सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख – भाग ३

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३८४ व १३८५.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू तुलसीपत्र - १३८४ या अग्रलेखामध्ये लिहितात,
ऋषि गौतमाने अत्यंत नम्रतेने प्रणिपात करून ब्रह्मवादिनी लोपामुद्रेस प्रश्न केला, “हे ज्ञानदायिनी माते! मी जेव्हा सूर्यकिरणांचा आणि म्हणून सूर्यमंडलाचा अभ्यास करत होतो तेव्हा मला माता कूष्माण्डेचे दर्शन झाले होते व तेसुद्धा प्रत्येक सूर्यबिंबाच्या मध्ये, तसेच ही मला व्याघ्रावर बसून सूर्य व सूर्यसमान ताऱ्यांच्या मंडलातून भ्रमण करताना दिसत होती. ह्यामागील रहस्य तू मला कृपा करून सांगशील काय?”
लोपामुद्रेने गौतमाकडे कौतुकाने पाहत उत्तर दिले, “हे शुद्धबुद्धी गौतम! तुझा अभ्यास खरोखरच अत्यंत उचित मार्गाने चाललेला आहे व तू सत्यनिष्ठ साधक आहेस.
तुझी ही सत्यनिष्ठा हाच मानवी जीवनातील सर्व प्रकारचे अंधःकार नाहीसे करणारा सूर्य असतो आणि ही सत्यनिष्ठाच माता कूष्माण्डेस अत्यंत प्रिय आहे व त्यामुळेच तिने तुला दर्शन दिले.
प्रत्येक मानवाला अनेक ठिकाणी सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा होत असते व असे सत्य ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक अधिकारानुसार केवळ ही कूष्माण्डाच त्याला उघड करून दाखवीत असते.
ह्या कूष्माण्डेच्या हास्यातूनच सर्व सूर्य, ताऱ्यांचा जन्म झालेला आहे. कारण हीच आदिमातेची मूळ प्रकाशिनीशक्ती आहे. त्यामुळेच हिला ‘काशी' हे नाम आहे. सर्व विश्वांतील सर्व ताऱ्यांचे तेज एकत्र केले, तरीदेखील ते हिच्या अंशमात्र तेजापुढेही फिकेच असते आणि म्हणूनच सूर्य, ताऱ्यांच्या जवळून फिरतानाही हिला जराही त्रास होत नाही.
उलट ह्या वसुंधरेवर येणारे सूर्याचे थेट सूर्यकिरणसुद्धा हीच येथील जीवनाला सुसह्य असे बनविते.
प्रकाशाशिवाय नवनिर्मिती नाही आणि हिच्याशिवाय प्रकाश नाही आणि म्हणूनच हिला ‘सहस्रप्रकाशसुंदरी' असेही नामाभिधान आहे.
हिचीच साधना ब्रह्मर्षि कश्यपांनी केली होती व जे ज्ञान त्यांनी तुला दिले, ते ज्ञान तिने स्वतःच त्यांना बहाल केले होते. त्यामुळे हिच्याशी अंबज्ञ राहण्यासाठी ब्रह्मर्षि कश्यपांनी याज्ञवल्क्य, वसिष्ठादि ब्रह्मर्षिपरिवाराला बरोबर घेऊन एक यज्ञ आरंभिला. तेव्हा त्या यज्ञकुंडातून ही कूष्माण्डा प्रकट झाली व ‘बली' मागू लागली.
सर्व ब्रह्मर्षि बुचकळ्यात पडले. प्राण्यांचे बलिदान करणे त्यांच्या नियमांत बसत नव्हते. त्यामुळे त्या सर्वांनी आदिमाता अनसूयेस आवाहन केले व ती लगेचच अष्टादशभुजा स्वरूपात प्रकट झाली आणि तिने स्वतःच सांगितले की ‘वसुंधरेवरील ‘कूष्माण्ड' (अर्थात कोहळा) हे फल माझ्या मूळ रूपाला ‘बली' म्हणून अत्यंत प्रिय आहे व त्यामुळे तुम्ही हिलादेखील निःसंकोचपणे कोहळ्याचाच बली द्या. मी येथेच उभी राहते.'
