श्रीमहागणपति-दैवतविज्ञान

  श्रीमहागणपति-दैवतविज्ञान

Previous Article 

हिंदी  ગુજરાતી  ಕನ್ನಡ   বাংলা  తెలుగు   తెలుగు  

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (१५-१२-२००६)

‘पार्वतीमाता म्हणजे पर्वत धारण करणाऱ्या पृथ्वीचे तरल स्वरूप म्हणजेच चैतन्याला प्रगटण्यासाठी आधारभूत असणारी द्रव्यशक्ती (द्रव्य म्हणजे भौतिक पदार्थ). ह्या द्रव्यशक्तीच्या सहाय्याशिवाय चैतन्याचे आविष्कार प्रगट होऊ शकत नाहीत आणि चैतन्याशिवाय द्रव्यशक्तीला अस्तित्वच नाही म्हणजेच द्रव्यशक्ती ही त्या मूळ चैतन्यापासूनच निर्माण होणारी व स्थूलत्वाकडे प्रवास करणारी शक्ती आहे आणि म्हणूनच ह्या शक्तीचे तरल स्वरूप जगन्माता पार्वती आहे तर पूर्ण स्थूल स्वरूप पृथ्वी आहे. अशा ह्या पार्वतीचा पुत्र गणपती, हा म्हणूनच तरल स्वरूपात संपूर्ण विश्वाचा घनप्राण आहे, सूक्ष्म स्वरूपात नाद आहे आणि स्थूल स्वरूपात परमात्मा महागणपती आहे.

माघी गणेशोत्सवात विराजमान श्रीब्रह्मणस्पति

संपूर्ण विश्वच मुळी प्रगटले, ते प्रणवाच्या नादामधूनच. प्रणवाचा नाद निनादू लागला आणि निर्गुण निराकार ब्रह्मापासून सगुण साकार विश्वरूपाची उत्पत्ती होऊ लागली. ह्या ॐकाराचे म्हणजेच मूळ ध्वनीचे आज विश्वात निर्माण होत असणाऱ्या प्रत्येक ध्वनीशी असणारे नाते म्हणजेच श्रीमहागणपती. मानवाने त्याला लाभलेल्या बुद्धिमत्ता व विशेष ध्वनियुक्त संपर्कशक्ती म्हणजेच भाषा ह्यांच्या सहाय्यानेच सर्व चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून आपले श्रेष्ठत्व विकसित केले. मानवाच्या प्रत्येक विकासाच्या आरंभस्थानी ही संपर्ककुशलता म्हणजेच भाषाविज्ञान आहे व ह्या भाषाविज्ञानाचे सर्व स्रोत ह्या महागणपतीच्याच गुणांतून प्रगट, सिद्ध व साध्य होऊ शकतात. मानवाच्या विकसनशील प्रवासात त्याच्या बुद्धीला व मनाला आपल्या स्वत:च्या ह्या भाषाविद्येचे व ध्वनिशास्त्राचे अपरंपार महत्त्व जाणवू लागले व त्यातूनच ऋषींचे अर्थगर्भचिंतन सुरू झाले. नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा असणाऱ्या ह्या ऋषींनी आपल्या निरीक्षणशक्तीच्या सहाय्याने केलेल्या चिंतनातून त्यांना ध्वनीच्या स्थूल, सूक्ष्म व तरल अस्तित्वाची जाणीव होऊ लागली व सरतेशेवटी ते ॐकारापर्यंत जाऊन पोहोचले. ॐकाराचे ‘दर्शन' होताच ऋषींना परमेश्वराच्या सत्‌‍-चित्‌‍-आनंद स्वरूपाची ओळख पटली व मग अध्यात्मशास्त्र बहरू लागले. ह्याच आध्यात्मिक प्रवासामध्ये मूळ चैतन्याचे आणि द्रव्यशक्तीचे मानवासाठी असणारे अपरिहार्य नाते उलगडले गेले. मानवाला प्राप्त असणारे शरीर, मन व बुद्धी हे तीनही जीवनस्तंभ द्रव्यशक्तीच्या उचित वापराशिवाय उचित विकास साधू शकणार नाहीत ह्याची ऋषींना खात्री झाली व त्याचबरोबर मूळ चैतन्याच्या अधिष्ठानाशिवाय द्रव्यशक्तीचा उचित वापर करून घेता येणार नाही ह्याचीही खात्री झाली व म्हणूनच प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये भौतिक जीवनविषयक शास्त्रे व अध्यात्मविषयक शास्त्रे एकमेकांपासून कधीच भिन्न राहिली नाहीत. ह्या प्रतिभावंत ऋषींनी पुरेपूर ओळखले होते की भौतिक विद्यांना अध्यात्माचे अधिष्ठान असल्याशिवाय त्यांचा विधायक व रचनात्मक उपयोग करून घेणे शक्य होणार नाही. अध्यात्माचे अधिष्ठान नसलेल्या निख्खळ भौतिक शास्त्रांच्या प्रगतीतून अनेक विध्वंसक, विनाशकारी आणि अपवित्र शक्ती व कार्ये उत्पन्न होऊ शकतात. त्याचबरोबर ऋषींनीही हेही पुरेपूर ओळखले होते की केवळ आध्यात्मिक चिंतन, मनन व अभ्यास केल्यामुळे भौतिक विद्या कमकुवत व अविकसित राहिल्यास देहधारी मानवाचे शरीर, मन व बुद्धी ह्यांचा उचित विकास अशक्य आहे. ह्या दोन्ही तत्त्वांचा समतोल हेच मानवी जीवनाच्या विकासाचे व सुखांचे सूत्र आहे, हा निर्णय निश्चित झाला व ह्या सूत्रासच ‘गणेशविद्या' असे संबोधिले गेले व ह्या ‘समतोला'सच शिव-पार्वतीचा पुत्र म्हणजेच गणपती, हे नामाभिधान प्राप्त झाले.

