गणपतीचा आवडता विलक्षण मोदक

English हिंदी ગુજરાતી বাংলা తెలుగు தமிழ் ಕನ್ನಡ മലയാളം
संदर्भ : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (०३-०९-२००८)
‘ॐ गं गणपतये नमः।
एकदा पार्वतीमाता बालगणेशास घेऊन अत्रि-अनसूयेच्या आश्रमामध्ये आली. आपल्या ह्या नातवाला पाहताच अनसूयामाता वात्सल्यकौतुकाने, ह्याचे किती लाड करू अन् किती नको, हा विचार करत करत अमर्याद लाड करू लागली. बाळाने हट्ट करावा आणि अनसूयेने तो पुरवावाच.
एके दिवशी पार्वतीमाता अनसूयामातेस म्हणालीसुद्धा की ह्या अशा लाडांची जर ह्या बालगणेशास सवय झाली तर कैलासावर परत गेल्यावर कसे बरे होईल? अनसूयामाता गोड हसली व म्हणाली, “अगं, तुझ्या नवऱ्याचेही असेच लाड केले होते, पण तरीही तो कैलासावर आनंदाने राहिलाच ना.” पार्वतीस अनसूयेचे म्हणणे पूर्णपणे पटले.

पार्वती पाहत होती की अनसूयामातेने कितीही लाड केले तरीही हे आपले बाळ अनसूयेच्या शब्दाबाहेर मात्र कधीच जात नाही व मुख्य म्हणजे तो ह्या लाडांमुळे शेफारूनही जात नाही. परंतु कैलासावर असताना मात्र ह्या बाळाच्या कानीकपाळी आपल्याला ओरडत फिरावे लागते. विचार करून करून पार्वती थकली. परंतु तिला उत्तर मात्र मिळेना. शेवटी तिने एकदा रात्री बालगणेश निद्राधीन झाल्यानंतर अनसूयामातेस हा प्रश्न विचारला. अनसूयामाता म्हणाली, “अगं, आज ना मी जरा मंत्रपठणामध्ये मग्न आहे. मला पुढील काही दिवसांत एक विशिष्ट मंत्रजपसंख्या पूर्ण करावयाची आहे. ती पूर्ण झाल्यावर मग बघू.”
त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वतः शिवशंकर कैलासाहून आपल्या मातापित्यांस भेटण्यासाठी व पत्नी आणि मुलास परत घेऊन जाण्यासाठी आले. शिवाच्या कोपिष्ट स्वभावामुळे कैलासावर राहताना सदैव थोडेसे सांभाळूनच वागणारी व बोलणारी पार्वती आतापर्यंत अनसूयेच्या आश्रमात निर्घोरपणे वावरत होती. शिवशंकरांना पाहताच तिचा मोकळेपणा आपोआप कमी झाला.
तो शिव मात्र आश्रमाच्या दारात दिसताच अनसूयामाता अत्यंत प्रेमाने पुढे गेली व त्याचे मंगल अभीष्ट करून आणि त्याचा हात धरून त्याला आत घेऊन आली. बालगणेश त्या बाल्यावस्थेत ज्या ओढीने पार्वतीच्या कुशीत शिरायचा, त्याच ओढीने शिवाला अनसूयामातेच्या कुशीत शिरताना पार्वतीमातेने पाहिले. तो भोळा सांब संपूर्ण दिवसभर आश्रमाच्या परिसरात फिरत रहायचा, बाळपणीच्या आठवणी सांगत रहायचा व मुख्य म्हणजे आश्रमातील त्याच्या बाळपणीच्या सवंगड्यांबरोबर अगदी लहान मुलाप्रमाणेच क्रीडा करीत रहायचा. त्या परमशिवाचे सवंगडीही काही बाल राहिलेले नव्हते. तेही मोठमोठे ऋषी झालेले होते.
सर्वांत मुख्य म्हणजे हा शिव रोज अनसूयामातेकडून भोजन भरवून घेण्यासाठी आसुसलेला असायचा. एकदा तर अशी वेळ आली की बालगणेशाला व शिवाला एकाच वेळेस जोराची भूक लागलेली होती, दोघांचाही हट्ट एकच होता की त्यांना अनसूयामातेनेच भरवावे. अनसूयामातेने शिवास सांगितले, “एवढा मोठा झालास, जरा थांब, थोडा धीर धर. आधी मी गणपतिबाळाला भरवते व त्याचे पोट भरले की मग तुझे बघते.” शिवशंकर नाराज होतात व म्हणतात, “तुझे म्हणणे मला मान्य आहे कारण हे माझेही बाळ आहे. परंतु तू माझ्यापेक्षा त्याच्यावरच जास्त प्रेम करतेस, असे पण वाटते. परंतु तुझे म्हणणे खरे आहे, मी थांबतो.”
बालगणेश जेवावयास बसला. लंबोदरच तो. त्यामुळे त्याची भूकही तेवढीच मोठी आणि त्या दिवशी तर गणपतीचे पोटच भरेना. अनसूयामाता त्याला भरवीतच राहिली. शिवशंकर बाजूलाच बाह्यतः डोळे बंद करून परंतु खरं म्हणजे कधी आपली पाळी येते, ह्याकडेच डोळे लावून बसले होते. पार्वतीमातेसही आश्चर्य वाटू लागले की आपला हा पुत्र अजून किती खात राहणार आहे? व हा व्याकूळ झालेला शिव किती वेळ धीर धरू शकणार आहे? एवढ्यात अनसूयामातेने श्रीबालगणपतीला सांगितले, “मी तुझ्यासाठी एक खास गोड पदार्थ केला आहे, तो आता खा.” आणि अनसूयामातेने त्या बालगणपतीस एक मोदक भरविला. त्या क्षणी बालगणपतीने एक सुंदरसा ढेकर दिला आणि काय आश्चर्य! त्याचबरोबर शिवशंकरांना तसेच तृप्तीचे सुखद एकवीस ढेकर आले. बालगणपती व शिव एकाच वेळेस अनसूयामातेस म्हणाले, “काय अप्रतिम आहे हा पदार्थ!”