अनसूयेच्या सांगण्यानुसार ब्रह्मर्षि कश्यपांनी एक रसरशीत कोहळ्याचा बली माता कूष्माण्डेस दिला व त्याबरोबर त्या सर्व ब्रह्मर्षिंना दिसले व कळले की आदिमातेच्या प्रत्येक उग्र रूपाससुद्धा कोहळ्याचा बळीच शांत करणारा आहे.
त्या यज्ञातून प्रकटलेल्या कूष्माण्डेने त्या कूष्माण्डबलीचा प्रेमाने स्वीकार करून सर्व यज्ञकर्त्यांस अभयवचन दिले की ‘आदिमातेच्या व माझ्या प्रत्येक रूपास कोहळ्याचे बलिदान हेच सर्वोच्च असेल.'
गौतमा! कोहळ्याचा नीट अभ्यास कर. ह्याच्यामध्ये सूर्याची दाहक उष्णता शोषून घेण्याचा अद्भुत गुण आहे.
कुठलीही नवनिर्मिती ही जशी प्रकाशाशिवाय अशक्य आहे, तशीच ‘रसा'शिवायसुद्धा अशक्य आहे व ‘रस'धातूचे अस्तित्व जलाशिवाय अशक्य आहे
आणि म्हणूनच त्या कूष्माण्डाच्या बलीचा स्वीकार करून चौथी नवदुर्गा असणाऱ्या कूष्माण्डा पार्वतीने ‘स्कन्दमाता' बनण्याची तयारी सुरू केली.
तिच्याच सूर्यतेजामध्ये कूष्माण्डरस मिसळून तिने सौम्यतेचा व शीतलतेचा स्वीकार केला आणि त्यामुळेच शिवपार्वतीचा पुत्र ‘स्कन्द' जन्मास येऊ शकला.
ही पाचवी नवदुर्गा ‘स्कन्दमाता' हीच शांभवी विद्येच्या नवव्या व दहाव्या कक्षांची, पायऱ्यांची अधिष्ठात्री देवी आहे
व हीच नवरात्रीच्या पंचमी तिथीच्या दिवस-रात्रीची नायिका आहे.”
आता एक अत्यंत तेजस्वी, अप्रतिम सौंदर्यवती अशी ऋषिकुमारी अत्यंत विनयाने उभी राहिली. तिने उठताना ब्रह्मवादिनी पूर्णाहूतीची अनुमती घेतली होती, हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते. पण ही कोण? हे कुणालाच ठाऊक नव्हते.
त्या तरुणीकडे पाहून लोपामुद्रेने अत्यंत वात्सल्याने विचारले, “कन्ये! तुझा काय प्रश्न आहे?” तिने अर्धोन्मीलित पापण्यांनीच प्रश्न विचारला, “सर्व सूर्यांचे तेज सहजपणे सहन करणाऱ्या पार्वतीस शिवाचे .... (अनुच्चारित शब्द - वीर्य) व त्यापासून बनलेला गर्भ सहन होईना, हे कसे शक्य आहे? ह्यामागे नक्कीच काहीतरी पवित्र व अतिगुप्त असे रहस्य असावे. मला कायम ह्या रहस्याचा शोध घ्यावा असे वाटते व त्यासाठी मला स्कन्दमातेची आराधना करायची आहे. मी कुणाकडे जावे?”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने तिला जवळ बोलावून तिच्या मस्तकाचे अवघ्राणन केले व म्हणाली, “हे राजर्षि शशिभूषण व ब्रह्मवादिनी पूर्णाहूति! तुमची ही कन्या खरोखरच तिच्या नामाप्रमाणे ‘अ-हल्या' आहे.”