सगुण साकार विश्वांतर्गत प्रत्येक गुणाचा समतोल राखणारी शक्ती म्हणजेच महागणपती आणि म्हणूनच तो गुणेशही व निरनिराळ्या गुणसमूहांचा अधिपती म्हणून गणेश.

सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या घरी श्री गणेशाचे आगमन

अध्यात्मशास्त्र व भौतिकशास्त्र म्हणजेच ज्ञान आणि विज्ञान ह्यांच्यामधील मूळ समतोल म्हणजेच महागणपती, हे जाणल्यानंतर ह्या महागणपतीच्या विविध सूक्ष्म आविष्कारांचा शोध सुरू झाला. ह्या शोधाच्या प्रक्रियेमध्येच प्राणमय देहातील मूलाधार चक्राचे प्रभुत्व हा गणपतीच गाजवितो, हे लक्षात आले व गणपती हा मूलाधार चक्राचा स्वामी म्हणून भारतीय शास्त्रात स्थापन झाला. भाषाविज्ञान व संपर्कशास्त्राचा अभ्यास करताना गणपतीचे आणखी एक सूक्ष्म स्वरूप जाणीवेच्या प्रांतात येऊ लागले आणि ते म्हणजे वाक्‌‍ म्हणजेच वाणी आणि बुद्धीचे संचालकत्व. त्यामुळेच श्रीगणपती, हा सर्व विद्यांचे आश्रयस्थान आणि बुद्धिदाता म्हणून समाजमानसात दृढ होत गेला.

अनेक विघ्नांशी, अडचणींशी व संकटांशी दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी सामना करणाऱ्या मानवी मनाचे ‘धैर्य' म्हणजेच सबुरीसुद्धा ह्या ‘समतोला'चेच सूक्ष्म स्वरूप आहे व हेच स्वरूप मानवास संकटातून मार्ग काढण्यास शिकविते, ही जाणीव ऋषींना झाली व श्रीमहागणपतीचे ‘विघ्नहर्ता' हे स्वरूप जाणीवेच्या प्रांतात आले. रामदास स्वामींनी अगदी साध्या सरळ व सोप्या शब्दांत म्हणूनच ह्याचे वर्णन सुखकर्ता, दु:खहर्ता व विघ्नांची वार्ताही न उरू देणारा असे केले.

श्रीमहागणपतीच्या ह्या लीला-स्वभावाची ओळख पटल्यानंतर साहजिकच त्याचा उपयोग करून घेण्यासाठी अनुसंधानरूप सेतु बांधण्याची एषणा ऋषींच्या विजिगीषु प्रज्ञेत उत्पन्न झाली व त्यातूनच ह्या महागणपतीच्या मंत्रांची व अथर्वशीर्षाची निर्मिती झाली. ‘गं' हे ध्वनिशास्त्रातील बीजाक्षर घन (स्थूल) व तरल ह्यामधील समतोल साधणारे आहे, हे अनुभवान्ती ओळखून ‘गं' हे गणेशबीज मंत्ररूपाने सिद्ध केले गेले व ‘गं' मधूनच गणपती हे नाव पुढे आले. त्याआधी ह्याच स्वरूपास ‘ब्रह्मणस्पती' ह्या सर्वसमावेशक नावाने संबोधिले जात होते. ‘ब्रह्मणस्पती' ते ‘गणपती' हा दैवताचा प्रवास नसून मानवाच्या जाणीवेचा प्रवास आहे आणि म्हणूनच हे दोघे वेगळे की एकच, हा वादच उत्पन्न होऊ शकत नाही. नाम व नामांतर हा मानवी प्रज्ञेच्या विकासाच्या त्या त्या अवस्थेचा सहज परिपाक असतो परंतु तो नामी मात्र एकच एक असतो व राहतो.'

अग्रलेखाच्या अंती सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात - 

‘मित्रांनो, ‘समतोल' व ‘संतुलन' ह्या गुणांशिवाय मानवाचेच काय, परंतु संपूर्ण विश्वाचेही अस्तित्व टिकू शकणार नाही. मानवी जीवनात हे संतुलन राखणे म्हणजेच विघ्ननाश होय. हे विघ्ननाशाचे सामर्थ्य, मानव विश्वाच्या मूळ ‘समतोल'शक्तीपासूनच मिळवू शकतो व म्हणूनच गणपती सदैव सर्व शुभकार्यांच्या अग्रस्थानी राहणारच आहे.'     

माघी गणेशोत्सवात अष्टविनायकांसह विराजमान श्रीब्रह्मणस्पतिस पूजन उपचार अर्पण करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू