भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 19

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अकथित इतिहासाचे काही पैलू - भाग 19

आपल्या लमाण वस्तीतील स्त्री-पुरुष, दुधाचा रतीब घालण्यासाठी त्या गावातील जवळजवळ प्रत्येक घरात जात असत कारण ह्यांच्याकडील दुधात थेंबभरही पाणी घातलेले नसे व त्यामुळे गावातील सर्वांनाच ह्या लमाणांकडील दूध अतिशय आवडू लागले होते.

काशीबाई एकटीच शांतपणे दुल्हेरावच्या वाड्यापासून अगदी जवळच असणार्‍या एका तळ्याच्या काठी बसली होती. तिच्या मनामध्ये असंख्य विचार दाटून येत होते. तिला कुठल्याही प्रकारे दुल्हेरावचा घात तर करायचाच होता, परंतु तिचे खरे निशाण होते, ब्रिगेडियर स्मिथ कारण ब्रिगेडियर स्मिथ दीड वर्षापूर्वी झाशीत रहात असताना, झाशीतील अनेक रहिवाशांशी अत्यंत चांगले संबंध ठेवून होता व त्यांतीलच काही लोकांना त्याने विविध मार्गांनी वश करून घेतले होते आणि त्यांतीलच काही जणांच्या सहाय्याने त्याने राणी लक्ष्मीबाईला लढवत-लढवत अशा ठिकाणी नेऊन पोहोचविले होते की जेथून तो राणी लक्ष्मीबाईचा सहज घात करू शकत होता. ती अवघड जागा त्याने स्वत:च शोधून काढली होती व तेथे मोठमोठ्या पाषाणांची अवाढव्य रचना करून ठेवली होती. त्या पाषाणांच्या समोर लक्ष्मीबाई येताच, त्या पाषाणांमागे लपलेल्या स्मिथने पाषाणावर उडी घेऊन, लक्ष्मीबाईच्या पाठीत तलवार आरपार घुसवली होती. राणी लक्ष्मीबाईच्या प्रिय घोड्याच्या अर्थात बादलच्या चारी पायांत गोळ्या ह्या ब्रिगेडियर स्मिथने स्वत:च मारल्या होत्या.

हा सर्व वृत्तांत काशीबाईला तिच्या, ‌‘सुंदरबाई‌’ नावाच्या खास मैत्रिणीने तीन दिवसांपूर्वीच सांगितला होता.

ही सुंदरबाई नेहमी मुंदरबेगम अर्थात मुंदरखातुनबरोबरच सदैव वावरत असे.

परंतु लढाईच्या त्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुंदर घायाळ होऊन जमिनीवर पडली व एका घोड्याच्या लाथेमुळे त्या पाषाणांच्या ढिगाच्या आडोशाला जाऊन पडली होती. तिच्या हातातील तलवार उडून गेल्यामुळे, ती एखाद्या मृत सैनिकाचे शस्त्र मिळविण्यासाठी हळूहळू सरकत पुढे येत होती आणि त्याच वेळेस स्मिथने राणी लक्ष्मीबाईवर खुनशी व भ्याड हल्ला केला.

दोन्ही पाय जायबंदी झालेल्या सुंदरबाईला उठून उभे राहताच येत नव्हते व त्यामुळे ती सूडाच्या भावनेने अधिकच पेटून उठून परत त्या पाषाणांच्या मागे जाऊन लपली व पूर्ण एक दिवस तिथेच लपून राहिली. त्यानंतर, अर्थात ब्रिटीश सैनिक तेथून हलल्यानंतर सुंदरबाई दुसर्‍या रात्री रांगत-रांगतच जवळच्या एका आदिवासी वस्तीवर गेली व तेथे पायांवर उपचार करून घेऊन, ती ह्या लोकांना शोधत-शोधत त्या लमाण वस्तीत तीन दिवसांपूर्वीच येऊन पोहोचली होती. 

