सूर्यकोटीसमप्रभ - २

संदर्भ : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेख (०५-०९-२००६)
मागील पोस्टमध्ये आपण सद्गुरु अनिरुद्धांनी प्रतिपादित केलेली अंध:कासुराच्या वधाची कथा पाहिली. ‘ती कथा भारतातील पाचही प्रमुख उपासना-संप्रदायांना एकमेकांशी घट्ट जोडणारी कथा आहे. शैव, देवीपूजक, वैष्णव, गाणपत्य व सौर अशा पाचही संप्रदायांच्या आदिदैवतांना समानपणे व एकसाथ अधिष्ठित करताना ही कथा सहजतेने, रंग विविध असले तरी आभाळ एकच आहे, हेच दाखवून देते.

ह्या कथेमध्ये आध्यात्मिकदृष्ट्याही अनेक महत्त्वाची तत्त्वे प्रतिपादित झालेली आहेत. त्यातील काही मोजकीच आज आपण पाहणार आहोत. श्रीमहादेवांच्या क्रोधयुक्त प्रथम शब्दापासून श्रीविष्णूंनी एका असुराचा बागुलबुवा उत्पन्न केला. हा खराखुरा असुर नसून फक्त मातेच्या शब्दासाठी तिच्या लाडक्या बाळास धाक घालण्यासाठी उत्पन्न केला गेलेला बाहुला होता. शिवाच्या क्रोधयुक्त शब्दापासून श्रीविष्णूंनी बनविलेला हा असुररूपाचा बाहुला म्हणजेच अबोध मानवी मनाला असणारा परमेश्वराचा धाक होय. हा धाक चुकीची गोष्ट घडू नये म्हणजेच ‘मर्यादा उल्लंघन' (प्रज्ञापराध) होऊ नये म्हणून तो सत्त्वगुणी विष्णू म्हणजेच प्रत्येक मानवास प्राप्त असणारा विवेक उत्पन्न करत असतो व तोही शिवाच्या म्हणजेच पवित्र जाणिवेच्या प्रागट्याद्वारेच. प्रत्येक मानवाकडे बुद्धिनिष्ठ विवेक व पावित्र्याची जाणीव ह्या दोन्ही गोष्टी असतातच, त्या त्या मानवाच्या पुण्याईमुळे नव्हे तर भगवंताच्या अकारण कारुण्यामुळे. जसजसे कर्मस्वातंत्र्यामुळे प्रज्ञापराध वाढत जातो तसतसे त्यांचे अस्तित्वही क्षीण होऊ लागते व ‘प्रज्ञापराधात् रोग:' ह्या न्यायाने मानवाच्या आयुष्यात संकटे येत राहतात व त्यांना तोंड देण्याची क्षमता मात्र कमीकमी होत राहते. बालगणेशाच्या ह्या लीलेतून एक मर्यादापालनाचे तत्त्व सुंदरपणे पुढे ठेवले जाते. ह्या परमात्म्याने लहान वयात जे करणे योग्य नाही असे त्या जगदंबेस वाटते म्हणजेच द्रव्यशक्ती-प्रकृती माता पर्ववती जी मर्यादा घालून देते, तिचे पालन करणे औचित्यपूर्ण व आवश्यक आहे. परमात्मा श्रीमहागणपतीने आपल्या ह्या लीलेतून मानवासमोर हाच धडा घालून दिला आहे की श्रेष्ठ व ज्येष्ठ आप्तवाक्याची मर्यादा उल्लंघणे कधीही अनुचितच असते. अशा मर्यादाभंगाचा विचार केल्यास बागुलबुवा उत्पन्न होतो. मग जर हा विचार कृतीत आला तर खराखुरा असुर उत्पन्न होणार नाही काय? प्रत्येक मानवाने आपले वय, आपले शारीरिक व मानसिक बळ, आपले कर्तव्य व आपली जबाबदारी ह्यांच्या स्थितीचे भान ठेवूनच कुठलेही कार्य हाती घ्यावयास हवे.
श्रीविष्णूंच्या व जगन्माता पर्ववतीच्या ह्या उचित उपाययोजनेमुळे शिव बालगणेशास मातेकडे सोपवून आपल्या कार्यासाठी निघतात म्हणजेच ज्या क्षणी मानवी मन विवेकाने भौतिक शक्तीच्या मर्यादा ओळखते, त्या क्षणीच अंतर्मनातील पवित्रतेची जाणीव आपले असुरसंहाराचे कार्य विश्वसंचार करून करत राहते. मर्यादापालन होताच अंतर्मनातील पावित्र्याची जाणीव व सत्ता दोन्हीही जोडीने वाढू लागतात व मग मनातील व जीवनातील असुरांचा नाश ठरलेलाच.

पुढे बालगणेशांच्या मनात उत्पन्न झालेली भीती ते थुंकून टाकतात व त्यातूनच अक्राळविक्राळ व सतत वाढत जाणारा ‘अंध:कासुर' निर्माण होतो. मानव जेव्हा कुठल्याही दडपणामुळे किंवा दबावामुळे मर्यादापालन करतो तेव्हा काही काळानंतर मानवाला ते दडपण झुगारून द्यावेसे वाटते. अर्थातच इथे अपेक्षित असलेले दडपण म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचा धाक. जेव्हा मानवास हा धाक गैरसोयीचा वाटू लागतो तेव्हा एका क्षणी मानवी मन विवेकास विन्मुख होऊन हा धाक फेकून देते व अर्थातच त्या धाकाची जागा विकृत अहंकार व मुजोरपणा घेतो. हाच तो अंधार हेच स्वरूप असणारा अंध:कासुर. एकदा का हा अंध:कासुर प्रगटला की तो वाढतच राहतो. ‘मी काहीही केले तरीही तो परमेश्वर माझे काहीही वाकडे करू शकत नाही' अशी वृत्ती म्हणजेच खराखुरा अंधार-अंध:कासुर परंतु साक्षात पावित्र्याचा म्हणजेच शिवाचा व पार्वतीचा म्हणजेच कार्यशक्तीचा (द्रव्यशक्तीचा) पुत्र असणारा हा महागणपती म्हणजेच मानवी जीवात्म्याचा द्रव्यगुणसंपन्न सत्त्वगुण कितीही अल्प असला म्हणजेच लहान वयाचा असला तरीही ह्या अंध:कासुराचे संपूर्ण उच्चाटन करण्यास समर्थ असतो. ह्या द्रव्यगुणसंपन्न सत्त्वगुणास ह्या लढाईमध्ये भावगुणसंपन्न सत्त्वगुण श्रीविष्णू सहाय्य करतात व एका क्षणात त्या सत्त्वगुणाचे तेज ‘कोटीसूर्यसमप्रभ' होते व मग काय? तो बालगणेश अंध:कासुराचा नाश सहजपणे करतो. भावगुणसंपन्न सत्त्वगुण म्हणजेच भक्तीचा प्रभाव.'
अग्रलेखाच्या अंती सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात -
‘मित्रहो, प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठला वळणावर हा अंध:कासुर वारंवार येत राहतो परंतु त्या मंगलमूर्ती महागणपतीची आराधना व आपल्या इष्टदैवताची भक्ती तुम्हाला त्या वळणावरून अलगदपणे प्रकाशमयी मार्गावर नेऊन ठेवू शकते.'