सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या भावविश्वातून - पार्वतीमातेच्या नवदुर्गा स्वरूपांची ओळख - भाग २

संदर्भ - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या दैनिक प्रत्यक्षमधील ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. १३८२ व १३८३.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू तुलसीपत्र-१३८२ या अग्रलेखामध्ये लिहीतात,
लोपामुद्रेने अत्यंत कौतुकाने ऋषि गौतमास आपल्याजवळ बोलाविले व त्याच्या कपाळाचे वात्सल्याने चुंबन घेऊन म्हणाली, “प्रिय गौतम! आताच ब्रह्मर्षि कश्यपांनी सांगितल्याप्रमाणे तू ‘सूर्यकिरण`विज्ञानाचा एक महान शास्त्रज्ञ आहेस. पण मी तुला एक प्रश्न विचारू काय?”
ऋषि गौतमाने तत्काळ विनयपूर्वक मान हलवूनच होकार दिला व लोपामुद्रेने त्यास प्रश्न केला, “ज्याअर्थी तू सूर्यकिरणविज्ञानाचा थोर शास्त्रज्ञ आहेस, त्याअर्थी तू सर्व प्रकारच्या सूर्यकिरण घटकांचा व्यवस्थित अभ्यास केलेला असावास. मग तू चंद्रकिरणांचाही अभ्यास निश्चितपणे केलेला असशील ना?”
ऋषि गौतमाने उत्तर दिले, “होय माते.”
लोपामुद्रेने लगेचच त्यास पुढील प्रश्न केला, “हे गौतमा! सूर्याचेच किरण चंद्राकडून फक्त परावर्तित केले जातात; परंतु त्यांची दाहकता मात्र पूर्णपणे नाहीशी झालेली असते. हे कार्य चंद्राचे. मग ह्यामागील कारणतत्त्व व मूलतत्त्व तू शोधले आहेस काय?”
ऋषि गौतमाने उत्तर दिले, “माते! मी ह्या विभागाचा अजूनही विद्यार्थीच आहे. माझा ‘सूर्यकिरण ते चंद्रकिरण` ह्या शास्त्राचा अजून व्यवस्थित अभ्यास झालेला नाही.”
त्याच क्षणी पार्वतीने गौतमाला सांगितले, “हे वत्स गौतम! तू अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू व प्रामाणिक विद्यार्थी आहेस, अध्यापक आहेस व शास्त्रज्ञही आहेस. तुला ‘सूर्याचेच किरण चंद्राकडून परावर्तित होताना सौम्य, शीतल व आल्हाददायक कसे बनतात` ह्याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुझ्या स्वभावातील उग्रता हा अभ्यास पूर्ण होताच नाहीशी होईल व तुझ्यातील एकमेव तामसी गुण म्हणजे ‘अनियंत्रित क्रोध` नाहीसा झालेला असेल आणि हे तुझे तुलाच शोधावे लागेल. कारण ‘शोध` हीच मानवाला परिपूर्णतेकडे नेणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.”
आता लोपामुद्रेने परत बोलण्यास सुरुवात केली, “हे उपस्थित श्रेष्ठ श्रद्धावानहो! शांभवीविद्येच्या दुसऱ्या पायरीवर - ‘मला आदिमातेला प्रसन्न करून घ्यायचे आहे व सदैव प्रसन्न ठेवायचे आहे, तसेच मला त्रिविक्रमाचा सत्शिष्य व सुपुत्र व्हावयाचे आहे आणि सदैव त्याचीच सेवा करावयाची आहे`ही तळमळ हेच एकमेव साधन आहे.

त्रिविक्रम आपला सद्गुरु बनण्यासाठी, सर्वश्रेष्ठ ‘मणिद्वीपमंत्र` अर्थात ‘श्रीगुरुक्षेत्रम्मंत्र` उच्चारणे व ‘अंबज्ञ असणे` ह्या दोनच गोष्टी आवश्यक आहेत.
ह्या दुसऱ्या पायरीवरच अनेक वर्षे कष्ट करावे लागतात व तेव्हाच शांभवीविद्येची तिसरी पायरी अर्थात कक्षा आपल्यासाठी उघडी होते.
शांभवीविद्येच्या ह्या प्रथम दोन कक्षांची (पायऱ्यांची) अधिष्ठात्री ही शैलपुत्री पार्वती आहे.
पार्वतीची ही नऊ ‘नवदुर्गा`स्वरूपेच क्रमाने शांभवीविद्येच्या अठरा कक्षांच्या अधिष्ठात्री देवता आहेत व त्यामागेही एक कारणपरंपरा व सिद्धांत आहे.
शांभवीविद्या ही मानवाच्या जीवनाला परिपूर्णतेकडे नेणारी उत्क्रांती आहे. ती क्रांति मार्गाने कधीच प्रवास करीत नाही व भक्तमाता पार्वतीचे संपूर्ण चरित्रच मुळी शांभवीविद्येचे मूर्तिमंत उदाहरण आहे.”
शिव-ऋषि तुंबरुंनी व देवर्षि नारदांनी अत्यंत विनयाने प्रणिपात करून ब्रह्मवादिनी लोपामुद्रेस प्रश्न केला, “हे लोपामुद्रे! तू कृपया अधिक विस्तारपूर्वक, पार्वतीचे चरित्र आणि ह्या नवदुर्गांची स्वरूपे व शांभवीविद्येच्या अठरा कक्षांशी असणारा त्यांचा संबंध विशद करून सांगशील काय?”
लोपामुद्रेने प्रसन्न चेहऱ्याने उत्तर दिले, “होय, नक्कीच. कारण ते शिकल्याशिवाय शांभवीविद्येची प्राथमिक ओळखसुद्धा अपूर्णच राहील.
हे श्रेष्ठ श्रद्धावानहो!
१) ‘सती`रूपाच्या आत्मदहनानंतर ही शिवप्रिया ‘पार्वती` म्हणून हिमालयाच्या पोटी जन्मास आली व म्हणून ही शैलपुत्री. ही शैलपुत्री अत्यंत आदर्श कन्या होती. ‘कन्या` म्हणून हिने पिता हिमवानास व माता मेनास जो परिपूर्ण आनंद दिला, तो खरोखरच विश्वातील प्रत्येक अपत्यासाठी अत्यंत आदर्श आहे व शांभवीविद्येच्या उपासकाला तर दुसऱ्या पायरीवर आपला पिता त्रिविक्रम ह्यास आनंदितच करायचे असते व ह्यामुळेच शांभवीविद्येच्या पहिल्या दोन कक्षांची अधिष्ठात्री शैलपुत्री पार्वती आहे. अर्थात नवरात्रीच्या प्रतिपदेची - पहिल्या दिवसरात्रीची नायिका.
२) हीच आदर्श कन्या शैलपुत्री पुढे सर्वगुणसंपन्न व सर्वश्रेष्ठ पती मिळविण्यासाठी अर्थात परमशिवाने तिचा स्वीकार करावा म्हणून शुद्ध मानवी प्रयासांनीच तपश्चर्येस बसली. त्याच तिच्या स्वरूपास ‘नवदुर्गा ब्रह्मचारिणी` असे म्हणतात व ही शांभवीविद्येच्या तिसऱ्या व चौथ्या कक्षांची अधिष्ठात्री आहे. अर्थात नवरात्रीच्या द्वितीया तिथीच्या दिवसरात्रीची नायिका आहे.
कारण शांभवीविद्येच्या तिसऱ्या व चौथ्या पायरीवर (१) एकांत (२) आराध्यदैवताचे चिंतन (३) त्याच्याच चरणी समर्पणाची पूर्ण भावना (४) त्यासाठी कुठलाही त्याग करण्याची सिद्धता ह्या चार साधनांचीच आवश्यकता असते व हे चारही गुण ब्रह्मचारिणीच्या चिंतनाने व पूजनाने मानवास प्राप्त होतात.”
शिव-ऋषि तुंबरुंनी आदरपूर्वक प्रश्न केला, “परंतु कुठले आराध्यदैवत निवडायचे?”
आता ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य उठून उभे राहिले व म्हणाले, “श्रीचण्डिकाकुलातील कुणाही एकास आपले आराध्यदैवत म्हणून निवडायचे पूर्ण स्वातंत्र्य आदिमातेने प्रत्येक श्रद्धावानास बहाल केलेले आहे. त्यामुळे ज्याला जे दैवत आवडते, भावते, जवळचे वाटते ते निवडण्याचा प्रत्येक श्रद्धावानाला पूर्ण अधिकारच आहे. ‘अमुकच दैवत निवडले पाहिजे` असा नियम नाही.”
देवर्षि नारदांनी नेहमीच्या मिस्कीलपणे ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांस प्रश्न केला, “श्रद्धावानाच्या संपूर्ण जीवनयज्ञाचा मार्गदर्शक असणाऱ्या व स्वतः त्रिविक्रमाने ‘नित्यगुरु` म्हणून स्वीकार केलेल्या ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांनी शांभवीविद्येची साधना करताना आपले आराध्यदैवत म्हणून कुणास निवडले होते?”
ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांनी नारदांची खेळी जाणून अत्यंत आदराने, पण तरीही संदिग्धच उत्तर दिले, “माझ्या आराध्यदैवताचे चरित्र अजून तू पाहिलेलेसुद्धा नाहीस व ते तुला लवकरच कळून येईल. कारण तुला व मला दोघांनाही ज्ञात आहे की भंडासुर जन्मास आला आहे.”
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू तुलसीपत्र-१३८३ या अग्रलेखामध्ये लिहीतात,
भक्तमाता पार्वती व ऋषि गौतम आणि मग देवर्षि नारद व ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य ह्यांच्यामधील संभाषण तेथे उपस्थित असणाऱ्या ऋषिकुमारांना व शिवगणांना स्पष्टपणे ऐकू आले होते; पण तेवढे स्पष्ट कळले मात्र नव्हते.
‘भंडासुर जन्मास आला आहे` ह्या ब्रह्मर्षि याज्ञवल्क्यांच्या उद्गारांमुळे तर सर्वच अचंबित झालेले होते.
त्या सर्वांची अस्वस्थता पाहून भक्तमाता पार्वतीने स्वतःहून परत बोलण्यास सुरुवात केली, “हे श्रद्धावानहो! भंडासुराच्या विषयीचे विचार व औत्सुक्य मनातून काढून टाका. कारण भंडासुर जरी जन्मास आलेला असला, तरी त्याने अजूनही कुठल्याच हालचालीस सुरुवातही केलेली नाही आणि एवढेच सांगते की भंडासुराशी युद्ध व्हावयाचेच आहे. पण ते सुरू होण्याआधी तुम्हां सर्वांना शांभवीविद्या समजणे अत्यंत आवश्यक आहे व आपल्याकडे भरपूर कालही आहे.
‘शिव-त्रिपुरासुर युद्ध` हे जसे शांभवीविद्येचे कथास्वरूप आहे, त्याचप्रमाणे ‘भंडासुराशी युद्ध व त्याचा वध` हे शांभवीविद्येच्या मानवी जीवनातील प्रत्यक्ष प्रभावाचे व कार्याचे कथास्वरूप आहे.”
भक्तमाता पार्वतीच्या ह्या उद्गारांबरोबर तेथील सर्वांची मने परत एकदा शांत झाली व ते परत लोपामुद्रेकडे वळून, ती आता पुढे काय सांगते ह्यावर लक्ष देऊन बसले.
ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने ऋषि गौतमाकडे पाहून सस्मित मुद्रेने सांगितले, “प्रिय वत्स गौतम! तू ‘सूर्यकिरण ते चंद्रकिरण` ह्या प्रवासाचा जो अभ्यास करणार आहेस, त्याचा मूळ स्रोत तिसरी नवदुर्गा ‘चंद्रघण्टा` हीच आहे.
ही ‘चंद्रघण्टा पार्वती` नवरात्रीतील तृतीयेच्या दिवस-रात्रीची नायिका आहे. ही दहा हात असलेली व मस्तकावर अर्धचंद्रालाच अर्थात शुद्ध अष्टमीच्या चंद्रालाच, केशकलापातील नाजूक घंटा म्हणून वापरणारी आहे.
हिच्या ह्या चंद्ररूपी घंटेतून निघणारा प्रकाश हा नादस्वरूपही असतो व ह्या घंटेचा होणारा ध्वनी प्रकाशलहरींनी बनलेला असतो.
अशी ही तिसरी नवदुर्गा चंद्रघण्टा, ध्वनी व प्रकाश ह्या दोन मूळ अभिव्यक्तींची एकरूपता करणारी व दाखविणारी आहे
प्रकाशकिरणांचा वेग हा ध्वनिलहरींच्या वेगापेक्षा अनेकपटीने जास्त आहे. परंतु ह्या नवदुर्गेची ही चंद्ररूपी घंटा हे एकमेव असे साधन आहे की जे प्रकाशलहरी व ध्वनिलहरी ह्यांचे एकमेकांत रूपांतर (Transformation) सहजतेने घडवून आणते आणि ही गोष्ट सर्व श्रद्धावानांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे व कायमस्वरूपी लक्षात ठेवण्याची आहे.
