गुणेश

हिंदी English ಕನ್ನಡ বাংলা తెలుగు తెలుగు தமிழ்
संदर्भ - सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (३०-०८-२००६)
गणपतीच्या जन्माची कथा बहुतेक सर्वांनाच माहीत असते. एकदा श्रीशिवशंकर ध्यान लावून बसले होते व किती काळानंतर घरी परत येतील हे पार्वतीमातेस माहीत नव्हते. पार्वतीमातेस अभ्यंगस्नान करावयाचे होते. शंकराच्या गणांना काही ती स्नानगृहाबाहेर उभे करून ठेवू शकत नव्हती. तिने आपल्या उजव्या मनगटाच्या त्वचेवर लावलेला सुगंधी लेप काढून, त्यापासून एक गोंडस बालकाची मूर्ती तयार केली व त्यात स्वतःच्या उच्छ्वासातून प्राण प्रक्षेपित केले. हाच तो पार्वतीनंदन, गौरीपुत्र विनायक अर्थात् गणपती. ह्या गणपतीस मग पार्वतीमातेने आज्ञा केली की माझ्या अंतर्गृहाच्या दरवाजाबाहेर द्वाररक्षक म्हणून उभा रहा आणि कुणालाही आत येऊ देऊ नकोस. अजूनपर्यंत जन्मदात्या पार्वतीमातेशिवाय दुसऱ्या कोणासही बालगणेशाने पाहिलेलेही नव्हते. पार्वतीमाता अंतर्गृहात गेली आणि बालगणेश मातेने दिलेल्या पाश व अंकुश ह्या आयुधांसह दारात उभा राहिला. तेवढ्यात श्रीशिवशंकर आपले ध्यान पूर्ण करून घरी परत आले. अर्थातच श्रीमहागणपतीने, त्या आठ वर्षांच्या बालकाने त्यांना आत जाण्यास मनाई केली. त्यामुळे अर्थातच श्रीशिवशंकर क्रोधायमान झाले. बालगणेशाने त्यांच्या क्रोधाला जराही न घाबरता सरळसरळ युद्धासाठी आव्हानच दिले. शिव-गणेशामधील हे युद्ध शंकरांना वाटले होते तेवढे सोपे ठरले नाही. बालगणेशाने आपले सामर्थ्य दाखवून दिले परंतु शेवटी शिवशंकरांनी सोडलेल्या पाशुपतास्त्राचा स्वीकार करून तो बालगणेश धारातीर्थी पडला व त्याचे मस्तक धडावेगळे झाले. एवढ्यात पार्वतीमाता पाशुपतास्त्राचा ध्वनी ओळखून लगबगीने बाहेर आली व तिच्या नवनिर्मित बालकाची ती अवस्था पाहून आक्रोश करू लागली. एका लहान बालकाशी एवढ्या कठोरपणे वागल्याबद्दल पार्वतीमातेने शिवशंकरांची कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली. शिवशंकरही ह्या कृत्यामुळे लज्जित झाले. पार्वतीमातेचे मातृत्व आता हळूहळू उग्रस्वरूप धारण करू लागले व पार्वती अक्राळविक्राळ रणचंडीस्वरूपात उभी ठाकली. शिव-शक्तीमधील हा अभूतपूर्व प्रसंग पाहून देवगुरु बृहस्पती मधे पडले व त्यांनी शिवशंकरास बालगणेशास पुनर्जीवन देण्याची आज्ञा केली. शिवशंकरांनी तसा निश्चय उच्चारताच पार्वतीमातेचे स्वरूप परत सौम्य होऊ लागले. शिवशंकरांनी आपल्या गणांस कुठल्याही नवजात बालकाचे मस्तक आणण्यास सांगितले. शंकराच्या गणांनी त्या नियोजित वेळेत आणले, ते हत्तीच्या बालकाचे मस्तक. अवघ्या काही क्षणांत जर नवीन मस्तक बालकाच्या धडावर लावले नाही तर बालकास जिवंत करणे शक्य होणार नाही व मग पार्वतीमातेच्या उग्रतम शक्तिस्वरूपास महाविध्वंस करण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरेल, हे जाणून शिवशंकरांनी तातडीने ते गजमुख बालगणेशाच्या धडावर बसविले व बालगणेश गजवदनस्वरूपात पुन्हा एकदा चैतन्यमय झाला.