पार्वतीस काही हे कोडे उलगडेना. त्या रात्री पार्वतीमाता परत अनसूयामातेस प्रश्न विचारू लागली. हे सर्व चमत्कार तुम्ही कसे काय करू शकता? आत्यंतिक लाड करूनसुद्धा हा बालगणपती तुमचे सर्व ऐकतो! हा कोपिष्ट शिव इथे येताक्षणीच एकदम नरम स्वभावाचा बनतो! बालगणेशाची भूक आज एवढी वाढत जाते! त्याची भूक असंख्य व अगणित विविध पदार्थांनी भागत नाही परंतु ह्या एका छोट्याशा नवीन पदार्थाने बालगणपतीचे पोट एका क्षणात भरून त्याला तृप्तीचा ढेकर येतो! आणि सर्वांवर कळस म्हणजे नेटाने धीर धरून बसलेल्या व भुकेने कासावीस झालेल्या शिवाचे पोटही बालगणपतीने तो एक मोदक खाताच पूर्णपणे भरले! बालगणेशाच्या एका ढेकराबरोबर शिवशंकरांस एकवीस ढेकर आले!
हे सर्व अत्यंत प्रेमळ असणाऱ्या पार्वतीमातेचे आश्चर्याचे उद्गार होते. परंतु प्रश्न मात्र एकच होता की ह्यामागील गोम काय? व हा विलक्षण मोदक नावाचा पदार्थ काय असतो?
अनसूयामाता म्हणाली, “हे सर्व आश्चर्य तुला वाटले व जो प्रश्नही पडला, त्यामागील जे कारण, तेच ह्या सर्व घटनांमागीलदेखील कारण आहे. तुझे जे तुझ्या पतीवर व पुत्रावर निरतिशय व निःस्वार्थ प्रेम आहे, तेच ते प्रेम - लाभेवीण प्रीती, हेच ह्या सर्वांमागील रहस्य आणि हा मोदक म्हणजे लाभेवीण प्रीतीचे म्हणजेच निख्खळ आनंदाचे अन्नमय अर्थात घनस्वरूप. हा बालगणपती विश्वाचा घनप्राण आहे व म्हणूनच ह्या घनप्राणास घन अर्थात स्थूलरूपातील हा निर्भेळ आनंद मोदकरूपाने भरविताक्षणीच तो तृप्त झाला व जे जे म्हणून स्वार्थोत्पन्न अर्थात षड्रिपु-उत्पन्न, ते ते जाळण्याचे ज्याचे कार्य आहे, त्या शिवाची तृप्तीही केवळ घनप्राणाने एक मोदक खाण्याने झाली व तीही २१ पट.”
पार्वतीमातेने अनसूयामातेस वंदन केले व ती म्हणाली, ‘हे सर्व भक्तिविश्वामध्ये चिरकाल व्हावे, असा आशीर्वाद द्या.” अनसूयामाता म्हणाली, “तथास्तु”.
....आणि त्या दिवसापासून हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा गणेशोत्सव सुरू झाला, गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जाऊ लागला व त्या दिवसापासून ज्याला एकपट दिल्याने शिव २१ पट तृप्त होतो, हे पाहून परमात्म्याच्या कुठल्याही रूपाच्या पूजनाच्या आरंभी श्रीगणपतीची पूजा सुरू झाली.'
अग्रलेखाच्या अंती सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात -
‘माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, मोदक म्हणजे लाभेवीण प्रीती व हा मोदक फक्त गणेशचतुर्थीलाच काय, परंतु रोज अर्पण करीत रहा व प्रसाद म्हणून तोच खात रहा. मग विघ्न टिकेलच कसे?'