कारण ज्या प्रमाणात मानवाची चण्डिकाकुलावर श्रद्धा व विश्वास, त्याच प्रमाणात ही चंद्रघण्टा नवदुर्गा त्याच्या जीवनात कार्यशील होते व मग हिच्यामुळेच त्या श्रद्धावानाच्या प्रार्थनेचा ध्वनी प्रकाशलहरींच्या वेगाने प्रवास करतो व त्याच्या प्रार्थनेचे फलही अर्थात चण्डिकाकुलाचे वरदानही त्याच्याकडे तशाच शीघ्रगतीने येते.
मात्र ‘माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे` हे केवळ तोंडाने बोलून चालत नाही, तर तुमच्या कृतीतही ते उतरावे लागते व शांभवीविद्येची पाचवी व सहावी कक्षा अर्थात पायरी ही श्रद्धा व विश्वास आपल्या कृतीतून व आज्ञापालनातून सिद्ध करण्याचीच पायरी असते.
ह्यामुळे शांभवीविद्येच्या श्रद्धाचरण व विश्वासाचरण ह्याच ५व्या व ६व्या पायऱ्या आहेत आणि ह्या दोनही कक्षांची स्वामिनी ही ‘नवदुर्गा चंद्रघण्टा` आहे. ह्या दोन पायऱ्या श्रद्धावानाला सर्वांत महत्त्वाची गोष्ट बहाल करतात - धैर्य (सबूरी). ह्या धैर्याशिवाय मनुष्याचे जीवन पोकळच राहते. धैर्याच्या अभावामुळेच मनुष्य चुकीच्या मार्गाने जात राहतो, स्वतःचा अहंकार वाढवत राहतो, मोहात पडत राहतो व उचित दिशेला चुकीची दिशा मानून बसतो.
जो श्रद्धावान आपल्या आराध्यदैवताचे चिंतन, भजन, पूजन, नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत आपला विश्वास कृतीतून प्रकट करीत राहतो, त्याला ह्या नवदुर्गा चंद्रघण्टेकडून वेळोवेळी धैर्याचा पुरवठा होत राहतो आणि तोदेखील चंद्रकिरणांसारखा - सौम्य व शांतपणे.
पार्वतीच्या ह्याच रूपाचा आविष्कार, शिवाशी तिचा विवाह होताना झाला आणि म्हणूनच ‘चंद्रघण्टा` हेच शिवपत्नी पार्वतीचे नित्यस्वरूप आहे.
ह्या ‘चंद्रघण्टा` रूपात ही पार्वती परमशिवाची नित्यसहधर्मचारिणी झाली व शिवाने हिचे पाणिग्रहण करताना हिचा हात आपल्या हातात घेताच, हिने एक सौम्य, शांत, सुंदर व सात्त्विक हास्य केले.
ह्या हास्यालाच ‘ईषत् हास्य` असे म्हणतात व ह्या हास्यातूनच अनंत ब्रह्मांडांतील नवनव्या ताऱ्यांचा जन्म होत राहतो व तो प्रत्येक तारा प्रथम अंड्याच्या आकाराचा असतो आणि म्हणूनच चौथ्या नवदुर्गेचे नाम ‘कूष्माण्डा` असे आहे कारण प्रत्येक विश्व हे प्रथम ‘कूष्माण्ड`रूपातच असते.
शांभवीविद्येच्या ७व्या व ८व्या कक्षांची अर्थात पायऱ्यांची अधिष्ठात्री ही ‘नवदुर्गा कूष्माण्डा`च आहे. कारण शांभवीविद्येच्या ७व्या व ८व्या पायरीवर श्रद्धावानाला कर्मतपश्चर्या करावी लागते - अर्थात नवीन शोध लावून मानवी पातळीवरील नवनिर्मिती करावी लागते व कुठलीही नवनिर्मिती नवदुर्गा कूष्माण्डेच्या शक्तिपुरवठ्याशिवाय शक्यच नसते.
नवरात्रीच्या चतुर्थीच्या दिवस-रात्रीची ही ‘कूष्माण्डा नवदुर्गा` नायिका आहे व ह्यामुळेच नवीन शुभकार्यास मानवाने नवरात्री-चतुर्थीस सुरुवात केल्यास, त्याचे कार्य सुलभ बनते.
जीवनात काहीतरी श्रेष्ठ व उत्कृष्ट करून दाखविण्याची ज्या श्रद्धावानाची इच्छा असते, त्याने नवरात्रीतील चतुर्थीच्या रात्री अवश्य जागरण करून आदिमातेच्या ग्रंथांचे वाचन करावे व दिवसा तिचे पूजन करावे.”