वैशाख पौर्णिमा (vaishakh purnima)
वैशाख पौर्णिमा आणि त्या दिवशीच्या उपासनेचे महत्त्व सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. 27-04-2023 रोजीच्या प्रवचनात सांगितले व ‘वैशाख पौर्णिमा ही गुरुपौर्णिमेप्रमाणेच स्वत:ला सद्गुरुतत्त्वाशी जोडून घेण्यासाठी महत्त्वाची पर्वणी आहे’, असेही बापू म्हणाले. असे सांगितले जाते की वैशाख पौर्णिमा हा वर्षाचा असा दिवस आहे, ज्या दिवशी सद्गुरुतत्त्वाच्या मार्गदर्शनानुसार दिव्य ब्रह्मर्षिंच्या सभेत संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी त्या वर्षाची योजना बनविली जाते आणि सद्गु्रुतत्त्वाद्वारे या दिवशी संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणकारी स्पंदने प्रसारित केली जातात. ही स्पन्दने स्वीकारण्यासाठी भगवन्तास भजणे हा सहजसोपा मार्ग आहे.
प्रवचनाच्या सुरुवातीस श्रीमद्आदिशंकराचार्य विरचित 'भज गोविन्दम् ...' या प्रसिद्ध स्तोत्राचा संदर्भ बापूंनी दिला. ख्यातनाम गायिका भारतरत्न एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांनी गायलेले 'भज गोविन्दम् ...' हे स्तोत्र आपणापैकी अनेकांनी ऐकलेही असेल. या स्तोत्रातील 'पुनरपि जननं पुनरपि मरणं ...' या ओळीचा उल्लेख करून बापूंनी 'जीव पुन्हा पुन्हा जन्म-मरणाच्या फेर्यात का अडकतो' हे स्पष्ट केले.
मानवाच्या जीवनात त्याच्या 'मी'मधून सुरू झालेला त्याचा प्रवास त्याच्या 'मी'मध्येच संपतो आणि या संकुचित मीपणामुळे स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमापासून दूर गेलेला जीव जन्ममृत्यूच्या फे-यात अडकतो, असे बापूंनी सांगितले. मानवातील 'खरा मी' आणि 'खोटा मी' (True Self and False Self) म्हणजे काय आणि भक्ती करून 'खोटा मी' पासून मुक्त होऊन 'खरा मी' ओळखून त्यास प्रबळ कसे करावे याचे मार्गदर्शन बापूंनी 21 ऑगस्ट 2014 रोजीच्या हिंदी प्रवचनात केले आहे.
स्वयंभगवानाशी, हरिगुरुशी, इष्टदैवताशी मानवाने मीपणा सोडून वागले पाहिजे. जो ह्यासाठी प्रयास करतो, त्याच्या जीवनप्रवासाचा दिग्दर्शक स्वयंभगवान बनतो. 'स्वयंभगवानास जीवनाचा दिग्दर्शक बनवा, माझ्या जीवनाचा दिग्दर्शक, निर्माता, लेखक सर्वकाही तो त्रिविक्रमच आहे या भूमिकेतून जगा, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा', असेही बापू म्हणाले. 'राम' हे स्वयंभगवानाचे रूप आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते हा विश्वासच मानवाचे सर्व प्रश्न सोडवतो. महान सन्त श्रीतुलसीदासजींनी 'एक भरोसो एक बल एक आस बिस्वास। एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास।।' या दोह्यातून या विश्वासाबद्दल सांगितले आहे असेही बापू म्हणाले. बापूंनी दि. 23-03-2023 रोजीच्या प्रवचनात या दोह्याचा अर्थ सांगितला आहे. 'हरि अनन्त हरि कथा अनन्ता' या श्रीतुलसीदासजीविरचित श्रीरामचरितमानसच्या बालकाण्डातील चौपाईचा उल्लेख करून बापू म्हणाले की स्वयंभगवानाचे गुण अनन्त आहेत आणि तो कोणत्या गुणाने मदत करेल हे अतर्क्य आहे. स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या १८ वचनांपैकी 'मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्चित। मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात॥' हे वचन श्रद्धावानांस ठाऊक आहेच.
श्रद्धावानाचा भूतकाळ दुरुस्त करणारा, श्रद्धावानाच्या भविष्यकाळात बदल घडवू शकणारा स्वयंभगवान सतत वर्तमानकाळात असतो. श्रद्धावानाने स्वत:ला कधीही असहाय्य (हेल्पलेस) समजू नये. जेथे श्रद्धावान असतो, तेथे स्वयंभगवान असतोच, सहाय्यासाठी सक्रिय असतोच. जीवनाच्या प्रवासात मित्रं, नाती बदलत राहतात, जुनं टाकून नव्याचा स्वीकार करावा लागतो. मानवात परिस्थितीनुसार बदलण्याची ताकद स्वयंभगवानाने दिलेली आहे, पण त्याचा उपयोग करण्याऐवजी मानव मात्र सबबी, कारणं देत राहतो. 'सबब हे माझ्या संपूर्ण जीवनाचा नाश करू शकणारे फार मोठे संहारक अस्त्र आहे' हे बापूंनी दैनिक प्रत्यक्ष च्या 'उद्धरेत् आत्मना आत्मानम्' ह्या पहिल्याच अग्रलेखात स्पष्टपणे लिहिले आहे. संपूर्ण अग्रलेख आपण येथे वाचू शकता. मानवाच्या उद्धारासाठीचे अनेक पर्याय सद्गुरुतत्त्व उपलब्ध करून देत असते आणि वैशाख पौर्णिमेची उपासना हा त्यांतीलच एक सुंदर पर्याय आहे. या वर्षीची वैशाख पौर्णिमा नुकतीच झाली. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार वैशाख पौर्णिमेस करावयाची उपासना सर्व श्रद्धावानांनी केलीच असेल, याची मला खात्री आहे.