सुंदरबाईला अजूनही दहा-वीस पावलांपेक्षा जास्त चालणे शक्य होत नव्हते व तिच्या मनात तर सूडाची भावना अतिशय प्रबळ होती. काशीबाईने सुंदरला वचन दिले होते की ती स्वत:च दुल्हेराव व स्मिथ ह्या दोघांनाही त्यांच्या घोर पापाची सजा देईल.

काशीबाई आज तळ्याजवळ वाट पहात बसली होती, ती ‌‘रामदीन वाल्मिकी‌’ची. त्यानेच सुंदरबाईला येथे आणून सोडले होते व तो आज मध्यरात्रीला तळ्याजवळ येणार होता, ब्रिगेडियर स्मिथचा पूर्ण ठावठिकाणा काढून.
रामदीन वाल्मिकी हा ‌‘शहीद मातादीन वाल्मिकी‌’चा ज्येष्ठ पुत्र होता. मातादीन वाल्मिकी हा मंगल पांडेच्या छावणीतील साफसफाईचे काम करणारा सैन्यकर्मचारी होता. ह्यानेच मंगल पांडेला, ब्रिटिशांकडून मिळणार्‍या नव्या रायफलींविषयी ‌‘काहीतरी गोंधळ असल्याचे‌’ सांगितले होते व त्यामुळेच मंगल पांडेने त्याच्याच सहाय्याने काडतुसांविषयीची सखोल माहिती मिळविली होती.

अनेक सैनिक मातादीनला ‌‘मातादीन भंगी‌’ असे हाक मारीत असत कारण तो भंगीकाम करत असे परंतु मंगल पांडे, ह्या घटनेपासून त्याला ‌‘मातादीन वाल्मिकी‌’ अशी हाक मारू लागला. ह्या मातादीनला मंगल पांडेबरोबरच ब्रिटिशांशी लढत असतानाच ब्रिटिशांनी पकडले व पुढे फासावर चढविले होते.

ह्यामुळे पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून रामदीन वाल्मिकी, प्रथम धनसिंह गुर्जरला सामील झाला होता व धनसिंह गुर्जरच्या मृत्यूनंतर झाशीच्या राणीच्या सैन्यात येऊन दाखल झाला होता व मोतीबाई आणि काशीबाईच्या सूचनेनुसारच ब्रिटीश छावणीत साफसफाईच्या कामावर राहिला होता व मोतीबाईच्याच योजनेनुसार ब्रिगेडियर स्मिथच्या छावणीत ‌‘सफाई कामगार‌’ म्हणून घुसला होता.

काशीबाई आतुरतेने रामदीन वाल्मिकीची वाट पहात बसली होती. बरोबर मध्यरात्र होता-होता रामदीन तेथे येऊन पोहोचला व त्याने ब्रिगेडियर स्मिथच्या छावणीचा ठावठिकाणा सविस्तरपणे काशीबाईला समजावून सांगितला.

काशीबाईने त्याला परत ब्रिगेडियर स्मिथच्या छावणीमध्येच पाठवून दिले आणि पौर्णिमेच्या रात्री अर्थात आठ दिवसांनी स्मिथच्या छावणीमध्येच तिची वाट पाहण्यास सांगितले.

पौर्णिमेच्या रात्री दुल्हेरावच्या घरामध्ये दुर्गादलाच्या 40 स्त्रिया कुळंबिणींच्या वेशात घुसून बसल्या होत्या. त्याच्या त्या विशाल वाड्यात किती नोकरचाकर दररोज सामील होत असत आणि त्यामुळे कितीही जण आत घुसू शकले असते.

आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दुल्हेरावच्या थोरल्या पत्नीच्या पहिल्या पुत्राचे बारसे होते व त्यासाठी भरपूर नातेवाईक त्यांच्या-त्यांच्या नोकर व कुळंबिणींसह रहायलाच आलेले होते.
रात्री दुल्हेरावच्या वाड्यामध्ये सर्व सामसूम होताच ह्या 200 लमाण स्त्री-पुरुषांनी, आतून व बाहेरून एकाच वेळेस जोरदार हल्ला चढविला. 

