

आता भगवान त्रिविक्रमाने पुढे बोलण्यास सुरुवात केली, “प्रिय ब्रह्मर्षिगणहो! आता प्रश्नाच्या उत्तराचा उत्तरार्ध.

तुम्ही केलेली चूक, ह्या सर्व महर्षिंनीही केली. 

कारण तुम्ही सर्व महर्षिंचे व ऋषिंचे शिक्षकगुरु आहात व तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही तुमच्या शिष्यांना आज्ञा करताना त्यांच्यासमोर प्रांजळपणे मांडलाच नाहीत. 

शिक्षक स्वतः विद्यार्थीदशेत केलेल्या चुकांमधूनच हळूहळू घडत जातो व त्याने तेच अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना सांगून त्यांचे घडणे सोपे करायचे असते. 

तेही येथे घडले नाही व म्हणून तुमच्या ह्या चांगल्या विद्यार्थ्यांनाही खूपच कमी गुण मिळाले. 

ह्या वसुंधरेवरील ह्या कल्पात सध्या नेमके हेच घडत आहे. तुम्ही तुमच्या शिष्यांना तयार करण्यात अर्थात महर्षि व ऋषिंना तयार करण्यात कुठेही चुकलेला नाहीत व तेदेखील निरनिराळ्या अध्यापकांना व्यवस्थित घडवत आहेत. 

श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्‌ येथे विराजमान श्रीमूलार्क गणेशाच्या स्थापनेच्या वेळी झालेला याग

परंतु हे ऋषि नसलेले अध्यापक मात्र, स्वतःच्या चुकांमधून ते जे शिकले, ते त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर मांडत नाही आहेत व मुख्य म्हणजे निरीक्षण निरीक्षणानंतर कृती हा क्रम विद्यार्थ्यांना मिळेनासा झालेला आहे व त्यामुळेच ह्या कल्पात मानवाची कार्यक्षमता खूप लवकर कमी होत चालली आहे.” 

भारावून गेलेल्या सर्व ब्रह्मर्षिंनी प्रथम अत्रि-अनसूयेचे चरण धरले व नंतर त्रिविक्रमासही अभिवंदन केले. 

परंतु ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य मात्र काहीतरी आठवून विचारात गेल्यासारखे झाले. ते जाणून त्रिविक्रमाने त्यांना सरळ सरळ प्रश्न केला, “हे ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य! तुम्ही तर सर्वश्रेष्ठ अध्यापक आहात. तुम्ही का बरे विचारात गेला आहात? तुमच्या मनात काही प्रश्न आहे काय? तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारू शकता.” 

ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य म्हणाले, “हे त्रिविक्रमा! परंतु आमच्या प्रश्नाला एक अपवाद होता व आहे. ब्रह्मर्षि धौम्य ह्यांच्या आश्रमात मात्र सर्व व्यवस्थित चालू आहे व त्याचे कारणही कळत नाही. तेथे सर्वजण व्यवस्थित निरीक्षण करून अत्यंत सुंदर कार्य करीत असतात. ह्याचे कारण काय?” 

धौम्यऋषिंनीही याज्ञवल्क्यांना अनुमोदन दिले, “होय! परंतु मलासुद्धा त्याचे कारण कळू शकलेले नाही.”

भगवान त्रिविक्रम एक स्मितहास्य करून म्हणाला, “आदिमातेने कुठलाही प्रश्न निर्माण होण्याआधीच, त्याचे उत्तर तयार करून ठेवलेले असते. 

ब्रह्मर्षि धौम्य १०० वर्षे देशभ्रमणाला गेलेले असताना त्यांच्या आश्रमाची धुरा त्यांचा ज्येष्ठ पुत्र महर्षि मंदार व त्याची पत्नी राजयोगिनी शमी हे सांभाळत होते. 

तुम्हाला पडलेला प्रश्न त्या दोघांना ९९ वर्षांपूर्वीच पडला व त्यासाठी त्यांनी अनेक शोध घेतले. परंतु उत्तर काही केल्या सापडेना व त्याचवेळेस असुरांच्या गुरुकुलात मात्र त्यांचे आसुरी काम शिस्तीने नीट चाललेले ह्या दोघांना समजले 

व ह्या दोघांनी आदिमातेच्या चरणी आपले तप व पावित्र्य सुरक्षित ठेवून, देवर्षि नारदांसह ते ताम्रतामस अरण्यामध्ये गेले व त्यांना अवघ्या काही दिवसांतच ज्ञानार्जनातील व कार्यातील निरीक्षणशक्तीचे व शिक्षकांनी आपल्या गतकाळातील चुका विद्यार्थ्यांसमोर गोष्टीरूपाने मांडण्याचे माहात्म्य कळून आले व ते लागलीच त्यांच्या आश्रमात परत आले. 

आदिमातेकडून त्यांना त्यांचे पावित्र्य व तप परत मिळताच ते निरीक्षणशक्तीचा व चुका गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा अभ्यास करू लागले. एके दिवशी असे चिंतन करता करता त्यांचे ध्यान लागले व त्या ध्यानात त्यांना ताम्रतामसमधील विद्यालये दिसू लागली व त्यांच्या लक्षात आले की आपण नकळत असुरांचे अनुकरण केले आहे - चांगल्यासाठी असले, तरी असुरांचे अनुकरण वाईटच; 

व म्हणून त्या दोघांनी प्रायश्चित्त म्हणून आपल्या सर्व साधना, उपासना, तपश्चर्या व पावित्र्य देवर्षि नारदांना दान म्हणून दिले. 