बापू पुढे तुलसीपत्र - १३८५ या अग्रलेखामध्ये लिहितात,
लोपामुद्रेने अहल्येशी काही वार्तालाप हळू आवाजात केला व तिला परत तिच्या मातेच्या जवळ जाऊन बसण्यास सांगितले आणि मग ती पुढे बोलू लागली, “ह्या अहल्येने खरोखरच अत्यंत उत्कृष्ट व पवित्र इच्छा व्यक्त केली आहे.
नवदुर्गा स्कन्दमातेची उपासना स्त्री व पुरुष दोघेही करू शकतात, वैरागी व प्रापंचिक दोघेही करू शकतात, श्रीमंत व दरिद्री दोघेही करू शकतात, ज्ञानी व अज्ञानी दोघेही करू शकतात, ह्यात प्रश्नच नाही.
कारण ही नवदुर्गा स्कन्दमाता आपल्या पुत्रांना, कन्यांना पराक्रम, शौर्य, रणविवेक व आक्रमकता ह्या गुणांबरोबरच, उचित ठिकाणी क्षमा व कष्ट आनंदाने सहन करण्याची क्षमता देत असते
आणि ह्या सर्व गुणांमुळेच वसुंधरेवर अनेकानेक पवित्र व पराक्रमी राजे उत्पन्न झाले.
तसेच भारतवर्षामध्ये जेव्हा जेव्हा सनातनधर्माचा ऱ्हास होऊ लागतो व त्याला कारण ‘कुमार्गीयांचे आक्रमण' हे असते, तेव्हा तेव्हा ही नवदुर्गा स्कन्दमाताच आपल्या काही चांगल्या भक्तांना वरील सर्व गुण पुरवीत राहते व सनातन वैदिक धर्मास परत सर्वोच्च पदावर नेऊन ठेवते.
आतापर्यंत हिची साधना जेव्हा जेव्हा केली गेली, तेव्हा तेव्हा भारतवर्षात स्कन्द कार्तिकेयाप्रमाणेच उत्कृष्ट सेनापती निर्माण झाले.
आता भंडासुराच्या रूपाने श्येन प्रदेशामध्ये (चीन) अशाच भारतविरोधी असुरांचा उदय झालेला आहे व त्यामुळे हे अहल्ये! तुझ्या अभ्यासामुळे व साधनेमुळे भंडासुराच्या वधासाठी योग्य ते पोषक वातावरण नक्कीच उत्पन्न होईल.
शांभवी विद्येच्या नवव्या व दहाव्या पायरीवर आध्यात्मिक साधनेमध्ये व प्रपंचामध्येही अनेक विकासविरोधकांशी अर्थात अभ्युदयविरोधकांशी जोरदार लढा द्यावा लागतो व त्यासाठी आसुरी वृत्तींशी लढण्यास शिकणे अत्यंत आवश्यक असते.
कारण आसुरी वृत्ती ह्या वृत्रासुराच्या गिधाडांद्वारे मानवी मनात प्रवेश करूनच वसुंधरेवरील आसुरी बल वाढवीत राहतात
आणि स्कन्द कार्तिकेय हा मानवी मनातील अशा आसुरी वृत्तींचा पूर्णपणे बीमोड घडवून आणण्याचे कार्य करीत असतो
आणि त्यासाठी त्याला त्याच्या स्वतःच्या साधनेची आवश्यकता नसते, तर नवरात्रिसाधनेची व आदिमातेच्या ज्ञानरसाने बनलेल्या व शौर्यरसाने घडलेल्या स्वरूपाच्या साधनेची आवश्यकता असते
व आदिमातेच्या ह्या स्वरूपास ‘श्रीललिताम्बिका' असे म्हणतात.

पुत्र स्कन्दास प्रथम स्तनपान देत असतानाच ह्या नवदुर्गा स्कन्दमातेने ‘ललितासहस्रनाम' प्रथम उच्चारले व त्यामुळे ललितासहस्रनामाचे पठण, अध्ययन, चिंतन व मनन हीच शांभवीविद्येच्या नवव्या व दहाव्या पायरीवरील प्रमुख साधना असते.