मोठमोठ्याने शंख फुंकून मोतीबाईने व सरदार मंजुनाथ पहाडीने सगळ्यांना आधी नीट जागे केले होते. त्यांना झोपलेल्या कुणालाही मारायचे नव्हते. तसेच गाववाल्यांसाठी ‌‘ब्रिटीश ऑफिसर‌’रूपी मुंदरबेगमने सांगितलेली खूण होती की शंखनाद झाल्यावर कुणीही दुल्हेरावच्या मदतीसाठी यायचे नाही.

ह्या प्रत्येक लमाण स्त्री-पुरुषाकडे कमीतकमी दोन शस्त्रे होतीच. लालाभाऊ बक्षींकडे व मुंदरबाईकडे दोन-दोन रायफली होत्या व ते दोघे दुल्हेरावच्या लोकांना टिपून मारणार होते - फक्त दुल्हेरावला सोडून.

जोरदार घनश्चक्री सुरू झाली. दुल्हेरावचे आलेले नातेवाईक, नोकर-चाकरसुद्धा ह्या जोरदार हल्ल्यामुळे घाबरून पळत सुटले. त्याचे जे नोकर व शिपाई लढू लागले, त्या प्रत्येकाला सपासप घाव घालून मारले गेले.

शेवटी एकटा दुल्हेराव उरला व त्याला हात-पाय बांधून दोरीने खेचत-खेचत त्याच्या वाड्याच्या भल्यामोठ्या प्रवेशद्वाराच्या समोरील एका विशाल वृक्षाच्या फांदीला टांगले गेले.

त्याच्या देहाला प्रत्येक जण एक-एक फटका मारत होता व त्याबरोबर त्याचा लोंबकळणारा देह वाटेल तसा हिंदकळत होता.

जोरजोरात परंतु वेगळ्या प्रकारे परत एकदा शंख वाजू लागले व ह्या खुणेबरोबर गावातील सर्व गावकरी तेथे जमा झाले. वाड्यामधून दुल्हेरावच्या सर्व स्त्रिया हे सर्व पहातच होत्या.

आपला प्रत्येक लमाण सैनिक हळूहळू दुल्हेरावच्या देहाला आपापल्या तलवारीच्या टोकाने टोचून-टोचून बेजार करू लागला. ह्याचबरोबर मोतीबाईने स्वत: हातात आसूड घेऊन त्याच्यावर फटके मारण्यास सुरुवात केली. दुल्हेरावचे हे हाल पाहणे गावकर्‍यांना शक्य होत नव्हते. परंतु आपल्या दोनशे सशस्त्र लमाणांना अधिक शस्त्रेच नव्हेत, तर दुल्हेरावच्या घराच्या पागेतून एक-एक घोडाही मिळाला होता व ह्या घोडदळाला तोंड द्यायची कुणाचीच ताकद नव्हती.

तीन तास असे त्याचे हाल-हाल केल्यानंतर त्याच्या पोटात स्वत: मोतीबाईने व मुंदरबेगमने तलवारी घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला व ते सर्व लमाण सैनिक भराभर तेथून निघू लागले.

शेवटच्या क्रमांकावर निघालेल्या सरदार मंजुनाथ पहाडींनी आपल्या खणखणीत आवाजात तेथील उपस्थितांना सांगितले की भारतमातेशी व राणी लक्ष्मीबाईशी फितुरी केल्याबद्दल ही शिक्षा आहे व अशीच शिक्षा प्रत्येक फितुराला मिळत राहील.

हा कडकडीत संदेश ब्रिटीश व्हाईसरॉयलाही अवघ्या सात दिवसांत त्या ठिकाणी आणता झाला.

आपले लमाण सैनिक दौडत जंगलातून स्मिथच्या छावणीच्या दिशेने पुढे निघाले होते. परंतु सर्वांना एकच प्रश्न पडला होता - ‌‘काशीबाई कुठे आहे?‌’

(कथा चालू)