ह्या त्यांच्या सात्त्विक आचरणामुळे आदिमाता अत्यंत प्रसन्न झाली व तिने त्यांना वर मागण्यास सांगितले. ते दोघेही मलाच आराध्यदैवत मानत असल्यामुळे त्या दोघांनीही मलाच मार्ग विचारला, मलाच आदिमातेकडून त्यांच्यासाठी वरदान मागण्यास सांगितले 

आणि अशी माझी पंचाईत केली. मी त्यांना उचित वरदान मागण्याची बुद्धी देताच त्या दोघांनी आदिमातेस विचारले, “हे आदिमाते! असुरांचे अनुकरण सोडून उचित निरीक्षणशक्ती व उचित अध्यापनमार्ग ह्यांचा मूळ स्रोत कुठून येतो व कसा मिळवायचा, हे आम्हाला सांगशील काय? आम्हाला हेच वरदान हवे आहे. 

एवढेच नव्हे, तर असुरांच्या भूमीतही पवित्र श्रद्धावानांना नीट निरीक्षणपूर्वक कार्य करता येण्याचा स्रोतही आम्हाला सांग.” 

त्याबरोबर आदिमातेने त्या दोघांना ‘तथास्तु' म्हणून वरदान दिले व मला त्या दोघांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. मी त्या दोघांना घेऊन ह्या नैमिषारण्यातच आलो व त्यांना सर्वोच्च ध्यान शिकविले व त्या ध्यानातून मी त्यांना बुद्धीपलीकडील ज्ञानाचा, आसुरी शक्तींपलीकडील सत्त्वाचा स्रोत दाखविला. 

तो स्रोत म्हणजेच प्रत्येकाच्या मूलाधार चक्राचा स्वामी असणारा भगवान श्रीमूलार्क गणपती. 

मूलाधार चक्राचा अधिष्ठाता श्रीमूलार्कगणेश

स्वतःच्याच मूलाधार चक्रात व त्याचबरोबर वसुंधरेच्या मूलाधार चक्रात श्रीमूलार्क गणपतीस पाहताना, त्या दोघांचीही पूर्ण समर्पित होण्याची इच्छा अत्यंत प्रबळ होत गेली व शिखराला पोहोचली

व त्यांची ही सर्वोच्च, सर्वोत्कृष्ट इच्छा आदिमातेस अत्यंत भावली व श्रीगणपतीस अत्यंत प्रिय झाली.

मग महर्षि मंदारपासून एक वृक्ष निर्माण झाला व राजयोगिनी शमीपासून एक नाजूक रोप निर्माण झाले.

अर्थात मंदार वृक्ष व शमी वनस्पती प्रथमच उत्पन्न झाले 

व त्याबरोबर आदिमातेने वरदान दिले की जो कुणी श्रीगणपतीच्या कुठल्याही प्रतिमेचे पूजन, विशेषतः मूलार्क गणपतीचे पूजन मंदार वृक्षाखाली व शमीपत्रांनी करेल, त्याला ही बुद्धीपलीकडील निरीक्षणशक्ती व आसुरी परिस्थितीतही संकटमुक्त राहण्याची शक्ती अर्थात दैवी प्रज्ञा (दैवी प्रतिभा) प्राप्त होईल. 

अशा रितीने ह्या नैमिषारण्यामध्ये विश्वातील प्रथम मंदार वृक्ष व प्रथम शमीवनस्पती निर्माण झाले.

एका निमिषात (पापणी लवते तेवढा काळ) मंदार वृक्ष बहरल्यामुळे त्यालाच ‘निमिषवृक्ष' हे नाम मी दिले व नुकत्याच झालेल्या त्रिपुरासुरयुद्धाच्या वेळेस शिवपुत्रांचे बाण ह्या मंदार वृक्षाच्या, शमीच्या रसात बुडविलेल्या समिधांपासून मी स्वतःच तयार करून घेतले 

व म्हणून शिवपुत्रांचे भाले व बाण ताम्रतामस अरण्यातील भूमीत रोवले जाताच, तेथे जागोजागी मंदार वृक्ष व शमी निर्माण झाले - श्रद्धावानांचे संरक्षण करण्यासाठी.” 

ही कथा ऐकून सर्व ब्रह्मर्षि अत्यंत आनंदाने धौम्यऋषिंचे अभिनंदन करू लागले 

आणि तेवढ्यात त्या सर्वांच्या लक्षात आले की आपल्यासमोरच मंदार व शमी आहेत. सर्व ब्रह्मर्षिंनी अत्यंत प्रेमाने, वात्सल्याने व आदराने मंदारवृक्षास आलिंगन दिले 

व त्याबरोबर त्रिविक्रमाने त्या सर्व ब्रह्मर्षिंचे, सामान्य श्रद्धावानांविषयीचे कारुण्य जल म्हणून त्या मंदार वृक्षाच्या मुळांना अर्पण केले व त्या मंदार वृक्षाच्या मुळापासून भगवान त्रिविक्रमाच्या हातात ह्या विश्वातील मूलार्कगणेशाची आद्य स्वयंभू मूर्ती आली. 

ब्रह्मवादिनी लोपामुद्रा कैलाशावरील सर्वांना पुढे सांगू लागली, “तोच तो क्षण, जेव्हा स्वयंभू मूलार्कगणेशाची मूर्ती त्रिविक्रमाने नैमिषारण्यात अत्रिऋषिंच्या आश्रमासमोर स्थापन केली. 

कशासाठी? 

मूलार्कगणेशाच्या मंत्रपठणामुळे मानवाची प्रज्ञा अर्थात भगवंताने दिलेली बुद्धी, मानवाच्या मानवी बुद्धीवर व मानवी मनावर ताबा मिळविते आणि श्रद्धावानाची सर्व संकटांतून व चुकांतून मुक्तता करते.”