हे कन्ये अहल्ये! भगवान हयग्रीवाने स्वतः मार्कण्डेय ऋषिस हे ललितासहस्रनाम नुकतेच शिकविले आहे. तू ब्रह्मर्षि मार्कण्डेयांकडे जाऊन त्यांची शिष्या बन व ललितासहस्रनामाची साधिका हो आणि ‘वज्रादपि कठोराणि', ‘मृदूनि कुसुमादपि' ही सिद्धी प्राप्त करून घे.
कारण ह्या तत्त्वानेच नवदुर्गा स्कन्दमाता भरभरून वाहत असते.
हे शुद्धबुद्धी गौतम! तू हिच्याबरोबरच ब्रह्मर्षि मार्कण्डेयांच्या आश्रमात जावेस, अशी माझी सूचना आहे.”
लोपामुद्रेची ही सूचना ऐकताच राजर्षि शशिभूषण कन्येच्या काळजीने थोडासा चिंतातुर झाला - अविवाहित व तरुण अशा कन्येला तशाच अविवाहित व तरुण ऋषिकुमाराबरोबर लांबवरच्या प्रवासास पाठवणे त्याला पटत नव्हते. परंतु ब्रह्मवादिनी पूर्णाहुति मात्र अत्यंत आनंदित झाली होती.
शशिभूषणाने आपल्या पत्नीच्या कानात आपल्या मनातील वरील शंका बोलून दाखविताच, तिने मात्र सुहास्यवदनाने त्याच्या कानात सांगितले, “आपण फक्त एक शब्द विसरत आहात - ‘अनुरूप' - परस्परांस अनुरूप.”
ब्रह्मवादिनी लोपामुद्रा हे सर्व पाहतच होती व जाणतच होती. तिने ऋषि गौतमास व ऋषिकन्या अहल्येस स्वतःच्या जवळ बोलाविले व गौतमाच्या पालकपिता कश्यपास आणि अहल्येच्या मातापित्यांसही बोलाविले.
त्या सर्वांचाच होकार आला व कैलाशावर आनंदोत्सव पसरला. कारण तेथील प्रत्येकाला ह्या दांपत्याची अनुरूपता पूर्णपणे मान्य होती व आवडलेलीही होती.
स्वतः ब्रह्मर्षि वसिष्ठ व ब्रह्मवादिनी अरुंधतीने सोहळ्याची धुरा सांभाळली.
गौतमाने अहल्येचे पाणिग्रहण करून तो तिच्यासह ब्रह्मर्षि मार्कण्डेयांच्या आश्रमाकडे त्वरित निघाला.
तेथील प्रत्येक उपस्थिताला वाटत होते की ह्या नवपरिणित दांपत्याला विवाहानंतर थोडा काळ तरी विनाकष्टाचा व सुखसोयींचा मिळावा.
त्या सर्वांच्या मनातील ही भावना जाणून भगवान हयग्रीव स्वतः तेथे प्रकटला व आदिमातेस अभिवादन करून म्हणाला, “हे आदिमाते! मी ह्या नवपरिणित दांपत्यास माझ्या पाठीवर बसवून अवघ्या एका क्षणात मार्कण्डेयांच्या आश्रमात नेऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या २९ दिवसांचा प्रवासाचा समय, त्यांना वैवाहिक जीवनाच्या आरंभासाठी मिळेल.”
आदिमातेने आनंदपूर्वक हयग्रीवास अनुज्ञा दिली.
गौतम व अहल्येस हयग्रीवाने आपल्या स्कंधांवर घेतले व हात जोडून आदिमातेस प्रश्न केला, “हे आदिमाते! सर्व ब्रह्मर्षि व महर्षि हे येथे जमलेले असताना एकटा मार्कण्डेय मात्र अजूनही त्याच्याच आश्रमात का बरे बसून राहिला आहे?”
आदिमाता श्रीविद्येने उत्तर दिले, “नवब्रह्मर्षि मार्कण्डेय तुझीच वाट पाहत थांबला आहे.”