वर्षानुवर्षे ही कथा अत्यंत श्रद्धेने ऐकली जाते व हा गणेश गजवदन का, ह्याचे उत्तरही त्यातूनच मिळत असते. ही कथा भावस्तरावर सत्यच आहे परंतु ह्या कथेमध्ये मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणारे तीन महान सिद्धांत प्रगट झालेले आहेत.
पार्वती म्हणजे ह्या संपूर्ण ब्रह्मांडातील द्रव्यशक्ती अर्थात उमा. द्रव्य म्हणजे पंचमहाभूतांपासून निर्माण होणारे प्रत्येक वस्तुजात, प्रत्येक पदार्थ. ह्या द्रव्यशक्तीचा लेप किंवा मल म्हणजेच द्रव्यशक्तीचा फलोत्पादक प्रभाव अर्थात गुण. प्रत्येक पदार्थ स्वतःच्या गुणांमुळे इतर पदार्थांवर जो प्रभाव टाकतो तो प्रभाव घडवून आणणारी शक्ती म्हणजेच गुण अथवा घनप्राण; म्हणूनच श्रीगणेशास ह्या संपूर्ण विश्वाचा घनप्राण मानलेले आहे.
मनुष्याच्या जीवनात श्वास, जल व अन्न हे तीन पदार्थ जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्या अस्तित्वाला जीवनीय ठरत असतात. मानवाच्या सर्व कृती व वृत्ती ज्यावर अवलंबून असतात, ते मानवाचे मन तर गुरु-लघु आदि भावशारीरि गुणांवरच अवलंबून असते. हा गुणांचा खेळ कधी मानवास उचित मार्गाने नेऊन यशाच्या शिखरावर बसवितो तर कधी अनुचित मार्गाने नेऊन खोल दरीत फेकून देतो. अन्नपदार्थ, औषधे, मनुष्याच्या संपर्कात येणारी इतर रसायने, इतर प्राणी व जीवजंतू, एवढेच नव्हे तर संपर्कात येणारे इतर सर्व मानव ह्यांच्या बऱ्यावाईट गुणांमुळेच मानवाच्या जीवनात अनेक नको त्या गोष्टी घडत असतात व त्यालाच आपण विघ्न असे म्हणतो.

महागणपती हा ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा अक्षय्य व अखंड घनप्राण असल्यामुळे मानवावर होणाऱ्या बाह्य वा अंतर्गत गुणांच्या विघ्नकारक प्रभावांना दूर करण्याचे कार्य करण्यास सदैव तत्पर असतो. कुठलाही पदार्थ किंवा द्रव्य त्याच्या गुणांमुळेच कार्यशील असते व कुठल्याही गुणाला आणि त्याच्या प्रभावाला पूर्णपणे बदलण्याचे सामर्थ्य ह्या गणेेशाकडे आहे; मात्र तो अनुचित प्रभावाचे रूपांतर उचित प्रभावात करतो, कधीही उचित प्रभावाचे रूपांतर अनुचित प्रभावात करत नाही आणि म्हणूनच हा महागणपती विघ्ननाशक, मंगलमूर्ती म्हणून सर्व जगास वंद्य झाला.
महागणपतीच्या भक्तीमुळे मानव आपल्या जीवनावरील विविध वाईट गुणांचे प्रभाव टाळू शकतो व म्हणूनच विघ्नेही. संतश्रेष्ठ रामदासस्वामींनी मंगलाचरणात म्हटल्याप्रमाणे, ‘गणाधीश जो ईश सर्वागुणांचा'.
